कॅंडी केन क्लब – तुमच्या लहानग्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारे शैक्षणिक बोर्ड गेम्स

कॅंडी केन क्लब – तुमच्या लहानग्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारे शैक्षणिक बोर्ड गेम्स

Tuesday December 29, 2015,

5 min Read

विधी मेहरा यांची मुले त्यावेळी होती अवघी तीन आणि पाच वर्षांची... पण या लहानग्यांनीच आपल्या आईच्या उपक्रमासाठी नाव सुचवले...

झाले असे की त्या दोघांच्याही हातात कॅंडी केन (एक प्रकारची पेपरमिंटची गोळी) होते आणि सहज सुरु असलेल्या गप्पांमधूनच त्यांनी आपल्या आईला हे नाव सुचवले. त्यानंतर त्यावर बराच विचार करुन शेवटी त्या यासाठी राजी झाल्या आणि आपल्या उपक्रमाला ‘कॅंडी केन क्लब’ हेच नाव देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. “ मला वय वर्षे दोन ते पाच या वयोगटातील मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. मला या मुलांना अशा खेळांमध्ये गुंतवून ठेवायचे होते, ज्यामाध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल,” कॅंडी केन क्लबच्या संस्थापिका विधी सांगतात.

image


आणि अशा प्रकारे सुरुवात झाली विधी यांच्या या नव्या प्रवासाला... सुरुवातीला त्यांच्याच दोन मुलांसाठी बोर्ड गेम्सची रचना करण्यापासून खरे तर हा प्रवास सुरु झाला आणि आता त्या या वयोगटातील सर्वच मुलांसाठी अशा खेळांची रचना करत आहेत. विधी यांचे लक्ष्य अगदी स्पष्ट होते – त्यांना मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि लॅटरल थिंकींगसाठी मदत करण्याची इच्छा होती.

त्यावेळी काही ओळखीचे ब्रॅंडस् होते, पण स्मरणशक्ती अधिक धारदार करण्यास मदत करणारे फारसे खेळ उपलब्ध नव्हते. त्यांनी दहा बोर्ड गेम्सची रचना केली, जे तीस शहरांमध्ये तातडीने उपलब्ध करुन देण्यात आले. विधी सांगतात, की त्यांची सुरुवात तर उत्तम झाली होती, पण नक्की कोण हे खेळ खरेदी करत आहे, ते मात्र त्यांना समजत नव्हते आणि त्यांना तर लोकांच्या प्रतिसादाबद्दल कमालीची उत्सुकता लागून राहिली होती.

“ मला सगळ्या पालकांपर्यंत पोहचण्याची इच्छा होती, यामागचे मुख्य कारण म्हणजे लहान मुलांबरोबर संवाद साधणे माझ्यासाठी नेहमीच आनंददायी असते. मी ज्या ठिकाणी रहायची, त्या पाली हिलमध्ये तर माझी ओळख मोफत क्रेश (पाळणाघर) अशीच होती... पालक त्यांच्या मुलांना नेहमीच माझ्या घरी सोडायचे आणि मीदेखील ती मुले सगळावेळ काही ना काही खेळत राहतील, याची काळजी घ्यायचे. त्याचबरोबर बऱ्याचदा मी माझा फावला वेळ हा प्लेस्कूलमध्ये घालवायची जेणेकरुन मला मुलांशी संवाद साधता येईल,” विधी सांगतात. “ मुलांना काही महत्वाचे धडे शिकवण्याचा प्रयत्न करत असतानाच, त्यांना त्यात गुंतवून ठेवण्यासाठी मी सातत्याने नवनवीन कल्पनांचा विचार करत असे. त्यातूनच कॅंडी केन क्लब या बोर्ड गेम्सचा जन्म झाला,” त्या सांगतात.

त्या दरम्यान त्यांनी मुलांसाठी शैक्षणिक खेळांची निर्मिती करणाऱ्या अमेरिकेतील प्रख्यात अशा डॉ. टॉयशी संपर्क साधला. लहान मुलांच्या गरजा समजून घेण्यासाठी विधी यांनी त्यांच्याशी चर्चा केली. “ मला माझे अनुभव सांगायचे होते, पालकांना काय हवे आहे ते समजून घ्यायचे होते आणि अशा प्रकारे मुलांसाठी सबस्क्रीप्शन बॉक्सेस विकसित करण्याची संकल्पना जन्माला आली,” त्या सांगतात.

जेंव्हा २००९ मध्ये कॅंडी केन क्लबची सुरुवात झाली, तेंव्हा तीन वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील मुलांसाठी शैक्षणिक बोर्ड गेम्स आणि पुस्तके तयार करणे, हा मुख्य हेतू होता. नेमक्या याच काळात ऑनलाईन गेम्सचे क्षेत्र वर येऊ लागले होते आणि या इलेक्ट्रॉनिक खेळण्यांबरोबर मुलांची हळूहळू ओळख होऊ लागली होती. जगभरातील तज्ज्ञ मात्र मुलांमधील परस्पर आणि सामाजिक कौशल्य विकसित करण्यासाठी क्लासिक बोर्ड गेम्स आणि मुलभूत खेळण्यांच्या फायद्यांचे तुणतुणे वाजवत बसले होते. “ मी तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांसाठी बोर्ड गेम्स तयार केले. खेळाडूंमधील संवाद वाढविणे जेणेकरुन त्यांची सामाजिक, भावनिक आणि सर्जनात्मक कौशल्ये विकसित होण्यास मदत होईल, या दृष्टीनी या गेम्सची रचना करण्यात आली होती. संवादातून शिक्षण या संकल्पनेवर माझा विश्वास आहे,” विधी सांगतात, ज्या मुलांसाठी अनुभवात्मक उपक्रमांचे जोरदार समर्थन करतात.

