लंडन ते महाड कार प्रवास करुन विश्वविक्रम रचणाऱ्या भारुलता कांबळे यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

0

३२ देश आणि ३२ हजार किलोमीटरचा एकट्याने कार प्रवास करुन विश्वविक्रम करणा-या भारूलता कांबळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या विश्वविक्रमाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रीमती कांबळे यांचे अभिनंदन करत कौतुक केले.

लंडनमध्ये स्थायिक झालेल्या मूळ भारतीय वंशाच्या भारुलता कांबळे यांनी लंडन ते महाराष्ट्रातील महाडपर्यंत एकट्याने कार प्रवास करण्याचा विश्वविक्रम केला आहे. या मोहिमेत ३२ देश आणि ३२ हजार किलोमीटरचा कार प्रवास करुन रशिया, चीन, म्यानमार या मार्गाने श्रीमती कांबळे यांचे भारतात आगमन झाले. भारतात आसाम, उत्तर प्रदेश, दिल्ली येथून मुंबईत भारुलता कांबळे यांचे आगमन झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी श्रीमती कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. 

लंडन ते महाड असा खड़तर कार प्रवास करुन ‘बेटी पढ़ाओ बेटी बचाओ’ चा संदेश भारूलता कांबळे यांनी दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले. या प्रवासात त्यांनी ३ जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत. लंडन ते महाड असा ७५ दिवसांचा प्रवास करुन कमी वेळेत प्रवास करण्याचा तसेच या प्रवासात २ हजार ७९२ किलोमीटरचे अंटार्टिका सर्कल कार प्रवासाने पार करण्याचा आणि संयुक्त ट्रान्स अंटार्टिका सर्कल पार करण्याचा अशा तीन नवीन विश्वविक्रमांची नोंद श्रीमती कांबळे यांच्या नावावर आहे. श्रीमती कांबळे या लंडनमध्ये व्यवसायाने वकील आहेत. त्या मूळच्या गुजरातमधील नवसारी येथील असून त्यांचे सासर महाडला आहे.