डबेवाल्या जोशीकाकूंचा दुबईतील मराठमोळा 'पेशवा' पर्यंतचा विस्मयकारक प्रवास!

डबेवाल्या जोशीकाकूंचा दुबईतील मराठमोळा 'पेशवा' पर्यंतचा विस्मयकारक प्रवास!

Tuesday November 22, 2016,

5 min Read


‘मराठी माणसाला उद्योगात गती नाही’ असे नकारात्मक विधान करायचे दिवस आता खूप मागे पडले आहेत कारण अनेक मराठीजनांनी आपल्या कर्तृत्वातून हे विधान खोटे ठरविले आहे त्यापैकीच एक आहेत दुबईतील जोशी काकू. जोशी काकू अर्थात श्रीया जोशी. कुठलीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना स्वबळावर, अपार कष्ट करत दुबईत ‘पेशवा’ रेस्टॉरन्ट यशस्वीरीत्या चालवतात श्रीया जोशी. नुसतं दुबईतच नाही तर स्वकष्टाच्या बळावर शारजामध्येही दुसरं ‘पेशवा’ रेस्टॉरन्टही त्यांनी सुरू केलं आहे. हॉटेल व्यवसायातच मर्यादित न राहता दुबईत किराणा व्यापार तसेच भारतीय मसाल्यांची निर्यातही त्या करतात. ‘निवांत’ नावाचा ‘स्पा’ही त्यांनी सुरु केला आहे. ‘पेशवा’ रेस्टॉरन्टचं नाव आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलय. ‘डबेवाली ते ‘पेशवा’ची मालकीण’ जाणून घेऊ या श्रीया जोशी यांची यशाची कहाणी...

image


पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या श्रीया यांचे वडील वकील होते, घरात व्यावसायिक असं वातावरण नव्हतं. चारचौघींप्रमाणे शिक्षण पूर्ण झाल्यावर श्रीया यांचं लग्न सचिन जोशी यांच्यांशी झालं. लग्नानंतर दोघेही पतीपत्नी सचिन यांच्या नोकरी निमित दुबईजवळच्या अजमान नावाच्या छोटय़ाशा इमिरेट्समध्ये आले. सुरवातीच्या दिवसात फक्त सचिनच्या पैशांवर घर सुरु होते. श्रीया यांना काहीतरी करून सचिन यांना हातभार लावावा असे वाटायचे. कारण वाढत्या खर्चात पैशांची तशी चणचण होतीच. एकदा त्यांच्या परिचयातील पवार काका त्यांच्याकडे जेवणाला गेले असता त्यांना जेवणाची चव खूप आवडली, त्यांनी डब्बा द्यावा असा आग्रह केला आणि इथेच श्रीया यांच्या व्यवसायाचा श्री गणेशा झाला. घरगुती जेवण कोणाला नको असतं, हळूहळू जेवणाच्या डब्याची संख्या वाढली आणि तब्बल १३५ डब्ब्यांची ऑर्डर श्रीया पूर्ण करू लागल्या. “पहाटे तीनला उठून स्वयपाक सुरु व्हायचा. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व डबे तयार व्हायचे. घर फारच अपुरे पडायचे, मुलगा लहान होता. उन्हाळ्यात तर मरणाची गरमी असायची, त्यात एसीचा प्रॉब्लेम असायचा. एक नाही अनेक अडचणींवर मात करत जिद्दीने मी तीन वर्ष सातत्याने डबे करून देत होते”. श्रीया सांगतात. अतिशय तरुण म्हणजे पंचविशी सुद्धा ओलांडली नव्हती तेव्हा श्रीया यांनी हे काम सुरु केले. सभोवतालची मंडळी डबेवाल्या जोशी काकू म्हणून हिणवायचे, त्यांचे बोलणे मनावर परिणाम देखील करायचे, पण काम करणे कधी बंद केले नाही. कधी कसलीही लाज वाटून घेतली नाही श्रीया पुढे सांगतात.

image


सर्व काही सुरळीत सुरु असताना सचिन यांना नोकरी निमित्ताने शारजा मध्ये जावे लागले, तिथून डब्बे पोहचवणे शक्यच नव्हते. त्यामुळे मग डब्बे करणे बंद केले आणि मग इतर छोटीमोठी कामं करण्यास सुरुवात केली श्रीया सांगतात. रिसेप्शनिस्ट म्हणूनदेखील त्यांनी काम केलं.

