अनाथांसाठी आपले आयुष्य लावले पणाला----- ‘परिवार आश्रम’चे विनायक लोहाणी.

0

निराधार आणि गरीब मुलांना मदत करणारे तर तुम्हाला खूप जण सापडतील, परंतू एखादा माणूस आपले सारे जीवन अशा मुलांच्या भवितव्यासाठी समर्पित करतो, ही खूपच मोठी गोष्ट आहे. कोलकाताच्या विनायक लोहाणी यांनी त्याबाबत नवा आदर्श ठेवला आहे.

मानवसेवेत समर्पित विनायक यांच्या जीवनात अनेक चढाव-उतार आले, मात्र आपल्या ध्येयावर त्यांची निष्ठा अशी पक्की राहिली जसे अर्जूनाची माशाच्या डोळ्यावर! एका आयएएस वडिलांचा मुलगा असणा-या विनायक यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण भोपाळ येथे झाले. ते बालवयातच खूप मेधावी राहिल्याने उच्च शिक्षणासाठी त्यांना आयआयटी खरग़पूर येथे प्रवेश मिळाला, त्यांनतर आयआयएम कोलकातामधून पुढील शिक्षण पूर्ण केले.

विनायक यांनी आयटी कंपनी इंफोसिस सोबत सुमारे वर्षभर काम केले. मात्र तेथील चकचकीत वातावरणाचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळेच नोकरी संकटात टाकून त्यांनी आपली स्वप्न पूर्ण करण्यास प्राधान्य दिले. ते स्वप्न होते निराधार मुलांना त्यांच्या जीवनात शिक्षणरुपी प्रकाश देण्याचे!

परिवार आश्रम च्या मुलाची स्वप्न
परिवार आश्रम च्या मुलाची स्वप्न

खरेतर विनायक यांच्याजवळ अशा प्रकारचे काम करणा-या सेवाभावी संस्था चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता मात्र दृढनिश्चयाने त्यांना त्यात काही करता आले. त्यासाठी त्यांनी खूप श्रम घेतले. खरेतर शिक्षण सुरू असतानाच त्यांनी काही सेवाभावी संस्थाच्या लोकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या, त्यातून योग्य तो अनुभव मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आपली सेवाभावी संस्था ‘परिवार आश्रम’ सुरू करण्याआधी त्यांनी उत्तरप्रदेशातील एक दलितवस्तीचे गांव, मध्यप्रदेशातील एक ग्रामीण संस्था आणि कोलकाता येथील मदर टेरेसा मिशनरी ऑफ चँरिटीमध्ये चांगला वेळ दिला होता. हे अनुभव त्यांच्यासाठी मोलाचे होते.

विनायक गावागावात जावून सामान्यांसाठी काम करणा-या महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, आणि विनोबा भावे यांच्यामुळे प्रभावित झाले होते. कोलकाता येथील वेश्याव्यवसायातील महिलांच्या मुलांसाठी एक लहान ‘होम’ चालवणा-या पाद्री ब्रदर झेवियर यांचाही त्यांच्यावर प्रभाव राहिला होता. मात्र त्यांच्यासमोर असे होम चालवण्यासाठी पैसा उभा करण्याचे आव्हान होतेच. त्यासाठी त्यांनी अनेकांची भेट घेतली, परंतू त्यांचा मार्ग सोपा नव्हता. पैसा उभारणे कठीण झाले होते मात्र विनायक यांनी हार मानली नाही, त्यांनी झोकून देऊन प्रयत्न चालूच ठेवले होते. सुरुवातीला त्यांनी काही मुलांसाठी एक जागा भाड्याने घेतली होती, आणि काम सुरू केले. मग अचानकपणाने त्यांच्या प्रयत्नाला यश येत गेले आणि इथून-तिथून पैसा येऊ लागला. लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे मंदी असतानाही हा पैसा येत राहिला. त्यानंतर त्यात वाढ होत गेली.

त्या पैश्यांच्या बळावर विनायक यांनी पश्चिम बंगाल मध्ये ‘परिवार आश्रम’ सुरु केला. जेथे आज अनाथ, आदिवासी, तसेच वेश्याव्यवसायातील महिलांच्या मुलांना आश्रय दिला जातो. या मुलांसाठी ‘परिवार आश्रम’ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही कारण या ठिकाणी या मुलांना जीवनाची ती स्वप्न बघता येतात आणि पूर्ण करता येतात, जी पाहण्याची कल्पनाही त्याना करता आली नसती. त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा ध्यास आश्रमाने घेतला आहे.

या ठिकाणी सध्या पाचशेपेक्षा जास्त मुले आहेत. येथे मुला-मुलींसाठी हॉस्टेल, ग्रंथालय, खेळांचा कक्ष, टिवी कक्ष आणि क्रिकेटचे मैदानही आहे. या मैदानाची देखभाल एकेकाळी इडन गार्डनची देखभाल करणारे क्यूरेटर करतात. जी मुले आश्रमाशी सुरूवाती पासून जोडली गेली आहेत, ती प्रथम जवळच्या शाळेत जावून शिकत होती. मात्र आता आश्रमातच अमर विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे. आश्रम एखाद्या कुटूंबा सारखा आहे. मुलांना पुस्तकी शिक्षणाशिवाय, पार्क, प्राणीसंग्रहालय आणि गँलरीज मधून फिरवले जाते. त्यातून त्यांना बाहेरच्या जगाची ओळख होते. म्हणजेच त्यांच्या सर्वांगिण विकासावर लक्ष दिले जाते. त्यामुळे ती सामान्य मुलांच्या तुलनेत मागे पडत नाहीत.

एखादी संस्था दिवस-रात्र चालविणे सोपे काम नाही. विनायक यांच्याकडे असे समर्पित सहकारी आहेत, जे त्यांच्या पावलाबरहुकूम चालतात. त्यांच्या संस्थेत शहरी लोकांव्यतिरिक्त, खेड्यातील लोक, अर्धवट शिक्षण सोडणारी मुले, आणि वृध्द देखील येत असतात. येथे काम करणा-यांना विनायक ‘सेवाव्रती’ म्हणतात. ज्याचा अर्थ आहे, अशी माणसे ज्यांनी सेवा हेच जीवन समजले आहे. आज ‘परिवार आश्रमा’त असे ३५ पूर्णवेळ ‘सेवाव्रती’ आहेत, जे या मुलांच्या भवितव्यासाठी झटत आहेत.

विनायक अविवाहित आहेत, आणि जीवन त्यांनी याच कार्याला समर्पित केले आहे. ते हे मिशन असल्याचे मानतात. कुणीतरी म्हटले आहेच की, “दुस-यांच्या कामी या, इतरांना मदत करा, जर हे करू शकला, तर जीवन हीच पुजा होऊन जाईल” जीवनाकडे बघण्याचा विनायक लोहाणी यांचा दृष्टीकोन काहीसा असाच आहे.


लेखक : आशुतोष खंतवाल.

अनुवाद : किशोर आपटे.