आता उच्च शिक्षणाची सर्व माहिती एका टचवर, स्टडीदुनिया डॉट कॉम एक उपयुक्त अॅप

0

गरज ही शोधाची जननी असते असं म्हटलं जातं. मालेगावच्या क्रिषीकेश खैरनार याच्या बाबतीत तसंच घडलं. दहावी पास झाल्यावर सीए बनण्याच्या ध्येयानं पुण्यात येऊन वाणिज्य शाखेत प्रवेश तर मिळवला. पण सीए संदर्भात इंटरनेटच्या महाजाळात अभ्यासक्रमाची माहिती मिळवत असताना एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. विद्यार्थ्यांना जे हवंय ते मोफत उपलब्धच नाहीए. आज जिथं शैक्षणिक सर्वच गोष्टींसाठी इंटरनेट हा एकमेव पर्याय म्हणून पाहिला जात असताना सीए सारख्या अभ्यासक्रमाबाबतचे स्टडीमटेरियल अगदी विंखुरलेल्या अवस्थेत उपलब्ध आहेत. काही ठिकाणी ते मिळतात पण त्यासाठी पैसे मोजावे लागतात. ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत इंटरनेट पोचलं पण आता त्यांना ही माहिती आणि स्टडी मटेरीयल हवं असल्यास त्यासाठी पैसे मोजणं त्यांना परवडणारं नव्हतं. आता ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल का याचं विचारसत्र सुरु असतानाच त्याला साथ मिळाली ती वर्गमित्र अथर्व कोळेकरची. मग दोघांनी मिळून नीट, आयआयटी जेईई, युपीएससी अशा परिक्षांच्या नोटस मोफत मिळवून देण्याच्या दृष्टीनं प्रथम स्टडीदुनिया डॉट कॉम या मोबाईल अॅपची निर्मिती केली. आज त्यांना जो प्रतिसाद मिळतोय तो खरंच चांगला आहे. आता ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला एका टचवर त्याला हव्या असलेल्या अभ्यासक्रम आणि परिक्षेची सर्व माहिती मिळेल. तेही अगदी मोफत. त्यासाठी एकही पैसा देण्याची गरज नाही. क्रिषीकेश आणि अथर्व पुण्याच्या एमबीसीसी महाविद्यालयात सध्या बारावीत शिकतायत. आपला अभ्यास करताना इतरांना अभ्यासाचं ऑनलाईन दालन आणि ते ही मोफत सुरु करण्याची त्यांची कामगिरी खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे. 

क्रिषीकेश सांगतो, “ मी लहानपणापासूनच इंटरनेटवर बराच वेळ घालवायचो. अनेक नवनवीन प्रोग्राम डाऊनलोड करणं. त्याची कार्यपध्दती पाहणं हा माझा छंद बनला होता. वेगवेगळ्या वेबसाईटवर जाणं. संपूर्ण माहितीचं विश्वच माझ्यासाठी इंटरनेटनं खुलं केलं. मज्जा येत होती. नववीलाच असताना आपण अश्या वेबसाईट तयार करु शकतो असं वाटू लागलं. यातूनच बझकिडा डॉट कॉम आणि अहिराणी जोक्स अशा दोन वेबसाईट मी बनवल्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणून आत्मविश्वास वाढला.”

दहावी उत्तीर्ण झाल्यावर क्रिषीकेश पुण्याला आला. त्यानं एमबीसीसी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्य़ाला सीए व्हायचं होतं. पुण्यात आल्यावर सीए व्हायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन काय मिळतंय का हे पाहणं सुरु झालं. क्रिषीकेश सांगतो, “इंटरनेटवर जे काही मिळत होतं ते परिपूर्ण नव्हतं. इंटरनेटनं कुठं काय आहे हे समजत होतं पण नेमकं असं काहीच नव्हतं. अनेक वेबसाईट अश्या होत्या त्या पैसे देऊन अभ्यासाचं साहित्य देत होत्या. ते सब्सक्रिप्शन सर्वसामान्यांना परवडणारं नव्हतं. काही वेबसाईटवर थोड्या प्रमाणात साहित्य उपलब्ध होतं. पण ते अगदी त्रोटक आणि अपूर्ण होतं. ही गोष्ट मी अथर्वला बोलून दाखवली. लर्निंग पोर्टलची कल्पना आली आणि पेड पेक्षा आपल्यासारख्या असंख्य लोकांना मोफत ही माहिती आणि अभ्यासाची माहिती मिळावी या कल्पनेनं जोर धरला. आज अॅपची जमाना असल्यानं स्टडी दुनिया अॅप असला पाहिजे असं ठरवून आम्ही मोबाईल अॅपच्या तयारीला लागलो. मी तांत्रिक बाजू पाहण्याचं ठरलं आणि अथर्व त्याचा कंटेन्ट तयार करणार होता. असे आम्ही दोघांनी एकत्र येऊन अगदी पध्दतशीरपणे स्टडीदुनिया अॅपच्या निर्मितीला सुरुवात केली.“ 

