भ्रष्टाचार मुक्त देशाचे स्वप्न उराशी बाळगणारा १२वी नापास मोहसीन यांचा समाजाचे रूप बदलण्याचा ध्यास

0

फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या एशियाच्या ३० वर्षापेक्षा कमी वय असलेल्या ‘कर्तुत्ववान तरुण नेते व उद्यमिंच्या यादीनुसार ५० पेक्षा अधिक भारतीयांना  मानाचे स्थान दिले आहे. या यादीत ग्राहक तंत्रज्ञान, व्यावसायिक तंत्रज्ञान, कला, आरोग्य सेवा तसेच विज्ञान, पत्रकारिता, सामाजिक उद्यमिता, वित्त, उद्योगांसहित अनेक विभिन्न क्षेत्राच्या प्रेरणादायी युवा नेत्यांचा समावेश आहे. खरंतर फोर्ब्सच्या यादीत फक्त अशा लोकांनाच जागा मिळते ज्यांच्या कार्याला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय ओळख मिळालेली आहे. पण प्रत्येक समाजात असे काही लोक असतात जे अलिप्त राहून देश, समाज व मानवतेच्या अनुषंगाने कल्याणाचे काम करतात. असे लोक प्रत्येक शहर, गांव व वस्ती मध्ये असतात.  त्यांना कोणत्याही प्रसिद्धीची अभिलाषा नसते. त्यांच्या कार्यामुळे मिळालेल्या यशातच त्यांचा आनंद सामावलेला असतो. असाच एक कर्तुत्ववान, प्रेरणादायी व अनामित प्रवासी तरुण भोपाळ मध्ये रहातो. ज्याच्या कार्यावर त्यांच्या समाजाला गर्व आहे. ज्या वयात एक सामान्य विद्यार्थी आपला अभ्यास, मित्रांमधील मौज मस्तीच्या पलीकडे जाऊन विचार करू शकत नाही, तेच या २२ वर्षीय विद्यार्थ्याने तरुणांसमोर जगण्याचा नवीन दृष्टीकोन दिला आहे. या विद्यार्थ्याकडे प्रभावित होऊन फक्त तरुणच त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सामील होत नाही तर त्यांचे पालक स्वच्छेने आपल्या मुलांना त्यांच्या टीमचा हिस्सा बनवण्यासाठी प्रेरित करतात.

‘’किसी की मुस्कुराहटो पे हो निसार

किसी का गम मिले तो ले उधार .....जीना इसी का नाम ही’’

प्रसिद्ध गाण्याच्या या ओळीनुसार .... 'अॅक्ट नॉनसेन्स ..... स्प्रेड हैपिनेस' म्हणजे निरर्थक कामापासून सुखाचा शोध घेऊन त्याचा प्रचार करून आपला आनंद दुसऱ्यांना देऊन त्यांचे दु:ख वाटून घेणे हाच त्यांच्या जीवनाचा उद्देश आहे. भोपाळ स्कूल ऑफ सोशल सायन्सच्या बॅचलर ऑफ सोशल वर्कच्या शेवटच्या वर्षात शिकणारे २२ वर्षीय विद्यार्थी मोहसीन खान यांनी सन २०१४ मध्ये ‘अंश’ नावाची एक स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्दिष्ट म्हणजे ज्यांना समाजासाठी काहीतरी करण्याचा कनवळा होता, आवेश होता पण काही कारणाने ते असमर्थ ठरले अशा लोकांना एकत्रित आणून ही संस्था त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करते.

संस्थेची क्षमता

"अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर

लोक आते गए और कारवा बनता गया"

मोहसीन यांनी युवर स्टोरीला सांगितले की," समाजसेवेचे कार्य मी २०११ पासून सुरु केले आहे, पण मागच्या तीन वर्षात लोकांनी माझ्या कार्याची प्रशंसा तर केलीच पण पुढाकार घेऊन त्यात सहभागी झाले. प्रारंभी चार मित्रांच्या साथीने अंश संस्थेचा पाया रचला व त्या नंतर कॉलेजचे काही विद्यार्थी या संस्थेशी जोडले गेले आहेत. सध्या या संस्थेत ८० असे समर्पित विद्यार्थी आहे जे कोणत्याही कामासाठी वर्षाचे ३६५ दिवस व २४ तास हजर असतात’’.

