टाकाऊ प्लास्टिक पासून इंधन निर्मिती

टाकाऊ प्लास्टिक पासून इंधन निर्मिती

Sunday April 02, 2017,

6 min Read

आपल्या रोजच्या जीवनात प्लास्टिकच्या वस्तू वापरण्याचे प्रमाण किती आहे याचा आपण कधीच विचार करत नाही, कारण आपल्या जीवनशैलीत आता या गोष्टी अविभाज्य झाल्या आहेत नाही का? पण विचार करा की वापर झाल्यावर यापैकी किती गोष्टी आपण पुन्हा वापर करण्यासाठी ठेवून देतो किंवा भंगारवाल्याला विकतो, फारच थोड्या गोष्टी आपण जपून ठेवतो किंवा भंगारवाल्याला विकतो, बहुतांश वस्तू आपण कच-यात फेकून देतो. त्याचा परिणाम पर्यावरणाच्या प्रदुषणावर होतो हे बरेचदा आपल्या गावी सुध्दा नसते नाही का? पण आता समाज बदलतो आहे, जग, सरकार जागे होत आहे. पर्यावरणाच्या हानीचा विचार लोक करू लागले आहेत, त्यातूनच या टाकाऊ प्लास्टिक पासून पुन्हा वापर करता येईल असे काय करता येईल ज्यातून त्याचे होणारे प्रदुषण टाळता येईल हा विचार करण्यात आला आणि पुण्याजवळ या टाकाऊ प्लास्टिक पासून इंधन निर्मिती करण्याचे काम सुरू झाले ते ही स्वस्तातील आणि कमी प्रदुषण करणारे इंधन! आहे ना, इंटरेस्टिंग!


image


ही गोष्ट आहे केशव सिता मेमोरिअल फांऊडेशनच्या डॉ मेधा ताडपत्रीकर आणि त्यांच्या सहका-यांची. त्यांनी सामाजिक जाणिवेतून सुरू केलेल्या ‘रुद्र एनव्हार्मेंट सोल्यूशन्स’ या उपक्रमाचा फायदा आज परिसरातून ग्रामिण भागात पसरणा-या प्लास्टिक कच-याला कमी करून त्याची योग्य विल्हेवाट करण्यासाठी होत आहे, ‘युवर स्टोरी’च्या वाचकांसाठी आम्ही त्यांच्याकडून ही माहिती जाणून घेतली, त्याचा हा सारांश :

प्लॅस्टिकपासून इंधननिर्मिती करण्याची संकल्पना कशी सुचली, त्यावर बोलताना डॉ मेधा म्हणाल्या की, त्या नेहमी सर्वत्र फिरत असतात. २००९ साली त्या कान्हा अभयारण्यात गेल्या होत्या, तेथे प्लॅस्टिक खाल्ल्याने काही हरणांचा बळी गेल्याचे निदर्शनास आले. त्यातून केवळ हळहळ व्यक्त करण्यापेक्षा या प्लॅस्टिकबाबत काहीतरी केले पाहिजे असा विचार करून त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी याबाबत माहिती घेतली असता प्लॅस्टिक हे पेट्रोल आणि डिझेल बनविण्यात येणाऱ्या ‘टार’पासून तयार होत असल्याने त्यापासून (पॉलिऑईल) इंधननिर्मिती करण्याची कल्पना पुढे आली. प्लॅस्टिकवर काम करणारे अनेक जण आहेत. मात्र, तरीही हा प्रश्‍न सुटलेला नाही. विविध पिशव्या, पाऊच, औषधांची वेस्टने, टूथपेस्ट, ब्रश यांसारखे रोजच्या वापरातील जवळपास ३० ते ४० टक्के प्लॅस्टिक विकले जात नाही हे देखील त्यांच्या लक्षात आले त्यामुळे हे प्लॅस्टिक आणून त्याची विल्हेवाट लावणे शक्य होईल का याचा विचार त्या करू लागल्या.

