स्टार्टअप इंडियाच्या घोषणेआधीच या योजनेला सार्थ ठरविणारे अभिजात अभियंता व ठेकेदार शरद तांदळे !

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या उद्देशातून स्टार्टअप इंडियासारखी योजना आणली, त्या उद्देशाला बळ देणाऱ्या अनेक तरुणांच्या कहाण्या आपल्याला पाहायला मिळतील. केवळ भागभांडवल आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर भारतातील नवतरुण उद्योगाच्या क्षेत्रात काय करून दाखवू शकतात. हे शरद तांदळे या नवउद्योजकाने दाखवून दिले आहे.

‘युअर स्टोरी’च्या माध्यामातून लाखो उद्यमशिल तरुणांना प्रेरणा घेण्यासाठी नक्कीच मदत होईल अशीच शरद यांची ही कहाणी आहे. स्टार्टअप इंडिया योजनेच्या सर्वात आधीही सुरुवात करणा-या काही मोजक्याच कंपन्यांमध्ये शरद यांनी देखील ही झेप घेतली, ज्यांना बाजारातील क्षमता विकसित करता आल्या. तेही रास्त दराने उच्च दर्जाने खात्रीशीर सेवा देऊन! शरद यांनी भुमिगत केबल, रस्ते बांधणी, पाणी पुरवठा जलवहिन्या, मोबाईल टॉवर्स, आणि इलेक्ट्रिकल सेवांमध्ये ही भरारी घेतली आहे. 

बीडमधील वंजारवाडी सारख्या छोट्याश्या गावातून सुरवात करून पुण्यासारख्या ठिकाणी येऊन धडपडत कष्ट करीत, अडचणींना सामोरे जात उद्योजक बनलेल्या शरद तांदळेच्या यशावर मोहोर मारली ती इंग्लंडचे युवराज प्रिन्स चार्ल्स यांनी. त्यांच्या हस्ते ३५ वर्षीय शरद यांना दोन वर्षापूर्वी लंडनमध्ये तरुण उद्योजकतेचा पुरस्कार मिळाला. शरद यांच्या उद्योगतेच्या प्रवासातील हा उत्कंठावर्धक क्षण.

शरद यांचे प्राथमिक शिक्षण बीड मध्ये झाले आणि अभियांत्रिकी शिक्षण औरंगाबाद येथे पूर्ण केले. अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना तरुणांना सामाजिक राजकीय, स्वयंरोजगार उद्योग याची माहिती होण्यासाठी शरद यांनी ‘विजयी युवक’ नावाचं मासिक सुरु  केले, पुढे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी एका पेपरमध्ये अपयश आले आणि वडिलांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. मात्र त्यांनी जिद्दीने इंजिनिअरिंग पूर्ण केले. या मधल्या काळात वेगवेगळ्या प्रयोग करण्याच्या नादाने डोक्यावर मोठे कर्ज निर्माण झाले. घरून पैसे मागणे शक्य नसल्याने दैनंदिन जीवनाचा प्रश्न महत्वाचा होता. अखेर वडिलांच्या आग्रहामुळे पुण्याला जायचा निर्णय घेतला. शरद सांगत होते "पुण्यात आल्यानंतर  चार हजार रुपयांचा जॉब मिळाला मात्र यामध्ये काही स्वतःची प्रगती होत नव्हती, स्वतःचे काहीतरी करायला हवे असे मला वाटत होते. खिशात पैसे नव्हते. करायचे तरी काय ? अशात एका मित्राने  ‘सॅप कोर्स’ करण्याचा सल्ला दिला, त्यासाठी हैदराबादला जाण्याचे मी ठरवले. मात्र कोर्ससाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न होताच. वडिलांकडे पैसे मागता येत नव्हते. मग आई मदतीला धावली. तिने सोने गहाण ठेवून पैसे दिले. हैदराबादला जाण्यासाठी औरंगाबाद येथे मित्राकडे मी थांबलो. तेथील रूममध्ये मी पैसे ठेवलेली पॅन्टच गायब झाली होती. ७० हजार रुपये चोरीला गेले. मित्रांनी दिवसभरातून १८ हजार रुपये गोळा करून दिले. हैदराबादला आल्यावर सहा महिने खाण्यापिण्याचे प्रचंड हाल झाले. खिशात पैसे नसल्याने अनेकदा उपाशीच झोपावे लागले. मात्र ‘कोर्स’ पूर्ण केला".

पुढे पुण्यात परतल्यानंतर चांगला जॉब मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती, मात्र जॉब काही मिळाला नाही. जवळचे सगळे पैसे संपले होते. स्वतःचा काहीतरी उद्योग सुरु करावा म्हणून उद्योजक केंद्रात गेल्यावर त्यांना समजले की तिथे कोणत्या तरी प्रतिष्ठित माणसाची ओळख पाहिजे होती. उद्योग सुरु करण्यासाठी ‘पॅनकार्ड’ गरजेचे होते. ज्या ठिकाणी ते राहत होते. ते घरमालक भाडेकरार करून देत नव्हते. पत्ता नसल्याने त्यांना बँकेत खाते मिळत नव्हते. ‘व्हॅट’चे लायसन्स काढायचे तर त्याला ३५ हजार रुपये मागण्यात आले. अनेक संकट येत होती. अनेकदा तर चला पुन्हा घरी असा विचार मनात येत होता, पण शांत बसायचे नाही, काहीतरी करायचे यामुळे ते संघर्ष करत राहिले. 

