लगीनघाईतल्या धावपळीपासून सुटका करणाऱ्या वेबसाईट्स

लगीनघाईतल्या धावपळीपासून सुटका करणाऱ्या वेबसाईट्स

Friday April 29, 2016,

4 min Read

कोणत्याही नवपरिणित जोडप्याला त्यांच्या लग्नाच्या तयारीबद्दल विचारलं, तर त्यांचं उत्तर असतं... "बापरे किती तो व्याप, केवढी तयारी आणि वेळ खर्च" असंच उत्तर बऱ्याचदा ऐकायला मिळतं. लग्नाकरता वधूची साडी, वराचे कपडे, दागिने, आमंत्रणपत्रिका, कॅटरर्स, फोटोग्राफर, हॉल अशा एक ना अनेक गोष्टी असतात. कधीकधी तर गुरूजीही शोधावे लागतात. ही सगळी तयारी, त्यात उडणारा गोंधळ आणि विवाहाशी संबंधित बाजारातला फायदा पाहून विवाहाच्या तयारीकरता बरेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू झालेत. 


image


या विवाह स्टार्टअपमुळे कुठेही धावपळ न करता बस एका क्लिक किंवा स्वाईपनिशी सगळ्या वस्तू चुटकीसरशी हजर होतात. आपल्याला हवी ती व्यवस्था, सजावट घरबसल्या ठरवता येते. लग्नाच्या बस्त्याकरता पिढ्यानपिढ्या प्रसिद्ध असणाऱ्या दुकानांचा व्यवसाय या ऑनलाईन स्टार्टअपमुळे कमी होताना दिसत आहे. बस्त्याच्या खरेदीला मुंबईत दादरला पसंती दिली जाते. बाजारातली गर्दी, आवाज, गोंधळ, ऊन, सामानाचं ओझं सांभाळत या दुकानातून त्या दुकानात जा, एकाच खेपेत सगळ्या वस्तू न मिळणं या सर्व कोलाहलातून ऑनलाईन विवाह स्टार्टअपनी सुटका केली आहे. 

आम्ही आज विवाहाची तयारी करणाऱ्या स्टार्टअपबद्दल माहिती देणार आहोत. जेणेकरून तुमच्या घरात लग्न असल्यास तुमची पळापळ जरा कमी होईल. आणि तुम्ही लग्नात मस्तपैकी मजा करू शकाल. 

सेव्हन प्रॉमिसेस (Seven Promises)

मनाजोगती वस्तू मिळेपर्यंत एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जाणे. अनोखी आमंत्रणपत्रिका शोधण्याकरता गिरगावातल्या गायवाडीतली दुकानं पालथी घाला. मग त्यावर मजकूर छापण्याकरता छापखान्याच्या फेऱ्या. हे सर्व करत असताना किंमतीची घासाघीस, उन्हातली वणवण यात वेळ आणि शक्ती दोन्ही वाया. याकरता सेव्हन प्रॉमिसेस घेऊन आलयं, देशभरातल्या आमंत्रणपत्रिकांच्या डिझाईन्स आणि मजकूर, ऑनलाईन. त्यामुळे तुम्हाला घरबसल्या घरातल्या सर्वांच्या पसंतीने पत्रिका निवडून त्यावर मजकूर छापून ऑनलाईन मागवता येतो. 

बँडबाजा (Bandbaajaa)

काहीही झालं तरी दरवर्षी मोठ्या संख्येने विवाह होत असतात. त्यामुळे या व्यवसायाला रिसेशनचा धोका नाही. म्हणूनच एनडीटीव्ही सारख्या मिडिया कंपन्याही या व्यवसायात उतरल्या आहेत. नीता लुल्ला, अंजू मोदी, किस्निल, प्रामा, कयाली आणि नेहा मेहता हे ड्रेस डिझाइनर्स, दीड हजारांहून अधिक व्हेंडर्स आणि लाईफस्टाईल प्रोफेशनल, पाच हजारांहून अधिक उत्पादनं यांचा समावेश असलेली बँडबाजा ही वेबसाईट एनडीटिव्हीनी यंदा सुरू केली आहे. 

विवाहाकरता आवश्यक असणाऱ्या गोष्टींची यादी बनवण्यापासून तुमच्या पसंतीचं विवाहस्थळ निवडणं, तुमच्या बजेटनुसार व्हेंडर शोधणे या सर्व गोष्टींमध्ये ही वेबसाईट तुमची मदत करते. विवाहाचा मनसोक्त आनंद घेता यावा याकरता स्थळं, फोटोग्राफी, डीजे आणि करमणूक, मेकअप, हेअरस्टाईल, आमंत्रणं, कॅटेरर्स, खरेदी यासारख्या अनेक गोष्टींची काळजी या वेबसाईटवर सोपवता येते.

