...आता चहावाल्या पंतप्रधानांच्या देशातील ही चहावाली ठरली ‘बिझनेस वुमन ऑफ दी इयर’

0

सध्या देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संघर्षांच्या दिवसांत कधीकाळी चहा विकला होता याचा आपणा भारतीयांना केवढा गौरव आहे. साधारणपणे आपल्याकडे चहाची टपरी चालविणे फारसे प्रतिष्ठेचे समजले जात नव्हते मात्र मोदी यांच्या यशानंतर त्याकडे गौरवाने पाहिले जावू लागले आहे. त्यामुळेच की काय गेल्या काही दिवसांपासून हेच ‘चहावाले’ आता प्रसिध्द होऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी चहावाला अर्शद खान हे चहावाले आपल्या निळ्या डोळ्यांमुळे समूह माध्यमात धुमाकूळ घालत चर्चेत राहिले होते. एका छायाचित्रात त्यांची ‘पोस्ट’ झळकल्यानंतर अर्शद रातोरात जगभर पोहोचले होते. नशिबाचे दार उघडले म्हणतात त्या प्रमाणे त्यांना मॉडेलिंगच्या ऑफर देखील आल्या आणि अचानक त्याचे भाग्य उघडले. ते लाखो रुपयांचा मालक झाले.

हे सांगायचे कारण आता भारतातील एक चहावालीसुद्धा सातासमुद्रापार तिच्या चहा विकण्याच्या कर्तृत्वातून गौरवली जात आहे. उप्पमा विरदी असं त्यांचं नाव असून ‘इंडियन ऑस्ट्रेलियन बिझनेस कम्युनिटी अवॉर्डस्‌ने त्यांना बिझनेस वुमन ऑफ द इयर २०१६’ या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात सिडनीतील एका शानदार कार्यक्रमात २६ वर्षीय उप्पमा यांना गौरविल्यानंतर सर्वांनीच त्यांच्या या यशाचा अभिमान बाळगत कौतुक केले आहे.

एका संस्थेमध्ये नामांकित वकील म्हणून काम करत असताना चहा, त्याची चव आणि त्याच्या प्रकारांविषयीची आवड त्यांना पुन्हा पुन्हा खुणावत होती. आजोबांकडुन आयुर्वेदाविषयी ज्ञान मिऴाल्यानंतर त्यांनी या विषयात अधिक काही करण्याचे विचार सुरु केले आणि या आवडीचेच रुपांतर भागीदारी व्यवसाय सुरु करण्यात झाले. त्यांच्या आवडीतूनच त्यांना जागतिक पातळीवर मोठा सन्मान मिळवून दिला आहे.

सुरुवातील उपम्मा यांनी स्पेशल चहापावडर मित्र-मंडळींमध्ये आणि कुटुंबियांना वापरण्यासाठी देऊन त्यांचा अभिप्राय घेतला. त्यांच्याकडुन आवडल्याची पावती मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक दुकानात विक्रीसाठी ती चहा पावडर दिली. तिथेही त्याला चांगली मागण आली मग त्यांच्या व्यापाराला अधिक चालना मिळावी म्हणून त्यांनी ऑनलाईन विक्री सुरू केली मग मात्र त्याला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यांची आवड, कर्तव्यपरायणता आणि चहाबाबतच्या विविध संशोधनामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

समुह संपर्क माध्यमात निळ्या डोळ्यांचा चहावाला तरुणांनी ज्या वेगाने व्हायरल झाला त्यापेक्षा जास्त कौतुक आता उप्पमा यांचे देखील व्हायला हवे. एक भारतीय सुकन्या तरुणवयात छंदातून व्यावसायिक यश मिळवताना चहा विकण्याच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून देते म्हणून आपण त्यांचा सन्मान करायलाच हवा नाही का? कारण त्यांच्या या संघर्षकथेतून अनेकांना प्रेरणा मिळणार आहे आणि नवीन क्षेत्रात नव्या भारतीय मुली-मुले देखील सर्वोत्तम कामगिरी करून देशाच्या गौरवात भर घालू शकतील नाही का?