शरद यांनी जीवनात अनेकदा अपयशच पाहिलं होतं, मात्र थांबायचं नाही, खचायचं नाही, तर लढायचं आणि फक्त लढायचं एवढाच काय तो विचार त्यांच्या मनात होता. एक दिवस जुना एक इंजिनिअर मित्र भेटला. धनकवडीमध्ये ट्रान्सफॉर्मर बसवण्याची विचारणा त्याने केली. कोणतेही पूर्वज्ञान नसताना शरद यांनी ते काम यशस्वीरित्या करून दाखवले. या कामाचे चार हजार रुपये त्यांना मिळाले. त्यानंतर त्यांना एका मागोमाग एक अंडरग्राउंड केबल टाकण्यापासून पाईपलाईनची कामे मिळत गेली. सर्वांशी मिळून मिसळून राहण्याच्या स्वभावामुळे जनसंपर्क वाढत गेला. कामगारांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केल्याने मजुरांची मजबूत फळी उभी रहात होती. मोठ्या संघर्षातून पुणे महानगरपालिकेची कामे करण्याचे लायसन्स मिळाले. मग त्यांनी स्वतःच टेंडर भरणे सुरु केले. उद्योग वाढत होता. मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्यासाठी विविध बँकेत कर्जासाठी प्रयत्न चालू होते, पण विनातारण कर्ज पुरवठा शक्य नसल्याचे लक्षात आले. योगायोगाने भारतीय युवा ट्रस्टच्या (BYST) माध्यमातून बॅंक ऑफ बडोदाने १० लाखाचे कर्ज दिले. त्यातूनच पंखांना बळ मिळत गेलं. व तीन वर्षात त्यांनी १०० हून अधिक कुटुंबाना रोजगार मिळवून दिला. शरद यांच्याकडे महाराष्ट्रातील बहुतांश गव्हर्मेंट डिपार्टमेंटची कामे सुरु आहेत.

अत्यंत छोट्या खेड्यातून शहरात येऊन स्वतःचा व्यवसाय उभा करणाऱ्या शरद यांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. लंडनच्या ‘प्रिन्स चार्ल्स’ यांच्या हस्ते ‘ युथ बिझनेस इंटरनॅशनल’ संस्थेचा ‘यंग आन्ट्रप्रीनयर ऑफ द ईयर २०१३’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, या पुरस्कारानंतर शरद यांना ‘आन्ट्रप्रेन्युर’ या शब्दाचा अर्थ कळला. स्वतःबरोबरच इतरांनीही उद्योजक व्हावे या सामाजिक भावनेतून त्यांनी प्रयत्न सुरु केले. या पुरस्काराने प्रसिद्धीपेक्षा जबाबदारीच वाढली अशी जाणीव होऊन हा पुरस्कार इतरांनाही प्रेरणा देत आहे. शरद यांना ‘आन्ट्रप्रेन्युर’ डेवलपमेंट आणि आन्ट्रप्रेन्युर डेवलपमेंट प्रोग्राम’ मध्ये बऱ्याचशा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘गेस्ट लेक्चर्स’साठी आमंत्रित करण्यात येते. दरम्यान शरद यांनी अनेक जणांना उद्योजक बनवले. त्यासोबतच त्यांनी  'इंडियाना' नावाची साॅफ्टवेअर कंपनी सुरु करून सर्व तरुण उद्योजकांसाठी संपूर्ण भारतात गव्हर्मेंट डिपार्टमेंटचे टेंडर दाखविणारे ‘ ई-टेंडरवर्ल्ड’ नावाचं टेंडरिंग सोल्यूशनचे अॅन्ड्राॅईड अॅप्लिकेशन बनवलं, तसेच How to become a contractor’ नावाचा  कंत्राटदार बनण्यासाठी उपयुक्त असणारा ट्रेनिंग कोर्से सुरु केला. तसेच भविष्यात देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे व कमी खर्चात कॉन्ट्रक्टींग बिझनेस सुरु करता येतो, या विषयी मेंटरिंग करणे तसेच उद्योजक घडवण्याचे काम ते करत आहे. तसेच ई-कॉमर्सच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व इतर उपयुक्त पुस्तके nextuskart.com या ऑनलाईन बुक स्टोरच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे. वाचन संस्कृती वाढवी हाही यामागचा हेतू आहे. 

सध्या शरद यांची वार्षिक उलाढाल दोन कोटी रुपयांची असून येत्या तीन आर्थिक वर्षात ती सहा कोटींच्या घरात जाईल. ठेकेदारी व्यवसाय देशातील फार मोठ्या प्रमाणातील अर्थव्यवस्थेला चालना देणारा व्यवसाय आहे. शरद यांनी मोठ्या कंपन्यांच्या धर्तीवर स्वत:ची काही मुल्य निर्माण केली आणि ती जपली आहेत. मोठ्या प्रमाणात ग्रामीण तरुणांना रोजगार देण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. जेथुन कुशल कामगार फारच थोड्या प्रमाणात मिळतात. त्यांच्यातील हुनर पाहून मग ते त्यांना प्रशिक्षित करतात. अशा भारतीय नवउद्यमीच्या या यश कहाणीतून स्टार्टअप इंडियाच्या कार्यक्रमातून देशात सक्षम युवा शक्ती काय करु शकते ते येत्या काही वर्षात दिसून येणार आहे.

सौजन्य : भारतीय युवा शक्ती ट्रस्ट, पुणे. http://www.bystonline.org/

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

एकेकाळचा रेती, विटा, सिमेंट वाहक मजूर आज आहे वीस कंपन्यांचा मालक

उद्योजकतेच्या जगतात सांगलीचा ठसा उमटवणाऱ्या पयोद उद्योगसमूहाच्या देवानंद लोंढे यांची यशोगाथा

ऑपरेशन थिएटरच्या प्रकाशात मेंदूची शस्त्रक्रिया करणारे डॉ. रंगनाथम कंदिलाच्या प्रकाशात करत होते अभ्यास