कॅशबॅक व्यवसायात आपली ओळख निर्माण करणाऱ्या स्वाती भार्गव

0

स्वाती भार्गव यांनी युकेमध्ये स्थायिक असलेल्या आपल्या पतीच्या सहाय्याने कॅश बॅकचा व्यवसाय सुरू केला. सध्या भारतीय बाजारपेठेत त्यांचा कॅशकरो (CashKaro) हा व्यवसाय तेजीत सुरु आहे. त्यांचे सविस्तर वर्णन करायचे तर, अशी स्त्री जी गणित या विषयात हुशार होती. तसेच सिंगापूर सरकार, लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सकडून त्यांना गणित या विषयात शिष्यवृत्तीदेखील मिळाली होती. मात्र ऑक्सफर्डकडून त्यांना शिष्यवृत्ती नाकारण्यात आली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रेमविवाह केलेल्या स्वाती लंडनमध्ये आपले वैवाहिक आयुष्य व्यतित करत असताना त्या लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स येथे तीन हजार सदस्यांच्या व्यावसायिक समुदायाचे नेतृत्व करत होत्या. तेथे त्यांनी आपल्या पतीसोबत कॅशबॅक व्यवसाय सुरू केला. त्यानंतर भारतात त्यांनी अशाचप्रकारचा व्यवसाय सुरू केला, जेथे त्यांना अपेक्षेपेक्षा दुप्पट यश मिळाले. याशिवाय स्वाती यांना योगाची आवड आहे.

मूळच्या अंबाला येथील असलेल्या स्वाती सांगतात की, ʻमी जेव्हा लहान होते, तेव्हा माझ्याकडे ऑक्सफर्ड डिक्शनरी होती आणि मला ते काहीतरी महत्वाचे असल्यासारखे वाटायचे. तेव्हा मला ऑक्सफर्ड विद्यापीठाबद्दल समजले. मी तेथेच शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.ʼ जेव्हा त्यांना प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांकडून प्रत्यक्षात शिष्यवृत्ती मिळाली, तेव्हा त्यांनी एलएसई येथील संधी नाकारली. कारण त्यांच्या मते लंडन येथे राहणे अधिक रोमांचकारी ठरणार होते. ʻते मला उच्च शिष्यवृत्ती देऊ करत होतेʼ, असे त्या सांगतात. महाविद्यालयात गणित विषयात कारकिर्द सुरू केल्यानंतर स्वाती यांनी विचार केला की, ʻकदाचित मला या विषयाची चांगली जाण आहे आणि म्हणून मी यातील कौशल्य अधिक जाणून घेण्याकडे लक्ष दिले तसेच आकड्यांसोबत खेळण्यात मला आनंद वाटत असे. मी लहान होती तेव्हा मी या विषयात काय करणार आहे, याची मला अजिबात माहिती नव्हती. तसेच गणित हा विषय मला कशाप्रकारे मदत करू शकतो, याची मला कल्पना नव्हती. मात्र माझ्यात कौशल्य निर्माण करण्यासाठी मी मेहनत घेत होती आणि कोणत्याही प्रकारे ते मला फायदेशीरच ठरणार होते.ʼ स्वाती यांनी गुंतवणूक बॅंकिंगच्या (इन्व्हेस्टमेंट बॅंकिंग) क्षेत्रात काही काळ काम केले. जेथे त्यांच्या कामाचे स्वरुप अहवाल तयार करणे तसेच एनालिटीकल डाटा इंटरप्रेट करणे, हे होते. स्वाती सांगतात की, ʻतुम्ही काय करता, हे महत्वाचे नाही. तर तुम्ही किती चांगल्या पद्धतीत ते काम करता, हे महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या नव्या कामाला सुरुवात करता, तेव्हा तुमची कंपनी तुम्हाला ते काम यायला हवे, अशी अपेक्षा करत नाही. तर त्यासाठी ते प्रशिक्षण देतात.ʼ स्वाती आणि त्यांच्या पतीने हीच रणनीती पोरींगपौऊंड्स आणि कॅशकरो येथे कर्मचारी नियुक्त करताना वापरली.