पायरॉलिसीस ही संकल्पना काय आहे, आणि हा प्रकल्प कसा चालतो? याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, ही १०० वर्षे जुनी संकल्पना आहे. तिचा आधार घेत सुरवातीला आम्ही प्लॅस्टिक कुकरमध्ये स्टोव्हवर तापवले. त्याला लावलेल्या दोन नळ्यांमधून आलेला वायू पाण्यात सोडला. पाण्यावर तरंगलेले द्रावणाला पेटवले असता ते डिझेलप्रमाणे पेटल्याने तेलनिर्मितीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर स्वत: गुंतवणूक करून प्लॅस्टिकपासून इंधननिर्मितीचे मशिन तयार करण्यात आले. प्लॅस्टिक गोळा करून एका टाकीत टाकण्यात येते. ते वेगाने वितळण्यासाठी त्यात विघटन द्रव्य टाकले जाते. प्लॅस्टिक वितळून त्यातून गॅस बाहेर येतो. या वेळी पॉलिकार्बन साखळ्या (चेन) हायड्रोकार्बनमध्ये बदलतात. यामुळे एलपीजीसारखा गॅस मिळतो आणि दुसरीकडे पॉलीफ्युएल बाहेर येते. या तेलाची ज्वलनशील क्षमता ही डिझेलपेक्षाही जास्त असते. साधारणत: १०० किलो प्लॅस्टिकपासून ५० ते ६५ लिटरपर्यंत तेल मिळू शकते, तर २० ते २२ टक्के गॅस मिळतो. हा वायू इंधन म्हणून पुन्हा प्रकल्पात वापरला जातो, तर तेलाची इंधन म्हणून विक्री करण्यात येते. शिल्लक राहणारी काजळी रबर आणि प्लॅस्टिक उद्योगाला रंग म्हणून वापरण्यासाठी देण्यात येते.


image


या प्रकल्पासाठी प्लॅस्टिक वापरले जाते ते दूध, तेल, कॅरिबॅगसह सर्व प्रकारच्या आणि जाडीच्या पिशव्या, तेलाचे डबे, हॉटेलमध्ये मिळणारे पार्सलचे डबे, टूथपेस्टचे वेस्टन, ब्रश, औषधाची वेस्टने, पाणी, सॉफ्ट ड्रिंक अशा सर्व प्रकारच्या बाटल्या, शाम्पू, पावडरचे डबे, वेफर्स, बिस्किट, ब्रेड, खाण्याच्या पदार्थांची वेस्टने, कपड्याच्या साबणाची रॅपर्स, कॅसेट, सिडी, कव्हर, खेळणी, फुले, बादली यांसह सर्वच प्रकारच्या प्लॅस्टिकपासून बनविलेल्या वस्तू कच्चा माल म्हणून वापरता येतो. असे त्यांनी सांगितले.

कच्चा माल म्हणून टाकाऊ प्लॅस्टिक गोळा करण्याबाबत काय केले जाते ते सांगताना त्या म्हणाल्या की, प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आम्ही शहरातील विविध सोसायट्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तू सोडून इतर प्लॅस्टिकच्या गोष्टी वेगळ्या काढायला सांगितल्या. त्या देण्याची विनंती केली. नागरिकांनी साठविलेले हे प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी आम्ही आमच्या गाड्या वापरल्या. वाघोली, विमाननगर, कल्याणीनगर, खराडी, हडपसर, एनआयबीएम, उंड्री पिसोळी रोड, बिबवेवाडी, कोथरूड, कर्वेनगर, पिंपळे सौदागर,औंध, मॉडेल कॉलनी, प्रभात रोडसह पुण्यातील सर्व भागांतून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्यावर लोक माहिती देतात. त्या ठिकाणी जाऊन प्लॅस्टिक गोळा केले जाते. लोकांमध्ये जागृती वाढल्याने ते अक्षरश: वाट पाहत थांबतात. काही लोक तर कुरिअरने प्लॅस्टिक पाठवतात. मुळशी तालुक्यातील तीस गावांबरोबर ओल्या कचऱ्यावर काम ‘इनोरा’ स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने आम्ही या भागातील प्लॅस्टिक आणू लागलो. तसेच ‘टेलअस’ नावाची स्वयंसेवी संस्था पर्यटनस्थळांचे प्लॅस्टिक गोळा करते. त्यांच्या पुढाकाराने वेल्ह्यातील ६१ गावे ‘प्लॅस्टिकमुक्त’ करण्याचा प्रयत्न करत आहोत. वेल्ह्यामध्ये शालेय मुलांच्या सहभागाने प्लॅस्टिक गोळा केले जात आहे. या माध्यमातूनही आम्हाला प्लॅस्टिक मिळते.

