आपण किती ऊर्जा आणि उत्साह शक्तीने तयार आहात २०१६करिता ?

0

अरेच्चा! हा एक असा प्रश्न आहे, जो नेहमी आमच्या मन-बुध्दीवर स्वार होत असतो. माझ्या वयाच्या ब-याच महिलांप्रमाणे, नेहमीच माझी आजी माझ्याजवळ येते आणि मोठ्या आवाजात लोकांना ऐकू जाईल अश्या पध्दतीने मला प्रश्न विचारते, कुटूंब वाढवण्यासाठी आणि मुलांच्या बाबतीत काय नियोजन मी करते आहे?

ती म्हणते, खूप काही चिकित्सा आता वैद्यकशास्त्रात उपलब्ध आहे. अर्थातच मला राग येतो. माझे या विषयावर त्यांच्याशी खूप भांडण होते, ज्यात काम, लग्न आणि अश्याच प्रकारच्या गोष्टी नेहमी असतात. पण भांडणाचा शेवट आजीच आपल्या विजयाची जाणिव देत एका वाक्याने करते. जर तू जननक्षम नाहीस तर लाज बाळगण्याचे काहीच कारण नाही. आज खूप सारे क्लिनिक आहेत जे अशा समस्यांचे समाधान करतात. खरोखर!

मी उत्तर देते आणि हे सांगण्याचा प्रयत्न करते की, मी शर्मा राहिले नाही. मी माझ्या जीवनात खूश आहे आणि निरोगी आहे. अशावेळी ती एक कातरदृष्टी माझ्यावर देते. हाच घटनाक्रम पुन्हा घडतो जेंव्हा मी पुन्हा समोर येते. माझ्या उत्तराचे कोणतेही समर्थन परिवारात मिळत नाही. हाच प्रश्न माझ्या परिवारात मुख्य चर्चेचा विषय बनतो.

परंतू मी ना तुमच्याशी माझ्या कुटूंबाबाबत किंवा ना माझ्या जननक्षमतेबाबत बोलणार आहे. आज मी तुमच्याशी यावर न बोलता याच्याशी मिळता-जुळता जीवनाच्या विस्ताराशी जुळणा-या मुद्दयावर बोलू इच्छिते. जो आमच्या जीवनाच्या एका अशा पैलूशी जोडला आहे ज्यात आम्ही स्वत:ला ओळखण्या, समजण्याची संधी देतो. स्वत:चा शोध घेतो आणि आपल्यातील नवनवीन गोष्टींची निर्मिती करु शकतो.

आपल्यापैकी बरेच वाचक हे जाणतात की २०१५युवर स्टोरीसाठी खूपच यशाचे वर्ष होते. आम्हाला या वर्षात सर्वाधिक निधी मिळाला. आम्ही २३हजारांपेक्षा जास्त मौलिक गोष्टी लिहिल्या. आमचा प्रवास २०१५मध्ये खूप वेगाने झाला. आम्ही बारा भारतीय भाषांमध्ये विस्तार केला. आमचा संघ वाढून ६५जणांचा झाला. आम्ही कित्येक नवे उत्पादन, नवे ब्रँड, आणि कित्येक सरकारी योजनांसोबत काम सुरू केले. या वर्षात आमची खूपच प्रगती झाली. मला वाटले की माझे अनेक वर्षांचे परिश्रम आता फळाला आले. मात्र या सा-यातही मला कुठे ना कुठे एकटेपणा आणि असे वाटले की, जसे मी काही तरी गमावते आहे. निधी उभारणे हे खूपच मेहनतीचे काम असते. जेथे मी एका बाजूला नव्यानव्या पाय-या चढत होते त्याचवेळी मी पाहिले की, माझ्या ब-याच नात्यांमध्ये बदल झाला होता, आणि लोकांचे माझ्याशी वागणेही बदलत होते. या सा-याच गोष्टी मला एक विचित्र जाणिवही करून देत होत्या. काय मी या कठीण प्रतिस्पर्धेच्या वातावरणात शोभते का?

पुढे जाण्याची इच्छा आणि काही चुकू नये याची चिंता यांनी मला२०१५मध्ये खूपच सक्रीय केले. मी सुमारे ६४कार्यक्रमांत भाषणे दिली, जी जास्तीत जास्त शनिवारी किंवा रविवारी होती. सुमारे सहा हजार लोकांशी मी व्यक्तिश: भेटले. तेवढ्याच लोकांना मी मेलवरून उत्तरे दिली. तरीही काही कॉल्सना मला उत्तरे नाही देता आली. कित्येकांच्या मेलचे उत्तरही देता आले नाही. आणि या सा-या गोष्टींचे मला वाईटही वाटले.

