चहाची ऑनलाईन विक्री आणि चहामधून नैसर्गिक उपचारांचा प्रयोग !

चहाची ऑनलाईन विक्री आणि चहामधून नैसर्गिक उपचारांचा प्रयोग !

Wednesday November 25, 2015,

3 min Read

पूर्व दिल्लीच्या अत्यंत वर्दळ असलेल्या मार्केटमध्ये एका काहीशा शांत गल्लीत चहाचं एक दुकान तुमचं नम्रपणे स्वागत करतं. दुकानाचे मालक अभिजीत मुजुमदार हे अशाचप्रकारे आठवड्याचे सातही दिवस चहा तयार करण्यात मग्न असतात. २०१२ पासून ते हे काम करत आहेत. इन्स्ट्रूमेंटेशन आणि डिझायनिंगच्या कामात १८ वर्ष घालवल्यानंतर कोणाच्याही हाताखाली काम करायचं नाही असा निर्णय अभिजीत यांनी घेतला. खाद्यपदार्थांच्या व्यवसायाचा सगळ्यात पहिला विचार डोक्यात आल्यानंतर मित्रासोबत शहरातील विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांचं सर्वेक्षण केल्याचं अभिजीत सांगतात. दोन वर्षांपर्यंत ते दर वीकेण्डला दिल्लीतील विविध ठिकाणी जाऊन पाहणी करत. खाद्यपदार्थांचे विविध प्रकार आणि अत्यंत फॅन्सी कॉफी शॉप पाहिल्याचं अभिजीत सांगतात. पण चहाच्या बाबतीत आम्हाला एक पोकळी दिसली. भारतीयांना घरचा किंवा बाहेर टपरीवर केलेला चहा खूप आवडतो. पण जसे कॉफी शॉप्स आहेत त्याचप्रकारे आरामात चहा घेता येईल अशी जागाच दिल्लीत नसल्याचं अभिजीत सांगतात आणि मग यातूनच 'टी लाउंज'ची संकल्पना जन्माला आली.


image


या टीम लाउंजची संकल्पना अभिजीत यांच्या डोक्यात सॅमटेल कंपनीत काम करत असताना आली. तेव्हा ते ग्राहकोपयोगी उत्पादनं, छोटी विमान आणि एफ16 साठी CRT डिस्प्ले तयार करण्याचे काम करीत असत. तेव्हा त्यांच्या व्यवसायातील सहकारी असलेल्या चीनी आणि जपानी सहकाऱ्यांनी त्यांना चहा भेट म्हणून दिला. या दोन्ही देशांमध्ये परदेश दौऱ्यावर गेल्यावर संस्कृतीचं प्रतीक म्हणून चहा भेट देण्याची प्रथा आहे. लवकरच अशा भेटींनी अभिजीत यांचं कपाट भरुन गेलं. माझा हा छंद पाहून माझे मित्र चहा मागायचे आणि आपणही त्यांना चहा करुन द्यायचो असं अभिजीत सांगतात. त्यामुळे टी लाउंजचा विचार डोक्यात येणं साहजिकच होतं असंही ते नमूद करतात.

त्यांनी त्यांच्या संस्थेत सल्लागार या पदावर काम करण्यास सुरूवात करुन जबाबदारी कमी केली आणि चहाबाबत आपलं ज्ञान वाढवण्याचं काम वेगाने सुरू केलं. ते चहा विकत घ्यायचे आणि त्यावर संशोधन करायचे. अखेर अभिजीत यांना न्यू ग्लेन्कोचे शिव सारीया आणि मित्तल टीजचे विक्रम मित्तल हे गुरू भेटले आणि सॅमटेलला रामराम करुन त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्यांना लाउंजसाठी पूर्व दिल्लीच्या बाजारपेठेत जागाही मिळाली आणि मित्राच्या मदतीनं त्यांनी निधीही उभा केला.

कामाला उत्साहात सुरूवात तर केली पण काही पायाभूत सुविधांच्या अभावामुळे त्यांना ठरवलेल्या वेळेत व्यवसाय सुरू करता आला नाही. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर अभिजीत यांनी टी लाउंजची कल्पना सोडून दिली आणि चहा विक्रीवर लक्ष केंद्रीत केलं. त्यांचे गुरू विक्रम मित्तल यांनी त्यांच्या दुकानासाठी चहाचा पुरवठा करण्यास सांगितलं. मोठ्या ऑर्डर घेण्याबरोबरच अभिजीत त्यांच्या दुकानात किरकोळ विक्रीही करु लागले. दरम्यान अभिजीत यांना काही आश्रयदाते मिळाले आहेत जे नेहमी त्यांच्याकडून चहा विकत घेतात आणि काहीजण तिथेच गरमागरम चहासुद्धा पितात. हेच ग्राहक त्यांचे ब्रँड ऍम्बेसेडर झालेत. चहाचे विविध प्रकार, साठा कसा करावा आणि खाद्यपदार्थांबद्दल अभिजीत सल्लेसुद्धा देतात. काळाच्या ओघात त्यांचे ग्राहक वाढलेत एक जपानी कुटुंब तर दर महिन्याला चहा घ्यायला येतं असं अभिजीत सांगतात.

किरकोळ आणि घाऊक विक्रीबरोबर अभिजीत यांनी ‘चायवाला’ या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन चहाविक्री सुरू केली आहे. यासह अभिजीत यांनी अमेझॉनसारख्या ऑनलाईन पोर्टलसोबत भागीदारीही केली आहे. त्यामुळे आता अभिजीत पुन्हा त्यांच्या टी लाउंजच्या कामाला लागलेत.

फुलांपासून तयार केलेला चहा आणि त्यांच्या पानांच्या अर्कापासून तयार केलेली पेय याबद्दल आपण सतत वाचत असल्याचं अभिजीत सांगतात. या अर्कामधील औषधी गुणांची माहिती मिळाल्यानंतर अधिक संधोशन करुन नैसर्गिक उपचारपद्धती म्हणून त्याचा वापर करण्याचा विचार केल्याचं ते सांगतात. सध्या ते करडई आणि बोरॅगो ऑफिसीयानालीसच्या अर्काचा चहामध्ये वापर करण्याबाबत अभ्यास करीत आहेत. करडईच्या फुलाचा अर्क हा आतड्यासंबंधीचे आजार, नैसर्गिक रेचक आणि बाळंतपणानंतर प्रकृतीसाठी वापरण्यास फायद्याचं असतं. तर बोरॅगो ऑफिसीयानालीस हे निळ्या रंगाचं फुल आहे ते भारतात खूप दुर्मिळ असतं पण ते एक ऍन्टिसेप्टिक म्हणून काम करतं. त्याचा वापर टॅल्कम पावडर आणि ऍन्टिसेप्टिक क्रीममध्ये केला जात असल्याचं अभिजीत सांगतात.

दुर्मिळ फुलांची खरेदी करुन चहाचे विविध प्रकार तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या उत्पादनांच्या सुधारणेसाठी त्यांच्याकडे आयुर्वेदतज्ज्ञांची एक टीम आहे. लोकांना विविध चवींचा चहा घेण्यास आम्ही प्रोत्साहन देतो असं ते सांगतात. चहा विक्री करणाऱ्या मोठ्या आस्थापनांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. तसंच परदेशातील पुरवठादारांशीही त्यांचे चांगले संबंध असल्याने त्यांच्याकडे कायम साठा असतो आणि त्यांना रास्त दरात माल मिळत असतो.

लेखक- इंद्रजीत डी. चौधरी

अनुवाद – सचिन जोशी