‘मिशन आय एम’…तुमच्या नसण्यापासून तुमच्या असण्यापर्यंतचा प्रवास

आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती..व्यक्तिगत विकासाच्या दोन बाजू

0

स्वत:ला व्यक्त करण्याच्या आपल्या क्षमतेमधून, बोलण्यातून आत्मविश्वास वाढतो, आत्मविश्वास वाढल्यामुळे आपण स्वत:ला व्यक्त करू शकतो? खरंच, मोठा गंमतीदार प्रश्न आहे. खरंतर तुमची अभिव्यक्ती आणि तुमचा आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. पहिल्याशिवाय दुस-याला अर्थ नाही आणि दुस-याशिवाय पहिल्याचं अस्तित्व नाही. म्हणजेच, या दोघांचं अर्थात अभिव्यक्ती आणि आत्मविश्वास या दोन गुणधर्मांची बेमालूम सरमिसळच एखाद्याच्या विकासासाठी गरजेची असते. आणि त्याचसाठी सुरुवात झाली ‘मिशन आय एम’ची. या दोघांना सोबत आणण्यासाठी..आणि एखाद्या व्यक्तीमध्ये पुन्हा नवा उत्साह निर्माण करण्यासाठी.

तुमच्यात फक्त आत्मविश्वास असेल, तर तुम्ही सहज स्वत:ला व्यक्त करू शकता, दुस-यांपर्यंत पोहोचवू शकता या धारणेला ‘मिशन आय एम’ने खोटं ठरवलंय. आणि हे काही बसल्या जागेवर मांडलेलं तत्वज्ञान नाहीये. तर बरीच शाळा, महाविद्यालयं आणि कंपन्यांच्या ऑफिसमध्ये अभिव्यक्ती कौशल्य आणि व्यक्तिगत विकास या विषयावर कार्यशाळा घेतल्यानंतरच समोर आलेला निष्कर्ष आहे. ही खरंतर दोन्ही बाजूंनी होणारी प्रक्रिया आहे. स्वत:च्या भावना आणि विचार व्यक्त करता येणं, तर्कसंगत आणि योग्य गोष्टी मांडणं आणि तुमचं ऐकणा-या आसपासच्या लोकांसोबत संवाद साधता येणं यामुळे कुणाचाही आत्मविश्वास वाढू शकतो.

‘मिशन आय एम’चे दोन संस्थापक..अरूण मित्तल आणि इरा अग्रवाल
‘मिशन आय एम’चे दोन संस्थापक..अरूण मित्तल आणि इरा अग्रवाल

‘मिशन आय एम’ची सुरुवात दोन इंजिनिअर्सने केली. एक होते अरूण मित्तल आणि दुस-या इरा अग्रवाल. ‘मिशन आय एम’ सुरु करण्यापूर्वी ‘डेलॉईट’ या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या नोकरीवर होते. दोघांची व्यावसायिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी सारखीच असूनही आपले विचार दुस-यांसमोर मांडण्याबाबत दोघांची मतं वेगवेगळी होती. एकीकडे अरुणला जास्त लोकांसमोर बोलायला आवडत नव्हतं, तर दुसरीकडे इराला हीच गोष्ट सर्वात जास्त आवडत होती. अरुण तर म्हणतात की, “ती एक चॅटरबॉक्स आहे. सतत बडबड. तिच्याकडे जणूकाही जगातल्या प्रत्येक विषयावर बोलायला काही ना काहीतरी आहेच.” पण गंमतीची बाब म्हणजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये जसं धन आणि ऋण भार कितीही विरुद्ध टोकाचे असले, तरी तेच एकमेकांकडे जास्त आकर्षित होतात, अगदी तसंच अरुण आणि इराच्या बाबतीत झालं.

अरुण म्हणतात, “मी आमच्या वर्गात पहिला यायचो. माझे मार्कस् सुद्धा उत्तम होते. पण या गोष्टीचा मला त्रासच जास्त व्हायचा. कारण एक चांगले मार्कस् सोडले, तर त्याव्यतिरिक्त मी काहीच करु शकलो नाही. ज्या ज्या वेळी अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्या कार्यक्रमात सहभाग घ्यायची वेळ यायची, मी माझ्या याच एकलकोंड्या मार्गामुळे मागे रहायचो.” पण ही काही एकट्या अरुणची समस्या नव्हती. आजही कॉलेजला जाणारे जवळपास 90 टक्के विद्यार्थी याच समस्येचा सामना करतात.

