जीवनात ज्योती माथुर यांना घडवायची आहे जादू

0

विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी ई काॅमर्स साईटवर तुम्ही काही उत्कंठावर्धक पुस्तके शोधली असतील तर बहुतांश पुस्तके ही विशेष मुलांना कसे सांभाळावे, कसे वाढवावे याबाबत आढळतील. गोष्टींची काही विशेष पुस्तकेही तुम्हाला आढळतील पण त्यापेक्षा फार काही आढळत नाही .

ज्योती माथुर यांचे 'माय कुकिंग रेसिपी बुक फॉर स्पेशिअल चिल्ड्रेन' हे पुस्तक याला अपवाद आहे . तुम्ही ते पाहिले आहे का ? पुस्तकात काय आहे ते नावावरूनच सुचित होते. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी पाककृती या पुस्तकात अहेत. या पाककृती करण्यासाठी स्टोव ची किंवा इलेक्ट्रिक साधनांची आवश्यकता नाही. काही जिन्नस एकत्र करून कुणाच्या तरी मदतीने किंवा अगदी स्वतःसुद्धा हे पदार्थ मुलं करू शकतात .


ज्योती माथुर या एक आई, लेखक आणि उपहारगृह चालक आहेत. त्यांची जीवनकहाणी त्यांनी मिळवलेले यश त्यांच्याशी गप्पा मारताना उलगडत जाते .

विशेष गरजा असलेली मुले -

विशेष गरज असलेल्या एका मुलीची आई म्हणून ज्योती यांना जाणवले की, त्यांच्या मुलीला पाककलेची खूप आवड अहे. मुलीची आवड लक्षात घेऊन ती सहज करू शकेल अशा पाककृती असलेले पुस्तक त्या शोधू लागल्या, पण असे एकही पुस्तक त्यांना आढळले नाही. यातूनच असे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. असे पुस्तक जे आपल्या मुलीसह विशेष गरजा असलेल्या आणि पाककलेत रस असलेल्या मुलांना उपयुक्त ठरेल.

विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शाळांना जसे की अमरज्योती, ग्रीनफिल्डस (विशेष विभाग) अशा अनेक शाळांना ज्योती यांनी हे पुस्तक पाठवले. मुलं आणि पालक दोघांनी या पुस्तकाचे उत्तम स्वागत केले.


एक आई म्हणून विशेषतः मुलगी लहान असताना अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागले . पण त्या म्हणतात, "जसजशी वर्षे गेली तसतश्या गोष्टी सुलभ होऊ लागल्या. माझ्या कुटुंबप्रती तसेच बृहत्कुटुंबाप्रती जे सतत आमच्याबरोबर होते आणि आहेत त्यांच्याप्रती मी कृतज्ञ आहे''.

फिलक ए डिश-

ज्योती यांचा आणखी एक आवडता उपक्रम म्हणजे फ्लिक ए डिश. फ्लिक ए डिश हे एक उपाहारगृह असून ज्योती यांनी ते दिल्लीच्या लाजपतनगर भागात मार्च २०१५ मध्ये सुरू केले. इथल्या खास पदार्थांमध्ये 'नानी के आलू' आणि 'दादी की चाय' यांचा समावेश आहे.

"आमच्या समुदायात म्हणजे माथुर परिवारात काही खास पाककृती आहेत ज्या परंपरेने एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जातात. माझा जन्म माथुर परिवारातला आहे आणि लग्नही माथुर परिवारातच झाले. या पाककृती परंपरेने माझ्या मुलीकडे जातील. या पदार्थांची ओळख करून देण्याच्या उद्देशातून उपाहारगृहाची संकल्पना जन्माला आली. ''


उपाहारगृहाच्या भिंती ऊबदार आणि प्रसन्नतेची अनुभूती देतात. कौटुंबिक छायाचित्रांलगत मांडलेल्या पारंपरिक वस्तूंनी या भिंती सुशोभित केल्या आहेत. काॅफीटेबलबुक्स, विन्टेज टेबलक्लाॅथ्स आणि अॅण्टिक टीपाॅटस (पारंपरिक किटल्या) यामुळे वातावरणात वेगळीच रंगत भरते. इथल्या शेफकडून तयार केले जाणारे वैशिष्ठ्यपूर्ण खास मसाले हे इथले खास वैशिष्ठ्य.

