मंजू भाटीया: प्रवाहाविरूद्ध पोहणारी धाडसी तरूणी.

बँकांचं थकवलेलं कर्ज वसूल करणं म्हणजे मोठं किचकट काम. भांडणं, विवाद हे या कामात ठरलेलीच. जो गुंड प्रवृत्तीचा असेल. ज्याच्यात समोरच्याला दमात घेण्याची धमक आहे अशाच व्यक्तीनं वसूलीच्या व्यवसायात पडावं असे संकेत आहेत. अशा परिस्थितीत महिलांनी काम करावं याचा कुणी साधा विचारही करणार नाही. पण हे प्रवाहाविरूद्ध पोहण्याचं आव्हान स्वीकारलं मंजू भाटीया या २६ वर्षांच्या धाडसी तरूणीनं. केवळ आव्हान न स्वीकारता त्यांनी या कामात यशस्वीही होऊन दाखवलं. आपल्यासारख्याच इतर तरूणींना या व्यवसायात आणलं आणि रूळवलं. अशा हिंमतीनं पुढं चाललेल्या या निडर तरूणीची ही कथा.

0

कर्ज वसूलीचं काम म्हणजे गुंडगिरी आणि धाकदपटशा दाखवून केलं जाणारं काम अशीच लोकांची धारणा आहे. हे काम करणाऱ्यांकडे समाज त्याच दृष्टीनं पाहतो. परंतु इंदोरच्या २६ वर्षांच्या तरूणीनं मात्र लोकांची ही धारणा बदलून टाकली. मंजू भाटीया असं या धाडसी तरूणीचं नाव आहे. इतकच नव्हे, तर कर्ज वसूली करणारी आणि देशातली मोठी एजंसी म्हणून नावारूपाला आलेल्या “ वसूली” या कंपनीच्या त्या सहव्यवस्थापन संचालिका आहे. आपल्या जीवनाला महत्त्व देऊन प्रत्येक महिलेनं पुरूषांच्या पुढं राहून काम केलं पाहिजे, असे त्या सांगतात.

प्रवाहाविरूद्ध पोहणा-या मंजू भाटीया
प्रवाहाविरूद्ध पोहणा-या मंजू भाटीया

इंदोरच्या एक उद्योजक कुटुंबात जन्माला आलेल्या मंजूनी २००३ मध्ये इंटरची परीक्षा दिली. त्यानंतरच तूलिका इंटरनॅशनल या स्थानिक कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणून त्या नोकरी करू लागल्या आणि इथूनच त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली. “इंटर करत असतानाच आपण आपल्या जीवनात काहीतरी करावं असं त्यांना वाटत होतं. मला सुरूवातीपासूनच केवळ कुणाची मुलगी वा बायको म्हणून आयुष्य घालवावं असं मुळीच वाटत नव्हतं.”

मंजूनी रिसेप्शनिस्टची नोकरी करता करता आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि आपल्या कामात त्या घेत असलेला रस आणि मेहनत या बळावर लवकरच त्या कंपनीच्या इतर कामकाजांमध्ये सुद्धा आपलं योगदान देऊ लागल्या. कंपनीचे मालक पगार शाह हे मंजूंचे कौटुंबिक मित्रच होते. त्यांनी मंजूंवर कंपनीचे अकाऊंट्स आणि माल खरेदी करण्याचं काम सोपवलं.

दरम्यानच्या काळात मंजूना एक अशी ऑफर आली, ज्या ऑफरनं मंजूंचं जीवनच बदलून टाकलं. औषध कंपनी व्यतिरिक्त पराग शाह यांची “वसूली” नावाची दुसरी छोटी कंपनी सुद्धा होती. ही कंपनी बँकांनी दिलेलं कर्ज वसूल करण्याचं काम करायची. या कंपनीचा ‘भारतीय स्टेट बँक’ हा एकमेव ग्राहक होता.

“ एक दिवस पराग शाहांनी मला वसूलीच्या कामात मदत करायला सांगितलं. कंपनीचं काम केल्यानंतर माझ्याकडे पुष्कळ वेळ असायचा आणि या वेळेत मी काही तरी नवं करावं असं मला वाटायचं. म्हणून मी काहीही विचार न करता त्यांना या कामासाठी होकार देऊन टाकला.”

