२१व्या शतकातील 'ढेपेवाडा' एक जिंदादिल वास्तू

२१व्या शतकातील 'ढेपेवाडा' एक जिंदादिल वास्तू

Tuesday February 23, 2016,

7 min Read

वाडा... अशी एक वास्तू जी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे वैभव होती. पुर्वीच्या काळात महाराष्ट्रात वाडा संस्कृती ही सर्रास आढळत होती. आपल्यापैकी अनेकांना या वाड्यामध्ये राहण्याचा अनुभव देखील असेल. संस्कृतीचे शहर अशी ओळख असलेल्या पुण्यासह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये ही निवारा पद्धत आढळत होती. वाड्याच्या दर्शनी भागी मधोमध एक चौक, त्या चौकाच्या मध्यभागी तुळशी वृंदावन, अंगण, पुढे आणि मागे एक दोन मजली इमारती अशी रचना असलेल्या या वाड्यामध्ये अनेक कुटुंब पिढ्यानपिढ्या वास्तव्यास होती. काही वाड्यांना तर चौफेर ओसऱ्या असायच्या. मात्र जसजसे मनुष्याचे जीवनमान सुधारत गेले, तसतशी त्याला शहराच्या दिशेने ओढ वाटू लागली. वाड्यामध्ये गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या लोकांनी स्वतंत्र निवाऱ्याला प्राधान्य दिले आणि कालांतराने फ्लॅट संस्कृतीच्या झळाळीमागे 'वाडा संस्कृती' कालबाह्य होत गेली. ओस पडलेल्या वाड्यांच्या जागी त्यानंतर बांधकामांना सुरुवात झाली. मात्र अशा या 'वाडा संस्कृती'ला जपण्याचा आणि जगवण्याचा प्रयत्न केला आहे तो नितीन ढेपे यांनी. पुण्यात 'ढेपेवाडा' या वास्तूद्वारे ते आजच्या पिढीला वाडा संस्कृतीची खऱ्या अर्थाने ओळख करुन देण्याचा प्रयत्न करतात. आजच्या पिढीला वाडा संस्कृतीचा परिसस्पर्श अनुभवता यावा, या जाणीवेतून नितीन ढेपे यांनी 'ढेपे वाडा' उभारला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने ढेपे वाड्याची विशेष दखल घेतली आहे.

image


नितीन यांचे बहुतांश बालपण मुंबईजवळील डहाणू या गावात गेले. लहानपणी नितीन दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत पुण्यात त्यांच्या आजोळी जात असत. पुण्यातील शुक्रवार पेठेतील एका वाड्यात त्यांचे आजोळ होते. त्यामुळे बालपणीच वाडा संस्कृतीची त्यांना ओळख झाली होती. मात्र व्यवसायाच्या निमित्ताने ते वाडासंस्कृतीशी अधिक घट्टपणे जोडले गेले. गेल्या २३ वर्षांपासून नितीन बांधकाम व्यवसायात कार्य़रत आहेत. या कार्यकाळात त्यांनी बांधकामाची अनेक कामे केली. त्यात बंगले, फॅक्टरी यांचा उल्लेख करता येऊ शकतो. तसेच अनेक वाड्यांच्या पुनःर्विकासाची कामे त्यांनी या दरम्यान केली. त्या काळी नितीन यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ नसल्याने तसेच वाड्यांच्या पुनःर्विकासातील गुंतवणूक कमी असल्याने ते वाड्यांच्या पुनःर्विकासात व्यावसायिकदृष्ट्या अधिक जास्त काळ रमले. तो काळ असा होता की, जगण्याचे सर्व संदर्भ बदलू लागले होते. आर्थिक बाबींना महत्व प्राप्त झाल्याने वाड्याच्या वास्तूतील खेळीमेळीचे वातावरण संपुष्टात आले होते. तसेच कोर्ट कचेऱ्या, ताण तणाव याची त्यात भर पडू लागली होती. वाड्याच्या वास्तूरचनेच्या अगदी विरुद्ध अशा सेल्फ कन्टेन्ड फ्लॅटने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यात दुर्दैवाने आमच्यासारख्या बांधकाम व्यावसायिकांकडून वाड्याच्या ऱ्हासाला हातभारच लागला. मात्र ती वाडा मालकांची कौटुंबिक आणि आमची व्यावसायिक अपरिहार्यता होती, अशी प्रांजळ कबूली नितीन देतात.

