मी लढाऊ आहे : बलात्कार पिडीतेची ह्रदयद्रावक कहाणी, त्यांचा संघर्ष आणि मातृत्वाच्या शक्तीची प्रेरणा!

1

"अत्याचारग्रस्त प्रत्येकवेळी स्मितहास्य करतात त्यावेळी ते त्यांच्यातील आंतरिक शक्तीचे दर्शन घडवितात". --- जेने मँक ऍलव्हानेय

हिंमत आणि धैर्य सहजासहजी येत नसते, खासकरून ज्यावेळी तुम्हाला सत्य बोलायचे असते, असे सत्य ज्यामुळे खूपश्या परंपरा आणि मिथकांना धक्का लागतो.


ही कहाणी आहे एका निष्पाप महिलेची. निलू, ज्या त्यांच्या पालकांच्या निधनानंतर एका मंदिरात लहानाच्या मोठ्या झाल्या. त्या १५ वर्षांच्या असताना त्यांच्यावर अत्याचार झाला, आणि त्या गरोदर असल्याचे जेव्हा त्या माणसाला कळले तेव्हा त्या माणसाने त्यांना एकटीला टाकून दिले.  सुरूवातीला त्यांनी त्यांच्या आणि बाळाच्या पोटासाठी मंदिराबाहेर भिक मागितली, नंतर त्यांना एका दलालाला विकण्यात आले. सुरूवातीला दारूच्या नशेत संघर्ष करत त्यांना दारूड्या अनोळखी पुरूषांची भूक भागविण्यासाठी ढकलण्यात आले, तरीही त्या आशेवर होत्या, आणि त्यांनी त्यांच्या लहानग्यासाठी या जीवनाचा स्विकार केला होता.

त्या इतक्या लढाऊ होत्या की, ट्यूबरकोलायसीस आणि एचआयव्हीची लागण झाली त्यानंतरही त्यांना त्यांच्या मातृत्वाचे भान होते आणि त्यासाठी त्यानी एक माता जे काही करते तेच केले. त्या बाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “ मी मंदिरात लहानाची मोठी झाले, जेथे पुजा-याने मला सांगितले की माझ्या जन्मानंतर माझे पालक वारले. मला त्यांना पाहिल्याचे स्मरत नाही. मी वयाच्या १५व्या वर्षी कुमारी माता झाले, ज्यावेळी वर्दीतील एका माणसाने माझ्यावर नेपाळमध्ये अत्याचार केला. मंदीराबाहेर खेळता खेळता माझे जग कधी बदलले मला समजलेच नाही, माझ्या पोटात त्याचे मुल वाढते आहे हे समजल्यावर त्या मुलाचा बाप पळून गेला. त्यानंतर मी मंदिराबाहेर भिक मागूनच उदर निर्वाह केला, माझ्या आणि माझ्या लहानगीच्या पोटासाठी. लोक आम्हाला कपडे वगैरे देत असत. मी मंदीरात रहात होते आणि तेथे स्वयंपाकाचे काम करत होते. त्यावेळी एक माणूस भेटला. जो रोज मंदीरात येवू लागला.एक दिवस मी चुलीवर स्वयंपाक करत होते त्यावेळी येवून तो मला म्हणाला की, “ जर तू माझ्या सोबत आलीस तर मी माझ्या बहिणीकडे तुला घेवून जाईन, नंतर तुला पैश्याची काही चिंता नसेल.” १६वर्षाची लहान मुल असलेली आई, मी हतबलपणे मान हलवून होकार दिला आणि अंधपणे त्याच्यामागे गेले. कारण माझ्या लहानग्या मुलीमुळे मला आधाराची गरज होती. त्यामुळे ज्यावेळी मी पुण्यात आले, मला लक्षात आले की मला घरकामासाठी आणण्यात आले नाही. ती बहिण जिचा त्याने उल्लेख केला ती कुंटणखान्याची मालकीण होती. तिला मला एक लाखाला विकण्यात आले. मला वेश्या बनविण्यात आले म्हणून मी खूप रडले. मी त्या धंद्यात काम करण्यास पहिले पाच महिने  नकार दिला ज्यावेळी मी पुण्यात होते. मला मारहाण झाली, रक्त बंबाळ होईपर्यंत त्या भडव्याने मारले जो मला तेथे घेवून आला होता. त्याने जबरीने मला अनोळखी पुरूषांसोबत जायला लावले ज्यांनी माझ्यावर अत्याचार केले. त्या पुरूषांनी माझ्याशी जबरीने संभोग केला. त्या नंतर मला मुंबईत साठ हजाराना विकण्यात आले. मला राहणे कठीण होते, पण शेठ चांगला होता. ज्यावेळी मी मुंबईत आले जीवन वेगळ्या प्रकारे सुंदर झाले. ज्या कामाला मी नकार देत होते ते मी स्वत:हून स्विकारले, कारण माझ्या लहानगीचे पोट भरण्याचा दुसरा पर्याय नव्हता. मी बाजूच्या बाईला चार हजार रूपये देवून तिच्याकडे तिचा सांभाळ करण्यासाठी ठेवत असे. याच वेळी मला क्षय आणि एच आयव्हीची लागण झाली. माझे जीवन वाया गेले, जरी मी तरूण होते.

मुंबईच्या वेश्या व्यवसायात नऊ वर्ष राहिल्यावर, येथे संघर्षाला सामोरे जात, दारूडे, व्यसनाधिन आणि रोग्यांचे मनोरंजन करत मी अखेर हा व्यवसाय सोडून देण्याचे ठरविले. पूर्णताने दिलेल्या संधीमुळे मी माझ्या मुलीसोबत सुखाने राहण्याचे स्वप्न पाहू लागले. जी आता हॉस्टेलमध्ये असते. मला अपेक्षा आहे की माझे प्रशिक्षण झाले की मला चांगली नोकरी मिळेल. माझे जीवन आता तिच्यासाठी असेल. मला माहित नाही मी किती दिवस जगेन, पण मला याची हमी हवी आहे की तिला शिक्षण मिळेल आणि ती स्वत:च्या पायावर उभी राहील. माझे जीवन विचित्र होते, पण मी जिद्द आणि प्रेरणा ठेवली तिच्या भल्यासाठी. इतकी हिम्मत मी करू शकले कारण मी एक आई आहे. त्या पूर्वी मी खूप निराश होते, पण मी हारले नाही, मला या लोकांसमोर हरायचे नाही, जे मला रोज रात्री मारून टाकण्यासाठी येतात. मी त्यांना जिंकू देणार नाही.

निलू यांचे सक्षम निवेदन ऐकून प्रत्येक भारतीयांचे मन पिळवटून जाईल,आपले सा-यांचे कर्तव्य बनते की, अशा कहाण्या पुन्हा तयार होवू नयेत.

अगाथा ख्रिस्ती यांच्या वचनानुसार, “ आईच्या बाळावर असलेल्या प्रेमापुढे जगातील सारे काही तुच्छ आहे, त्याला कायदा लागू होत नाही, दया,किंवा कशालाही ते भिक घालत नाही, त्याला कुणी चिरडून टाकू शकत नाही अशा सक्षमपणाने ते आपल्या मार्गावर उभे असते”.