गरिबीवर मात करीत विणले यशाचे जाळे...

0

आपल्या मनात इच्छा असेल तर कठीणातल्या कठीण परिस्थितीवर आपण मात करीत यशाचा डोंगर मोठ्या धाडसाने चढू शकतो हे आपण फक्त कोणत्याही फलकावर लिहिलेल्या सुविचार स्वरूपात पाहिले असेल किंवा एखाद्या विचारवंताच्या मार्गदर्शनामध्ये ऐकले असेल, परंतू याची प्रचिती नवी मुंबईतील पनवेल येथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. अतिशय हालाखीच्या परिस्थितीत राहून वेळोवेळी आर्थिक परिस्थितीशी सामना करीत पनवेलमधील अश्‍विनी म्हात्रे या तरूणीने भुगोल विषयात सखोल अभ्यास करून ९०.८३ टक्के गुण प्राप्त करून मुंबई विद्यापीठावर पनवेल शहराचा झेंडा फडकविला आहे.

बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करीत, आई वडीलांचा आधार, सहवास हरवलेल्या वाकडी गावातील अश्‍विनी म्हात्रे हीने खस्ता खात आणि हालापेष्टा सोसत आपली शैक्षणिक वाटचाल उज्ज्वल केली आहे. घरात अठराविश्‍वे दारिद्य्र....लहानपणापासूनच वडिलांचा महिन्याचा पगार आला की त्याचे नियोजन करून घरखर्च करताना तिने आपल्या आईला पाहूनच ती या गावात लहानाची मोठी झाली. त्यामुळे परिस्थितीची तिला लहानपणापासूनच जाणीव होती. अशी गरिबीची श्रीमंती असलेल्या कुटुंबातील अश्‍विनी या तरुणीने जणू आकाशाला गवसणी घालात शिक्षणाची प्रखर ज्योत पेटविली. तिने चौथी पर्यंतचे शिक्षण पनवेल तालुक्यातील वाकडी येथील प्राथमिक शाळेत घेतले. त्यानंतर पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण पनवेल येथील शांतिवन आश्रमशाळेत घेतले. आपल्या गावातील आजुबाजुच्या मुली-मुले मोठ-मोठ्या वेगवेगळे युनिफॉर्म घालून खाजगी शाळेत शिकण्यासाठी जाताना, चांगल्या-चांगल्या कार्टून्सचे चित्र असलेले दप्तर हे सर्व तिच्या आजूबाजूला नजरेसमोर येतच होते. परंतू तिने या सर्व गोष्टींची कधी आस धरली नाही. जेथे इच्छाशक्ती असते तेथे संधी आपोआप मिळत असते. त्यासाठी मग कितीही मोठे अडथळे वा मर्यादा आल्या तरी यश मिळते, हा विचार तिच्या मनात ठसून भरला होता. म्हणूनच तिने तिच्या शिक्षणाची वाटचाल अगदी वेगाने सुरू केली. कुठेही खाजगी क्लासेस लावण्याची तिची कौटूंबिक परिस्थितीही नव्हती. शाळेतून घरी ती जे काही स्वतः अभ्यास करेल तेवढंच काय ते...त्यातही अभ्यास करण्यासाठी घरात कुठेही विशेष खोली नाही...अभ्यासासाठी लागणारी पुस्तके खरेदी करून घेतली नाहीत. म्हणूनच आपण स्वतः शिक्षण घेऊन ही परिस्थिती बदलायची हे जणू तिने मनात लहानपणापासूनच ठरवले होते. तिचे ध्येय आणि तिची जिद्दच तिच्या या यशामागचे कारण ठरले आहे. काही दिवसांत तिच्या या वाटचालीत अनेक अडथळे आले. शिक्षण घेत असतानाच अश्‍विनीच्या वडिलांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाल्याने तिच्या डोक्यावर कायम असलेला वडिलांचा आशिर्वादाचा हात निर्जीव झाला. या घटनेमुळे ती थोडी खचली...