समाजात नैतिक मूल्य जपण्यासाठीची तपस्या..आर.डी. रावल

खरं ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा वसा

0

आज आपला देश प्रगतीच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. आपण फार वेगाने पुढे जातोय. भारतात अनेक नवनवीन कंपन्या जन्माला येत आहेत. भारतीय तरुण जगभरातल्या नामांकित कंपन्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. पण हे सगळं असूनही एक वास्तव हे सुद्धा आहे की भारतात गुन्हेगारीचा आलेख वाढता राहिलेला आहे. त्यामुळे एकीकडे विकास आणि दुसरीकडे गुन्हेगारी अशा दोन्ही गोष्टी भारतात एकाच वेळी अस्तित्वात आहेत. पण हे असं कुठवर चालणार? एकाच वेळी या दोन्ही गोष्टी अस्तित्वात किती काळ राहू शकतील? हे नक्कीच शक्य नाही. त्यामुळेच जर देशाचा विकास असाच अबाधित ठेवायचा असेल, तर इथे होत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालावाच लागेल. नाहीतर विकासाचा हा चढता आलेख खाली यायला वेळ लागणार नाही.

पण मग देशातल्या कायद्याचं काय? देशात तर लोकशाही आणि कायद्याचं राज्य आहे. पण भारतात अस्तित्वात असलेला कायदा वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी खरंच पुरेसा आहे का? कठोर कायदे करून आपण या वाढत्या गुन्हेगारीला खरंच थांबवू शकतो का? कठोर कायद्यांच्या भीतीमुळे गुन्हेगार गुन्हा करणं सोडून देतील का? हा मोठा अवघड प्रश्न आहे, आणि त्याचं उत्तरही काही सोपं नाही. कारण या कठोर कायद्यांच्या भीतीमुळेच गुन्हेगारी कमी होणार असती, तर आत्तापर्यंत ती ब-याच अंशी कमी झालीही असती. पण वास्तव पहायचं झालं, तर ती कमी होण्याऐवजी उलट वाढतच आहे. गाव असो वा शहर, कुठेही पाहिलं तरी सगळीकडे गुन्हेगारीत वाढ होतानाच दिसते.


खरं ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा वसा घेतलेले आर.डी. रावल
खरं ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा वसा घेतलेले आर.डी. रावल


हरियाणाचे आर. डी. रावल यांचं मत मात्र काहीस वेगळं आहे. त्यांच्यामते कायदा त्याचं काम चोख बजावत असतो, आणि त्याची देशाला नितांत आवश्यकताही आहे. पण जर आपल्याला खरंच गुन्हेगारी कमी करायची असेल, तर लोकांना चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे. त्यांचं ज्ञान वाढवावं लागेल आणि त्यांना अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सत्य समजावून सांगावं लागेल. त्यांच्यात नवी चेतना आणि उत्साह निर्माण करावा लागेल. रावल म्हणतात, “जर एखाद्या व्यक्तीला वास्तवाचं भान असेल, आणि त्याला चांगल्या-वाईटाची जाण असेल, तर ती व्यक्ती स्वत:च गुन्हा करायला धजावणार नाही. जर आपण हे खरंच करू शकलो, तर त्यातून साधला जाणारा विकास हा स्थायी स्वरूपाचा असेल. संपूर्ण देशाचा सर्वच क्षेत्रात विकास होईल आणि संपूर्ण जगासमोर भारत एक आदर्श ठेऊ शकेल.” आणि हीच गोष्ट साध्य करण्यासाठी आर. डी. रावल यांनी मदत घेतली ती भारताच्या प्राचीन ज्ञानभांडाराने समृद्ध अशा भगवद्गगीतेची. गेल्या कित्येक वर्षांपासून रावल यांची ही तपस्या अविरत सुरु आहे.

कोणत्याही देशासाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. तिथल्या नागरिकांमध्ये नैतिक मूल्य असावी लागतात. कोणत्याही धर्म, जात आणि पंथाच्या लोकांना त्या देशात मान-सन्मान मिळायला हवा. पण आजकाल दोन समाजांमध्ये वाद, भांडणं आणि त्याचं रूपांतर हिंसेमध्ये अगदी सहज होतं. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर रक्तपात घडवून आणले जातात. आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा देश प्रगती करतही असेल, तरी ती प्रगती फार काळ टिकणं अशक्य आहे. लोकांमध्ये स्पर्धा नक्कीच असावी. पण त्या स्पर्धेचं रूपांतर द्वेष आणि मत्सरानं घेता कामा नये. आज भारताकडे जगभरातले देश भावी महासत्ता म्हणून पाहू लागले आहेत. कित्येक विदेशी कंपन्या आज भारतात येऊ लागल्या आहेत. देशात अनेक नवउद्योजक तयार होत आहेत. तरूण वेगाने यशाची नवनवीन शिखरं सर करत आहेत. हे सगळं होत असताना त्याच तरूणांमध्ये नैतिकतेचं भान असणं अत्यंत आवश्यक आहे.

