भगतसिंह यांची विचारसरणी रास्वसंघाला परवडणारी आहे का? : आशूतोष

भगतसिंह यांची विचारसरणी रास्वसंघाला परवडणारी आहे का? : आशूतोष

Tuesday March 29, 2016,

6 min Read

शहीद भगतसिंग एकदम प्रकाशझोतात आले आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष त्यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी ते राहूल गांधी ते अरविंद केजरीवाल प्रत्येकाला त्यांच्याबद्दल प्रेम वाटते आहे. अकाली दलाला तर साक्षात्कार झाला आहे की शहीद भगतसिंग यांना भारतरत्न मिळावे आणि त्यासाठी राष्ट्रपतींना विनंती करणार आहेत. दिल्ली विधानसभेबाहेर असलेल्या अर्धकृती पुतळ्याला देखील त्यांचा आक्षेप आहे. त्याचवेळी अकालीदलाचे राजकीय घटकपक्ष असलेल्या भाजपाचे गुरु असलेल्या रास्वसंघाने देखील यावर खूप कळवळा दाखवला आहे. सा-यांनाच आता एकदम देशप्रेमाचा पुळका आला असावा असे हे चित्र आहे. एखाद्याचा राष्ट्रवाद तपासून बघण्याची ही जणूकाही फूटपट्टी मानली जात आहे आणि शशी थरुरांसारख्या एखादयाने कन्हैया कुमार याची तुलना भगतसिंग यांच्याशी केली तर त्याचे तुकडे तुकडे करण्याची भाषा ते करत आहेत. मी अलिकडेच एका दूरचित्रवाणीच्या चर्चेत गेलो होतो आणि एक तरूणी त्यावेळी प्रचंड रागावली जेंव्हा अशी तुलना करण्यात आली, मला तीची हतबलता आणि दु:ख तिच्या चेह-यावर जाणवत होते.

image


आम्हा भारतीयांसाठी भगतसिंग हे नेहमीच आदरणीय राहिले आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे ते आदर्श राहिले आहेत. हे नाकारून चालणार नाही की ते गांधीजींपेक्षा नक्कीच वेगळे होते. आणि गांधीजीनी स्वांतत्र्याच्या चळवळीत त्यांची हिंसक कृत्ये कधीच मान्य केली नाहीत. पण तरीही भगतसिंग यांनी त्यांच्या बलिदानातून १९३१च्या त्या काळात सा-या देशाला झपाटून टाकले होते ज्यावेळी त्यांना सुखदेव आणि राजगुरु यांच्यासोबत फाशी देण्यात आले होते. ते केवळ २३वर्षांचे होते. क्रांतीच्या लढ्याचे ते अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान झाले. पण रास्वसंघ / भाजपा आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना आता त्यांचा कड येण्यामागे वेगळ्याच प्रकारच्या प्रेरणा असाव्यात असे दिसते. त्यांच्याआधी असेच प्रयत्न सरदार पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत देखील त्यांनी केले होते, दोघांचा रास्वसंघाशी कोणताही संबंध नव्हता आणि संघाने संघटना म्हणून स्वातंत्र्य चळवळीत कधीच भाग घेतला नव्हता. हे दोन्ही नेते कॉंगेसपक्षाचे ज्येष्ठ नेते होते. मी थोड्याफार प्रमाणात सरदार पटेल यांच्या संघाला असलेल्या आदर्शांच्या बाबतची जवळीक समजू शकतो, पण सुभाष बोस मात्र पूर्णत: वेगळाच मुद्दा आहेत. ते समाजवादी विचारसरणीचे क्रांतिकारी नेते होते.