फॉरमायशादी (ForMyShaadi)

सुधा महेश्वरी यांच्या फॉरमायशादीवर लग्न ठरलेल्या जोडप्याला द्यायच्या भेटवस्तूंची नोंदणी करता येते. नियोजित वधू-वर या वेबसाईटवर नोंदणी करतात. त्यांना लग्नानंतर घर लावण्याकरता किंवा त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची यादी वेबसाईटवर बनवतात. ही यादी वेबसाईटवर पाहायला मग हे वधू वर त्यांच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना आमंत्रण देतात. या वेबसाईटवर अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. नातेवाईक आणि मित्रमंडळी ही यादी पाहतात, वेबसाईटवर उपलब्ध वस्तूंमधून त्याची खरेदी केली जाते. भेटवस्तूसोबत ग्रिटींगकार्डही ठेवलं जातं. अशाप्रकारे वधूवरांना हवी ती गोष्ट मिळते, आपण काय भेटवस्तू द्यावी या विचारातून सुटतो आणि भेटवस्तू थेट नवपरिणीत जोडप्याकडे जाऊन पोहचते. आणि सर्वांनाच विवाहाचा आनंद मस्तपैकी लुटता येतो. 

एक्सक्लुझिव्ह ब्रांडस् एकाच ठिकाणी उपलब्ध, नवपरिणीत जोडप्याला त्यांचं घर लावण्याकरता हव्या असणाऱ्या गोष्टी मिळाव्यात याकरता हा एक मस्त पर्याय उपलब्ध झालाय. 

वेडिंग्झ (Weddingz)

वेडिंग्झने २०१५ मध्ये मुंबईत कामाला सुरूवात केली. विवाहस्थळं आणि व्हेंडर्सचे खूप चांगले पर्याय या साईटवर उपलब्ध आहेत. सध्या दिल्ली, बेंगळुरू आणि गोव्यातल्या १० शहरांमध्ये वेडिंग्झचं काम सुरू आहे. यावर्षी कोलकता, चेन्नई आणि हैद्राबाद यासोबत २० शहरांमध्ये त्यांना कामकाज वाढवायचं आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एंजल गुंतवणुकीच्या माध्यमातून अंबित कॅपिटलकडून वेडिंग्झमध्ये ६ अब्ज ६४ कोटी ९५ लाख ४५० रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. वर्षाच्या सुरूवातीला सिक्सथ सेन्स व्हेंचर्स यांच्याकडून ए राऊंडद्वारेही निधी मिळवला.

या क्षेत्रातल्या जाणकारांच्या मते देशात वर्षाला दहा लाख लग्न होतात आणि यात २,६५९ अब्ज २९ कोटी ८० लक्ष रुपयांची उलाढाल होते. या बाजारात वर्षाला २५ टक्क्यांनी वाढ होतेय. 

वेडमीगुड, शादीसागा आणि बॉलीवुडसादीज या काही आणखी वेबसाईट्स विवाहासंबंधी सेवा पुरवतात. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गुडगावच्या वेडमीगुडने भारतीय एंजल नेटवर्कद्वारे २.७ कोटी रुपयांचं भांडवल मिळवलं. तर शादीसागाने त्यांच्या सेवेत सुधारणा आणण्याकरता आणि आणखी शहरांमध्ये विस्तार करण्याकरता आउटबॉक्स व्हेंचर्स कडून निधी मिळवला.

दिवसेंदिवस विवाहविषयक सेवांमध्ये विस्तार होत आहे. हा चिरंतन चालणारा व्यवसाय आहे. दिवसेंदिवस यात काही ना काही नवीन येतच असतं. इतर उद्योगांप्रमाणे विवाहविषयक सेवांच्या व्यवसायातही नवनवीन कल्पना येत असतात. लोक त्यांना उचलून धरत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या सेवांशी निगडीत व्यवसायाचाही चांगला विकास होणार आहे.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

'फॉरमायशादीडॉटकॉम' भेटवस्तू देण्याची अनोखी कला

‘फुलऑन शुभमंगल.कॉम’

...आणि त्यांनी अख्ख जग जोडलं

लेखक - तौसिफ आलम

अनुवाद - साधना तिप्पनाकजे