एकदा त्या एका ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’ला गेल्या असताना तिथे निलोफर वालिया नावाची एक पारसी बाई नाशिक-पुणे रोडवर कसारा येथील प्लॉट्स विकत होती. श्रीया यांनी एक प्लॉट विकत घेतला. त्यांचे बघून आणखी ओळखीतून १० जणांनी प्लॉट्स घेतले. त्या बाईंनी श्रीया यांना कमिशन दिलं आणि त्यांच्यासाठी मार्केटिंग करण्याविषयी विचारले. यातून भरपूर पैसे मिळायला लागले. त्यामुळे श्रीया यांनी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ सेल्सचे काम त्या पाहू लागल्या. त्यांनी सहा महिन्यांत ३५० प्लॉट्स विकले. डबेवाली, रिसेप्शनिस्ट, सेल्स वुमन अशी निरनिराळी कामं श्रीया यांनी केली. भरपूर अनुभव गाठीशी होता. या सर्वाचा फायदा त्यांना ‘पेशवा’ सुरू करताना झाला.

image


“अनेक कामं केली पण स्वयंपाकाची हौस मनामध्ये होतीच, एखादं रेस्टॉरन्ट सुरु करावा असा विचार मनात सुरु होता. म्हणतात न इच्छाशक्ती तीव्र असली की तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे चालत येतात. आमचे मित्र आनंद जोग यांनी रेस्टॉरन्ट चालू करण्यासाठी पुण्याचे डेक्कन जिमखान्यावरील जनसेवा भोजनालयाचे सचिन देवधर यांचं नाव सुचवलं. सचिन देवधर यांच्या आईने हे भोजनालय सुरू केलं होतं. ७० वर्ष जुनं होतं. चांगलाच योग जुळून आला होता, मग सचिन देवधर, आनंद जोग आणि आम्ही तिघांनी मिळून रेस्टॉरन्ट सुरू केलं. सचिन देवधर यांनी ‘पेशवा’ हे नाव सुचवलं आणि ‘पेशवा’ रेस्टॉरन्टचा जन्म झाला..’’ श्रीया सांगतात.

image


२०१२ मध्ये ‘पेशवा’ रेस्टॉरन्ट सुरू झालं. रेस्टॉरन्ट मध्ये मेनू काय ठेवायचा यावरही बराच विचार केला. इतर रेस्टॉरन्ट प्रमाणे पंजाबी, गुजराती जेवण न ठेवता फक्त महाराष्ट्रीयन पद्धतीच जेवण ठेवायचं ठरलं. त्यात महाराष्ट्रातील सर्वच प्रांतांचा विचार केला. कोल्हापुरी, वऱ्हाडी, मालवणी, कोकणी, नागपुरी शाकाहारी आणि मांसाहारी. सचिन देवधर यांनी आणि त्यांच्या आईनी सर्व स्टाफला प्रशिक्षण दिलं. दोन महिने पुरणपोळी आणि उकडीचे मोदक सर्व मुलांना शिकवले. त्यामुळे पुरणपोळ्या आणि उकडीचे मोदक पुण्यापर्यंतच मर्यादित राहिले नाहीतर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. ‘पेशवा’ चा श्री गणेशा झाल्यापासून आजपर्यंत रेस्टॉरन्ट ग्राहकांनी भरलेलं आहे. मराठीच नव्हे तर अमराठी लोकंही मोठ्या प्रमाणात जेवण करायला येतात.”

