सर्व काही समाजाच्या मानसिक स्वास्थासाठी

सर्व काही समाजाच्या मानसिक स्वास्थासाठी

Tuesday October 13, 2015,

3 min Read

मुंबईच्या एसएनडीटी महाविद्यालयातून स्तानकोत्तर पदवी मिळाल्यावर समाजासाठी काम करायचं हे असीरा चिरमुलेचं आधीपासून ठरलं होतं. कॉलेज सुरु असतानाच तिचं सामाजिक कार्य सुरु झालं होतं. आदिवासी पाड्यातल्या मुलांना सायकली मिळवून देण्याचा उपक्रम राबवला होता. या कामात तिला मदत मिळाली मुक्ता देशपांडे आणि यशश्री केतकर या मैत्रिणींची. बहिण इशा चिरमुलेची साथ सुरुवातीपासून होतीच. आपल्या मानसशास्त्रातल्या शिक्षणाचा फायदा समाजाला कसा करवून देता येईल यावर असीरा नेहमी विचार करायची. यातूनच मेकींग ए डिफरेन्स अर्थात ‘मॅड’ या नव्या उपक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात मुक्ता, यशश्री आणि इशा तिघीही असीरासोबत होत्याच. मॅड उपक्रमाअंतर्गत अल्झायमर या वृध्दापकाळात उद्भावणाऱ्या मानसिक आजाराबद्दल जनजागृती करण्याची मोहिम हाती घेण्यात आली.

image


भारतामध्ये अल्झायमर या मानसिक आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. एकूण लोकसंख्येतल्या २० पैकी १ जण अल्झायमरग्रस्त आहे. इतकं हे प्रमाण वाढत जातंय. महाराष्ट्रातले पाच लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे डिमेन्शियाग्रस्त आहेत. यापैकी ७० ते ८० टक्के लोकांना अल्झायमर झालेला असतो. दैनंदिन जगण्यातली गोष्टी विसरायला होणं. भूतकाळातल्या गोष्टी न आठवणे, त्या कायमस्वरुपी स्मृतीतून निघून जाणे ही अल्झायमरची लक्षणं आहेत. मेंदूतल्या विशिष्ट भागातल्या पेशी आकुंचित पावणे किंवा मग त्या पेशी मृत बनणे याला वैद्यकिय भाषेत अल्झायमर असे म्हटले जाते. या आजाराची लक्षणे दिसण्याआधी बऱ्याच वर्षांपासून या पेशी काम करेनाशा झालेल्या असतात. यामुळे जेवण करण्यासारख्या महत्वाच्या गोष्टीपासून गाडी चालवणे, कम्प्युटरवर काम करण्यासारख्या साध्या गोष्टीही जमत नाहीत. काहीवेळा हा आजार अनुवांशिकही असू शकतो. 


अल्झायमर झालेली व्यक्ती अनेकदा चिडचिडी बनते, ती लोकांशी संपर्क कमी करायला लागते, अनेक गोष्टीमधला त्या व्यक्तिचा रस कमी होतो. वृध्दापकाळामुळं असं होत असेल असं म्हणून या गंभीर मानसिक आजाराकडे दुर्लक्ष केलं जातं आणि इथंच हा आजार बळवायला सुरुवात होते.


अल्झायमर ऍण्ड रिलेटेड डिसऑर्डर सोसायटी ऑफ इंडिया यांच्या पाहणीनुसार भारतात दर पाच वर्षांनी अल्झायमरग्रस्तांची संख्या दुप्पट होत असल्याचं आढळून आलंय. महाराष्ट्रात २००६ मध्ये दोन लाख सात हजार ज्येष्ठ नागरिक अल्झायमरने त्रस्त होते. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार २०११ मध्ये सुमारे तीन लाख ६० हजार ज्येष्ठांना अल्झायमरने ग्रासलंय. जगात दर सातव्या सेकंदाला एक याप्रमाणे ज्येष्ठांना अल्झायमरची लागण होते आहे. 


२०१६ पर्यंत या आजाराची सर्वाधिक म्हणजे २०० टक्के लागण झारखंड आणि दिल्ली राज्यांमध्ये होणार आहे. याशिवाय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, आसाम आदी राज्यांतल्या अल्झायमरग्रस्त रुग्णांच्या संख्येत १०० टक्‍क्‍यांनी वाढ होण्याचा धोक्‍याचा निर्देशही या संदर्भात काम करणाऱ्या संस्थांनी निदर्शनास आणून दिला आहे.

image


एकट्या मुंबई शहरात अल्झायमर झालेल्या वृध्दांची संख्या ही 40 हजारच्या आसपास आहे. ही परिस्थिती या मानसिक आजाराबद्दल माहिती नसल्यानं उदभवली आहे. हे स्पष्ट आहे. यासाठीच काम करायचं असीरानं ठरवलं. डॉक्टर विनायक जोशी, डॉक्टर अरविंद डिसोझा आणि डॉक्टर विवेक चिंचोळकर यांच्यासारख्याच्या मदतीनं अल्जायमरची माहिती देणारी छोटी पुस्तिका तिनं तयार केली. या पुस्तिकेत अल्झायमर म्हणजे काय? त्याची लक्षणं काय असतात? अल्झायमर टाळण्यासाठी काय करु शकतो. अशी सर्व माहिती देण्यात आलीय. मेंदूला सतत कार्यरत ठेवणं हा अल्झायमर टाळण्याचा महत्वाचा उपाय ठरु शकतो. यातूनच कोडी सोडवणं, मेंदूला चालना देणारे गेम खेळणं अशा गोष्टी करु शकतो. याची माहितीही या पुस्तिकेत आहे. सुरुवातीच्या काळात ही सर्व माहिती असलेल्या १००० पुस्तिका तयार करण्यात आल्या. त्या केमिस्ट आणि ठाण्यातल्या पुस्तकांच्या दुकानांमध्ये वाटण्यात आल्या. तिथं खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांना त्या पुस्तिका देण्यात आल्या. ४००० हजार पेक्षा जास्त पुस्तिका इमेलद्वारे किंवा ऑनलाईन पध्दतीनं लोकांपर्यंत पोचवण्यात आल्या. अल्झायमरबद्दल जनजागृती करण्यासाठी फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंगचा वापरही असीरा चिरमुलेनं केलाय.

आता असीरानं पुढचं पाऊल टाकलंय. मुलुंड आणि ठाण्यात जनजागृतीसाठी ती कार्यक्रम करते. अल्झायरमची लक्षणं दिसणाऱ्या लोकांना मदत म्हणून आता सपोर्ट ग्रूप तयार करण्याबरोबरच त्यांना मदत करणारे केयर गिवर तयार करण्याचं काम तिनं हाती घेतलंय. प्रशिक्षण देऊन त्यांना अल्झायमरचा सामना करण्यासाठी सज्ज करण्यासाठी असीरा काम करतेय.

image


हा आजार जेवढ्या झपाट्यानं वाढतोय तेवढी त्याबद्दलची जनजागृती वाढणं गरजेचं आहे. एका व्यक्तीच्या मानसिक स्वास्थाबरोबरच समाजाचं मानसिक स्वास्थ टिकून राहणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी काम करत राहणार असल्याचं असीरा सांगते.