एक न्हावी अन् ‘रोल्स रॉयस’चा मालक

0

संकटांशी सामना

एका अत्यंत गरीब कुटुंबात मी जन्माला आलो. माझे वडील न्हावी होते. मी सातच वर्षांचा होतो आणि वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. १९७९ ची ही दुर्दैवी घटना. वडील होते, तोवर सगळे ठिक होते, ते गेले आणि कुटुंबाची वासलात लागली. सगळंच विस्कटलं.

मुलांसाठी आईला लोकांच्या घरची भांडीकुंडी करावी लागली. वारसा म्हणून वडील आमच्यासाठी एक दुकान सोडून गेलेले होते. पण आता ते चालवणार कोण? बंगळुरूतील ब्रिगेड रोडवर हे दुकान होते. वडील इथेच लोकांच्या हजामती करत. वडील गेल्यानंतर माझ्या काकांनी हे दुकान चालवायला सुरवात केली. दिवसाला पाच रुपये भाडं ते आम्हाला देत असत. पाच रुपयांना तेव्हाही फारशी किंमत नव्हती. एवढ्या पैशांत घर चालवणे अशक्य होते. माझे भाऊ, बहिण आणि माझे शिक्षण, खाणेपिणे एवढे सगळे भागवणे म्हणजे कसरतच होती. आम्ही तिघं भावंडं एकवेळ जेवणावर भागवत असू. आई इतरांकडे कामाला जायची म्हणून मग मीही तिला हातभार लागावा म्हणून लहानसहान कामे करायला सुरवात केली. पेपरवाटप सुरू केले. दुधाच्या बाटल्या पोहोचवणे सुरू केले. जीवनाचा असा आरंभ होता. अडचणींशिवाय दुसरे असे काहीही त्यात नव्हते. आम्ही सगळ्यांनी मिळून एकमेकांना हिंमत देत कसे तरी दिवस काढले. कशीबशी माझी दहावी झाली, आणि तशीच बारावीही.

नव्वदच्या दशकात बहुदा मी अकरावीला होतो. आईचं काकांशी कडाक्याचं भांडण झालं. काकांनी अचानकच आईला दुकानाचं भाडं देणं बंद केलं होतं, हे या भांडणाचं कारण होतं. त्यादिवशी मी आईला सांगितलं वडिलांचं दुकान आता मी चालवणार. पण आईने नकार दिला. मी अभ्यासात लक्ष घालावं, असं आईला वाटत होतं. मीही जिद्दीला पेटलो. मी दुकान चालवणार म्हणून आईला तयार केलंच. त्यादिवसापासून मी दुकानावर जाऊ लागलो. केशकर्तनाची कला शिकू लागलो. कॉलेजही काही सोडलेले नव्हते. सकाळी दुकान, संध्याकाळी अभ्यास, पुन्हा रात्री दुकान असं चक्र सुरू झालं. दुकान रात्री एकपर्यंत सुरू असायचे आणि मी तोवर केशकर्तनातले बारकावे शिकत राहायचो. तेव्हापासूनच लोक मला न्हावी म्हणून ओळखू लागले.

जीवन बदलणारी ‘ती’ कल्पना

१९९३ मध्ये माझ्या काकांनी एक कार खरेदी केली. मलाही मग कार घ्यावी, असे वाटू लागले. जितकी म्हणून बचत होती, सगळी गोळा केली. कार खरेदीसाठी ही रक्कम पुरेशी नव्हती. पण मी ठरवून टाकलेले होते, वड तुटो वा पारंब्या काहीही होवो कार घ्यायची म्हणजे घ्यायची. आजोबांची संपत्ती गहाण टाकली आणि कर्ज काढले. कार घेतलीच. माझ्याकडे आता मारुती व्हॅन होती आणि काकांपेक्षा आपल्याकडे अधिक चांगली गाडी आहे म्हणून मीही ऐटीत होतो.

