रेल्वेचे त्या दोन कर्मचा-यांच्या प्रसंगावधानामुळे वाचला हजारो प्रवाशांचा जीव; रेल्वे विभागाने केला गौरव!

0

सातत्याने होत असलेल्या रेल्वे अपघातामुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पदाचा राजीनामा पंतप्रधानांना पाठवला होता,अश्यावेळी महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री रहात असलेल्या गावाहून येणा-या नागपूर मुंबई दुरांतो रेल्वे गाडीला मोठा अपघात झाला. मात्र त्यावेळी देखील काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण सार्थ ठरवत तत्परतेने हजारो लोकांचे प्राण वाचविण्याचे काम रेल्वेच्या ज्या दोन कर्मचाऱ्यांनी केले त्यांचा आता गौरव करण्यात येत आहे.


२९ ऑगस्टला नागपूर दुरांतो एक्स्प्रेसचे डबे आसनगाव- वाशिंद या दोन स्टेशनांच्या दरम्यान डबे रेल्वे रूळावरून घसरून मोठी दुर्घटना घडली. समोर असलेले संकट लक्षात घेऊन लोको पायलट वीरेंद्र सिंह यांनी आपत्कालीन ब्रेक दाबले. त्यांचा असिस्टंट को पायलट अभय कुमार यानेही वीरेंद्र सिंह यांना साथ दिली. त्याचमुळे दुरांतो एक्स्प्रेस रूळावरून घसरूनही प्रवाशांचे प्राण वाचले. वीरेंद्र सिंह आणि अभय कुमार यांच्या या निर्णयाचे कौतुक करत, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांच्या हस्ते या दोन्ही कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. दिल्लीतील रेल्वे भवनात हा कार्यक्रम पार पडला.

तीन दिवसांपूर्वी म्हणजेच २९ ऑगस्टला नागपूरहून मुंबईला येणारी दुरांतो एक्स्प्रेस सकाळी साडेसहाच्या सुमारास आसनगाव या ठिकाणी पोहचली. त्यानंतर पुढील प्रवास सुरू असतानाच वीरेंद्र सिंह यांना रेल्वे रूळांवर मोठ्या प्रमाणावर चिखल साठल्याचे दिसले. यानंतर तातडीने वीरेंद्र सिंह यांनी आपत्कालीन ब्रेक दाबले, ज्यामुळे गाडी चिखलावरून घसरली खरी पण एकाही प्रवाशाचे प्राण गेले नाहीत.

वीरेंद्र सिंह आणि अभय कुमार या दोघांनीही समोर आलेल्या प्रसंगाला धीराने तोंड देत निर्णय घेतला. या अपघातात या वीरेंद्र सिंह जखमीही झाले मात्र सगळ्या प्रवाशांचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले. याच निर्णयामुळे आज हे दोघेही रिअल लाईफ हिरो ठरले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.