विज्ञान अन् जगाच्या आकलनासाठी एका ‘आई’चे ‘स्टेलर चिल्ड्रेन्स म्युझियम’

विज्ञान अन् जगाच्या आकलनासाठी
एका ‘आई’चे ‘स्टेलर चिल्ड्रेन्स  म्युझियम’

Tuesday October 20, 2015,

6 min Read

ज्ञानप्राप्तीचे सर्वाधिक प्रभावी माध्यम कुठले असेल तर ते म्हणजे प्रयोग… प्रात्यक्षिके… जसजशी मुले प्रात्यक्षिके करू लागतात, तसतसे ते भोवतालच्या जगाशी संवादही साधू लागतात. जग त्यांना कळू लागते. मुलांच्या आकलन शक्तीवरील प्रात्यक्षिकांच्या सकारात्मक परिणांमाबद्दल अंजना मेनन कमालीच्या ठाम आहेत. प्रात्यक्षिकांशिवाय ज्ञानार्जन म्हणजे नुसतीच पोपटपंची, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. मेनन यांनी या ठाम धारणेतूनच २०१२ मध्ये दिल्लीतील गुडगावात ‘Stellar Children’s Museum’ (स्टेलर चिल्ड्रेन म्युझियम) या संस्थेची स्थापना केली. सहकार्य, प्रोत्साहन, सहभाग आणि आणखी अशा कुठल्याही बाबतीत यजमान अक्षय यांनी हात आखडता घेतला नाही... आणि मुलांसाठी फुललेल्या या स्वप्नाला अक्षय बहर आला.

इंजिनिअर आणि प्रोग्रॅमर म्हणून अंजना बरीच वर्षे अमेरिकेत होत्या. इथेच त्यांना मुलेही झाली. मुलांना सर्वकष ज्ञान असावे म्हणून त्यांना त्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या संधी आपण आई म्हणून उपलब्ध करून द्यायला हव्यात, असा त्यांचा पुरेपूर प्रयत्न असे. प्राणी संग्रहालय, टपाल तिकिटांचे संग्रहालय, पुरातत्व दृष्ट्या महत्त्वाच्या वस्तूंचे संग्रहालय अशा विविध प्रक्रारच्या संग्रहालयांतून मुलांना त्या आवर्जून नेत. विज्ञान संग्रहालयाला तर प्राधान्य असेच. अमेरिकेत अशा प्रकारची एकूण ३०० वर संग्रहालये आहेत.

मायदेशातील उणीव अन्‌ अस्वस्थता

परिस्थितीने आणि काळानेही कूस बदलली, तशा त्या भारतात परतल्या. इथे परतल्यानंतर मुलांना कुठे न्यायचे तर संग्रहालयांची वाणवाच. विज्ञान संग्रहालये तर नावालाही नाहीत. मायदेशातील ही उणीव त्यांना अस्वस्थ करून गेली. विज्ञान या विषयाबाबत मुलांमध्ये बालपणापासूनच जिज्ञासा निर्माण करण्याच्या दृष्टीने आपल्याकडे काहीही खास केले जात नाही, ही बाब त्यांना आता आपणच काही तरी करायला हवे म्हणून प्रेरणा देऊन गेली.

image


मनोरंजनासह मुलांचे ज्ञानार्जनही

अंजना म्हणतात, ‘‘सुटीच्या काळात मुलांच्या मनोरंजनासाठी इथले आई-वडील त्यांना एक तर बागेत घेऊन जातील. सिनेमाला नेतील. विविध प्रकारचे कॉम्प्युटर गेम उपलब्ध असतील, अशा एखाद्या ठिकाणी नेतील. व्हिडिओ ऑर्किडमध्ये नेतील. मनोरंजनासह ज्ञानार्जन यात कुठे आहे? म्हणूनच मी ठरवले की आपण या दोन्ही गोष्टी उपलब्ध करून देऊ. पुढे २०१२ मध्ये २ ते १० वयोगटातील मुलांसाठी एक संवादात्मक (इंटरॅक्टिव्ह) संग्रहालय सुरू करण्याच्या दिशेने हालचाली सुरूही केल्या. याच वर्षात नोव्हेंबरमध्ये संग्रहालय सुरू झाले. सध्या महिन्याला ६ हजार ५०० वर व्हिजिटर्स इथे येतात. गुडगावातील अँबिएंस मॉलमध्ये हे संग्रहालय असून, ते ११,००० चौरस फूट एवढ्या भव्य आकारात पसरलेले आहे. सात हॉल्स, एक थियेटर आणि एक रेस्टॉरंट अशी रचना आहे.