image


नितीन पुढे सांगतात की, 'माझ्या सुदैवाने मला अशा वाड्यांचा पुनःर्विकास करण्यास मिळाला जे किमान १०० वर्षे जुने होते. वाड्यांच्या पुनःर्विकासाची प्रक्रिया चालू असताना माझा वाड्याच्या मालकांशी आणि भाडेकरुंशी भरपूर संवाद व्हायचा. परिणामी मला वाड्याविषयी भरपूर माहिती उपलब्ध व्हायची. मुळातच मला वाड्याच्या इतिहासाविषयी जाणून घ्यायला आवडायचे. हा इतिहास जाणून घेताना मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या, त्यापैकी एक म्हणजे वाड्याच्या मालकाची आणि भाडेकरुंची त्या वास्तूबद्दल असलेली आस्था. अर्थात त्याला कारणेदेखील तशीच होती. ती म्हणजे त्या वाड्यांमध्ये अनेक कुटुंबाच्या पिढ्यांनी वास्तव्य केलेले असायचे. वाड्याचे मालक तसेच भाडेकरुंच्या घरातील साखरपुडा समारंभ, लग्न, नामकरण सोहळा यांसारखी अनेक मंगलकार्ये त्या वास्तूच्या साक्षीतच पार पडलेली असायची. सुखदुःखाच्या प्रसंगी एकमेकांमधील हेवेदावे विसरुन सर्वांनी एकत्र येण्याची प्रवृत्ती वाड्यातच दिसून येत असायची. वाड्यांच्या वास्तूरचनेत घरातील आतील जागा कमी आणि चौक, परस, विहिर इत्यादी सार्वजनिक जागा जास्त असायची. त्यामुळे आपसूकच वाड्यात वास्तव्य करणाऱ्या लोकांमध्ये संवाद जास्त व्हायचा. कदाचित या सर्व कारणांमुळे तिथे राहणाऱ्या कुटुंबाचा भावनिक बंध त्या वास्तूशी जास्त असायचा. खऱेतर व्यवसायात भावनेला जास्त महत्व असू नये, असे म्हणतात. मात्र मला ते कधीच जमले नाही. त्यामुळे या गोष्टींचा शोध घेताना हळूहळू मी भावनिकदृष्ट्या वाड्यांमध्ये गुंतत जायचो इतका की वाड्यातील मालक भाडेकरुंच्या खोल्यांचा ताबा घेताना त्यांचे थरथरणारे हात आणि डोळ्यातील भाव मला हेलावून सोडत. कित्येक वेळा त्यांच्यासोबत मीही भावना आवरू शकत नसे. वाडा पाडण्यासाठी रिकामा झाल्यावर त्या वाड्याच्या मोकळ्या वास्तूत मला प्रचंड अपराधी वाटायचे. आपण एका जिंदादिल वास्तूचा इतिहास पुसतोय, अशी खंत मला वाटायची. आपल्या नव्या पिढीला आपली पारंपारिक वास्तूशैली दाखवण्याऐवजी आपण ती उद्ध्वस्त करतोय, याचे दुःख वाटायचे. तसेच वाडे पाडून त्या जागी बांधलेल्या नव्या इमारतींमध्ये या इतिहासाची पुनरावृत्ती होणे अशक्य आहे, याची सलदेखील मनाकडे असायची', असे नितीन सांगतात. व्यवसायाचा भाग म्हणून नितीन यांनी वाडे पाडून त्या जागी इमारती उभारल्या. मात्र त्या इमारतींमध्ये गेल्यावर त्यांना कायम एकाप्रकारची निर्जिवता जाणवायची. झपाट्याने बदलणाऱ्या या परिस्थितीने वाडा संस्कृती लयाला जात असल्याचे शल्य कायम नितीन यांच्या मनाला टोचत होते. याची भरपाई म्हणून नितीन यांनी वाडा बांधण्याचा निश्चय केला.