‘वसूली’सोबत काम करत असताना आपल्याला आलेल्या पहिल्या अनुभवाबाबत सांगताना मंजू म्हणतात की कर्जाचे हफ्ते न भरणा-या ग्राहकांची एक यादी एसबीआय दर महिन्याना त्यांना देत असे. त्यांच्याकडे आलेल्या एका यादीत एका प्रसिद्ध राजकीय नेत्याचं देखील नाव होतं. “ परागनी त्या नेत्याकडून वसूली करण्याचं काम माझ्यावर सोपवलं. मग मी कर्जाबाबत काहीही न बोलत त्यांच्या भेटीची वेळ मिळवली.”

मंजू पुढे सांगताना म्हणतात की त्या नोकरी करत असताना जो अनुभव त्यांना मिळाला त्या आधारे लोक आपल्या कर्जाचे हफ्ते चुकवण्याची तारीख विसरून जातात याचा त्यांना अंदाज होता. ब-याचदा काही अडचणींमुळं लोकांना आपल्या कर्जाचे हफ्ते भरणं शक्य होत नाही, आणि जेव्हा असं होतं तेव्हा बँका अशा ग्राहकांना नॉन परफॉर्मिंग अॅसेट( NPA) च्या यादीत टाकतात आणि मग वसूलीचं काम वसूली एजंटांकडे सोपवतात.

असाच काहीसा किस्सा एका राजकीय नेत्याच्या बाबतीत घडला. मंजूनी जेव्हा त्यांना भेटून त्यांच्या कर्जाबद्दल त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी दुस-याच दिवशी राहिलेली रक्कम भरून टाकली आणि इथूनच मंजूंच्या जीवनानं यू-टर्न घेतला.

मंजू सांगतात, की या वलूसीनंतर त्यांना हे लक्षात आलं की बहुतेक लोकांना आपण घेतलेल्या कर्जाची रक्कम वेळेत चुकती करावीशी वाटत असते, पण बँक आणि ग्राहकांदरम्यान जसा व्हायला हवा तसा संवाद होत नाही. याचमुळे ब-याचदा डिफॉल्टची स्थिती उद्भवते. या अनुभवानंतर मंजू वसूलीचं काम करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार झाल्या होत्या आणि पुढे त्यांनी जे काही केलं त्यामुळं या बदनाम झालेल्या कामाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम केलं.

“ आपल्या समाजात महिलांना मोठा मान सन्मान दिला जातो हे मी बघत आली आहे. म्हणून मग मी विचार केला की मी महिलांना माझ्यासोबत या वसूलीच्या कामात वसूली एजंट म्हणून का कामावर ठेऊ नये. यामुळे दोन फायदे होणार होते. एक तर आम्हाला कुणीही गुंड-बदमाश म्हणू शकत नव्हतं आणि दुसरं म्हणजे जर एखाद्या कर्ज घेतलेल्या ग्राहकाकडे जेव्हा वसूलीसाठी महिला गेली तर त्या व्यक्तीला कर्जाचे हफ्ते थकवल्याबद्दल थोडीबहुत लाजही वाटण्याची शक्यता होती.”

मंजूना या कामासाठी त्यांच्यासारख्याच काही महत्त्वाकांक्षी आणि धाडसी मुली मिळाल्या. मग मंजूनी आपल्या ‘वसूली’च्या कामात प्रगती करायला सुरूवात केली. सुरूवातीच्या दिवसांमध्ये काही ‘पर्सनल लोन’च्या प्रकरणांचा निपटारा केला जात होता. अशा प्रकारच्या पुष्कळ डिफॉल्टर्सकडून त्यांनी ब-य़ाच रकमा वसूल केल्या आणि याचा परिणाम म्हणून त्यांना लवकरच कृषी कर्जाच्या वसूलीची जबाबदारीही मिळाली. या वसूलीमध्ये त्यांना डिफॉल्टर्सनी कर्ज काढून खरेदी केलेल्या वाहनांना जप्त करून घेऊन जमा करण्यासाठी घेवून यावं लागणार होतं. हे खूपच कठीण असं काम होतं.

“ सुरूवातीला तर आम्ही लोकांना त्यांनी बुडवलेल्या हफ्त्यांबाबत सांगत असू. त्यांपैकी काही लोक आमचं म्हणणं समजून घेत असत आणि आपली चूक झाल्याचं मान्य करत उर्वरित रक्कम एकदम वा हफ्त्या हफ्त्यांनी जमा करत असत. जर आम्हाला कुणाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर मग आमची संपूर्ण महिला वसूली एजंटांची टीम रात्री दहा वाजल्यानंतर बाहेर पडायची आणि वाहनं ताब्यात घेऊन यार्डात घेऊन यायची.

