नोकरी सोडून डोंगरी स्वयंपाकात नशीब अजमावतायत अर्चना रतूडी आणि स्वाती दोभाल!

0

दोघा मुलींनी ठरवून ठेवले आहे की, कॅटरिंगचे काम चांगले चालले तर त्या देहराडून मध्ये एक असे उपहारगृह सुरू करतील ज्याची ‘थिम’ डोंगरी असेल, इतकेच नाहीतर वाढप्यांचे गणवेश आणि अन्नपदार्थ सुध्दा पहाडीच असतील.

या दोन मुलींनी आपल्या खाण्यापिण्याच्या परंपरेला जिवंत ठेवताना चांगल्या नोकरीचा त्याग केला आहे. त्यांच्या निर्णयाला विरोध होऊ नये म्हणून त्यांनी ही गोष्ट बराच काळ घरच्यांना सांगितली नाही. उत्तराखंडच्या देहराडून येथे राहणा-या अर्चना रतुडी आणि स्वाती दोभाल यांनी ‘रस्यांण’ नावाचे गढवाली स्वयंपाकगृह सुरू केले आहे. अर्चना व्यवसायाने अंतर्गत गृहसजावटकार आहेत, तर स्वाती यांनी एमबीए केले आहे.

अर्चना आणि स्वाती दोघी मुळच्या गढवालच्या राहणा-या आहेत. दोघींचे शिक्षण देहराडून येथे झाले. दोघींची मैत्री तेंव्हाच झाली जेंव्हा त्या वर्षांनुवर्ष जुनी संस्था ‘धाद फाउंडेशन’ मध्ये डिसेंबर २०१२ मध्ये भेटल्या, त्यावेळी निर्भया प्रकरण घडले होते. त्यावेळी ‘धाद फाऊंडेशन’च्या वतीने देहराडूनच्या गांधी चौकात एक मोर्चा काढण्यात आला होता त्यात अर्चना आणि स्वाती यांनी देखील भाग घेतला होता. त्यानंतर दोघी अनेकदा भेटल्या आणि या भेटीतून मैत्रीच्या गाठी बांधल्या. त्यावेळी दोघी नोकरी करत होत्या. पण त्या दोघींची काहीतरी वेगळे काम करण्याची इच्छा होती. प्रश्र्न असा होता की काय करावे ते दोघींनाही माहिती नव्हते. त्याचवेळी स्वाती यांच्या वडिलांची यकृत प्रत्यारोपण श स्त्रक्रिया दिल्लीत पार पडली. त्यावेळी स्वाती यांनी पाहिले की रुग्णालयात आणि आसपास टिफीन सेवा चालते. स्वाती यांना हे काम आवडले. देहराडूनला परत येताच त्यांनी ही गोष्ट अर्चनाला सांगितली आणि विचारणा केली की, असेच काम आपण देहराडून मध्ये का करु नये? कारण देहराडूनमध्येही बाहेरून येऊन खूप मुले शिक्षण घेतात, जे साधारणपणे मेस किंवा उपहारगृहात जेवतात. त्यांनी नक्की केले की लोकांना जर स्वच्छ घरचे अन्न मिळाले तर त्यांना ते नक्कीच आवडेल.

जरी त्यावेळी हे काम इतके सोपे नव्हते कारण अर्चना आणि स्वाती दोघीजणी आपापल्या क्षेत्रात काम करत होत्या. असे असूनही दोघींनी ठरविले की, हे काम नोकरी करून करायचे. अशा प्रकारे दोघींनी २०१४ मध्ये ‘साझा चुल्हा’ या नावाने टिफीन सेवा सुरू केली. अर्चना सांगतात की, “ डोंगरी समाजात व्यापार करणे फार चांगले समजले जात नाही. त्यामुळे आम्ही आमच्या या कामाबाबत घरात काही सांगितले नाही. आणि एक खोली आणि स्वयंपाकघर भाड्याने घेऊन काम सुरू केले.”

आपले काम करण्यासाठी दोघींनी चार महिलांना ठेवले. या महिला विधवा आहेत किंवा खूपच गरीब आहेत, ज्यांच्यावर कुटूंबाची सारी जबाबदारी आहे. सुरुवातीला टिफीन ने-आण करण्यासाठी दोघींनी एका मुलाला काम दिले, पण जेंव्हा त्याने या कामात गोंधळ केला तेंव्हा या कामाची जबाबदारी त्यांनी स्वत:वर घेतली. आज अर्चना आणि स्वाती दोघी मिळून वेगवेगळ्या कार्यालयात, दुकानांत जेवण पोचविण्याचे काम करतात. जेवणात त्या दोघी वरण-भात,भाजी, लोणचे, सलाद, आणि चार पोळ्या देतात.