गुरुत्वाकर्षण, सापेक्षता ते चुंबकत्व

मुलांसाठी विज्ञान संग्रहालय ही कल्पना किमान व्यावसायिक दृष्टीने तरी आपल्याकडे अभिनव अशीच आहे. याउपर अंजना यांनी हे धाडस केले. मोठी गुंतवणूक केली. जोखीम होतीच, पण नफ्यापेक्षाही मुलांचा सर्वांगिण विकास हीच प्रेरणा अंजना यांच्या दृष्टीने या उपक्रमामागे अधिक महत्त्वाची ठरली. मुले एक ब्लॉक बनवतात तेव्हा त्यांच्यातल्या सृजनशिलतेचा कस लागतो. ते या खेळातून उद्दिष्टप्राप्तीसाठी धडपडायला शिकतात. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणा, की चुंबकत्वाचा नेमका प्रभाव म्हणा, की आइन्स्टाईनची सापेक्षता हे सारेच शब्दांत, भाषेत, व्याकरणात पकडणे आणि ते पुन्हा शब्द, व्याकरण आणि भाषेच्या माध्यमातून मुलांच्या गळी उतरवणे हे सगळे अगदी गुंतागुंतीचे ठरते. शिक्षक आपल्या परीने सांगून मोकळे होतात. मुलांना ते कितपत समजले, हे खरंतर महत्त्वाचं आहे. इथं या संग्रहालयात गुरुत्वाकर्षण, चुंबकत्व या आणि अशा वैज्ञानिक संकल्पना थेट एखाद्या खेळसदृश प्रयोगाच्या, प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सांगितल्या जातात, त्या मुलांना पटकन कळतात. गुंतागुंतीच्या या संकल्पनांचे अगदी सहज आकलन होते. शब्द फार खर्ची पडत नाही. थेट कृतीतून संवाद साधला जातो. मुलांच्या दृष्टीने तो परिणामकारक ठरतो. संग्रहालयातील कुठलीही वस्तू मुलांसाठी अस्पर्ष्य नाही. प्रत्येक वस्तू मुले हाताळू शकतात.

विज्ञान, भूगोल, कला, समाज जीवन

संग्रहालयात सात हॉल्स आहेत. विज्ञान, भूगोल, कला, शिल्प, धाडसाचे खेळ, समाज जीवन अशा विविध विषयांना ते वाहिलेले आहेत. संग्रहालयात दोन शिक्षक आहेत. सातही हॉल्समध्ये प्रत्येकी एक पर्यवेक्षक आहे. मुलांच्या शंकांचे निरसन या पर्यवेक्षकांकडून केले जाते. सामूहिक शिक्षणाची कल्पना थोडक्यात राबवली जाते. मुले गटागटातून प्रात्यक्षिके करतात, पाहतात. एकमेकांशी चर्चा करतात. पर्यवेक्षकांची, शिक्षकांची मदत घेतात. अर्थात शिकणे इथे गौण आहे. समस्या सोडवणे, तर्क लावणे, सल्ला घेणे हे सगळे कौशल्याचाच एक भाग आहे. शिकणे या संकल्पनेपेक्षाही ही सगळी कौशल्ये आत्मसात करणे मुलांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरते.

