दीड वर्षात ‘बुलेट’ने थेट ४६ देशांची सफर

दीड वर्षात ‘बुलेट’ने थेट ४६ देशांची सफर

Wednesday March 23, 2016,

6 min Read

"जे भटकत असतात, ते सगळेच काही हरवून गेलेले नसतात." - जे. आर. आर. टॉल्किन

रोहित सुब्रमण्यमसाठी सोमवारची सकाळ रमणिय होती. तो एका टेकाडावर मस्त रेललेला होता आणि एरिक क्लॅप्टनच्या स्वरांचा गोडवा चहाच्या घोटागणिक आपल्या कानांतून स्त्रववून घेत होता. दुहेरी माधुर्याच्या कैफात क्षितिजावरून चढत असलेल्या दिनकराचे दृश्य डोळ्यात साठवून घेत होता. हे सगळं अधूनमधून करायला का होईना तो हमखास सवड काढायचा, कारण मग दिवसाच्या पुढल्या तासांमध्ये केव्हा आपण गोंगाटात सापडू याचा नेम नसायचा. वर्दळ, वाट अडवणारे गाईंचे, शेळ्या-मेंढ्यांचे कळप. गाईंच्या गळ्यातील घंट्यांचे किणकिणणे तसे रोहितला आवडायचे. दिवसभरासाठी पुढे हा नाद त्याला आनंद द्यायला पुरायचा. पुरून उरायचा. एखाद्या कोकरावर सहज म्हणून फिरवलेली बोटे जगात सारंच काही वाइट चाललेलं नाहीये, याची पावती रोहितच्या मनाला देऊन जायची.

image



आता या सगळ्या गोष्टींमुळे रोहितची इर्षा कुणालाही वाटेलच ना! आता निव्वळ हवेची एक मंद झुळुक आपल्या चेहऱ्याच्या वाटेवरून वातावरणात विरावी याच एका उद्देशाने कुणी रस्त्याची वाट धरत असेल. सेकंदाच्या काही भागांतच निसर्गातील एका दृश्यापाठोपाठ डोळ्यावर पडणाऱ्या दुसऱ्या दृश्याचे लाड पुरवणे, दृश्यांची ही मालिका डोळ्यात साठवणे या गोष्टीच जर एखाद्याच्या दृष्टीने निखळ आनंदाची व्याख्या असतील, तर वास्तवाचे याहून मोठे भान ते कोणते? गती ही एक कृतीच आहे… आणि वर्तमानात जगण्याचा धडा गतीहून अधिक कुठली कृती देऊ शकेल?

image


दृश्य जागराचे…

रोहित एकुणात एकविशीतला… ‘रॉयल एन्फिल्ड’वरून त्याचा रस्त्यावरला प्रवास सुरू आहे आणि पुढल्या एक-दीड वर्षांत या प्रवासाने ४६ देश ओलांडलेले असतील. एक लाख किलोमिटर्सचा हा प्रवास आहे. इतक्या कमी वयात एवढे मोठे लक्ष्य ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. पण जर तुम्ही रोहितला बघितले तर तुम्हाला जाणवेल, की अरे हा वाटतो त्यापेक्षा मोठा आहे. धिप्पाड शरीरयष्टीमुळे नव्हे तर चेहऱ्यावरील प्रगल्भ तेजामुळे हे आपल्याला जाणवते, हे आणखी विशेष! रस्त्यावर त्याला उणापुरा महिना उलटलेला आहे. पण तरीही कितीतरी किलोमिटर्सच्या या प्रवासातून आलेले शहाणपण त्याच्या चेहऱ्यावर झळकतेच. सारखा प्रवास करणाऱ्यांसाठी तसेही रस्ते मित्र बनलेले असतात. अंगवळणी पडलेले असतात आणि म्हणूनच की काय प्रवासाचा शिण अशांच्या गावी नसतोच.

image


चेन्नई हे राहुलचे गाव. गेल्या महिन्यात रोहित बंगळुरूत होता आणि हंपीच्या वाटेने निघालाही. रोहितशी जे काही बोलणे झाले, ते मजेदार असेच होते. आतापर्यंत जो काही प्रवास झालेला आहे, त्यातून मी एक संयमी श्रोता नक्कीच बनलेलो आहे, असे तो म्हणाला. ‘‘या दरम्यान मी माझी संवेदनशिलता जाणिवपूर्वक विकसित केलेली आहे. मिनिटागणिक हिशेब मी आता ठेवू लागलेलो आहे. शिवाय मला आता हेही ठाऊक आहे, की आपण मिनिटागणिक हिशेब ठेवला काय आणि कितीही आडाखे बांधले तरी रस्ता हा अनेक अनिश्चिततांनी भरलेला असतोच. हवामानाचे आणखी वेगळेच. बरं गाडीच खराब झाली समजा तर आडाखे जातीलच ना उडत!’’