‘मिशन आय एम’च्या टीमचं म्हणणं आहे की आपण तसे नसलो, तरी साधारणपणे आपल्यावर एखाद्या गोष्टीचा शिक्का पडला की आपणही स्वत:ला तसेच समजायला लागतो. खरंतर यामुळे आपण स्वत:ला ओळखूच शकत नाही. अरुण म्हणतात की , “उदाहरणच द्यायचं झालं तर एकाद्या मुलाला तुम्ही अंतर्मुखी अर्थात इंट्रोव्हर्ट म्हणायला सुरुवात केलीत, की मग तो स्वत:ला कितीही चांगल्या पद्धतीने सादर करत असला, व्यक्त करत असला, तरी बाकीचे लोकं त्याला इंट्रोव्हर्टच म्हणतात.”

टीम ‘मिशन आय एम’!
टीम ‘मिशन आय एम’!

आणि इथेच ‘मिशन आय एम’चं काम सुरु होतं. अरुण म्हणतात की, “तुम्ही काहीतरी असणं आणि काहीतरी होण्याची तुमची इच्छा असणं यामध्ये जे अंतर आहे, ते आम्हाला कमी करायचंय. त्याचबरोबर आम्ही तुमच्या व्यक्तिमत्वातला तो पैलूही शोधून काढण्यात तुमची मदत करतो, जो तुम्हाला खात्री आहे की तुमच्यात आहे, पण आत्तापर्यंत तुम्ही त्याला जगासमोर आणू शकलेला नाहीत. ‘मिशन आय एम’मधला ‘मिशन’ हा शब्द हेच लक्ष्य साध्य करायच्या आमच्या ध्येयाचं प्रतीक आहे. आणि ‘आय एम’ म्हणजेच ‘मी आहे’ यामध्ये एक वेगळाच सुंदर असा सकारात्मक भाव आहे. कारण हे दोन शब्द थेट तुमची ओळख समोर मांडतात. ते एक सत्य आहे, तुमच्या स्वत:बद्दलच. जे तुम्हाला व्हायचंय त्या पेक्षाही जे तुम्ही आहात त्याची साक्ष पटवणारं.”

तुमच्या मनाचा खरा ठावठिकाणा शोधणं, तुमची शारीरिक भाषा अर्थात बॉडी लँग्वेज, आवाजाचे चढउतार, आंतरराष्ट्रीय भाषांचं प्रशिक्षण अशा अनेक प्रकारच्या कौशल्यांचा समावेश ‘मिशन आय एम’च्या उपक्रमात आहे. पण त्याचबरोबर ‘मिशन आय एम’ तुम्हाला असं वातावरण उपलब्ध करुन देतं, ज्यामध्ये तुम्ही या सर्व कौशल्यांचा योग्य अभ्यास करु शकाल, त्यांना आत्मसात करु शकाल. अरुण सांगतात, “आम्ही खेळ, शारीरिक तंदुरुस्तीसोबतच फोटोग्राफीसारख्या इतरही कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करतो.”

तुमच्या नसण्यापासून तुमच्या असण्यापर्यंतचा प्रवास
तुमच्या नसण्यापासून तुमच्या असण्यापर्यंतचा प्रवास

खरंतर ‘मिशन आय एम’ चा जन्म अगदी काही महिन्यांपूर्वी झाला. आणि येत्या काही महिन्यांमध्ये जवळपास 17 कार्यशाळा त्यांना घ्यायच्या आहेत. कंपनी सुरु करण्यासाठी सुरुवातीच्या काळात जी काही गुंतवणूक केली होती, ती कधीच वसूल झालीये. आणि येत्या काही महिन्यांमध्येच कंपनी नफा कमवायला सुरुवात करेल असा कंपनीला विश्वास वाटतोय. सुरुवातीला अवघ्या दोन जणांची असलेली ‘मिशन आय एम’ टीम आता 10वर जाऊन पोहोचलीये. या टीममध्ये वैयक्तिक विकास प्रशिक्षक, सेल्स-मार्केटिंग आणि वेब डिजाईन टीम आहे. पुढच्या दोन महिन्यांत 13 प्रशिक्षणार्थी अर्थात इंटर्न्सचाही टीममध्ये समावेश केला जाणार आहे.

