‘ऑस्टीयोजेनिसिस’ आजाराने पीडित पूनम श्रोत्रीच्या उत्तुंग वाटचालीची कहाणी

0

आपल्या अपयशाचे खापर आयुष्यभर दुसऱ्यांवर फोडणाऱ्या लोकांसाठी ती एक उत्तुंग आशेचा किरण आहे, ती हिंमत आहे अशा लोकांची जे बिकट परिस्थितीत हतबल होतात, ती उमेद आहे अशा लोकांची जे शारीरिक अपंगत्वामुळे निराश झालेले असतात. ‘उद्दीप सोशल वेलफेअर’ सोसायटीची संचालक पूनम श्रोत्री ‘ऑस्टीयोजेनिसिस’ (हाडासंबंधीचा विकार) सारख्या गंभीर आजाराने पीडित असून सुद्धा पूनम ग्रामीण विकास, महिला सशक्तीकरण व विकलांग मुलांना उच्च शिक्षण देण्याबरोबरच त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ऑस्टीयोजेनिसिसने पीडित ३१ वर्षीय पूनम श्रोत्री यांना हलकीशी जरी ठेच लागली तरी त्यांचे हाड तुटते. हा आजार लाखात एक किंवा दोन जणांना असतो. आपल्या आजाराबद्दल पूनम सांगतात की, ‘माझे जेवढे वय आहे त्यापेक्षा जास्त आजपर्यंत मला फ्रॅक्चर झाले आहेत व त्यामुळे माझे अनेक ऑपरेशन झाले आहेत जी मलाच नीट आठवत नाही.’ या सगळ्या अडचणींवर मात करून त्यांनी सर्वसाधारण मुलांबरोबर आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण भोपाळच्या केंद्रीय विद्यालयातून घेतले व अर्थशास्त्र हा विषय घेऊन एमबीए चा अभ्यासक्रम पूर्ण केला. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी बहिस्त विभागातून मानव संसाधन विषयाचे  शिक्षण घेतले. त्या सांगतात की, ‘मी अभ्यासात हुशार होते. माझ्या वडिलांनी मला विकलांग मुलांच्या शाळेत न पाठवता सर्वसाधारण मुलांबरोबर शिकवले. म्हणूनच मी स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजत नाही. माझ्या कुटुंबात आई-वडिलांखेरीज मला दोन भावंडे आहेत.’ पूनम सांगतात की त्यांना समाजात चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे लोक भेटले म्हणूनच त्यांच्या  बाबतीतील भेदभावाला त्यांनी सहजतेने स्विकारले. 

त्या सांगतात की, ‘जर मला कुणी सांगितले की तुम्ही या कामासाठी असक्षम आहात तर ते काम मी जिद्दीने पूर्ण करून दाखवते. याच विचारसरणीने मला सकारात्मक उर्जा मिळते.’ आपल्या अडचणींबद्दल पूनम सांगतात की, शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये पण त्यांच्या बाबतीत भेदभाव झाला. परंतु त्यांची योग्यता दुसऱ्यांच्या तुलनेने नेहमीच चांगली होती. पण शारीरिक भेदभाव असल्याकारणाने त्यांना कधीच संधी मिळाली नाही. 

अगणित उपेक्षानंतर एका कंपनीने पूनम यांना रीतसर व्यवस्थापकाच्या पदावर काम करण्याची संधी दिली. तथापि हे पद त्यांच्या योग्यतेपेक्षा कमी दर्जाचे होते पण त्यांनी एक आव्हान म्हणून त्याचा स्वीकार केला. नऊ तासांच्या शिफ्ट मध्ये बसून त्या काम करू शकता हे पूनम यांना सिद्ध करून दाखवायचे होते. सुमारे ५ वर्ष कंपनीमध्ये राहून त्या उपव्यवस्थापक या पदापर्यंत पोहोचल्या. नंतर त्यांनी काहीतरी वेगळे करण्याचा विचार करून नोकरीचा राजीनामा दिला. नोकरीच्या दरम्यान पूनम यांना अनेक भेदभावाला सामोरे जावे लागले म्हणून त्यांना वाटले की ज्याप्रकारे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला तसा तो इतर अपंग मुलांच्या वाट्याला येऊ नये. म्हणूनच त्यांनी सन २०१४ मध्ये ‘उद्दीप सोशल वेलफेअर सोसायटीची’ स्थापना केली. ज्याच्या आधारे अपंगांना कामाचा समान दर्जा मिळून ते आपले वेगळे स्थान बनवू शकतील. आज पूनम आपल्या या संस्थेद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असून ग्रामीण विकासावर जोर देत आहेत तिथेच दुसरीकडे त्या स्त्री सबलीकरणाबरोबरच अपंग मुलांच्या उद्धारासाठी पण प्रयत्नशील आहेत.