सहज सोप्या भाषेत गीतेतलं संपन्न ज्ञान
सहज सोप्या भाषेत गीतेतलं संपन्न ज्ञान

रावल म्हणतात की ,“जगातले सगळेच धर्म महान आहेत. प्रत्येक धर्म सत्य आणि चांगल्या कर्माचीच शिकवणूक देत असतो. पण मानव त्या धर्माच्या धर्मग्रंथांमधल्या गोष्टींचं योग्य पालन करत नाही, आणि चुकीच्या दिशेनं जाऊ लागतो.” अगदी काही वर्षांपूर्वी रावल यांनी याच गोष्टीवर काम करण्याचा विचार केला. या भटकत जाणा-या समाजाला योग्य मार्गावर आणण्यासाठी भगवद्गगीता लोकांपर्यंत सोप्या शब्दांत पोहोचवण्याचं त्यांनी ठरवलं. खरंतर आर. डी. रावल हे काही धर्मगुरु नाहीत किंवा कुठले संतही नाहीत. ते तुमच्या आमच्यासारखेच एक सामान्य व्यक्ती आहेत. त्यांना फक्त भगवद्गीतेमधलं ज्ञान लोकांपर्यंत सोप्या शब्दांत पोहोचवायचं आहे. ते म्हणतात, “आजच्या तरूणांकडे रोजच्या धकाधकीमुळे खूप कमी वेळ असतो. आणि प्रत्येकाला संस्कृत समजणंही कठीण आहे. त्यामुळे भगवद्गगीता सर्वसामान्यांपर्यंत आणि विकासाच्या दिशेने घोडदौड करणा-या आजच्या तरूणांपर्यंत पोहोचवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अगदी सहजसोप्या भाषेत आणि संक्षिप्त स्वरूपात गीतेतलं प्राचीन आणि संपन्न ज्ञान उपलब्ध करून देणं. पण असं करताना एका गोष्टीकडे मात्र काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागेल. सोप्या भाषेत सांगताना गीतेचा मूळ गाभा आणि अर्थ कायम रहायला हवा.

याचसाठी रावल यांनी २००९ मध्ये ‘गीता भजनावली’ आणि २०१४ मध्ये ‘मानसी गीता’ ही पुस्तकं लिहिली. आणि विशेष म्हणजे या दोन पुस्तकांमधून रावल कोणताही नफा मिळवत नाहीत. ही पुस्तकं ते लोकांमध्ये मोफत वाटतात. खरंतर रावल यांनी अर्थशास्त्रात एम. ए.ची पदवी घेतलीये. शिवाय ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’(एसबीआय) अर्थात ‘भारतीय स्टेट बँक’मध्ये ते मुख्य व्यवस्थापक (चीफ मॅनेजर) म्हणून कार्यरत होते. पण याचमुळे त्यांना देशाच्या आर्थिक परिस्थितीचा पूरेपूर अंदाज आलेला होता. २००५ मध्ये ते नोकरीतून निवृत्त झाले. यादरम्यान नोकरीच्या निमित्ताने त्यांची अनेक ठिकाणी बदली झाली. त्यांना विविध राज्यातल्या, प्रदेशातल्या, प्रकारच्या लोकांना भेटण्याची, त्यांना जाणून घेण्याची संधी मिळाली. अगदी लहानपणीच रावल यांना कुणीतरी भगवद्गगीता भेट म्हणून दिली होती. तेव्हा भगवद्गगीता वाचल्यानंतर गीतेतल्या ज्ञानाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला आणि त्यांनी निर्धार केला की पुढे जाऊन ते गीतेचा, त्यातल्या ज्ञानाचा प्रसार करणार. गीतेतून देण्यात आलेल्या संदेशाचा देशहितासाठी उपयोग करणार.

आर. डी. रावल सांगतात, “भगवद्गगीते मध्ये श्रीकृष्णाने खूप व्यावहारिक आणि वास्तववादी गोष्टी सांगितल्या आहेत. आणि त्यामुळेच गीतेतलं हे ज्ञान अगदी कोणत्याही कालखंडात तितकंच लागू होतं, जितकं महाभारत घडलं त्या काळात लागू झालं. फक्त ते ज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. भगवद्गगीता म्हणजे एक स्वयंपूर्ण आणि स्वयंस्फूर्त ज्ञानाचं भंडार आहे. जर कुणी खरंच गीता आत्मसात केली, तर तो एक चांगली आणि परिपूर्ण व्यक्ती बनू शकेल. त्यातून फक्त त्या व्यक्तीचाच नाही तर संपूर्ण देशाचाच विकास होऊ शकेल.” आणि आर. डी. रावल हेच काम करत आहेत. तसं पहायला गेलं तर इतर अनेक लेखकांनीही गीतेवर लिखाण केलं आहे, गीतेचं आकलन करण्याचा प्रयत्न केला आहे. पण रावल यांनी गीता अत्यंत कमी शब्दांमध्ये आणि सहजसोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला गीता अगदी सहज समजू शकेल.

जगात अनेक धर्म आहेत. पण प्रत्येक धर्म शिकवण मात्र एकच देतो. प्रत्येक धर्मानं शेवटी विजय सत्याचा आणि मानवतेचा होतो असंच सांगितलंय. प्रत्येक धर्म शांतीचाच संदेश देतो आणि बंधुभावाच्या भावनेला सर्वोच्च प्राधान्यही. तुम्ही कोणत्याही धर्माचे अनुयायी असाल, तुमचा कोणत्याही धर्मावर विश्वास असेल. पण जर तुम्ही त्याचं योग्य आचरण केलंत, तर तुम्ही नक्कीच एक चांगली आर.डी. रावल व्यक्ती बनू शकाल.

अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास केल्यामुळे आर. डी. रावल यांना ही गोष्टी पक्की माहिती आहे की देशाच्या विकासामध्ये कोणकोणत्या बाबी महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांच्यामते देशाच्या विकासात सरकारची भूमिका आणि सरकारी योजना, धोरणांचं महत्त्व तर आहेच. पण त्याचबरोबर त्या देशात रहाणा-या लोकांना देशाच्या विकासासाठी हातभार लावावा लागेल, पुढाकार घ्यावा लागेल. आणि त्यासाठी लोकांना प्रत्येक धर्माचा आदर करावा लागेल, अकारण उठवल्या जाणा-या अफवांपासून दूर रहावं लागेल आणि सत्याचा अंगीकार करावा लागेल.

Related Stories

Stories by Pravin M.