या पॉली फ्युएलचा कसा वापर करता येईल? यापासून प्रदूषण होते काय? या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, “ प्रतिलिटर ४० रुपये दराने विक्री होणाऱ्या पॉली ऑईलची ज्वलनशील क्षमता ही डिझेलच्या तुलनेत जास्त आहे. केरोसीन आणि डिझेलला पर्याय म्हणून त्याचा वापर करता येईल. घरगुती वापराचे स्टोव्ह, बॉयलर्स, पाणी उपसा करणारे पंप, फवारणी पंप, भारतीय बनावटीचे विविध यंत्रे, डिझेलवर चालणाऱ्या बोटी यासाठी हे इंधन वापरता येते. प्लॅस्टिकच्या वस्तूंसाठी क्रूड ऑइलपासून नाफ्ता बनविला जातो. नाफ्ता तयार करताना त्यातील सल्फर काढले जाते. शिवाय प्लॅस्टिकपासून पुन्हा तेल बनविताना क्लोरिनप्रमाणे इतर काही वायू वेगळे होतात. परिणामी यात अधिकाधिक कार्बन डाय ऑक्साइड आणि अत्यल्प प्रमाणात कार्बन मोनाक्साइड शिल्लक असतो. केरोसीन व इतर इंधनाच्या मानाने कमी प्रदूषण होते.

या टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधननिर्मिती प्रकल्पासाठी किती खर्च येतो अशी विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, रूद्र एन्व्हायर्न्मेंटल सोल्यूशनच्या माध्यमातून प्लॅस्टिकपासून इंधननिर्मितीची यंत्रणा तयार करण्यात आली आहे. यासाठी १५ लाखांपासून ते ३५ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. यात प्लॅस्टिकचे लहान तुकडे करण्यासाठी ‘सेडर’ मशीन, तुकड्यांची साफसफाई करण्यासाठी ‘झटक मशीन’ आणि प्लॅस्टिक गरम करून त्याचे आकारमान कमी करण्यासाठी ‘एग्लो मशीन’ या तीन यंत्रणांसाठी साधारण: पाच लाख रुपये खर्च येतो. तर इंधन तयार करण्याच्या यंत्रासाठी १० ते ३० लाख रुपये लागतात. ग्रामीण भाग डोळ्यासमोर ठेवून १० लाखांपर्यंतचे छोटे यंत्र तयार केले आहे. चार तासाची बॅच असते. डिझेल तयार होण्याच्या १० लाख रुपयांच्या लहान मशिनमध्ये ८० ते १०० किलो, तर मोठ्या मशिनमध्ये २५० ते ३०० किलो प्लॅस्टिकवर प्रक्रिया करता येते. लहान युनिट असल्यास गुंतवणुकीचा परतावा कालावधी वाढतो. शासनाकडून सबसिडी मिळाली, तर हे यंत्र आणखी स्वस्तात मिळेल. त्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.

ग्रामीण भागात टाकाऊ प्लॅस्टिकचे प्रमाण प्रचंड आहे. तेथे असे प्रकल्प उभारता यावेत यासाठी काय करता येऊ शकते त सांगताना डॉ मेधा म्हणाल्या की, ग्रामीण भागात सर्वत्र प्लॅस्टिकचे साम्राज्य दिसते. मातीमध्ये असलेल्या या प्लॅस्टिकमुळे पाणी झिरपण्याचे प्रमाण कमी झाल्याने आणि त्यातील इतर घटकांमुळे जमिनीचा पोत कमी झाल्याचे दिसून येते. प्लॅस्टिक विल्हेवाट योग्य पद्धतीने लावल्यास शेतीच्या प्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येईल. प्लॅस्टिक पोटात गेल्याने दुभती जनावरे मृत्युमुखी पडल्याची उदाहरणे आहेत. शिवाय भूजलाचे साठेही प्रदूषित झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागासाठी काहीतरी करण्याचे आमचे पहिले उद्दिष्ट आहे. दररोज किमान ५०० किलो प्लॅस्टिक मिळणाऱ्या ठिकाणी हा प्रकल्प यशस्वीपणे सुरू करता येईल. काही गावांनी मिळून हा प्रकल्प सुरू करता येईल. त्यातून ग्रामीण युवकांना रोजगारही मिळेल. ग्रामपंचायतींनी जागा आणि प्लॅस्टिक उपलब्ध करून दिल्यास तेथे प्रकल्प उभारू शकतो. त्यातून तयार झालेले इंधन त्याच गावांना कमीत कमी दराने देण्याचाही आमचा मानस आहे.