image


स्वतःच्या मुलांना वाढविताना आलेल्या अनुभवांविषयी बोलताना विधी सांगतात, की मुलांसाठी कोणती खेळणी किंवा पुस्तके घ्यायची याबाबत त्यांची नेहमीच द्विधा मनस्थिती होत असे. “ शेवटी मी अशीच पुस्तके किंवा खेळणी घेऊन येत असे, ज्याकडे माझी मुले पहातही नसत. मी ऑनलाईनही शोध घेतला, पण तेथे एवढी उत्पादने असत, की त्यामुळे मी नेहमीच गोंधळून जात असे आणि त्यातूनही जेंव्हा मी खरोखरच घरी काही घेऊन येई, तेंव्हा माझी मुले त्याकडे ढुंकूनही पहात नसत. जेंव्हाकेंव्हा मला मुलांनी खेळावेसे वाटे, तेंव्हा मी वापरु शकेन असे केवळ मुठभरच खेळ माझ्याकडे असत. त्यावेळी मी अगदी लहान मुलांसाठीचे खेळ आणि पुस्तकावर संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी माझ्या असे लक्षात आले की, माझ्या मुलांच्या कौशल्यांवर, जसे की स्मरणशक्ती आणि लॅटरल थिंकींग, काम करताना मला मदत करतील यादृष्टीने ते खेळ योग्य नाहीत. तसेच मला अधिकाधिक असे पालकही सापडले जे खेळण्यांच्या दुकानात शिरल्यावर एक तर गोंधळलेले तरी असतात किंवा त्यांना काय घेऊ आणि काय नको, असे होते,” विधी सांगतात.

त्यावेळी मग विधी यांनी एक अशी टीम बनविण्याचा निर्णय घेतली, जिला मुलांच्या विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील गरजांची योग्य ती समज असेल. कॅंडी केन क्लबद्वारे त्यांनी दर महिन्याला एक बॉक्स देऊ करण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये खेळणी, पुस्तके आणि विविध उपक्रम एकत्रित केलेले असतील आणि प्रत्येक मुलाच्या विकासाच्या गरजा भागवेल या दृष्टीने हा बॉक्स खास तयार केलेला असेल. त्यांच्याकडील तज्ज्ञ वयानुसार प्रत्येक बॉक्स डिजाईन करतात आणि मुलांच्या संपूर्ण वाढीत मदत करण्यासाठी पालकांनाही एक परिपूर्ण अनुभव देतात.

विधी यांनी जेंव्हा या सबस्क्रिप्शन बॉक्सेची सुरुवात केली, त्यावेळी त्यामध्ये प्रामुख्याने खेळणी आणि पुस्तकांच्या संचाचा समावेश असे. प्रत्येक महिन्यात एक विशिष्ट विषय असतो, जो एका निश्चित चौकटीत बसविला जातो. “ आमचे प्राथमिक लक्ष असते ते खास संच तयार करण्याकडे, आता आम्ही हळूहळू पुस्तके आणि खेळण्यांपासून दूर जात आहोत,” विधी सांगतात. त्यांच्या ग्राहकांना या बॉक्ससाठी दर वर्षी १४,००० रुपये मोजावे लागतात.

कॅंडी केन क्लबचे देशभरात दोन हजाराहून अधिक ग्राहक असून त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई परीसरातील ग्राहकांचा समावेश आहे. पालकांसाठी लवकरच नविन शैक्षणिक साधने सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे, अशी उत्पादने ज्यामुळे पाल्याचा सर्वांगिण विकास शक्य होईल आणि तो जोखीम घेण्यास तयार होईल.

कॅंडी केन क्लबकडे सध्या चार जणांची कोअर टीम असून नुकतीच त्यांच्याकडे एक टेक टीमही आली आहे, जी त्यांना उत्पादन सुरु करण्यासाठी मदत करत आहे. आतापर्यंत स्वतःच्याच निधीतून सुरु असलेला कॅंडी केन क्लब हा मुलांना अनेक ऑनलाईन शैक्षणिक स्पर्धा आणि प्रत्यक्ष उपक्रमांमध्ये व्यस्त ठेवत असतो. लवकरच ते भांडवल उभारणीसाठी प्रयत्न करणार आहेत.

कुटुंबाचा प्रचंड पाठींबा असलेल्या विधी सांगतात की त्यांना नेहमीच मुलांच्या चेहऱ्यांवर हसू आणण्याची इच्छा होती आणि या उपक्रमाने त्यांना नेमकी हीच संधी देऊ केली आहे.

“ हा संपूर्ण प्रवास खूपच सुंदर राहिला आहे. लवकरच एक पाऊल पुढे टाकण्याचा आणि जागतिक स्तरावरील ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा आमचा मानस आहे,” विधी सांगतात.

लेखक – सास्वती मुखर्जी

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन