डॉ. कोटणीस यांच्या निधनानंतर माओंनी पाठविलेल्या सुलेखित शोकसंदेशाचे लोकार्पण 

0

चीनमधील कम्युनिस्ट क्रांतीचे जनक आणि माजी अध्यक्ष माओ झेडाँग हे उत्तम सुलेखनकार होते, हे फार कमी लोकांना माहित आहे. त्यांच्या चीनबाहेर असलेल्या केवळ तीन सुलेखन शैलीतील पत्रांपैकी एक पत्र म्हणजे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना पाठवलेला शोकसंदेश. या वर्षी डॉ. कोटणीस यांच्या निधनास ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने चीनने अध्यक्ष माओ यांचा ऐतिहासिक शोकसंदेशाचे नव्याने जतन केले. भारत-चीन मैत्रीच्या या ऐतिहासिक दस्तावेजाचे लोकार्पण माझ्या हस्ते होत आहे, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे, अशा शब्दात चीनचे भारतातील राजदूत लाऊ झाओहुई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


९ डिसेंबर १९४२ रोजी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे अतिश्रमाने आणि आजारपणाने निधन झाले. त्यानंतर चीनचे अध्यक्ष माओ झेडाँग यांनी आपल्या सुलेखनाद्वारे (कॅलिग्राफी) आपल्या भावना त्यांच्या कुटुंबियांना पाठविल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यातील डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या जन्मस्थानी या शोकसंदेशाचे कायमस्वरूपी जतन करुन ठेवण्यात येणार आहे. या सुलेखित शोकसंदेशाचा लोकार्पण सोहळा, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन मुंबई, मुंबई विद्यापीठ आणि चीनचा मुंबईतील दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील विद्यानगरीत नव्याने बांधण्यात आलेल्या झी शियानलिन सेंटर फॉर इंडिया चायना स्टडीज् या वास्तूत हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला चीनचे भारतातील राजदूत लाऊ झाओहुई, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, सोलापूरच्या महापौर सुशिला आवुटे, महाराष्ट्राचे राजशिष्टाचार प्रमुख सुमित मलिक, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी, चीनचे मुंबईतील कॉन्सुल जनरल झेन झियुआन, डॉ. कोटणीस यांचे कुटुंबीय आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.


भारत आणि चीन या दोन देशांमध्ये परस्पर ‘मैत्री आणि सहकार्य करार’ व्हायला हवे आणि त्याद्वारे मुक्त व्यापाराला चालना मिळायला हवी. दोन देशांमध्ये असलेला सीमावाद हा लवकरात लवकर संपावा आणि भारत-चीन मैत्रीचे नवे पर्व सुरू व्हावे. चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये भारत सहभागी झाल्यास ते भारताच्या ‘अॅक्ट इस्ट’ हे धोरणालाच पुरकच असेल, असे मत लाऊ झाओहुई यांनी व्यक्त केले.

डॉ. द्वारकानाथ कोटणीस हे मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी. हा सोहळा आयोजित करून मुंबई विद्यापीठ आपल्याच एका गौरवशाली माजी विद्यार्थ्याचा उचित सन्मान करीत आहे. ही संधी आम्हाला मिळाली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या निमित्ताने भारत आणि चीन यांच्यात शैक्षणिक मैत्रीचा धागा विणला जावा, अशी भावना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केल्या.


जगातील अनेक मानवी संस्कृतींपैकी भारतीय आणि चीनी या दोनच संस्कृती अजूनही जिवंत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा मैत्रीचे नवे पर्व सुरू होणे ही आनंदाची बाब आहे आणि त्यादृष्टीने आजचा सोहळा निश्चितच अभिनंदनीय आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे राजशिष्टाचार प्रमुख सुमित मलिक यांनी या प्रयत्नांना दाद दिली.

आमच्याकडे असलेल्या चेअरमन माओ यांच्या मूळ हस्तलिखिताचे नव्याने जतन करण्याची गरज आम्ही चीनला दिलेल्या भेटीत चीनच्या सरकारकडे अधोरेखित केली होती. चीनने या विनंतीला मान देऊन हा सुलेखित शोकसंदेश नव्याने जतन करून दिला आहे, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, अशी कृतज्ञता सोलापूरच्या महापौर सुशिला आवुटे यांनी व्यक्त केली.

चीन आपल्या गरजेच्या वेळी उपयोगी पडलेल्या मित्रांना कधीही विसरत नाही. पिढ्यानुपिढ्या अशा मित्रांच्या कृतींच्या स्मृती जपल्या जातात. डॉ. कोटणीस यांना चीनने दिलेली मानवंदना आणि आजचा सुलेखित शोकसंदेश लोकार्पण सोहळा यांचे म्हणूनच महत्त्व आहे. या निमित्ताने या वास्तूतील एका सभागृहाला डॉ. द्वारकानाथ कोटणीस सभागृह असे नाव देऊन मुंबई विद्यापीठानेही आपल्या माजी विद्यार्थ्याचा गौरव करावा, असे आवाहन ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी केले.


मुंबई विद्यापीठात भारत-चीन अभ्यास केंद्र

रिलायन्स फाउंडेशन, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन मुंबई आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील विद्यानगरीत झी शियानलिन सेंटर फॉर इंडिया चायना स्टडीज् हे केंद्र उभारण्यात आले आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात पदवी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी येथे नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील, अशी घोषणा यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी केली.

डॉ. कोटणीस यांच्या निधनानंतर चीनचे तत्कालिन अध्यक्ष माओ झेडाँग यांनी स्वहस्ताक्षरात व्यक्त केलेल्या शोकभावना

“जपानच्या आक्रमणाविरोधातील चीनच्या लढाईमध्ये चिनी बांधवांना मदत करण्यासाठी डॉ. कोटणीस फार दूरून (देवदूतासारखे) धावून आले. चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यालय असणाऱ्या यानहान् येथे त्यांचा पाच वर्षे मुक्काम होता. या मुक्कामात त्यांनी असंख्य सैनिकांनी जीवदान दिले आणि अनेकांच्या वेदना कमी केल्या. त्यांच्या निधनाने चीनच्या लष्कराने आपला एक हात गमावला आहे आणि सारा देश एका लाडक्या मित्राला मुकला आहे. विश्वबंधुत्वाचे मूर्तिमंत रुप असलेल्या डॉ. कोटणीस यांना आम्ही कधीही विसरू शकणार नाही.”