मागच्या दोन वर्षांपासून पूनम अपंगांच्या सशक्तीकरणासाठी ‘कॅनडू’ नामक एक मोहीम चालवीत आहेत ज्यात त्या समाजाला उपदेशून सांगतात की अपंगांवर दया करून त्यांची जबाबदारी घेण्यापेक्षा त्यांची पुढे जाण्यासाठी हिंमत वाढवा. समाजात त्यांना बरोबरीचे स्थान देण्यासाठी पूनम यांनी अनेक प्रशिक्षण व जागरूकतेचे कार्यक्रम राबवीत असून स्त्रियांच्या विकासासाठी भोपाळ जवळपासच्या ग्रामीण भागात त्या सक्रीय आहेत. ज्यात त्यांची संस्था स्त्रियांना शिक्षित करण्याबरोबरच व्यवसाय मार्गदर्शनाचे प्रशिक्षण देतात व स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध गावात सफाई अभियानसुद्धा राबवतात. १५-१५ स्त्रियांचे दोन ‘सेल्फ हेल्प ग्रुप’ तयार केले आहेत. जिथे स्त्रियांना कागदी पिशव्या व इतर वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देतात की ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. यासाठी पूनम यांची संस्था या स्त्रियांना कच्चा माल उपलब्ध करवतात. त्याचप्रमाणे ते अशा स्त्रियांना शिक्षित करवतात ज्यांचे शिक्षण हे काही कारणाने अर्धवट राहिले आहे. 

याशिवाय गावातील मुलांचा शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी त्या  पुस्तकांची मदत करतात व त्यांना संगणकाचे ज्ञान पण देतात. पूनम सांगतात की, सुरुवातीपासूनच त्यांना विकलांग मुलांना नोकरी उपलब्ध करून देण्याची इच्छा आहे पण अशा मुलांच्या भेटीअंती जाणवले की मुळातच त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे भलेही ते कितीही हुशार असो. यानंतरच त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे त्यांचा आत्मविश्वास जागृत करण्यावर जोर दिला व ते काही प्रमाणात यशस्वी झाले. त्या सांगतात की, ‘ज्या मुलांना बी.टेक, बीसीए व इतर अभ्यासक्रमात काही अडचण येत असेल तर आमचे सहाय्यक त्यांची मदत करतात.’

पूनम सांगतात की अशा मुलांच्या शिक्षणानंतर त्यांना रोजगार देण्यासाठी सुद्धा त्या मदत करतात. याचदरम्यान एका कंपनीने अपंग लोकांच्या नोकरीसाठी पूनम यांच्या संस्थेशी बोलणी केली आहे.

त्या सांगतात की निधी जमविणे ही आपली सगळ्यात मोठी अडचण आहे. सध्या बचतीचा पैसाच या चांगल्या कामासाठी त्या वापरत आहेत. दुसरी समस्या आहे ती मनुष्यबळाची. पूनम यांच्या मतानुसार, ‘जे या क्षेत्रात मनापासून काम करण्यास इच्छुक असतात तेच या क्षेत्रात येतात किंवा ज्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार असेल तेच इथे काम करण्यास राजी असतात.’ सध्या या टीम मध्ये १२ लोक काम करीत असून ते सगळे पूनम यांचे मित्र आहेत ज्यात ५-६ कार्यक्षम सदस्य आहेत.

येणाऱ्या रोजच्या अडचणींकडे दुर्लक्ष करणाऱ्या पूनम यांच्या कामाची हळूहळू दखल घेतली जाऊ लागली आहे. नुकतेच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशातील १०० सन्मानित स्त्रियांना पुरस्कार प्रदान केला ज्यात पूनम यांचा समावेश आहे. त्या सांगतात की, ‘पुरस्कार मिळाल्यामुळे माझी  जबाबदारी वाढली आहे. सध्या माझे लक्ष्य माझ्या कामावर आहे ज्याला मी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊ इच्छिते.’

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

क्षयरोगामुळे २२ किलो वजन आणि अंशतः बहिरेपणा आलेल्या नंदिताला नृत्याने दिली संजिवनी

पोलिओग्रस्त युवकाची ‘तेजस्वी’ कहाणी, योगाने जिंकले हरणारे आयुष्य!

एकेकाळी गंभीर उदासीनतेतून जाणा-या पूनम आता इतरांच्या समस्येचे करत आहे निराकरण

लेखिका : गीता बिश्त
अनुवाद : किरण ठाकरे