५२ वर्षांच्या ज्योती सांगतात, "यासाठी माझ्या नवर्‍याने प्रेरणा दिली. माझ्या मुली आता मोठ्या झाल्या आहेत आणि आता त्यांना माझी सारखी आवश्यकता भासत नाही. त्यामुळे या उपक्रमाकडे मी वळले. आतापर्यंतचा प्रवास खूप काही शिकवणारा होता. उपक्रमाने हळूहळू गती घेतली. सगळ्या गोष्टी एकदम घडल्या नाहीत पण ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत राहिल्यामुळे आमचा उत्साह वाढत राहिला. प्रत्येक दिवस नवे काहीतरी शिकवतो, नवा अनुभव देतो, यातून ग्राहकांबरोबरचे आमचे संबंध विकसित व्हायला मदत मिळते."

ज्योती आणि त्यांचा परिवार खूप कठोर परिश्रम घेत आहेत. यात त्यांच्या मुली आणि पतीचाही समावेश आहे. "हे सोपे नव्हते पण आम्ही आमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवला." ज्योती सांगतात.

जडणघडण -

दिल्लीत जन्मलेल्या आणि परदेशात वाढलेल्या ज्योती सांगतात की त्यांचे बालपण खूपच रोमांचक होते. त्यांचे वडील एअर इंडियात होते. त्यामुळे खूप प्रवास घडला. ज्योती त्यांच्या आठवणी सांगतात, "एखाद्या राजकुमारीसारखी मी जगले. वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्या. नव्या संस्कृती अनुभवल्या आणि नव्या भाषा शिकले." वडिलांची भारतात नेमणूक झाल्यावर कला आणि भाषेची आवड जोपासण्याचा तसेच फ्रेंचचा अभ्यास करण्याचा निर्णय ज्योतीने घेतला. संस्थेत त्या अग्रणी राहिल्या. लवकरच त्यांचे लग्न झाले आणि त्या भारतात स्थायिक झाल्या. त्यांची दुसरी मुलगी विशेष गरज असलेले मूल होते. तिच्या जन्मानंतर कुटुंबाला त्यांचे प्राधान्य राहिले. त्यांचे सगळे लक्ष आणि ऊर्जा घरावर केंद्रित झाली.

आव्हाने आणि शिकणे-

ज्योतीसमोरचे सर्वात मोठे आव्हान होते ते साचेबंद सोपी जीवनशैली सोडून घर आणि उपाहारगृह अशी दोन्हीकडची तारेवरची कसरत साधण्याची. पण त्यांना हे साधावे लागले.

त्यांच्या कामगिरीला त्रिवार सलाम. या सगळ्यात सर्वात महत्त्वाचे काय शिकायला मिळाले यावर ज्योती सांगतात, "सर्वात महत्त्वाची शिकवण म्हणजे सतत आत्मपरीक्षण करत राहायचे व एक माणूस म्हणून स्वतःला सुधारायचे आणि त्यातून संवाद वाढवायचा. माणसामाणसातला संवाद खूप महत्त्वाचा आहे."

उपाहारगृहामध्ये व्यस्त असूनही या जागेचा वापर विशेष मुलांसाठी स्वयंपाकाचे क्लासेस घेण्यासाठी, मूलभूत तंत्र शिकण्यात त्यांना मदत करण्यासाठी आणि सोप्या पाककृती शिकवण्यासाठी कसा करता येईल, याची योजना त्या आखत आहेत. नव्या आव्हानाबाबत आशा व्यक्त करताना त्या म्हणतात, "हे कसे अमलात येईल यावर मी विचार करत आहे. बघू यात कसे यश मिळवता येतंय ते!" त्यांचा चेहरा उत्साहाने खुलतो.

लेखिका : तन्वी दुबे

अनुवाद : सोनाली कुलकर्णी