“ आपला नियमित अभ्यास सांभाळून आमचं अगदी आठ-आठ तास सतत या अॅपचं काम सुरु होतं. नक्की कुठल्या अभ्यासक्रमांची मागणी आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या कुठल्या गोष्टी मिळत नाहीयेत. याची पूर्ण माहिती आम्ही मिळवली. यातून नीट, आयआयटी जेईई, युपीएससी, सीए अशा अभ्यासक्रमांबद्दल विद्यार्थ्यांना मिळणारी माहिती स्टडीदुनियाच्या मार्फत पुरवण्याचं ठरलं. अगदी तीन महिन्यात आम्ही मेहनत करुन त्यातला कंटेन्ट तयार केला. वेगवेगळ्या शैक्षणिक अॅपमध्ये जे चांगलं आहे ते इथं एकत्र कसं मिळेल हे पाहिलं गेलं आणि य़ातूनच स्टडीदुनिया अॅप आकाराला येऊ लागला.” क्रिषीकेश अॅप निर्मितीची माहिती देत होता. 

स्टडीदुनिया अॅपमध्ये वेगवेगळ्या परिक्षांसंदर्भातली सर्व माहिती आणि अभ्यासासाठी लागणारं साहित्य उपलब्ध आहे. हे साहित्य तज्ञांनी तपासल्यानंतरच अपलोड करण्यात आलं आहे. त्यामुळं त्यात चुका अगदी नगण्य आहेत. शिवाय या अभ्यासक्रमांचे प्रश्नसंच इथं उपलब्ध करुन देण्यात आलेत. जेणेकरुन विद्यार्थी आपली तयारी करु शकतील. नेमके कुठले प्रश्न येतात आणि त्यांची उत्तरं काय द्यावीत याची तयारी इथं होते. शिवाय या अॅपवर ईबुकचा खजिना विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आलाय. ती डाऊनलोड करुन पीडीएफ फॉरमॅटमध्ये ऑफ लाईन वाचता येण्याची सुविधा आहे. शिवाय थेट तंज्ञांकडून आपल्या शंकांचं निरसन  करण्याची सुविधा ही आहे. शिवाय व्हिडीयो लेक्चरही उपलब्ध करुन देण्यात आलेत. यामुळं एका टचवर विद्यार्थ्यांना जे काही हवंय ते मिळणार आहे. 

“ हे अॅप अजूनही प्राथमिक स्तरात उपलब्ध आहे. यात अनेक गोष्टी नव्यानं येणार आहेत. त्यासाठी वेळ लागणार आहे. आम्ही एप्रिल महिन्यात हे अॅप तयार केलं आणि प्लेस्टोरवर टाकलं. आतापर्यंत आम्हाला सात हजार हून जास्त डाऊनलोड मिळालेत. आम्हाला मिळणाऱ्या रिव्ह्यू आणि कमेन्टमधून आम्ही अनेक गोष्टी सुधारतोय. त्याचा अॅप आणखी परिपूर्ण होण्यास मदत होतेय.” क्रिषीकेश अॅपच्या यशाबद्दल सांगत होता.


ज्या वयात मौजमस्ती करायची त्या वयात क्रिषीकेश आणि अथर्व या दोघांनी आपल्या सारख्या अनेकांना उपयोगी पडेल असं अॅप तयार केलंय. क्रिषीकेश सांगतो, “ आम्ही हे अॅप तयार करण्यासाठी अनेक तास कम्प्युटरवर बसून  रहायचो. तेव्हा आमच्या पालकांना चिंता वाटायची आमच्या अभ्यासाची. आता हे स्टडीदुनिया लोकांना कसं उपयोगी पडतंय हे त्यांना समजल्यानंतर त्यांनाही अभिमान वाटतोय आमचा. माहिती अभावी ग्रामीण भागातले असंख्य विद्यार्थी योग्य शिक्षणापासून मागे राहतात. स्टडीदुनियानं ही समस्या संपेल आणि ग्रामीण भागातूनही अनेकजण या परिक्षांमध्ये शहरी मुलांसारखे आपली चुणूक दाखवतील. तेवढं झालं तरी आमची मेहनत कामाला आली असं म्हणायला हरकत नाही.”

सध्या गुगल एडमार्फत या अॅपवर जाहिराती येतायत. पुढे जाऊन टायअप आणि इतर माध्यमातून अॅपचा खर्च निघू शकतो असा विश्वास क्रिषीकेशला विश्वास आहे. काहीही झालं तरी विद्यार्थ्यांना ही माहिती मोफतच मिळायला हवी असं क्रिषीकेश आणि अथर्व यांना वाटतंय.  

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या

सर्व काही छंदासाठी... हॉबीगिरी डॉट कॉम एक अनोखा उपक्रम 

व्यवसाय वृद्धीसाठी मागणीनुसार वेबसाईट आणि मोबाईल अॅप सेवा ‘ClickExcel.com’

'बुक माय अॅक्टिविटी'च्या मदतीनं शोधा आपल्या छंदासाठीचं योग्य ठिकाण