कागदाच्या पुनर्वापराद्वारे झाडे वाचविण्यासाठी लोकांना प्रोत्साहीत करणारी ‘कबाडी एक्सप्रेस’

0

भारतात वापरलेल्या कागदांपैकी फक्त २० टक्के कागदाचा पुनर्वापर केला जातो. ८० टक्के वापरलेल्या कागदांपैकी खूप मोठा भाग जरी सामान बांधण्यासाठीचे कागद, पिशव्या आणि खोके बनविण्यासाठी वापरला गेला तरी शेवटी तो डम्पिंग ग्राऊंडमध्येच जातो. दुसरीकडे कागदाच्या वाढत्या मागणीमुळे दिवसेंदिवस झाडांची कत्तल सुरुच आहे. सध्याची वार्षिक १० दशलक्ष टन कागदाची मागणी २०२५ पर्यंत दुप्पटीहून जास्त वाढेल.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी कपिल बजाज आणि संदीप सेठी यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. आयटी आणि फायनान्शिअल मार्केटमधील १५ वर्षांचा अनुभव असलेल्या या दोघांनी २०१५ च्या सुरुवातीला ‘कबाडी एक्सप्रेस’ सुरु केली.

पुनर्वापर प्रक्रियेच्या सद्यस्थितीनुसार नवीन कागद बनविण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करावी लागते किंवा वाया गेलेला कागद परदेशातून आयात करावा लागतो. वातावरण आणि नैसर्गिक संसाधनांसाठी ही खूप धोकादायक परिस्थिती आहे. भारतातील एका घरामध्ये दरवर्षी जवळपास १०० किलो कागद कचऱ्यात जातो. “ही परिस्थिती पाहून आम्हाला वाटले की आपण लोकांना याबाबत माहिती देऊन कागद कचऱ्यात न टाकता त्याऐवजी कागदाच्या पुनर्वापराला हातभार लावून झाडे वाचवायला मदत करण्याबाबत जनजागृती करावी,” कपिल बजाज सांगतात. त्यानंतर दोघांनी डोमेन रजिस्टर केले आणि दीड वर्षांपूर्वी आपली वेबसाईट सुरु करुन कामाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी मार्केट सर्व्हे केला आणि ग्राहकांची मानसिकता जाणून घेतली आणि जवळपास सहा महिन्यांपूर्वी त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. सध्या ते पूर्व दिल्लीमध्ये कार्यरत आहेत.

‘कबाडी एक्सप्रेस’ गृहनिर्माण संस्थांशी संपर्क साधते आणि संस्थेच्या अध्यक्ष आणि इतर सभासदांना त्यांच्या सेवेची माहिती देते. त्यानंतर सोसायटीतील प्रत्येक घरामध्ये १५ किलो वापरलेला कागद ठेवता येईल एवढी पिशवी वाटते. पिशवी भरली की ग्राहक कबाडी एक्सप्रेसला फोनवरुन संपर्क करतात; कबाडी एक्सप्रेसच्या टीममधून कुणीतरी येऊन ती पिशवी घेऊन जाते. व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याच्या उद्देशाने वजन मोजण्यासाठी ते डिजीटल स्केलचा वापर करतात. एवढेच नाही तर एक पाऊल पुढे जाऊन ते रद्दी जमा केलेल्याची पावती आणि झाडे व पर्यावरण संवर्धनामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद देणारा एसएमएस पाठवितात.

पिशव्या वाटण्यामागे ग्राहकांना अजाणतेपणी पुनर्वापरायोग्य कागद जमा करण्याची सवय लागावी हा मुख्य उद्देश आहे. कपिल आशा करतात की त्यांनी दिलेली पिशवी लोकांना पुनर्वापरायोग्य कागद जमा करण्याची सवय अंगी भिनविण्यासाठी मदत करेल.

ते ग्राहकांकडून स्पर्धात्मक बाजारभावानुसार कागद जमा करतात आणि थेट कारखान्यांना विकतात. “आम्ही ग्राहकांना किलोमागे १० रुपये देतो आणि पुनर्वापर प्रक्रिया कारखाने आम्हाला किलोला १३.५० रुपये देतात.” मूल्यसाखळीतील दलालांचे अनावश्यक वर्चस्व संपवून जास्त फायदा मिळविणे हेच या मॉडेलचे लक्ष्य आहे.

कपिल सांगतात की हा त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत नाही, “आम्ही पिशव्यांवर केलेल्या जाहिरातींच्या माध्यमातून पैसा मिळवितो, याद्वारे कंपन्यांना आपली ओळख लोकांपर्यंत पोहचविता येते आणि आम्हाला कबाडी एक्सप्रेसचा विस्तार करण्यासाठी पैसा मिळतो.” कबाडी एक्सप्रेस आणि इतर पुनर्वापरावर आधारित उपक्रम यामधील फरक ते सांगतात, “कबाडी एक्सप्रेसने ग्राहकांना वापरलेला कागद जमा करण्यासाठी पिशव्या वाटून, त्यांच्याशी थेट संवाद साधून, कागदाच्या पुनर्वापराबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करुन आणि एका चांगल्या कामामध्ये ग्राहकांचा मोठा सहभाग मिळवून आपले वेगळेपण राखले आहे.”

केवळ मौखिक प्रसिद्धीच्या जोरावर कबाडी एक्सप्रेसची ग्राहक संख्या सुरुवातीच्या चार महिन्यातच दोन हजारच्या वर गेली. येत्या काही महिन्यात रोहिणी, द्वारका आणि गाझियाबाद या ठिकाणी ते आपला कार्यविस्तार करणार आहेत.

कबाडी एकस्प्रेसमुळे पारंपरिक रद्दीवाल्यांच्या उत्पन्नावर गदा येईल का? या प्रश्नाचे उत्तर देताना कपिल सांगतात,“नाही, आम्ही त्यांच्या पोटावर पाय देत नाही आहोत. किंबहुना, त्यांनी आमच्याबरोबर यावे यासाठी आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि आम्ही त्यांना याबाबत मार्गदर्शन करायला आणि आमच्या माध्यमातून त्यांना अधिक पैसा मिळवून द्यायलाही तयार आहोत.” कपिल पुढे सांगतात,“मात्र, ते कबाडी एक्सप्रेसबरोबर काम करायला तयार नाहीत कारण वजन करण्याच्या आणि दर ठरविण्याच्या नवीन आणि जास्त पारदर्शी पद्धतींशी त्यांना जुळवून घ्यायचं नाही, ही वस्तुस्थिती आहे.” कबाडी एक्सप्रेसला होणारा फायदा त्यांच्या लक्षात आल्यावर हा ट्रेंड लवकरच बदलेल अशी कपिल यांना आशा आहे.

सद्यस्थितीमध्ये मानक वजन आणि दराचे धोरण न अवलंबणाऱ्या या स्थानिक रद्दीवाल्यांशिवाय ग्राहकांना पर्याय नाही. ही समस्या सोडविण्यावर आणि ग्राहकांना चांगली सेवा पुरविण्यावर सध्या कबाडी एक्सप्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. या कामासाठी सर्व रद्दीवाले लवकरच एकत्र येतील अशी आशा बाळगूया.

Related Stories

Stories by Anudnya Nikam