स्वप्नांना पैसेही लागतातच

रोहित ज्या रस्त्यावरून जातो, तिथल्या मार्गस्थांना भुरळ घालतोच.

हे सगळं दिसायला स्वप्नवत, पण पैशांचं काय, त्याचं तर सोंग घेता येत नाही ना. अर्थात रोहितने आपल्या ‘रॉयल’ भ्रमंतीचा निर्धार एखाद्या लहरी क्षणात केला नाही म्हणून बरे. ‘‘मागच्या वर्षीच हे धाटायला सुरवात झाली होती. FundMyDream सारखे crowdfunding startup माझ्याजवळ होतेच… आणि आम्ही (त्याच्या सहसंस्थापकासह) पक्कं ठरवलेलं होतं, की माझ्या भ्रमण मोहिमेसाठी आपला हाच प्लॅटफॉर्म वापरायचा.

तेव्हापासून रोहितने सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) म्हणून कंपनीची जबाबदारी सोडलेलीच होती, पण स्टार्टअपचा एक हिस्सा त्याच्या नावे होताच. रोहितने ६ लाख रुपयांपर्यंत व्यवस्था करून झालेली होती. पुढला प्रवास अांतरराष्ट्रीय असल्याने ते स्वाभाविकही होते.

रोहितने आपल्या प्रवासातील खर्चासाठी काही छानसे पर्याय तयार करून ठेवलेले होते. काही कंपन्यांशी यासंदर्भात संपर्क साधलेला होता. So Wrangler ने कपडे प्रायोजित केलेले होते. WickedRide या भाडेतत्वावर लक्झरी बाइक उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीचे प्रायोजकत्व मिळवणे त्याच्यासाठी घरचे काम होते. बदल्यात तो बाइकप्रेमींशी आणि ज्याला-ज्याला म्हणून यासंदर्भात रस असेल त्याच्या-त्याच्याशी या कंपनीसंदर्भात बरेच काही बोलणार होता. Zeus ने त्याच्यासाठी गिअर प्रायोजित केलेले होते आणि आणखीही असे बरेच काही रोहितने विविध कंपन्यांकडून मिळवून घेतलेले होते.

image


‘‘खरं तर हे जे सगळं काही जमून आलं ते रंजकच कारण गतवर्षी मी जेव्हा माझ्या संभाव्य प्रायोजकांच्या भेटीगाठी घेत होतो, कुणीही माझ्या या उपक्रमाबद्दल फारसे स्वारस्य दाखवत नव्हते. कुणीही मंला गंभीरपणे घेत नव्हते,’’ रोहित सांगत होता. आपण स्वत:बद्दल आणि आपल्या उपक्रमाबद्दल अत्यंत गंभीर आहोत, हे समोर बसलेल्यांना पटावे म्हणून त्याने दाढी वाढवायलाही सुरवात केली. गंमत म्हणजे ही खेळी यशस्वी ठरली. वर नमूद केलेले प्रायोजक खिशात घालण्यात मग त्याला फार अडचण आली नाही. ‘‘पुढे मी पुरुषांसाठी हजामतीची अवजारे बनवणाऱ्या Ustaraa शी संपर्क साधला. माझ्या दाढीचे प्रायोजक होता काय म्हणून विचारणा केली. कहर म्हणजे हे सुद्धा जमून आले. सार्वत्रिक बंधुभावाच्या कल्पनेसह एकता संवर्धनाची मोहीम राबवणाऱ्या आणखी एका कल्याणकारी कंपनीचे सहकार्य रोहितला मिळाले.

मोटरसायकल डायरी

रोहितने दक्षिण भारतीय राज्ये आपल्या टायराखालून पालथी घातलेली आहेत. गोव्यापर्यंतही तो धडकला आणि इथे त्याने समुद्रकाठी फुटबॉलचा आनंदही लुटला. ‘इंडिया बाइक विक’च्या सदस्यांसमवेत फुटबॉलची धमाल औरच होती. ‘‘गोकर्ण ते गोवा राइडही धमाल होती. खरंतर माझ्या सर्वच राइड या चिरस्मरणीय अशाच. पण या राइडला मी माझ्या आत्मसंशोधनाची आणि आत्मचिंतनाची राइड म्हणेन,’’ रोहित म्हणतो.

