महाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान शरद पवार यांना पद्मविभूषण प्रदान

महाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

शरद पवार यांना पद्मविभूषण प्रदान

Friday March 31, 2017,

2 min Read

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मपुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील चार मान्यवरांचा यात समावेश आहे.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या देशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून एका मान्यवरास पद्मविभूषण, एका मान्यवरास पद्मभूषण तर एका मान्यवरास पद्मश्री तर एका मान्यवरास मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी ,केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


image


पद्म पुरस्कारांचे वितरण दोन टप्प्यात करण्यात येते. आज पहिल्या टप्प्यात काही मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पद्म पुरस्कारातील सर्वोच्च मानला जाणारा पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी तेहेमटॉन उडवाडीया यांना महाराष्ट्रातून सन्मानित करण्यात आले. 


image


या समारंभात काही मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील 2 मान्यवरांचा यात समावेश आहे. कला व संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रसिध्द गायिका अनुराधा पौडवाल यांना सन्मानित करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे डॉ. एस.व्ही. मापुसकर यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. आज त्यांची मुलीने हा पुरस्कार स्वीकारला.


image


गणतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला यावर्षी देशातील पद्म पुरस्कार प्राप्त 89 मान्यवरांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण 8 मान्यवरांचा समावेश आहे. पैकी तिघांना आज सन्मानीत करण्यात आले. तर एका मान्यवरास मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढच्या टप्प्यातील पुरस्कार 6 एप्रिलला प्रदान करण्यात येणार आहे. (सौजन्य -महान्युज)