एक असे महारथी ज्यांनी हॉकी सोबत केला विवाह आणि घडविले अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू!

0

एड्रीन डिसुजा, गोविन परेरा, विरेना रास्किन्हा...हे हॉकीचे असे महान खेळाडू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवला आहे. यांचे एक वैशिष्ट्य देखील आहे, ते म्हणजे या लोकांनी ज्यांच्याकडून हॉकी खेळणे शिकले, त्यांचे नाव मर्जबान पटेल आहे. जवळपास ६५ वर्षांचे मर्जबान पटेल यांनी अशा अनेक खेळाडूंना हॉकीच्या त्या शिखरावर पोहोचविले आहे, जेथे पोहोचण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. हॉकीचे हे महारथी आजही त्या मुलांना हॉकी शिकवितात, जे या खेळावर प्रेम करतात आणि त्याला आपली कारकिर्द बनवू इच्छितात. मर्जबान पटेल यांच्यामुळे आज भारतीय हॉकी संघात केवळ वरिष्ठ खेळाडूच नव्हे तर, कनिष्ठ वर्गातील अनेक खेळाडू देखील आज तयार होत आहेत.

मर्जबान यांचा जन्म मुंबईत झाला. मुंबईच्या भायखळा रेल्वे कॉलनीत राहणा-या मर्जबान यांनी केवळ १०वी पर्यंतच शिक्षण घेतले, कारण ते अभ्यासात जास्त हुशार नव्हते. मात्र, हॉकी हा खेळ त्यांना लहानपणापासूनच आवडायचा. मर्जबान सांगतात की, ते ज्या कॉलनीत रहायचे तेथेच त्यांच्या मित्राचे वडील हॉकीचे चांगले खेळाडू होते. ज्यांना ते नेहमीच हॉकी खेळताना पहात असत. हॉकीसाठी असलेली आवड ही त्यांच्यामुळेच आहे. मर्जबान यांनी सुरुवातीला त्यांना बघूनच हॉकी खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर कॉलनीत त्यांनी हॉकी खेळण्यास सुरुवात केली. हॉकी खेळता खेळता त्यांना त्यातील छोट्या छोट्या गोष्टी समजायला लागल्या.

ज्या भागात मर्जबान यांचे घर होते, त्याच्या जवळच हॉकीचा एक क्लब होता, ज्याचे नाव‘रिपब्लिकन स्पोर्टस क्लब’ होते. त्याची स्थापना सन १९६३ मध्ये झाली होती, जेथे तरुण खेळाडू प्रशिक्षण घेण्यासाठी येत होते. मर्जबान पटेल यांनी देखील हळूहळू या क्लबमध्ये जाण्यास सुरुवात केली. त्या क्लबमध्ये संसाधनांची खूप कमतरता होती, अशातच मर्जबान पटेल यांना हॉकी आवडत असल्यामुळे क्लबचे दुसरे काम देखील ते करायला लागले. त्या दरम्यान ते हॉकी देखील शिकत असत आणि क्लबचे काम देखील पहात असत. मर्जबान पटेल सांगतात की, या दरम्यान मला माहित होते की, खेळाडूंना कसे स्वतःसोबत सामिल केले जाते आणि त्यांना चांगला खेळ दाखविण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

काही काळातच मर्जबान पटेल यांनी क्लबमध्ये येणा-या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. या दरम्यान ते खेळाडूंना केवळ प्रशिक्षणच देत नसत तर, आपल्या देखरेखी खाली त्यांच्या मनात खेळा प्रती अनुशासन आणि समर्पणाची भावना देखील जागृत करत असे. गेल्या ४० वर्षापासून हॉकी खेळाडूंना प्रशिक्षण देणारे मर्जबान यांनी देशाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. जे हॉकीच्या मैदानावर आपने नाव प्रसिद्ध करत आहेत. ज्या क्लबमध्ये एकेकाळी मर्जबान हॉकी खेळण्यासाठी जात होते, आज ते त्याच क्लबचे संचालन देखील करत आहेत. आज त्यांच्या क्लबमध्ये जी गरीब मुलं हॉकी खेळण्यासाठी येतात, त्यांना ते हॉकी खेळण्यासाठी हॉकी, बूट आणि दुस-या वस्तू देखील देतात. या वस्तूंची व्यवस्था क्लब आणि हॉकीचे वरिष्ठ खेळाडू करतात.