टार्गेट २ ते १० वयोगटातली मुले

संग्रहालयाचा ‘टार्गेट ऑडियन्स’ही ठरलेला आहे. तो म्हणजे २ ते १० वयोगटातली मुले. या वयोगटातील मुलांच्या शिक्षणासंदर्भात, आकलन क्षमतांसंदर्भात नेमकी माहिती असलेले प्रशिक्षित आणि अनुभव शिक्षक या संग्रहालयात नियुक्त आहेत. प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षणतंत्रातील अद्ययावत माहिती या शिक्षकांकडे उपलब्ध असते. थोडक्यात ते ‘अपडेट’ असतात. संग्रहालयाची रचनाही शिकागो (अमेरिका) येथील तज्ज्ञांच्या सहकार्यातून केली गेलेली आहे. मुलांसाठी संग्रहालये साकारण्याच्या क्षेत्रातील २५ वर्षांचा अनुभव या तज्ज्ञांच्या गाठीशी होता. सहा महिन्यांचा कालावधी त्यांनी रचनेसाठी घेतला. संग्रहालयातील हॉल्सचे विषय आणि त्यातली सामुग्री फार विचारपूर्वक ठरवण्यात आलेली आहे. उत्स्फूर्तपणे पालक मुलांना इथे आणतातच. त्यासह संग्रहालयातर्फे विविध शाळांच्या संयुक्त विद्यमानेही सहलींचे उपक्रम राबवले जातात.

‘Stellar Group’ चे आर्थिक सहकार्य

'Stellar Children’s Museum' हा तसा खर्चिक उपक्रम. ‘Stellar Group’ चे आर्थिक सहकार्य त्याला आहे. स्टेलर ग्रुप ही नोएडा येथील रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी आहे. ‘डेटॉल’सारख्या काही कॉर्पोरेट कंपन्यांचे प्रायोजकत्वही संग्रहालयाला बरेचदा मिळते. ‘हार्पर कॉलिन्स’, ‘ट्रॅव्हलर किड्स’, ‘फ्रँक टॉइज’ अशा काही कंपन्यांकडूनही सहकार्य मिळते. पुस्तके आणि डीआयवाय किट त्यांच्याकडून उपलब्ध करून दिले जातात. संग्रहालयातील दुकानाच्या माध्यमातून त्यांची विक्री केली जाते. सरकारकडून कुठलीही मदत घेतली जात नाही. तसा प्रश्नच नाही.

संग्रहालय आठवड्याचे सातही दिवस सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत सुरू असते. संग्रहालयाची सदस्य योजनाही आहे. त्यासाठी अर्थातच शुल्कात सूट दिली जाते. असे १४० वर सदस्य आजमितीला आहेत. ३० मिनिटांसाठी २०० रुपये आकारले जातात. संग्रहालयात घालवलेल्या वेळेच्या हिशेबाने पैशांची आकारणी केली जाते. मुलांसमवेत आलेल्यांसाठी शुल्क आकारणी केली जात नाही. बुधवारी शुल्कात विशेष सूट दिली जाते. वाढदिवस आणि अन्य आयोजनांसाठी विशेष पॅकेजेस्‌ही असतात.