image


‘पेशवा’ हे नावाप्रमाणेच अस्सल मराठी संस्कृतीचं, परंपरेचं प्रतीक आहे. मराठी राज्याचं पेशवेकालीन वातावरण, मराठी संगीत आणि सणावाराला चांदीच्या ताटवाटीत बसणारी पंगत अमराठी लोकांनासुद्धा अतिशय भावते. इथे सर्वच सणवार मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात गुडीपाडव्यापासून दिवाळी पर्यंत सर्वच सण इथे पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. त्यामुळे परदेशात आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहणाऱ्या भारतीयांना ‘पेशवा’ मध्ये सणांचा आनंद घेता येतो. इतकेच नाही तर श्री सत्यनारायण पूजा, गणपती पूजा अशा सर्व पूजांच्या प्रसादाच्या ऑर्डर लोक अतिशय विश्वासाने देतात. महाशिवरात्रीला उपवासाची थाळी मिळते. इथे पूजेचा स्वयंपाक हा वेगळ्या भांड्यातून वेगळ्या जागेत होतो.

यूएईमध्ये राहून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठी माणसाला दरवर्षी पेशवातर्फे ‘पेशवा सन्मान पुरस्कार’ दिला जातो. भारतातून आलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

image


‘‘दुबईत म्युन्सिपालटीचे नियम अतिशय कडक आहेत. वारंवार अधिकारी येऊन तपासणी करतात. इथे व्हेज-नॉनव्हेज बनवण्यासाठी काउंटर्स वेगळे असतात, शाकाहारी पदार्थाना वेगळे आणि मांसाहारीला वेगळे, तर माशांसाठी आणखी वेगळे. भांडी, सुऱ्या, काटे, चमचे, इतकेच काय पण बेसिनसुद्धा वेगळी असतात. किचनमधील सर्व टाइल्स चांगल्या असल्या तरी दोन वर्षांनी बदलाव्या लागतात. ड्रेनेज सिस्टीम, गार्बेज व्यवस्था याबाबतीत अतिशय कडक नियम आहेत. हे नियम पाळावेच लागतात नाहीतर खूप मोठा दंड बसतो किंवा रेस्टॉरंट बंद सुद्धा ठेवावं लागतं.’’

‘पेशवा’ रेस्टॉरन्ट अतिशय आता उत्तमप्रकारे सुरु आहे. दिवसेंदिवस ग्राहकांच्या संख्येमध्ये भरच होते आहे. ‘पेशवा’ला मिळणारा प्रतिसाद पाहून शारजामध्येही त्याची दुसरी शाखा उघडली आहे. रेस्टॉरन्ट व्यतिरिक्त आणखी काहीतरी करावं असा विचार मनात घोळत असताना एक छानसा योग जुळून आला आणि आम्ही ‘निवांत’ या नावाने ‘स्पा’ सुरू केला.’’ श्रीया सांगतात.

image


‘‘जनरल ट्रेडिंगचं लायसन्सही मिळाल्यामुळे आम्ही ट्रेडिंगही सुरू केलं आहे. आफ्रिका व इराणला भारतीय मसाले, इतर पदार्थ निर्यात करतो. दुबईतच किराण्याचं दुकानही सुरू केलं आहे. हे सर्व नवीन व्यवसाय नव्यानेच सुरु केले आहेत. समोरून चालून आलेल्या संधीचा फायदा घ्यायचा, भरपूर मेहनत करायची आणि सातत्याने काम करत राहायचं हेच आमच्या पती-पत्नीच्या यशस्वी जीवनाचं सूत्र आहे ’’ श्रीया सांगतात.

२०१३ मध्ये ‘गल्फ मराठी बिझनेस फोरम’ने श्रीया यांना पुरस्कार देऊन गौरविलं. श्रीया अभिमानाने सांगतात की, “पेशवा’ रेस्टॉरन्टचं श्रेय हे माझा नवरा सचिन आणि माझं एकत्रित आहे, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याने मला जी साथ दिली त्यामुळेच मी हा पल्ला गाठू शकले”. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा. 

    Share on
    close