म्हणजेच मी जितकी जास्त मेहनत केली, लोक माझ्याशी तेवढेच असंतुष्ट होते. किंवा असं म्हणायला हवं की, जितके जास्त काम केले तितकेच माझ्याकडून सुटले सुध्दा होते. या सा-या दरम्यान मी माझ्या माणसांपासूनही दूर होत होते. माझ्या घरच्यांना आणि नातेवाईकांना वाटत होते की, माझ्याकडे आता त्यांच्याकरिता वेळच नाही. एक दिवस मी खूपच हैराण होते आणि रडत होते. मला काही समजत नव्हते की हे सारे काय होत होते? अशावेळी माझ्यासमोर एक प्रश्न असा होता की, काय मी माझ्या २०१५च्या यशाचा आनंद साजरा करू की स्वत:ला आणि आपल्या कामाला आणखी चांगल्या प्रकारे नियोजित करणे शिकू?

नोव्हेंबर महिन्यात मी लोकांपासून थोडे दूर राहण्यास सुरुवात केली जेणेकरून स्वत:च्या जवळ जाऊ शकेन. मी स्वत:ला समजण्याचा प्रयत्न केला. स्वत:साठी वेळ दिला आणि लवकरच मला या गोष्टीची जाणिव होऊ लागली की, माझ्या मानसिक शांतीचा हाच उपचार आहे की मी स्वत:ला वेळ देऊ. स्वत:साठी वेळ काढू.

मला आठवले की सुमारे १५वर्षांपूर्वी मी जेव्हा महाविद्यालयात होते तेंव्हा मी एका मानसोपचार तज्ञांना भेटले होते ज्यांनी मला खूप मदत केली होती. त्यावेळीही मी काहीशा अश्याच स्थितीशी आणि समस्यांशी झुंजत होते. त्यावेळी त्यांनी मला समजावून उदाहरण दिले होते की, भारताच्या उत्तरीमैदानी भागात खूपच चांगले पिक येते कारण तेथील माती खूपच सुपीक आहे. या मातीत खूपच क्षार आहेत. त्यामुळे इथे चांगली शेती होते. येथील लोक पिके कापल्यानंतर शेताला काही काळ मोकळेच ठेवतात जेणेकरून जमिनीला तिची सुपीकता पुन्हा मिळावी. त्यातून हा फायदा होतो की, पुढच्यावेळी जे पिक येते ते अधिक जोमाने येते. मात्र त्या उलट जर तुम्ही सातत्याने शेतात पेरत राहिलात तर त्यातून शेताच्या जमिनीचा कस कमी होऊ लागतो.

हीच गोष्ट माणसांसोबतही होते. जर तुम्ही आपल्या भावना आणि स्वत:ची स्वत: काळजी घ्याल तर तुम्ही स्वत:ला चांगल्या प्रकारे समजू शकता. त्यातून प्रत्येकवेळी तुम्हाला चांगली कामगिरी करत राहणे शक्य होते. त्याच बरोबरीने तुम्ही तुमच्या व्यावसायिक यशासोबतच जीवनाच्या इतर गोष्टींनाही चांगल्या प्रकारे समजावून घेऊ शकता. म्हणूनच आवश्यक आहे की स्वत:ला समजून घेणे. स्वत:शी बोलणे झाले पाहिजे आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे.

या गोष्टीने माझा फायदा झाला. मी डिसेंबर महिन्यात स्वत:साठी वेळ काढला. स्वत:ला ऐकले, समजले, आणि स्वीकारले. विश्वास ठेवा हे काम सोपे नाही. पण तुम्हाला नाही वाटत का, की हेच काम खूपच सोपे देखील आहे?

एका बौध्द भिक्षूच्या लिहिलेल्या ‘ द मिरँकल ऑफ माइंड फुलनेस’ नावाच्या पुस्तकाने मला गोष्टी समजण्यास खूपच उपयोग झाला. मी माझा फोनही स्विच ऑफ केला आणि मला समजले की, मी कुणाचे फोन उचलू शकत नाही किंवा कुणाला उत्तर दिले नाही तर कुणाचे काही फारमोठे नुकसान होत नाही. मी चहाच्या पेल्यासोबत स्वत:ला वेळ देण्यास सुरुवात केली. आता मी रोज आपला काही वेळ माझ्या दोन आवडत्या कुत्र्यांसोबत देते आणि चांगला वेळ व्यतित करते.

याच सा-या गोष्टी मी उद्योजकांसोबत शेअर करू इच्छिते जे यश मिळवणे, आणि पुढे जाण्याच्या स्पर्धेत असतात. हे योग्यच आहे की आपण खूप मेहनत करा. दुस-यांची मदत करा, पुढे जा. पण एक सत्य हे सुध्दा आहे की, आमच्याजवळ सा-या कामांना वेळ असतो पण बस स्वत:साठी आम्ही वेळ काढू शकत नाही. या वर्षी आपण हे ठरवा की आपण खूप काम कराल, आपली नवीन उद्दिष्टही ठरवाल पण स्वत:साठीसुध्दा वेळ काढाल. जो माणूस स्वत:साठी वेळ नाही काढू शकत तो पुढे जाऊन नापिक जमिनीसारखा खडबडीत होतो.

लेखक : श्रध्दा शर्मा, मुख्य संपादिका युअर स्टोरी.

अनुवाद : नंदिनी वानखडे-पाटील