स्वाती आणि त्यांचे पती रोहन यांची भेट एलएसई येथे झाली. त्यानंतर रोहन वॉशिंग्टनला निघून गेले, तेथे त्यांना नोकरीदेखील मिळाली. दरम्यान स्वाती यांनी गोल्डमॅन सॅच्स येथे नोकरी केली. या दरम्यान तीन वर्षांचा काळ लोटला. मात्र मला रोहनएवढे कोणी आवडले नाही, अशी कबूली स्वाती देतात. त्यानंतर या दोघांनी २००९ सालात लग्न केले आणि २०११ साली पोरींगपौऊंड्सची स्थापना केली. ʻरोहन यांच्यासारखे उत्कृष्ट व्यवसाय भागीदार कोणाला मिळणार नाही. आम्ही आमच्या शक्तीनुसार या व्यवसायाकरिता योगदान दिले. तसेच आमच्या व्यवसायाकरिता जे काही चांगले असेल, ते आम्ही करत गेलो. आम्ही आमचा अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवला होता. खरेतर रोहनच माझी सर्वात मोठी शक्ती होते. त्यांच्याकडे व्यवसायाबद्दल कमालीची प्रेरणा आहे, ज्यामुळे आम्ही यशस्वी होत गेलो. उद्योजक होणे, हे काही सोपे काम नाही. मात्र जर तुमच्यासोबत योग्य साथीदार असेल, तर मात्र उद्योजकतेचा हा अनुभव अवर्णनीय असतो. एखादे लक्ष्य गाठण्यासाठीचा प्रवासदेखील तुम्ही आनंदाने पार करू शकताʼ, असे स्वाती सांगतात. रोहन आणि स्वाती यांच्या पोरींगपौऊंड्स या स्टार्टअपमुळे कॅशबॅक क्षेत्राचे यश अनेक देशांमध्ये दिसून येत होते. सर्वात मोठी कॅशबॅक वेबसाईट ही अमेरिकेन Ebates.com असून, जापनीस रेक्युटेनने एक अब्ज अमेरिकन डॉलर्सला विकत घेतली आहे. या संकेतस्थळाचे संपूर्ण ई-कॉमर्स क्षेत्रातील यूकेमधील बाजारपेठासंलग्न भागीदारी ३ ते ४ टक्के आहे.

हे दांम्पत्य भारताचा फार पूर्वीपासून विचार करत होते. मात्र जेव्हा त्यांनी यूकेमध्ये पोरींगपौऊंड्सची स्थापना केली, तेव्हा भारतात ई-कॉमर्सची पाळेमुळे रोवली गेली नव्हती. यूकेमधील गुंतवणुकदारांकडून साडेसात लाख डॉलर्सची गुंतवणूक आल्यानंतर त्यांनी एप्रिल २०१३ साली भारतात कॅशकरोची स्थापना केली. तसेच आपण भारतातील सर्वात मोठी कॅशबॅक आणि कुपन कंपनी असल्याचा दावादेखील त्यांनी केला. त्यांची स्पर्धा baggout.com आणि पेनीफूल यांच्याशी होती. एमेझॉन, स्नॅपडील, जबॉंग यांसारख्या ५०० बड्या ब्रॅण्ड्सोबत ते सध्या काम करत आहेत. तसेच आपला व्यवसाय प्रगतीपथावर असल्याचे स्वाती सांगतात.

भारत आणि यूकेमधील उद्योजकतेच्या वातावरणातील फरक सांगताना स्वाती म्हणतात की, ʻदोन्ही ठिकाणी आव्हाने जवळपास सारखीच होती. तुम्हाला तुमची टीम एकसंध ठेवावी लागते, गुंतवणुकीचा विचार करावा लागतो. भारतात उद्योजकतेची मानसिकता काहीशी लवचिक आहे. इथे एखाद्या ग्राहकाला रविवारी सकाळी आठ वाजता फोन केल्यास काही अडचण होत नाही. सर्वक्षेत्रातील बड्या हस्तींपर्य़ंत आपण पोहोचू शकतो. अनेक बड्या कंपनीचे संस्थापक हे फेसबूकवर माझे मित्र आहेत. यूकेमध्ये तुम्ही या गोष्टीचा विचारदेखील करू शकत नाही.ʼ स्वाती आपल्या या सर्व यशाचे श्रेय देवाला देतात. देवाने संधी उपलब्ध करुन दिल्यानेच हे शक्य झाल्याचे त्या सांगतात. ʻमी अशा अनेक लोकांना भेटली आहे, जे माझ्यापेक्षा हुशार आहेत. मात्र मी खरंच भाग्यवान आहे, त्यामुळे मी कृतज्ञ आहेʼ, असे स्वाती सांगतात.

लेखक - फ्रान्सेस्का फेरारिओ

अनुवाद - रंजिता परब

Related Stories