आता लठ्ठपणाची लाज नको... बना 'प्लस साईज मॉडेल' आणि व्हा मालामाल... 

0

लठ्ठपणा हा अनेकांच्या चिंतेचा विषय असतो, खास करुन महिलांचा. लहानपणापासून लठ्ठ असण्याबद्दल एकतर टोमणे ऐकलेले असतात किंवा मस्करीचं कारण बनलेले असतात. यामुळे नेहमीच लठ्ठ असण्याबद्दल त्या व्यक्तीमध्ये  न्युनगंडाची भावना निर्माण होते.  यातूनच मग सामाजिक कार्यक्रमात न जाणं, वारंवार जिम सुरु करणं आणि काही दिवसांनी सोडणं, असं सगळं सुरु होतं. मात्र हा लठ्ठपणाच तुम्हाला मॉडेल बनवू शकतो याची कल्पना तुम्ही करू शकाल का ? थोडसं विचित्र वाटेल ऐकायला पण तुमचा लठ्ठपणाच  आता तुम्हाला मॉडेल बनण्याची संधी देत आहे. 'रेडियन्स व्हीजन' या मुंबईतल्या अग्रगण्य मॉडेल एजन्सीचे संस्थापक शशांक शर्मा यांचं म्हणणं आहे की या क्षेत्रात लठ्ठ मॉडेल्सची संख्या फार कमी आहे. यामुळे लठ्ठ असणं हे अनेकांसाठी वरदान ठरतंय. आमची मॉडेलिंग एजन्सी असे मॉडेल्स पुरवणारी मुंबईतली अग्रणी एजन्सी आहे. 

गेल्या काही वर्षांपासून मॉडेलिंगच्या क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. हे क्षेत्र नेहमीच बदलत जातं. पूर्वी मॉडेलिंग म्हणजे देखणं रूप आणि उत्तम 'फिगर'  असं समीकरण जुळलेलं होतं. पण गेल्या काही वर्षांमध्ये 'साईज प्लस गार्मेन्ट' ब्रान्डची संख्या वाढली आहे. याचं महत्त्वाचं कारण एकूण लोकसंख्येत लठ्ठ व्यक्तींची वाढलेली संख्या.  जर मग लठ्ठ व्यक्तींची संख्या वाढतेय, मग त्यांच्यासाठी फॅशन शो का मागे राहतील, यासाठी खास साईज प्लस ब्रान्डही मोठे झाले. त्यांनी आपले एस्क्लुझिव ब्युटीक सुरु केले. इथं खास साईज प्लस लोकांसाठी कपडे ठेवण्यात आले. आता याची मागणी वाढली म्हणजे फॅशनच्या नियमानुसार त्यांचं प्रमोशन आलंच, मग शोध सुरु झाला साईज प्लस मॉडेल्सचा. शशांक सांगतात, “ आम्हाला अनेक ब्रान्ड कडून साईज प्लससाठी विचारणा व्हायला लागली, त्याची खास अशी मागणी असायची, आमच्यासाठी हे नवीन होतं. आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून या साईज प्लस मॉडेल्सचा शोध घ्यायला सुरुवात केली. अगदी फेसबुकवर वारंवार त्यासाठी प्रमोशन केलं. अऩेकदा विचारणा करणारे कॉल्स आले पण त्यानंतर काहीच घडलं नाही. काही काळ गेला. त्यानंतर मात्र एक एक करत आमच्या वेबसाईटवर तब्बल चाळीसहून अधिक साईज प्लस मॉडेल्सनी नोंदणी केली. आता मुंबई आणि देशातल्या प्रमुख साईज प्लस ब्रान्डसाठी आम्ही मॉडेल्स पुरवतो. अशा मॉडेल्सची  मोठी संख्या असलेली आमची ही एकमेव मॉडेलिंग एजन्सी असावी असं आम्हाला वाटतं.” 

अनेकांना आपल्या लठ्ठपणाबद्दल कमालीचा न्युनगंड असतो. आपण लठ्ठ आहोत म्हणून आपल्याला कधीच काहीही चांगलं करण्याची संधी मिळणार नाही असा न्युनगंड लहानपणापासून निर्माण झालेला असतो. मित्र मैत्रिणींमध्ये नेहमीच लठ्ठ असल्याबद्दल हसण्याचा विषय ठरत असल्याने तो  वाढत जातो. 

पण शशांक सांगतात, ” हा लठ्ठपणा तुम्हाला लक्षावधी बनवू शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे. मुंबईत साईज प्लस ब्रान्डची संख्या वाढतेय. हे फक्त मुंबई किंवा मेंट्रो शहरांमध्येच घडतंय असं नाही, तर छोट्या शहरांमध्येही साईज प्लस स्टोअर दिसू लागली आहेत. यामुळे या सर्व ब्रान्ड्सला मॉडेल्स हवे आहेत त्यामुळे साईज प्लस मॉडेल्सची मागणी वाढू लागली आहे. आता सध्या आम्हाला दिवसाला एखाद्या तरी साईज प्लस मॉडेलसाठी विचारणा होतेच.”

परदेशात साईज प्लस ब्रान्ड चांगलेच प्रचलित आहेत. भारतात साईज प्लसचा ट्रेन्ड गेल्या दहा वर्षापासून विकसित झाला.  रेडीमेड क्षेत्रात साईज प्लसला कधीच विचारात घेतलं जात नव्हतं. पण गेल्या दहा वर्षात ही मानसिकता बदलली. काही वर्षांपूर्वी तुम्ही लठ्ठ असाल तर तुमच्या समोर एकच पर्यांय असायचा तो म्हणजे शिंप्याकडे जायचं आणि रितसर माप देऊन कपडे शिवायचे. त्यात फॅशनचा अभाव होता, व्हरायटीचा अभाव होता, तडजोड करावी लागत होती. “पण आता भारतात साईज प्लस लोकांच्या फॅशनकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. ही फार महत्त्वाची बाब आहे. आमच्या मॉड़ेलिंग एजन्सीला या बदलेल्या साईज प्लस ट्रेन्डचा चांगलाच फायदा झाला आहे. आमच्याकडे या ब्रान्डसाठी मॉडेल पुरवणे अनेकदा कठिण जाते. यामुळे मॉडेलिंग एजन्सी म्हणून आम्ही साईज प्लसला एक चांगला मॉडेलिंग पर्याय म्हणून पाहत आहोत.” शशांक शर्मा सांगत होते.    

रोज घालायच्या कपड्यांपासून ते साईज प्लस अंडर गार्मेंन्टपर्यंत फॅशनची एक नवी दुनिया साईज प्लससाठी खुली झाली आहे.