देशाचे दोन टॉपर ‘आयएएस’ मधूरबंधनाच्या निर्णयाने चर्चेच्या केंद्रस्थानी!

0

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१६मधील देशातील टॉपर टिना डाबी सध्या आणखी एका नव्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तिर्ण झाल्या आहेत! ती आहे वधू परिक्षा! मागासवर्गीय समजल्या जाणा-या समाजात जन्मलेल्या टीना यांनी आपल्या बुध्दीमत्तेच्या बळावर देशातील ही प्रतिष्ठेची समजली जाणारी  केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तिर्ण केली त्यावेळी त्यांच्या नावाची चर्चा देशात आणि जगात सारे करत होते. मात्र आता आणखी एका कारणाने त्या देशात सर्वांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत त्या त्यांच्या एखाद्या चित्रपटाचे कथानक शोभावे अशा प्रेम कहाणीमुळे! त्या प्रेमात पडल्या आहेत आणि त्या देखील त्यांच्या प्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशात दुसरा क्रमांक मिळवणा-या अतहर अमीरउल शफी खान यांच्यासोबत! आयएएस टॉपर म्हणून नवी दिल्लीत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पदवीदान समारंभ आयोजित केला होता, तेथेच या दोघांचे पहिल्या नजरेत प्रेम म्हणतात तसे सूत जुळले आहे. टिना सांगतात की, ‘त्या दिवशी त्यांनी मला पदवीदान समारंभात पाहिले आणि सायंकाळी थेट माझ्या घरी आले. पहिल्याच भेटीत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो!’

काश्मिरमधील एका लहानश्या खेड्यात जन्मलेले अमीर आणि मागासवर्गियांच्या समाजातून येवून देशात अव्वल क्रमांक मिळवना-या टिना आता लवकरच लग्न करणार आहेत. आपल्या प्रेमकहाणीला समाजमाध्यमातून मोकळी वाट करून देताना या दोघांच्या मनावर कोणताही तणाव नाही. या दोघांची अनेक छायाचित्रे टिना यांनी समूह संपर्क माध्यमांवर उघड केली आणि देशातील त्यांच्या चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का दिला. मात्र असे असले तरी समाज माध्यामातून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या दोघांच्या प्रेमसंबंधाबद्दल आणि नात्याबद्दल काही जणांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र त्याबाबत बोलताना टिना यांनी म्हटले आहे की, समाजमाध्यमातून आमच्याबद्दल ज्या काही प्रतिक्रिया पाहिल्या त्या मनस्ताप देणा-या आणि दु:खी करणा-याही होत्या त्यामुळे आता आम्ही त्या माध्यमांकडे दुर्लक्ष करण्याचे ठरविले आहे. त्या म्हणतात की, लोकांच्या नजरेत आल्याने आम्हाला अशा काहीतरी प्रतिकूल गोष्टीना सामोरे जावेच लागणार होते.

अवघ्या बावीसाव्या वर्षी टीना देशात पहिल्या आयएएस म्हणून झळकल्या आहेत आणि त्या सध्या मसूरी येथे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी कमी वयात टॉपर म्हणून झळकताना यापूर्वीच्या टॉपर डी.सुब्बाराव आणि माजी राजदूत निरुपमा राव यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.