गाडीतर घेतली, पण कर्जावरले व्याज महिन्याला ८ हजार ८०० रुपये होते. दरमहा ते भरायचे म्हणजे माझ्या नाकी नऊ येऊ लागले. अशात माझी आई ज्यांच्याकडे कामाला जायची, त्या नंदिनीअक्कांनी मला मोलाचा सल्ला दिला. गाडी तू भाड्याने देत जा म्हणून आणि जे भाडे येईल, त्यात व्याजाचे हप्ते भरत जा म्हणून. हा मस्त सल्ला होता. मला पटला. नंदिनीअक्कांनीच मला व्यवसायातील क्लुप्त्या शिकवल्या. नंदिनीअक्क़ा मला गुरुस्थानी होत्या. बहिणीसारखाच तिने मला जीव लावला. आज मी जे काही आहे, त्यात सगळ्यात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर तो या नंदिनीअक्काचा. माझ्या जगण्यात जे जे म्हणून चांगले बदल घडले, ते या अक्कामुळे. अक्कांनी त्यांच्या मुलीच्या लग्नातही मला बोलावले होते आणि विशेष म्हणजे सगळ्यांशी माझा परिचय करून दिला होता.

व्यवसायातील यशाचा श्रीगणेशा

१९९४ पासून मी गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय जोमाने पुढे रेटला. नंदिनीअक्का ज्या कंपनीत होत्या, त्या कंपनीलाच पहिल्यांदा मी माझी गाडी भाड्याने दिली होती. कमाई सुरू झाली. धंदा वाढू लागला. एकापाठोपाठ गाड्या मी खरेदी करू लागलो. २००४ पर्यंत माझ्याजवळ पाच-सहा कार होत्या. भाड्यावर गाड्या चांगल्या चाललेल्या होत्या. गाडी रुळावर येऊ लागलेली होती, मग मलाही वाटायला लागले, की कशाला आता लोकांची दाढी-हजामत करत बसा. थोडक्यात आता मी पूर्णवेळ या नव्या व्यवसायातच स्वत:ला झोकून देण्याचे ठरवले. त्यावेळी सर्वांकडेच लहान गाड्या होत्या. व्यवसाय आणखी वाढवण्याच्या उद्देशाने मी मोठ्या गाड्या, लक्झरी कार खरेदी करायला सुरवात केली.

जोखीम पत्करली

२००४ मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा लक्झरी कार खरेदी केली तेव्हा सगळ्यांनीच मला सांगितले, की तू चूक करतोएस म्हणून, पण मी काही कुणाचे ऐकले नाही. २००४ मध्ये कुणीही ४० लाख रुपये खर्च करणे म्हणजे मोठी गोष्ट होती, त्यात माझ्यासारख्याने करणे म्हणजे जोखीमच होती. लक्झरी कार विकत घेण्यासाठी का असे ना ४० लाख खर्च करणे म्हणजे गंमत नव्हती. खरं सांगायचं तर माझ्याही मनात धाकधुक होती. दुविधा होती. पण व्यवसाय वाढवायचा तर जोखीम घ्यावीच लागते, यावर माझा ठाम विश्वास होता. या विश्वासातूनच मी ही हिंमत केली. लक्झरी कार घेतानाच फार जास्त अडचण आली तर विकून टाकू, अशी स्वत:ला दिलासा देणारी खुणगाठही अर्थातच मी मनाशी बांधून ठेवलेली होती. पण सुदैवाने तशी वेळ आली नाही. माझ्या अन्य कुठल्याही स्पर्धकाकडे लक्झरी कार नव्हती आणि हेच माझ्या पथ्यावर पडले. काही लोकांकडे सेकंड हँड कार होत्या. पण लोकांचे प्राधान्य माझ्याकडल्या न्यू ब्रँडला असायचे. विकण्याची वगैरे वेळ आलीच नाही, उलट ही लक्झरी कार मला फायद्याची ठरली. बंगळुरूत मी असा पहिला महाभाग होतो, ज्याने आपली एवढी रक्कम लक्झरी कारवर खर्ची घातली होती!

Related Stories