आवडत्या कामातला त्रासही लाडका

काम आणि कुटुंबातील संतुलन राखणे महिलांच्या दृष्टीने आव्हानाचेच असते. अंजना सांगतात, ‘‘मला दररोज नोएडा-गुडगाव अशी ये-जा पुरते. त्रास होतोच. त्रागाही होतो, पण मला वाटते तुम्हाला जे मनापासून आवडते, ते करण्यात होणारा त्रास, त्रागाही तुम्हाला आवडायला लागतो. मुळात माझ्या मुलांबद्दल मी जसे जागरूक होते. या संग्रहालयाच्या माध्यमातून मी इतर मातांना तसे जागरूक करतेय, ही भावनाही मला त्रागा सहन करण्याचे बळ देते. सासू-सासरेही मला समजून घेतात. यजमान अक्षय तर अगदी छोट्या-छोट्या गोष्टींतही मला मदत करतात. संग्रहालयाच्या आर्थिक बाजूंमध्ये त्यांचेच लक्ष माझ्यापेक्षा अधिक असते. मी तर मुलांना या संग्रहालयातून होणाऱ्या फायद्यांमध्येच गुंतलेली असते. माझ्या मुलांवर असलेल्या माझ्या प्रेमातूनच खरं तर हे संग्रहालय उभं राहिलेलं आहे. प्रेम आणि जिद्द असं समीकरण त्यामागे आहे. अमेरिकेत मुलांसाठी अशी संग्रहालये आहेत आणि त्यांचा उपयोग मुलांच्या कल्पनाशक्तीला, सृजनशक्तीला होतोय तर माझ्या देशात असे संग्रहालय का असू नये, या जिद्दीतून मी हा प्रकल्प साकारलेला आहे. संग्रहालयाचे स्वरूप व्यावसायिक दिसत असले तरी तो निव्वळ व्यवसाय नाही, हे कृपया समजून घ्या.’’

‘जाेखीम नाही तर यशही नाही’

महिलांनी विविध क्षेत्रांतून सक्रिय व्हायला हवे, यावर अंजना यांचा भर असतो. महिलांनी जोखीम पत्करायला शिकले पाहिजे, असे त्या म्हणतात.

अंजना सांगतात, ‘‘माझ्याप्रमाणेच माझे यजमानही जोखीम पत्करणारे, पण मला वाटते जोखीम घेतल्याशिवाय यश तुमच्याकडे फिरकत नाही. तुम्हाला वाटते ना तुम्ही ही गोष्ट करू शकता. तुम्हाला वाटते ना ही गोष्ट केल्याने तुम्हाला आनंद मिळेल तर मग फार मागचापुढचा विचार करू नका. ती गोष्ट करा. प्रेम आणि जिद्द असली तर बाकीच्या गोष्टी घडत जातात. परिस्थितीही अनुकूल होत जाते. आणि फार भव्यदिव्यच केले पाहिजे असेही नाही. व्यवसायाचा आकार हा मुळात मुद्दाच होऊ शकत नाही. व्यवसायाचा प्रकार तेवढा महत्त्वाचा. व्यवसाय म्हणजे एखादे लहान मूल. तुम्ही जसजशी गुंतवणूक करत जाल तसतसा तो वाढत जाईल. त्याचा काय ताण घ्यायचा. कामाला सुरवात करणे महत्त्वाचे. नव्या कल्पनांसाठी तर ही एक चांगली वेळ आहे. लोकांना नव्या कल्पना आवडतात. भारतात हा मोकळेपणा आता आलेला आहे. तुमच्याकडे जर अशी कुठली नवीन कल्पना आहे तर खात्री बाळगा, की लोक तुमचे कौतुक करायला तयार बसलेले आहेत. तुम्ही आरंभ तर करा… बघा अवघे आकाश तुमच्या कवेत असेल…’’

‘पसारा’ वाढवायचाय पण सावरूनच

अंजना आपल्या आगामी उद्दिष्टांबाबत सांगतात, ‘‘सध्या दिल्लीत आणखी एका संग्रहालयाचे चाललेले आहे. देशातल्या अन्य शहरांतूनही ही कल्पना राबवण्याचा विचार आहे. फ्रेंचायझी हा एक पर्यायही त्यासाठी डोळ्यासमोर खुला ठेवलेला आहे. आता याबाबतीतही आम्ही चोखंदळ आहोत. जो कुणी असे संग्रहालय सुरू करू इच्छितो, त्याला मुळात या संकल्पनेबद्दल आत्मीयता आणि जिव्हाळा असला पाहिजे.

निव्वळ नफ्याच्या उमाळ्यातून कुणी हे काम करणार असेल तर त्याने ते न केलेलेच बरे! यात एक आतला आनंद आहे… आणि तो म्हणजे मुलांना आनंद देण्याचा… आणि आनंदातून मुले घडवण्याचा…’’