या सर्व योजनांशिवाय ‘मिशन आय एम’चं आणखी एक महत्त्वाचं लक्ष्य आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करणं. अरुण म्हणतात की, “इतक्या मोठ्या पातळीवर प्रत्येक ठिकाणी आम्ही स्वत: उपस्थित रहाणं अशक्य आहे. त्यामुळेच लवकरच आम्ही आमचा अभ्यासक्रम ऑनलाईन सुरु करणार आहोत.” त्यांच्यामते, “या अभ्यासक्रमासाठीची फी तेवढीच असेल, जेवढी सर्वसामान्य लोक अगदी सहज भरु शकतील. प्रत्येक विद्यार्थ्याकडून आम्ही 10 ते 15 तासांच्या कार्यशाळेचे फक्त 900 ते 1000 रूपये घेतो.”

भारतातल्या प्रत्येक राज्यात पोहोचण्याचं ‘मिशन आय एम’ टीमचं स्वप्न आहे. पण त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषकरुन शाळांमध्ये. अरुणच्या चेह-यावर थोडी चिंता दिसते, “शाळांचा स्वत:चाच अभ्यासक्रम एवढा असतो, की त्यातून आमच्या कार्यशाळेसाठी काही तास काढणं मोठं कठीण काम होऊन बसतं. त्यातही आम्ही काही शाळांच्या प्राध्यापकांशी बोलून ही कार्यशाळा अभ्यासक्रमातच समाविष्ट करण्यासाठी त्यांना तयार केलंय. असं जर झालं, तर त्या शाळकरी मुलांसोबत आम्हाला अधिक चांगला वेळ घालवता येईल.”

लोकांकडून मिळणा-या चांगल्या प्रतिक्रियांमुळे ‘मिशन आय एम’ला प्रोत्साहन मिळतंय. विशेषत: ज्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी काम केलंय, कार्यशाळा घेतल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांकडून. आता अरुणच्या चेह-यावर उत्साह आणि आनंदही आहे, “मी नुकताच एका महाविद्यालयातून परत आलोय. तिथली एक मुलगी आत्तापर्यंत फक्त लिखाणातूनच तिच्या भावना व्यक्त करु शकत होती. किंबहुना करत होती. पण आज ती इतक्या सहजतेने माझ्याशी बोलत असलेली पाहून मनाला खूप समाधान मिळत होतं. माझ्यासाठी ते अविश्वसनीय होतं.”

बॉलिवूडमधले अभिनेते राजकुमार यांच्या बुलंदी सिनेमात एक डायलॉग होता..‘हमें मिटा सके ये जमाने में दम नहीं, हम से है ये जमाना, जमाने से हम नहीं’. कधीकधी सिनेमातले संवादही ख-या आयुष्यात अगदी चपखलपणे बसतात. आणि ‘मिशन आय एम’नं हीच गोष्ट खरी करुन दाखवलीये. तुम्ही आहात, तर जग आहे, नाहीतर काहीच नाही. ‘आय एम’, मी आहे याचा थेट अर्थ होतो माझा आत्मविश्वास आणि माझी अभिव्यक्ती. आधी म्हटलं जायचं की मौन पाळणं हाही व्यक्त होण्याचा एक मार्ग आहे. पण आता मौन पाळणं म्हणजे स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. त्यामुळेच तुमच्या भावनांना आत्मविश्वासाने व्यक्त करणं ही आजची सर्वात मोठी गरज आहे. हे तर नक्की आहे की तुम्हाला प्रचंड स्पर्धेचा सामना करायचाय. तुमची स्वत:ची अशी ओळख बनवायचीये. आणि त्याचसाठी तुमच्या नसण्यापासून तुमच्या असण्यापर्यंतच्या प्रवासात दोन महत्त्वाचे टप्पे तुम्हाला पार करावे लागतात...आणि ते म्हणजे आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती.

Related Stories