त्याचप्रमाणे भगतसिंग यांचेही संघ किंवा भाजपासाठी काही आदर्शवादी नाते असल्याचे दिसत नाही. इतकेच कशाला माझ्या मनात मुळीच शंका नाही की, ते जर जिवंत असते तर मोदी सरकार आणि रास्वसंघावर सर्वाधिक टीकाच त्यांनी केली असती. रास्वसंघ/ मोदी सरकारची जेएनयू बाबतची भूमिका पाहून भगतसिंग यांना रागच आला असता. रास्वसंघ/ मोदी सरकारने काहीच कारण नसताना जेएनयू मधील घटनांना दहशतवादाचा रंग दिला आणि राष्ट्रद्रोही ठरविण्याचा चंग बांधला. रास्वसंघाला साम्यवादाचा कट्टर विरोधक समजले गेले आहे, आणि जेएनयू मध्ये साम्यवादी विचारसरणीचा पगडा असल्याने रास्वसंघाच्या व्देषमुलक राजकारणाचे ते लक्ष्य असल्याचे दिसते. देशविरोधी घोषणा दिल्याचे निमित्त झाले आणि त्यांना आयतीच संधी चालून आली. अशावेळी मला आश्चर्य वाटते जेंव्हा रास्वसंघाने भगतसिंग यांच्याबाबत ते त्यांच्यापैकीच कुणी एक असल्याचे दाखवावे! आणि त्यांना राष्ट्रभक्ति आणि देशप्रेमाचे प्रतिक ठरवावे.

भगतसिंग साम्यवादी विचारांचे होते. अगदी लहानवयातच त्यांच्यावर कार्ल मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारांचा प्रभाव होता. बोल्शेव्हिक क्रांतीने त्यांना झपाटून टाकले होते आणि लेनिन हा त्यांचा आदर्श होता. स्वातंत्र्याची बीजे आणि उपाय त्यांना साम्यवादी क्रांतीच्या सोविऐत युनिअनच्या विचारांत असल्याचे जाणवत होते. त्यांना माहिती होते की, भारतातील गोर गरीब कामगारांच्या प्रश्नांना नियंत्रित हुकूमशाहीच्या माध्यमातून सोडवता येऊ शकते. दास कँपिटल आणि साम्यवादी विचारांच्या जाहीरनाम्यातील मुद्देच त्यांनी सुखदेव आणि राजगुरु यांच्यासोबत विधानसभेत भिरकावलेल्या पत्रकांत होते, ज्यासाठी त्यांना नंतर फाशीवर जावे लागले. त्यावर लिहिले होते, “ माणसाचे माणसांकडून आणि एका देशाचे अन्य दुस-या देशाकडून होणारे शोषण तोवर थांबणार नाही जोवर साम्राज्यवादी विचारांना रोखले जाणार नाही.” ते सांगत असत की राजसत्ता बदलून नाहीतर समाजव्यवस्था बदलून बदल घडू शकेल. पत्रकांत म्हटले होते की, “ मानवता त्याचवेळी मुक्त होऊ शकेल ज्यावेळी जग भांडवलशाही आणि साम्राज्यवादी विषमतेच्या युध्दापासून मुक्त होईल” रास्वसंघ केवळ हिंदूच्या एकतेबद्दल बोलते संपूर्ण श्रमजीवी वर्गाबद्दल नाही. पण भगतसिंग या विचारांचे होते की कामगारांनी लढा देऊन लोकांचे राज्य स्थापन करावे.

साम्यवाद मानतो की, धर्म लोकांना विभागतो आणि मार्क्सने तर धर्म ही अफूची गोळी आहे जी देश आणि देव असा भेद करण्यास शिकवते असे म्हटले होते. त्यामुळे धर्म हा रास्वसंघाच्या विचारसरणीचा आत्मा आहे. हिंदूत्व ही प्रेरणा आहे. साम्यवाद आणि समाजवादाचा पुरस्कर्ता म्हणून भगतसिंग खरेतर नास्तिक होते आणि त्यांनी ते कधी कुणापासून लपवून ठेवले नाही. त्यांचे पत्रक “ मी नास्तिक का आहे?” हे ऐतिहासिक तथ्य आहे सा-यांनी वाचावे असे. तो त्यांच्या विचारांचा असा झरोका आहे त्यातून समजेल की ‘भगतसिंग’ हे नेमके काय होते. त्यांनी देवाचे अस्तित्वच नाकारले होते. त्यांनी प्रश्न विचारले होते की, जर देव आहे तर जगात इतके दैन्य का आहे? गरिबी का आहे? त्यांनी त्यांच्या पत्रकात म्हटले आहे, “ जर तुम्ही विश्वास करत असाल की येथे सर्वसाक्षी परमेश्वर विद्यमान आहे, हे सारे जग कुणी निर्माण केले? मग मला सांगा हे भेदभाव आणि दु:खभरीत जग का निर्माण केले? एकही माणूस आनंदी नाही?”