image


वाडा बांधण्याच्या आपल्या निश्चयाबद्दल अधिक बोलताना नितीन सांगतात की, 'वाडा बांधण्याच्या निर्णयामागे पाश्चिमात्य संस्कृती आणि वास्तूशैलीचा प्रभाव असलेल्या सेल्फ कन्टेन्ड फ्लॅटमध्ये नांदणाऱ्या सध्याच्या आणि पुढील अनेक पिढ्यांसाठी संस्कार, प्रेम आणि आनंद देणारी वाडा संस्कृती जिवंत करणे, हा हेतू होता. मला असा एक वाडा बांधायचा होता, ज्या ठिकाणी आल्यावर आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीचा परिसस्पर्श अनेकांना तिथे वास्तव्य करुन प्रत्यक्ष अनुभवता येणार होता. तसेच ज्या लोकांना वाड्यात राहण्याचा अनुभव आहे, त्यांना वाडा संस्कृतीचा पुनर्प्रत्यय घेता येणार होता. याशिवाय मला असा वाडा बांधायचा होता, जो लोकांना लयाला गेलेल्या मराठा वास्तूशैलीची पुनःओळख करुन देईल तसेच त्याचा प्रसार करायला लोकांना भाग पाडेल. सुदैवाने सर्व गोष्टी जुळून आल्या आणि असा वाडा बांधण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले.' वाडा बांधण्याच्या स्वप्नपूर्तीत नितीन यांना त्यांच्या कुटुंबियांचा पाठिंबा मिळाला. याबद्दल अधिक बोलताना नितीन सांगतात की, 'माझ्या आईवडिलांचा, पत्नी आणि मुलींचा मला भक्कम पाठिंबा मिळाला. तसेच त्यांनी दिलेला मानसिक आधारदेखील खूप मदत करुन गेला. कारण हे काम करताना शेवटची दोन वर्षे माझे व्यवसायाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत होते. परिणामी माझ्या कुटुंबाची आर्थिक ओढाताण होत होती. कुटुंबाव्यतिरिक्त माझ्या कार्यालयातील सर्व कर्मचारी, कंत्राटदार आणि कामगार यांचीदेखील मला मोलाची मदत झाली. मी सांगितलेले कोणतेही काम त्यांनी विनातक्रार पूर्ण केले. गिरीवन प्रकल्पातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच आसपासचे ग्रामस्थ यांचेदेखील मला सहकार्य झाले. यात विशेष उल्लेख करावा लागेल तो म्हणजे आमचे वास्तूविशारद आणि मराठा वास्तूशैलीचे अभ्यासक डॉ. अविनाश सोहोनी यांचा. त्यांनी या सर्व प्रवासात मला योग्य ते मार्गदर्शन केले. या सर्वांच्या सहकार्याने आणि मदतीनेच ढेपेवाडा ही वास्तू उभी राहिली', अशी प्रांजळ कबूली नितीन देतात.

