भारतातील लघु व मध्यम उद्योजकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा

भारतातील लघु व मध्यम उद्योजकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा

Saturday December 24, 2016,

2 min Read

शासनामार्फत उद्योग विभागाने उद्योजकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे अनेक मोठे उद्योग महाराष्ट्रात येत आहेत. त्याच धर्तीवर लघु व मध्यम विभागाकडून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांचा नवउद्योजकांनी आपल्या कामावर विश्वास ठेवून कुठलाही न्युनगंड न बाळगता याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

image


दि सोशल सर्व्हिस लीग संचलित ना.म.जोशी समाजकार्य प्रशिक्षण वर्गाव्दारे परळच्या दामोदर सभागृहात आयोजित केलेल्या ‘स्वयंसेवी संस्थांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री : सोशल सर्व्हिस फेस्टिव्हल-2016’ चे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई व महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

देसाई म्हणाले की, लघु व मध्यम उद्योगासाठी अनेक योजना शासनामार्फत राबवल्या जात आहेत. नवउद्योजकांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी शासनामार्फत व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरच स्टार्टअप हब उभारले जाणार आहे. नवउद्योजकांनी आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर पुढे जावे. त्यांना उद्योग क्षेत्रामध्ये अनेक संधी आहेत. चोरडिया म्हणाले की, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांनी सतत होणा-या बदलाच्या पार्श्वभूमीवर असे बदल आत्मसात करणे हा व्यवसायात टिकून राहण्यासाठीचा मूलमंत्र आहे. प्रदर्शनासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून उद्योजकांनी ग्राहकाशी थेट संवाद साधून त्यांच्या गरजा जाणून त्याप्रमाणे त्यांना सेवा उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे. तसेच या प्रदर्शनातील नवउद्योजकांनी खादी व ग्रामोद्योगासाठी सदस्य म्हणून नाव नोंदणी करावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

image


प्रदर्शनात भारतातील व राज्यातील दुर्गम भागातील, तसेच दुर्लक्षित व वंचित गटाला स्थान देण्यात आले आहे. या प्रदर्शनात 42 स्टॉल लावण्यात आलेले आहेत.