या सा-यात रास्वसंघ अगदी दुस-या टोकाला असल्याचे दिसते. मी विचारू शकतो का की, रास्वसंघ भगतसिंग यांच्या देव आणि धर्माबद्दलच्या संकल्पना काय होत्या ते सिध्द करु शकते का? प्रथमदर्शनीच भगतसिंग साम्यवादी विचारांचे नव्हते का? जर होकार असेल तर मग दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी त्यांचे पुस्तक विचारांचा गुच्छ मध्ये असे का लिहिले आहे की, “ भारताचे तीन शत्रू आहेत, साम्यवाद्यांना, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्या पंक्तित का ठेवले आहे? हे विसंगती दर्शवते. गोळवलकर यांच्या म्हणण्यानुसार भगतसिंग आणि रास्वसंघ एकत्र चालूच शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात एकत्र येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

हे देखील नमूद करणे रोचक ठरेल की भगतसिंग यांनी जवाहरलाल नेहरू यांची प्रशंसा केली होती, ज्यांना रास्वसंघ/भाजपा खलनायक मानते. भगतसिंग यांनी नेहरू आणि सुभाष बोस यांची तुलना करताना म्हटले आहे की, बोस हे भावनाशील आहेत पण नेहरू व्यवहारी आहेत. त्यांनी पंजाबच्या युवकांना आवाहन केले होते की, “ नेहरूंचे अनुकरण करा, कारण बोस आणि नेहरूंपैकी नेहरूंच्या मार्गानेच पंजाबच्या युवकांचे हित आहे. रास्वसंघाला हे सारे परवडणारे आहे का? नाही! रास्वसंघाने शोध लावला की सरदार पटेल आणि सुभाष बोस नेहरूंच्या विरोधात होते आणि त्यांचा लोकांच्या मनात असलेल्या लोकप्रियतेचा वारसा खोडून टाकण्यासाठी रास्वसंघाने मान्य केले आहे की, रास्वसंघाकडे नेहरूपर्व असे पर्यंत संघाच्या विचारसरणीला लोकमान्यता मिळवता येणार नाही. जेंव्हा पासून मोदी सरकारने सत्ता हाती घेतली आहे तेंव्हापासून नेहरू यांच्या विकासाच्या ध्येय धोरणांबाबत नेहमीच वेगळी भूमिका घेण्यात येत आहे. त्यामुळे भगतसिंग यांचे नेहरुंबाबतचे विचार मी दाखवून दिले ते चुकीचे ठरवता येतील का? याचा अर्थ रास्वसंघाने गोळवलकर यांच्या विचारांना बाजुला करून भगतसिंग यांचे विचार मान्य केले आहेत असा होतो काय? रास्वसंघही असे मानतो का धर्म ही माणसांना वेगळी करणारी गोष्ट आहे जसे भगतसिंग मानतात. हे प्रश्न पाहता मला नक्की माहिती आहे, की रास्वसंघ आपली भूमिका बदलू शकत नाही जरी त्यांचे वागणे बदलल्यासारखे दिसत असले तरी आणि वस्तुस्थिती वेगळीच आहे. तेंव्हा भगतसिंग यांना मान्य करण्यासाठी त्यांचे हौतात्म्य हाच केवळ चांगला आधार असू शकतो ज्याने राजकीय लक्ष्य साध्य करता येणार आहे. परंतू मला हे स्पष्ट केले पाहिजे की, भगतसिंग हे खूप मोठे आदर्श होते आणि त्यांच्या नावाचा क्षुद्र राजकारणासाठी उपयोग होता कामा नये. हा त्यांच्या क्रांतीकारी विचारांचा आणि वारश्याचा अवमान केल्यासारखे होईल.

( या लेखाचे मूळ लेखक पत्रकार आशुतोष हे आम आदमी पक्षाचे नेते आणि राजकीय विचारवंत आहेत त्यांनी मांडलेल्या विचारांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.) 

अनुवाद: किशोर आपटे