वाहनं ताब्यात घेण्याच्या या कामाला मंजूनी योजनाबद्ध पद्धतीनं साकार केलं. भविष्यात येणारी आव्हानं डोळ्यासमोर ठेवून त्यांची टीम कारवाईसाठी आपल्यासोबत पोलिसांनाही घेवून जायची. याबरोबर या कारवाईचं ते व्हिडिओ शुटींग देखील करत असत. पुढे कुणी आपल्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप लावला तर त्या आरोपांना उत्तर देता यावं म्हणून ही योजना होती. एका वर्षामध्ये १००० पेक्षा जास्त वाहनं ताब्यात घेतल्यानंतर मग त्यांनी आपल्या कामाची व्याप्ती अधिक वाढवली.

मंजू पुढे सांगतात की यानंतर त्यांच्या कंपनीनं आपलं संपूर्ण लक्ष होम लोन आणि कॉर्पोरेट डिफॉल्टर्सवर केंद्रीत करत आपल्या कामाचा अधिक विस्तार केला आणि जयपूर, रायपूर तसेच मुंबईत आपल्या कंपनीची कार्यालयं उघडली. सर्वच मुख्य बँकांचे निर्णय घेणारे महत्त्वाचे अधिकारी मुंबईतच बसतात हे लक्षात घेवून २००७ मध्ये “वसूली”नं आपलं मुख्यालय मग मुंबईत हलवलं.

मुंबईत आल्यानंतरचे दिवस आठवताना मंजू भावूक होऊन जातात. त्या सांगतात, “ सुरूवातीला एका बँकेच्या डीजीएमनं आमची पारख करण्यासाठी आम्हाला फक्त दोनच खातेदाराकडून वसूलीचं काम सोपवलं. आणि आज आम्ही त्याच बँकेच्या दोन लाखाहून अधिक प्रकरणांचा निपटारा करत आहोत. या व्यतिरिक्त संपूर्ण देशभरात आमच्या २६ शाखा आहेत. या शाखांमध्ये २५० महिला एंजंट म्हणून काम करत आहेत.”

मंजू पुढे सांगतात की सध्या त्यांच्या कंपनीत काम करणारांमध्ये फक्त दोन पुरूष आहेत. त्यांपैकी एक महाव्यवस्थापक पराग शाह आणि दुसरे त्यांचे वडील. उर्वरीत सर्व कर्मचारी महिलाच आहेत. ज्या महिलेनं इंदोर किंवा मुंबईच्या कार्यालयांमध्ये लक्षणीय कामगिरी करून दाखवली असेल अशाच महिलेला ‘वसूली’मध्ये शाखा प्रमुख हे पद दिलं जातं. डिफॉल्टर्सकडून बँकेला आपले पैसे परत मिळाले की मग ‘वसूली’ला त्याचं कमिशन मिळतं. सन २०११-२०१२ मध्ये कपनीनं जवळजवळ ५०० कोटी रूपयांच्या प्रकरणांचा निपटारा केला. यामध्ये कमिशनच्या रूपात कंपनीला जवळजवळ १० कोटी रूपये मिळाले.

भविष्यातल्या योजनांबद्दल बोलताना मंजू सांगतात की लवकरच “ वसूली” कंपनीची रिकव्हरी एजंसी ही ओळख बदलून तिला ‘संपत्ती पुनर्निमाण’ कंपनी बनवण्याचा आमचा हेतू आहे. या व्यतिरिक्त त्या कायद्यात डॉक्टरेट करण्याचीही योजना तयार करत आहे.

शेवटी मंजू सांगतात, “ वसूलीचं काम अतिशय खडतर काम आहे. जर तुम्ही एखाद्या छोट्या मुलाकडूनही त्याची वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न केलात तर तो मूल सुद्धा तुम्हाला विरोध करेल. आणि इथं तर तुम्हाला डिफॉल्टर्सच्या वाहनांव्यतिरिक्त अनेक लोकांच्या घरांवर आणि दुकांनावरदेखील ताबा घेवून ती हिसकून घ्यावी लागतात. परंतु कोणत्याही कामात केलेला प्रामाणिक प्रयत्न कधीही व्यर्थ जात नाही आणि हाच प्रयत्न तुम्हाला यशस्वी बनवतो.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe