अपघातानं मिळालेल्या संधीमधून प्रयोगशील रहाण्याचा प्रयत्न - अभिनेत्री नम्रता गायकवाड

0

ग्रॅज्युएशनंतर एमबीए करुन मोठ्या कंपनीत जॉब करायचा हे ध्येय असणाऱ्या नम्रताचे कलाक्षेत्रात पदार्पण हे अपघाताने झाले. बाबांच्या कंपनीत एकांकिका स्पर्धा बघायला गेलेल्या नम्रताची ओळख प्रसिद्ध नाट्यलेखक दिग्दर्शक अशोक समेळ यांच्याशी झाली, त्यांनी तिथेच नम्रताला त्यांच्या आगामी नाटकात काम करणार का असे विचारले. घरी आल्यावर नम्रताने आई बाबांना हे सांगितले , त्यांचा होकार मिळाला आणि 'ज्ञानोबा माझा' या नाटकातनं नम्रता गायकवाड अभिनेत्री म्हणून अवघ्या महाराष्ट्रासमोर आली.

ज्ञानोबा माझा मधल्या भूमिकेमुळे नम्रताला पुढे मंगळसूत्र ही मालिका मिळाली, ज्यात ती अभिनेत्री अलका कुबलची मुलगी म्हणून झळकली. आणि या मालिकेमुळे स्वराज्य-मराठी पाऊल पडते पुढे हा सिनेमा मिळाला. या सिनेमानंतर पुढे अनेक सिनेमांमधून नम्रताने नायिकेच्या भूमिका साकारल्या. आणि आता ही अभिनेत्री झरी या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या सिनेमामध्ये झरीची प्रयोगशील भूमिका साकारतेय, अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधून झरी हा सिनेमा सध्या यशस्वीपणे प्रवास करतोय.

“ कुठलंही ग्लॅमर किंवा लाईमलाईटशिवाय फक्त आणि फक्त कलाकार म्हणून मिळणारा आनंद मी झरीमुळे अनुभवतेय. एक साधं सुती लूगडं आणि पोलका अशा पेहेरावामध्ये मी या पूर्ण सिनेमात वावरते. सिनेमाचे संपूर्ण शूट अकोल्यामध्ये पार पडले. जानेवारीमध्ये अकोल्यात दिवसाचा कडक उन्हाळा आणि रात्रीची तेवढीच कडाक्याची थंडी असायची. यामुळे सावळं दिसण्यासाठी मला फार मेहनत घ्यावी लागली नाही, स्किन आपोआपच करपू लागली होती,

शिवाय भूमिकेच्या मागणीनूसार मला अनवाणी फिरायचे होते. नंतर नंतर तर पायाला उष्णतेने इजा होऊ लागली, दिवसा पायाची ही इजा घेऊन कॅमेरासमोर उभं रहायचं आणि रात्री त्यावर मलमपट्टी करायची हे रोजचं काम बनलेलं.”

“झरीची ऑफर आली तेव्हा माझी दुसऱ्या सिनेमाबद्दल बोलणी सुरु झाली होती त्यामुळे त्यांना हव्या त्या तारखा माझ्याकडे उपलब्ध नव्हत्या, अशावेळी इतर सिनेमाशी तडजोड करत मी या सिनेमासाठी हव्या त्या तारखा काढल्या. व्यावसायिक चित्रपटातनं काम करताना तुम्हाला पैसा प्रसिद्धी मिळते पण अभिनेत्री म्हणून खरी ओळख ही झरी सारखे सिनेमे देतात. आणि करिअरच्या या टप्प्यावर मला या ओळखीची आवश्यकता आहे.” असा ठाम विश्वास नम्रताला आहे.

तसे पहाता वंशवेल, कॅम्पसकट्टा, लंगर सारख्या सिनेमातनं महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या नम्रताच्या अभिनयाच्या गाठोड्यात अजूनपर्यंत तरी हिट सिनेमा जमा झालेला नाही. नम्रतालाही त्याची जाणीव आहे. “प्रत्येक सिनेमा हा तिकीट खिडकीवर त्याचे नशिब घेऊन येत असतो आणि सिनेमा हेही एक टिमवर्क आहे, कलाकार म्हणून मी माझी भूमिका प्रामाणिकपणे साकारणे एवढेच काय ते माझ्या हातात असते, आत्तापर्यंतचा माझा एकही सिनेमा हिट नाही झाला तरी हे सर्व सिनेमे दखलपात्र होते हे नाकारुन चालणार नाही.”

अभिनयाचे कुठचेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नसताना आणि या क्षेत्रातला कोणताही गॉडफादर किंवा मदर नसताना नम्रता स्वतःचं नशिब आजमावतेय. या क्षेत्रातले उतार चढाव ती खंबीरपणे अनुभवतेय. “कधीतरी एकटं असताना मी विचार करते की अशोक समेळांनी मला दिलेली नाटकाची संधी मी नाकारली असती तर, कदाचित मी आज काहीतरी वेगळी असते. पण मग कलाक्षेत्रातलं हे ग्लॅमर, चाहत्यांचे प्रेम, विविध भूमिका जगण्याचा हा अनुभव मला नसता मिळाला.

मी या क्षेत्रात कुठलीही अपेक्षा किंवा तर्कवितर्क करुन प्रवेश केला नव्हता त्यामुळे निराशा मला कधीच भेडसावत नाही. जिथे अपेक्षाच नाही तिथे निराशा कसली. मला फक्त अपघातानं मिळालेल्या या क्षेत्रातल्या संधीचे सोने करायचेय.” नम्रता हा कबूली जवाब देत जाते आणि तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातली चमक, भविष्यातल्या नव्या स्टारशी आपला जणू परिचय करुन देऊ लागते.