शाळा सोडलेल्या अंगद यांचा विस्मयकारी जीवनप्रवास

शाळा सोडलेल्या अंगद यांचा विस्मयकारी जीवनप्रवास

Thursday December 10, 2015,

3 min Read

युअरस्टोरीने आजवर अनेक हरहुन्नरी लोकांच्या प्रेरणादायी आयुष्यावर प्रकाशझोत टाकला आहे. मात्र आता युअरस्टोरी अशा तरुणाच्या जीवनाचा लेखाजोखा इथे मांडणार आहे, ज्याला शाळेतून काढून टाकण्यात आले होते. अंगद दर्याणी, असे त्या तरुणाचे नाव असून, नववीच्या इयत्तेत असताना शाळेतून सोडलेल्या अंगद यांनी शाळेच्या अभ्यासक्रमापलीकडील कामगिरी केली आहे. अंगद यांनी नुकतेच TEDx Gateway तयार केले आहे. वयाच्या आठव्या वर्षी अंगद यांनी लेगो माइंडस्ट्रॉमचा वापर करुन एक रोबोट तयार केला. तेव्हापासून अंगद संशोधन आणि विकसनाच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. अर्ध्यावरच शाळा सोडणारे अंगद सांगतात की, ʻमी उच्च माध्यमिक बोर्डाच्या परिक्षांचा अभ्यास घरीच करत असे. गेल्याच वर्षी मी आयसीएससी (इंडियन सर्टीफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन), आयजीसीएसई (इंटरनॅशनल जनरल सर्टीफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन) आणि एनआयओएस (नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कूलिंग) या बोर्डाच्या माध्यमातून परिक्षा दिल्या आहेत.ʼ अनेक विद्यार्थ्यांकरिता एकाच बोर्डातून परिक्षा देणे, हे देखील अवघड असते. या सर्व परिक्षांमुळे माझ्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्याचे अंगद सांगतात.

image


अंगद यांनी आजवर अनेक प्रकल्प विकसित केले. त्यात सोलार पॉवर बोट (वयाच्या दहाव्या वर्षी अंगद यांनी हा प्रकल्प तयार केला), गार्डिनो (ही एक स्वयंचलित यंत्रणा असून, ती स्वतःच दिवे प्रकाशमान करते आणि झाडांना पाणी घालते) आणि हॅंड गेस्चर कंट्रोल्ड व्हेइकल यांचा समावेश आहे. याशिवाय त्यांच्या संघाने एमआयटी मिडिया लॅबच्या सहकार्याने व्हर्च्युअल ब्रेल हा प्रकल्प तयार केला. ज्यामुळे अंध लोकांना ई-पुस्तके कोणत्याही आवाजावर निर्भर न राहता वाचता येणे शक्य झाले. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ३डी प्रिंटर्सचे आयुष्य जास्त नाही. काही महिन्याच्या वापरानंतर ते बिघडतात. ते बिघडण्यामागील मुख्य कारण म्हणजे प्रिंटरमधील एक्सट्रुडरमध्ये अडथळा येणे. अंगद सध्या या समस्येवर काम करत असून, लवकरच ते या समस्येवर तोडगा काढतील. अंगद आपल्याला एका सर्वसामान्याप्रमाणे वाटू शकतात. मात्र भारतातील सर्वोत्कृष्ट फुटबॉल संघ असलेल्या माटुंगा येथील डॉन बॉस्को आंतरराष्ट्रीय शाळेत ते शाळा सोडण्यापूर्वी शिकत होते, हे समजल्यावर आपण नक्कीच चकित होऊन जातो.

शालेय शिक्षणात खंड पडण्याचा आयुष्यावर कशाप्रकारे परिणाम झाला, याबाबत बोलताना अंगद सांगतात की, सध्या त्यांना त्यांच्या आवडत्या गोष्टींना वेळ देता येतो. तसेच साहित्य आणि अर्थव्यवस्था याबाबत त्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाचन करण्याची संधी मिळते. अंगद यांच्या मते, शालेय शिक्षणात निवडक आणि अभ्यासक्रमातील विषयांचेच वाचन करण्याची सर्वाधिक संधी मिळते. मात्र सध्या ते अनेक विषयांचे वाचन करू शकतात, तसेच जगातील अनेक चित्रपट पाहू शकतात, प्रोग्रामिंग शिकू शकतात तसेच आपल्या आवडीच्या अनेक गोष्टींना वेळ देऊ शकतात. शाळा सोडल्यानंतर मी अनेक गोष्टी शिकलो, असा दावा अंगद करतात. याशिवाय अंगद हे DIY किट कंपनीच्या Shark Kitsचे संस्थापक आहेत. ही कंपनी गुणवत्ताधारक किट्स मेक, जमेको, स्पार्कफन, अडाफ्रुट या अमेरिकन प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत कमी दराने विकते. याशिवाय मेकर्स असायलमचे अंगद हे सह-संस्थापक आहेत. मेकर्स असायलम मध्ये कल्पनाशक्तीला पुरक असे वातावरण असून, तेथे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडवता येतात. तसेच तेथे तुम्ही तुमच्या कल्पनेवर काम करू शकता.

आपल्या भविष्यकाळातील योजनाबद्दल बोलताना अंगद सांगतात की, मला शिकत राहायचे आहे. तसेच समाजाला माझ्यापरीने जेवढी शक्य होईल, तेवढी परतफेड मला करायची आहे. अंगद त्यांचे प्रकल्प ओपन सोर्समध्ये ठेवतात. ते सांगतात की, इंटरनेटच्या सहाय्याने अनेक गोष्टी मी शिकलो. त्यामुळे माझे प्रकल्प ओपन सोर्सवर ठेवणे, यापेक्षा चांगली परतफेड होऊ शकत नाही. शाळेच्या विषयावर बोलताना अंगद सांगतात की, विद्यार्थ्यांच्या वयानुसार त्यांना वेगळे करणे, योग्य नव्हे. शालेय शिक्षणाचा मुख्य मुद्दाच त्यामुळे मागे पडतो, असे ते सांगतात.

लेखक - आदित्य भूषण द्विवेदी

अनुवाद - रंजिता परब