पण या प्रसंगाने आपले ध्येय ती विसरली नाही. वडिलांचे छत्र हरविल्याने घरचा आर्थिक कारभार बिघडला. घर चालविण्यासाठी तिची आई अनेक कामे करून पै पै जमा करून आपला फाटका संसार चालवू लागली. हे सर्व पाहून अश्‍विनीचे ध्येय आणखी बळकट होऊ लागले. केवळ पैशाअभावी दोन वेळचे जेवण करण्यासाठी आपल्या आईला बाहेर जाऊन कामे करावी लागतात, हे तिला सहन नाही झाले आणि मग ती अभ्यासासोबतच बाहेर छोटे मोठी कामे करून घराच्या खर्चाला आर्थिक हातभार लावण्यास सुरवात केली. यात तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही याची तिने दक्षता घेतली. नजरेसमोर पैसा आला तरीही तिची शिक्षणाची आस काही कमी झाली नाही. अशा वातावरणातही अश्‍विनीची आई सतत तू शिक, मोठी हो, गरिबीत राहू नकोस, अशी प्रेरणा देत असे. आईने काबाड कष्ट करीत तिला पुढील शिक्षणासाठी कॉलेज मध्ये पाठविले. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी बी.ए. मधून तिने भूगोल विषय घेतला. परंतू शिक्षणाच्या शेवटच्या वर्षीच तिच्या आईने शेवटचा श्‍वास घेतला आणि ती आणि तिच्या बहिणीला पोरके केले. कुटूूंबात आता ती आणि तिच्या बहिणीशिवाय दुसरे कोणीच नव्हते. त्या दोघा बहीणींचा आणखी धारदार काट्यांचा प्रवास सुरू झाला. आई-वडीलांचं मायेचं छत्र हरवल्याने पुढे काय? हा प्रश्न त्या दोघा बहिणींसमोर आ वासून उभा असतानाच तिला तिच्या थोरल्या बहिण व नातेवाईकांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धीरावर व अंगी असणारी चिकाटी, जिद्द व मेहनत तसेच आई वडीलांचा आशिर्वाद या बळावर तिने अखेर काटेमय प्रवास पूर्ण करून यशाचे डोंगर चढली व बी.ए.परिक्षेत भूगोल विषयात मुंबई विद्यापीठात प्रथम येण्याचा मान तिने पटकाविला. माझे यश पाहण्यासाठी माझे आई-वडील नाहीत, ही माझ्या दुष्टीने मोठी दुःखाची बाब असली तरी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी एम.पी.एस.सी. ची परिक्षा देणार आहे, असा विश्वास शेवटी अश्विनी बाळाराम म्हात्रे हिने व्यक्त केला. यावरून तिच्यातील आत्मविश्‍वास आणि कोणत्याही परिस्थितीला धाडसाने सामोरे जाण्याची तयारी दिसून येते. तसेच या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य एच.डी.जाधव, शिक्षक पाटील सर, शेळके मॅडम, घरत मॅडम, मुकादम सर, शिवाजी सर तसेच क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक व अध्यक्ष नामदेव फडके व संघाचे उपाध्यक्ष डी.के. भोपी यांचे आभार ती व्यक्त करते. यावेळी क्रांतिकारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष नामदेव फडके हे सांगतात की, आज आई-वडिलांची छत्र-छाया हरवली असतानाही अश्विनी म्हात्रे हीने शालेय जीवनात अभ्यासाची कास धरत आपल्या आई-वडिलांचे व कॉलेजचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिण्याचे काम केले. तिचा आदर्श इतर मुलांनी अंगीकारणे ही काळाची गरज असून अशा विद्यार्थीनींच्या पाठी क्रांतिकारी सेवा संघ निश्चित उभा राहील, असा विश्वास शेवटी नामदेव फडके यांनी व्यक्त केला. अश्विनी म्हात्रे हिच्या यशाबद्दल नामदेव फडके, डि.के.भोपी, आर.पी.आय. पनवेल अध्यक्ष प्रकाश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य दत्ता म्हात्रे, माजी सरपंच विनोद भोपी, उपसरपंच बाळू म्हात्रे नामदेव जमदाले यांनी तिचे अभिनंदन केले.

अक्षरश: तिने गरिबीशी झुंजत, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, गरीब राहू नका, उद्योग करा, प्रयत्न करा, यश मिळेलच, अशा आदर्श युवतींच्यासमोर निर्माण केला आहे.

जीवनात यश मिळविण्यासाठी माणसाने सतत धडपडणे गरजेचे आहे. जो माणूस जीवनात जेवढा मोठा संघर्ष करतो त्याला तेवढे मोठे यश मिळते.

Related Stories