सुरुवातीपासूनच लोक त्यांच्या कामाचे कौतुक करु लागले. अर्चना यांचे म्हणणे आहे की, काही वयोवृध्द लोक तर इतके खूश झाले की, त्यांनी या कामाचे आगाऊ पैसे देण्याची तयारी दर्शवली. अर्थातच दोघींनी नम्रपणाने त्याला नकार दिला. हळू-हळु लोक त्यांचे काम ओळखू लागले. एकदा उत्तराखंडमधील एक नियतकालिक ‘अतुल्य उत्तराखंड’ मध्ये या दोघींच्या कामाबद्दल लेख प्रसिध्द झाला आणि त्यांची छबीदेखील पहिल्या पानावर झळकली. ज्यात त्यांच्या कामाचे खूप कौतुक करण्यात आले होते. तेंव्हा त्या दोघींनी आपल्या या कामाबाबत घरात सांगितले. त्यावर आधीतर त्यांचे आई-वडिल नाराज झाले, पण जसजसे त्यांचे काम वाढत गेले तसे-तसे घरच्यांनी देखील त्यात मदत करण्यास सुरूवात केली. स्वाती यांचे बंधु गरज असेल तेंव्हा त्यांना मदत करतात.

टिफिन सेवेनंतर या दोघा मैत्रिणींनी कॅटरिंगच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. खरेतर या क्षेत्रात आधीपासूनच तीव्र स्पर्धा होती, त्यामुळे दोघींनी ठरविले की त्या इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील जेणे करून लोक आकर्षित होतील. दोघींनी मिळून ठरविले आहे की, त्या उत्तराखंडच्या खाद्यपरंपरेचे जतन करण्यासाठी काही करतील. त्यासाठी त्यांनी या वर्षी जानेवारीत ‘रस्यांण’ नावाची कॅटरिंग सेवा सुरू केली आहे. त्यातून त्या डोंगरी पध्दतीचे भोजन लोकांसमोर आणत आहेत. अर्चना मानतात की, “ अशा प्रकारे एकतर लोक डोंगरी पध्दतीशी परिचित होतील दुसरे असे की यातून डोंगरी अन्नधान्याला मागणी वाढेल. ज्यातून गावाच्या महिलांनाही अप्रत्यक्षपणे रोजगार मिळेल.

दोघींच्या या प्रयत्नाला स्थानिक लोकांनी चांगल्या पध्दतीने स्विकारले आहे. इतकेच नाहीतर देहराडून आणि आसपासच्या अनेक उपहारगृ्हातून या कामासाठी त्यांना संपर्क करण्यात आला, जेणेकरून त्यांनाही त्यांच्याकडे येणा-या ग्राहकांना डोंगरी भोजनाचा आस्वाद देता यावा. अर्चना यांच्या मते त्यांचे हे काम सुरू होऊन थोडाच कालावधी लोटला आहे, पण मागणी अपेक्षेपेक्षा जास्तच आहे. हे काम दोघींनी स्वत:च्या पैशातून सुरु केले आहे. आपल्या भविष्यातील योजनांबाबत अर्चना यांचे म्हणणे आहे की, “ मी आणि स्वाती दोघींनी हे ठरवून ठेवले आहे की, जर आमच्या कॅटरिंगच्या कामात प्रगती झाली, तर आम्ही देहराडून मध्ये एक असे उपहारगृह सुरू करु ज्याची थिम डोंगरी असेल यासोबत आमचा प्रयत्न हा असेल की यात काम करणा-या जास्तीत जास्त महिलाच असतील.”

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

मुंबईत या माता-पूत्र जोडीने ‘बोहरी किचन’च्या माध्यमातून कसा बदलला ‘घर का खाना’चा अर्थ!

स्नॅकीबलः एक पाऊल निरोगी जगण्याच्या दिशेने

'रोडीज ते फुडीज्' कवनीत साहनी यांचा रंजक प्रवास

लेखिका : गीता बिश्त
अनुवाद : नंदिनी वानखडे -पाटील