image


२००१ साली नितीन यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी तब्बल १५ वर्षांचा कालावधी लागला. कोकणापासून पुण्याच्या आसपास अनेक जागा बघण्यात जवळपास तीन ते चार वर्षांचा कालावधी गेला. शेवटी पुण्यापासून ३५ ते ४० किमी परिघात वाड्यासाठी जागा निश्चित करण्याचे ठरले. अखेरीस जागेची निश्चिती गिरीवन येथे झाली. मात्र तेथे काम करणे म्हणजे एक मोठे आव्हान होते. कारण वर्षातील चार महिने तेथे प्रचंड पाऊस असतो. याशिवाय मराठा वास्तूशैलीवर आधारित बांधकाम करणे, हे खूप आव्हानात्मक होते. नितीन यांना वाडा उभारण्यात नव्या जुन्याचा संगम करायचा होता, याकरिता त्यांना कुशल मजुरांची देखील आवश्यकता होती. विशेष म्हणजे वाडा उभारण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर नितीन यांनी स्वतः लक्ष ठेवले होते. अनेक आव्हानांवर मात करत अखेर साडेचार वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर ढेपेवाड्याची वास्तू उभी राहिली, असे नितीन सांगतात. त्यानंतर पर्यटकांना ढेपेवाड्याकडे आकर्षित करण्यासाठी नितीन यांनी काम सुरू केले. ढेपेवाड्याची माहिती, तेथील सुखसोयी, जेवणाच्या सोयी याबद्दलची सर्व माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रक, जाहिराती, संकेतस्थळ तयार करणे, ही कामे सुरू करण्यात आली. या कामासाठी जवळपास चार ते पाच महिन्याचा कालावधी गेला आणि अखेरीस पर्यटकांचा ओघ ढेपेवाड्याकडे सुरू झाला.

image


वाडा संस्कृती ही संकल्पना आजही अनेक नागरिकांच्या मनात घर करुन असल्याने तसेच ढेपेवाडा ही संकल्पना नवी असल्याने सुरुवातीपासूनच पर्यटकांचा ढेपेवाड्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. याबद्दल अधिक बोलताना नितीन सांगतात की, "गेल्या वर्षीच ढेपेवाड्याचे संकेतस्थळ नेटवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यानंतर दरमहा जवळपास ४० ते ५० हजार लोक या संकेतस्थळाला भेट देतात. ढेपेवाड्यात पर्यटकांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले असून, आजवर या वाड्यात तीन लग्नसोहळे, दोन मुंजीचे कार्यक्रम तसेच दिवाळसण, केळवण यांसारखे कौटुंबिक सोहळे पार पडले आहेत. पहिल्या वाढदिवसापासून ते सहस्त्रचंद्रदर्शनापर्यंत आजवर अनेक कार्य़क्रम पारंपारिक पद्धतीने ढेपेवाड्यात साजरे झाले आहेत. येथे येणारे पर्यटक पारंपारिक खेळांचा तसेच वातावरणाचा आस्वाद घेतात. या पर्यटकांमधील एक साम्य म्हणजे, येथे आल्यावर प्रत्येकजण आपल्या भूतकाळात रमतो आणि जुन्या आठवणींना उजाळा देतो. ढेपेवाड्याच्या निर्मितीइतकाच पर्यटकांना मिळत असलेला आनंद आम्हाला सुखावून जातो.' भविष्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत विशेषतः नव्या पिढीपर्यंत ढेपेवाडा अर्थात आपली जुनी वाडा संस्कृती पोहोचवणे, हा उद्देश्य आहे. शिवरायांनी निर्मिलेली आणि पेशवाईपर्यंत उत्तरोत्तर समृद्ध होत गेलेल्या मराठा वास्तूशैलीची पर्य़टकांना माहिती देणे, हा ढेपेवाड्याचा उद्देश्य आहे. नव्या पिढीपर्यंत ढेपेवाडा पोहोचवण्यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या सहली, कार्यशाळा तसेच ऐतिहासिक सहली आयोजित करण्याची नितीन यांची योजना आहे. आजकालच्या सेल्फ कन्टेन्ड फ्लॅटच्या संस्कृतीमध्ये वाडा संस्कृती जपण्याचा नितीन ढेपे यांचा प्रयत्न हा नक्कीच कौतुकास्पद आहे. ढेपेवाड्याबद्दल अधिक माहितीकरिता तुम्ही www.dhepewada.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा 

माती घडवणारे हात: शालन डेरे

पारंपरिक कलावस्तूंचे जागतिक दालन ‘exqzt’

‘ब्ल्यू पॉटरी’ – नामशेष होऊ घातलेल्या पिढीजात कलेचं पुनरूज्जीवन