या कोर ग्रुपच्या सदस्यांनी आपले पूर्ण जीवन दुसऱ्यांच्या सेवेसाठी अर्पण केले आहे ते भोपाळ व्यतिरिक्त मध्यप्रदेशच्या अन्य जिल्ह्यातही काम करतात. कोर ग्रुपचे सदस्य घरापासून लांब राहून समाजासाठी कार्यशील आहे. संस्थेत कोर ग्रुपच्या व्यतिरिक्त ५०० असे सदस्य आहे जे कोणत्याही मोठ्या आयोजनासाठी तत्पर राहून ते यशस्वी करून दाखवतात. कुणीही व्यक्ती anshindia.org या वेबसाईटला लॉग इन करून स्वतःला या कार्याशी जोडून घेऊ शकतो. यावर एकदा आपले नाव नोंदवल्यानंतर संस्थेचे लोक स्वतःहून दूरध्वनीद्वारे त्यांच्याशी संपर्क करतात.  

जीवनाच्या दुसऱ्या पर्वाची सुरवात

त्या जुन्या हाडांमध्ये व लटपटत्या पायांमध्ये माहित नाही पण कुठून ताकद आली होती, त्या निर्जीव धमन्यांमध्ये रक्त सळसळत होते व एक उर्जा उत्पन्न झाली. चेहऱ्यावर एक अवर्णनीय आनंद व डोळ्यात एक चमक होती. जसे अनेक वर्षाच्या बंदिवासातून एखाद्या पक्षाने उंच गगन भरारी घेतली, आता प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकतो.

आयुष्यात पुन्हा लहानपण अनुभवासे वाटते. ८० वर्षीय शर्मा अंकल आपल्या हातात माईक घेऊन ‘ओ मेरी जोहरा जबी’ हे गाणे गुणगुणत होते, जवळजवळ ८५ वर्षाच्या अनुभवाची गाठोडी असलेले हमीद चाचा यांनी त्यांच्या तरुणपणी लिहिलेली स्वतःची तर काही गालिब व मीरची शायरी ऐकवीत होते. २० वर्षापूर्वी बँकेतून सेवानिवृत्त नायडू अंकल आज पहिल्यांदाच माऊथ ऑर्गनवर गाण्याची चाल लावत होते. तिथेच बसलेली मृदुला काकू, गौरी काकी व शबनम चाची हे सगळे बघून उगीचच हसत होत्या व टाळ्या वाजवत होत्या.

हे दृश्य मोहसीन यांच्या दुसऱ्या पर्वातील कार्यक्रमाचे होते. त्यांनी एकाच भागातील अनेक वयस्कर रहिवाश्यांना एकत्र आणून त्यांचे स्नेहसंमेलन भरवले त्यांच्याकडून त्या सगळ्या गोष्टी करवल्या ज्या मागच्या अनेक वर्षांपासून त्यांनी केल्या नव्हत्या. त्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा भरवून त्यांना सन्मानित केले. हे सगळे ते लोक आहेत जे आपल्या नोकरीतून सेवानिवृत्ती नंतर एखाद्या जुन्या फर्निचरप्रमाणे घराच्या कोपऱ्यात पडून होते.

पेंशन आणण्यासाठी तसेच आजारपणात डॉक्टरांकडे जाण्याव्यतिरिक्त ते आपल्या घरातून क्वचितच बाहेर होते. एकाच भागात रहाणारे दोन वयस्कर गृहस्थ वर्षानुवर्षे एकमेकांना भेटत नव्हते. असे नाही की ते घरात एकटे होते, त्यांचे आपले एक कुटुंब होते. सून व मुलगा नोकरीत व्यस्त तर नातवंडे त्यांच्या मित्रांमध्ये व्यस्त. ‘अंश’ या पद्धतीचे अनेक कार्यक्रम आयोजित करते ज्याने लोकांच्या जीवनात आनंद निर्माण केला जातो.

अंश यांचे अन्य सामाजिक कार्यातील योगदान

अंशच्या सदस्यांनी मागच्या दोन वर्षात गरिबी, भूक, बेरोजगारी,  स्त्रियांवरील अत्याचार, स्त्री सबलीकरण, भ्रष्टाचार, पर्यावरण जागृतता असे अनेक विषय हाताळले. अंशचे सदस्य आदिवासी पाडयांमध्ये शिक्षणासंदर्भात अनेक कँप लावून मुलांमध्ये शिक्षण व इतर अनेक विषयांबद्दल जागरूकतेचे काम करीत आहे. अंशचे सदस्य आपल्या कलागुणांमध्ये इतरांना सहभागी करतात. अंशने अनेक प्रसिद्ध प्रतिष्ठित संस्थेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय सिनेमा निर्मितीबरोबरच, अभिनय, रंगभूमी, छायाचित्रण आदी विषयांवर कार्यशाळा आयोजित केली आहे.

विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप

मोहसीन त्यांच्या पुढच्या योजनेसाठी आपल्या संस्थेतंर्गत आपल्या कॉलेजसहित इतर कॉलेजच्या सामजिक कार्य करणाऱ्या विद्यार्थांसाठी एका महिन्याची इंटर्नशिप आयोजित केली आहे. या इंटर्नशिपमध्ये सामाजिक विज्ञानाच्या इतर विषयांचे विद्यार्थीपण भाग घेतात. या एका महिन्यात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सामाजिक समस्यांची माहिती देऊन त्यांच्यात समाजसेवेचे बीज पेरले जाते जेणे करून त्यांच्यात सामाजिक मुद्दे व समस्यांची ओळख निर्माण होईल. या कामाला पूर्ण सहयोग देण्यासाठी युनिसेफने सहमती दर्शवली आहे.

अंशची सहयोगी संस्था

अंशच्या सदस्यांच्या कामाने प्रेरित होऊन अनेक प्रतिष्ठित संस्थांनी त्यांना आपला सहयोग दिला आहे. युनिसेफ, एकता परिषद, मिशन इंद्रधनुष्य, नर्मदा बचाव आंदोलन, मेक ए डिफ्रें स , दी ऑप्टी मिस्ट सिटीजन, नॅशनल राईटर एज्युकेशन फोरमसारख्या संस्था अंशच्या कामासाठी त्यांचा सहयोग देत आहे. तसेच या संस्थेच्या कार्याला अंशचे सहायक पण मदत करीत आहे.

निधी गोळा करण्यासाठी सदस्यांची मदत

अंश द्वारा केलेल्या कामासाठी सदस्य हे निधीची व्यवस्था स्व:खर्चाने करतात. आपल्या घरातील पेपरची रद्दी व अन्य भंगार वस्तू विकून तो पैसा सामाजिक कार्याच्या उपयोगासाठी अंशच्या खात्यामध्ये जमा करतात. २६ जानेवारी व १५ ऑगस्टला तिरंगी झेंडा विकून पैसा गोळा करतात. कोणताही विशेष कार्यक्रम आयोजित करण्याअगोदर सदस्य निधीचे उत्पादन वाढवण्यासाठी मोहिमेद्वारे पैसे जमा करतात, यासाठी ते संगीत मैफिल आयोजित करण्यापासून ते बूट पॉलिश करण्यासाठी मागेपुढे पहात नाही. बऱ्याचवेळा शहरातील काही संस्थांद्वारे छोटी मोठी रक्कम उपलब्ध करवली जाते.

अण्णांच्या आंदोलनापासून सुरवात

या गोष्टीची सुरवात २०११ पासून झाली. हा तोच काळ होता जेव्हा देशाची राजधानी दिल्ली सहित पूर्ण देशात भारत भ्रष्टाचाराविरुध्द अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली जनलोकपाल विधेयक आणण्यासाठी व भ्रष्टाचार संपवण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाने देशातील नागरिकांमध्ये  एक आशेचा किरण आणला होता, जो देशाला खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारापासून मुक्त होतांना बघत होता. मोहसीन या आंदोलनामुळे प्रभावित झाले होते. मोहसीन यांनी भोपाळच्या सगळ्या लोकांचे फेसबुक प्रोफाईल तपासले व जे अण्णांच्या आंदोलनाला समर्थन करीत होते त्या सगळ्यांना एका व्यासपीठावर बोलावून प्रथमच भोपाळ मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात मौलाना आझाद नॅशनल टेकनिकल इंस्टीटयूट समोर एका रॅलीचे आयोजन केले.  १६ वर्षीय मोहसीन खान यांना मात्र या गोष्टीची मुळीच कल्पना नव्हती की सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचार हा कोणता रोग आहे व जनलोकपाल नामक डॉक्टर या आजाराला कसे निट करू शकतील. देशातून भ्रष्टाचार समाप्त झाला किंवा नाही, पण मोहसीन यांना या आंदोलनाने  मानवतेच्या सेवेसाठी प्रेरित केले. या सगळ्या व्यापातून ११वी व १२वी परीक्षेत मोहसीन नापास झाले व दोन तीन वर्ष मागे पडले. पण या अपयशाने खचून न जाता मोहसीन यांनी असे क्षेत्र निवडले जे प्रत्यक्ष व्यवहारात व सिद्धांतात समाजसेवेतूनच मार्गस्थ होतात.

युवर स्टोरीला मोहसीन सांगतात,’’जेव्हा लोक मला विचारतात की तु एकटा सगळी काम कशी करशील तेव्हा मी त्यांना सांगतो अशा कामांसाठी मी एकटा सक्षम नाही, पण एका सोनेरी भविष्यासाठी समानता असलेला समाज बनवण्याची उत्कट इच्छा मला हे कार्य करण्यासाठी प्रेरित करून हिम्मत देते’’.

लेखक : हुसैन ताबिश
अनुवाद : किरण ठाकरे