दैनंदिन वापराच्या वस्तू रोहित सोबत बाळगतोच, पण लॅपटॉपही त्याच्याजवळ हमखास असतो. प्रवासात प्रत्येक सेकंद नोंदवला जावा म्हणून त्याच्या हेल्मेटवर GoPro ची सुविधा आहे. रोहित सांगतो, ‘‘प्रवासादरम्यान मी अनेक प्रांत ओलांडलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी भाषा वेगवेगळ्या आहेत. तसेच खाण्यापिण्याच्या सवयीही भिन्न आहेत. आणि हे आपल्यासाठी एकाचवेळी वेगळेही असते आणि जवळचेही असते.’’

image


येणारे-जाणारे रोहितचे स्वागत करतात. वाटेत पडणाऱ्या गावांतले लोक जेवायला विचारतात. कुठे कुणी विचारलं नाही तर मग रोहित बसस्टँडवर किंवा पोलिस ठाण्यात अगदी मजेत रात्र घालवतो. रोहित मजेने म्हणतो, ‘‘सामानसुमान कुणी चोरले-बिरले तर पोलिस स्टेशनलाच यावे लागेल तक्रार नोंदवायला त्यापेक्षा इथेच (पोलिस स्टेशनलाच) रात्र घालवलेली काय वाइट?’’ अतुल्य भारताचा अनुभव म्हणून रोहित रस्त्यावरल्या लोकांना पडेल ती मदतही करत असतो. उदाहरणार्थ एखाद्या पायी शेतकऱ्याला त्याच्या गाठोड्यासह शेतालगत सोडणे, चहावाल्याला मदत करणे आदी. बालपणापासूनच रोहितला बस ड्रायव्हर, बुट पॉलिशवाला अशा आगळ्या कामांचे आकर्षण होते. आगळी कामे याद्वारे अनुभवण्याचा आनंदही तो या राइडमध्ये लुटून घेतोय.

आगमनापेक्षा प्रवास चांगलाच

२०१४ मध्ये एका मित्रासमवेत रोहितने FundMyDream उपक्रम सुरू केला होता. एमबीए करत असताना इंटर्नशिप सेशन संपले तसे हे सुरू झाले होते. रोहित सांगतो, ‘‘इंटर्नशिप खुप झाली होती. जसा मी मॅनेजमेंट बिल्डिंगमधून बाहेर पडलो, तसे एका मित्राला भेटलो. मला चित्रपट बनवायचा आहे, पण कुणी प्रायोजक मिळत नाहीये, अशी या मित्राची तक्रार होती. मी त्याला मदत करायचे ठरवले. माझ्या नेटवर्कमधून मी त्याला काही फंड मिळवूनही दिला.’’

गेल्या वर्षी रोहितने एक लेख ऑनलाइन वाचला. एका ४० वर्षांच्या अमेरिकन गृहस्थाने तो लिहिलेला होता. मी २० वर्षांचा असताना मला जग पालथे घालायचे होते, पण जगन्भ्रमंतीचे माझे हे स्वप्न काही पूर्ण होऊ शकले नाही, अशी खंत या अमेरिकन गृहस्थाने आपल्या लेखात व्यक्त केलेली होती. रोहित सांगतो, ‘‘इथेच मी गंभीर बनलो. या लेखाने मला निरंतर आणि कठोर विचार करायला भाग पाडले. बाइकभ्रमंती आधीपासनंच मला भावणारी गोष्ट. माझ्या चटकन लक्षात आले, की हा लेख मला माझ्या स्वप्नांचा मागोवा तातडीने घ्यायला सांगतोय.’’

रोहित म्हणतो, की हा प्रवास… जगाकडे असे बघायला शिकवतो, की जीवन हाही जणू एक प्रवासच आहे. मोटारसायल चालवणे माझ्यासाठी एक प्रकारचे ध्यान आहे. चिंतन आहे. टिंब टिंब जोडण्यासारखे ते आहे. तो एक ‘झेन’ (बौद्ध धर्मातील एक पंथ) विचार आहे. ‘झेन अँड द आर्ट ऑफ मोटरसायकल मेंटनंस : ॲन इन्क्वायरी इन्टू व्हॅल्यूज्‌’ या पुस्तकाचा लेखक रॉबर्ट एम. पिर्सिगने जणू तो पडताळलेला असावा… म्हणूनच आपल्या पुस्तकात तो लिहितो,

‘‘जगात चांगल्या सुधारणा करण्याची पहिली खरी आणि योग्य जागा म्हणजे स्वत:चे हृदय, स्वत:चे डोके आणि स्वत:चे हात होय. हे झाले, की मगच निघावे जग सुधरवायला…’’

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

बंगळूरू ते लंडन प्रवासाचे स्वप्न, ते देखील एका तीचाकी(टेम्पो)मधून!

बरैली ते नवी दिल्लीः कथा रश्मी वर्मा यांच्या रंजक प्रवासाची....

उद्देशाच्या शोधात रिक्षांच्या चाकांवर धावणारी ‘नवीन’ स्वप्ने!




लेखिका : दीप्ती नायर

अुनवाद : चंद्रकांत यादव

    Share on
    close