आज युवराज वाल्मिकी आणि देवेंद्र वाल्मिकी भारतीय हॉकी संघाची शान आहेत. या दोन खेळाडूंनी मर्जबान पटेल यांच्याकडून हॉकीचे धडे गिरवले आहेत. त्या व्यतिरिक्त भारतीय कनिष्ठ आशिया चषक विजेता संघातील गोलकिपर असलेल्या सूरज यांना मर्जबान यांनीच विरोधी संघाचा सामना कसा करायचा ते शिकविले. आज त्यांच्या क्लबमध्ये जवळपास ३० खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत, जे येणा-या काळात देशाचे नाव प्रसिद्ध करण्याची जिद्द बाळगतात. मर्जबान पटेल आज ६५ वर्षांचे आहेत. मात्र, त्यांनी विवाह केला नाही. त्यांचे म्हणणे आहे की, “ माझा विवाह तर हॉकी सोबत झाला आहे, त्यामुळे दुसरा विवाह करण्याचा काही अर्थ नव्हता.” त्यांच्या मते, हे काम करण्यास खूप वेळ लागतो आणि विवाहित पुरुषासाठी इतका वेळ काढणे शक्य नसते.

मर्जबान पटेल यांचा हॉकी शिकविण्याचा प्रवास इतकाही सहज नव्हता. ते सांगतात की, आर्थिक अडचणीमुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला, कारण त्यांच्या क्लबमध्ये अधिकाधिक गरीब मुलंच हॉकी शिकण्यासाठी येत असत. आर्थिक अडचण असूनही त्यांनी कुणासाठीही आपल्या क्लबचे दरवाजे बंद केले नाहीत. त्यांच्या मते,“अनेकदा अशीही परिस्थिती आली की, दुस-यांकडून कर्ज घेऊन क्लबला चालवावे लागत असे, मात्र मी हिम्मत हरलो नाही. आजही या क्लबला चालविण्यासाठी अनेक समस्या येतात. मात्र आता जुने खेळाडू स्वतःकडून जितकी होऊ शकेल तितकी मदत करतात.” त्याव्यतिरिक्त मर्जबान पटेल यांचे म्हणणे आहे की, “ पूर्वीपेक्षा आता हॉकीचे सामान खूप महाग झाले आहे, अशातच हॉकीसाठी लोकांची आवड देखील कमी व्हायला लागली आहे.” असे असूनही ते मोफत हॉकीचे प्रशिक्षण देतात. मर्जबान पटेल रोज बॉम्बे हॉकी असोसिएशन मैदानात संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत आपल्या खेळाडूंना प्रशिक्षण देताना दिसतील. त्याव्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशीही ते आपल्या खेळाडूंना प्रशिक्षण देतात. क्लब व्यतिरिक्त मर्जबान पटेल काही शाळांमध्ये देखील हॉकीचे प्रशिक्षण देतात. त्यांचे म्हणणे आहे की, काही मुलं हॉकी खेळण्यास सुरु करतात. मात्र काही मुलं शाळेत तर, काही मुलं महाविद्यालयात जाऊन हॉकी खेळणे सोडतात, त्यामुळे ते निराश देखील होतात. मात्र सोबतच त्यांचे मत आहे की, ज्याप्रकारे हाताची पाचही बोटे समान नसतात, त्याचप्रकारे प्रत्येकजण हॉकीला आपले लक्ष्य बनवू शकत नाही. भविष्याच्या योजनेवरील प्रश्नावर मर्जबान पटेल यांचे म्हणणे आहे की, “ जोपर्यंत शरिरात जीव आहे, तोपर्यंत ते काम करत राहतील.” जर तुम्हालाही मर्जबान पटेल यांच्या या मोहिमेत सामिल व्हायचे असेल आणि त्यांची मदत करायची असेल, तर तुम्ही त्यांना इमेलद्वारे संपर्क करू शकता. 

conroyblaise@yahoo.co.in

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किशोर आपटे