भारतच जगात शांती व एकता प्रस्थापित करेल... 

0

 “आज जगात मानवता हा एक शब्द असा आहे, ज्याचा अर्थ व्यापक आहे. हीच मानवता आज कमी झाल्याने प्रत्येक देश अडचणींना तोंड देत आहे. या पार्श्‍वभूमीवर विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन संपूर्ण देशासाठी आदर्श असेल.” असे उद्गार महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे प्रमुख स्वामी आचार्य गोविंद गिरीजी महाराज यांनी काढले. विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या 69 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘आंतरधर्मीय समन्वय’ या विषयावर राष्ट्रीय गोलमेज परिषदेच्या उद्घाटन आणि प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवना’च्या प्रस्तावित एकमेवाद्वितीय प्रतिकृतीच्या लोकार्पण सोहळ्याच्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, माजी केंद्रीय मंत्री डॉ. अरिफ महंमद खान, ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेद प्रताप वैदिक, रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य आणि माजी खासदार डॉ. राम विलास वेदांती, सुप्रसिध्द मुस्लिम विचारवंत सय्यद कल्बे रशीद रिझवी, माजी सनदी अधिकारी, शिक्षणतज्ञ अविनाश धर्माधिकारी, अखेरचे मुघल बादशहा बहादूर शहा जफर यांचे पणतू  नवाब शाह मोहम्मद शोएब खान, मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक  मुकेश शर्मा, भारतरत्न अबुल कलम आझाद यांचे वंशज आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते  फिरोज बख्त अहमद, पंडित वसंत गाडगीळ, इस्लामचे गाढे अभ्यासक  अनीस चिस्ती, प्रा. रतनलाल सोनग्रा, झोरास्ट्रियन कॉलेजच्या अध्यक्षा डॉ. मेहेर मास्टर मूस व मौलाना वहिदुल्ला खान-अन्सारी-चतुर्वेदी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.


यावेळी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटीचे सचिव व कार्यकारी संचालक प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, माईरचे विश्‍वस्त डॉ. चंद्रकांत पांडव, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे व विश्‍वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये हे उपस्थित होते.

आचार्य गोविंद गिरी महाराज म्हणाले, “आज आपण माणूस असूनही मानवता भाव विसरत चाललो आहोत. या स्थितीत मानवतेचे स्वप्न बघणाराच या समाजाला, देशाला पुढे घेऊन जाईल. विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवनाच्या माध्यमातून निश्‍चितपणे आपण त्या दिशेने पुढे जाऊ, तसेच, भव्यता, दिव्यता, उदारता आणि विचारांनीच हे शक्य होईल. लोकशाहीमधील या देशाचा राजा असणारा नागरिकच हे स्वप्न साकार करू शकतो. हे मंदिर येथे साकार होईल की नाही हे फक्त जनतेच्याच हातात आहे. ”

डॉ. विजय भटकर म्हणाले, “आज शिक्षकांनीच आपल्या विद्यार्थ्यांना मानवतेचा संदेश देणे गरजेचे आहे. सत्य हाच धर्म आहे. प्रत्येक समस्येचे समाधान असतेच. आज येथे बनवलेले मानवतेचे प्रतीकात्मक मॉडेल एकतेचे प्रतीक आहे. अनेक वर्षांपासून सुरू असणार्‍या अयोध्येतील वादंगाच्या पार्श्‍वभूमीवर विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन समाधानकारक उपाय आहे. . ”

प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “वादग्रस्त जागेवर विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवनाचे निर्माण केले जावे . या ठिकाणी हिंदू, मुस्लिम, ईसाइ, बौध्द, जैन, शीख, झोरास्ट्रियन, ज्यू आदी सर्व धर्मांचे उपासक येथे पूजा-प्रार्थना करू शकतील. विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन हे विश्‍वाला मानवतेचा संदेश देईल. मानवता, सहिष्णुता विश्‍वकल्याणाचा विचार जगापर्यंत पोहोचविण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. या भवनाच्या निर्मितीसाठी अनेक राजकीय नेत्यांना प्रस्ताव पाठविले आहेत. श्रीराम पुरुषोत्तम होते त्यामुळे या भवनास विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन हे नाव दिले गेले. ”

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, “2016चे वर्णन एकाच शब्दात करता येईल तो म्हणजे फुटिरतावाद. ब्रेक्झीट, सिरियातील संघर्ष, युरोपवरील हल्ले या घटना फुटिरतावादी विचारावरच घडल्या आहेत. हे प्रस्तावित भवन मानवता आणि एकतेचे प्रतीक म्हणून विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन आहे. या घडीला आपण देशधर्मी नसून विश्‍वधर्मी असायला हवे. या वाढच्या राष्ट्रवादाच्या वातावरणामध्ये वैश्‍विक विचारांचा अंगीकार करावयास हवा. जगातील सर्व धर्म हे समांतर मार्गाने चालत आहेत. परंतू ते कोठेच एकत्र येताना दिसत नाही. या मानवता भवनाच्या माध्यमातून हे स्वप्न सत्यात येऊ शकेल. ”

डॉ. अरिफ महंमद खान म्हणाले, “मुस्लिम हे नाव एका समुदायाचे असले तरी कुराण हे नाव प्रत्येक धर्मात आस्था असलेल्या व्यक्तीसाठी आहे. धर्माचा अर्थ ठराविक समूदाय असा होत नाही. आपण अध्यात्मावर विश्‍वास ठेवतो. आपण लोकांना सहन करण्याऐवजी त्यांचा स्वीकार व आदर करा. ”

डॉ. रामविलास वेदांती म्हणाले, “विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन अयोध्या येथे उभारण्यात आल्यानंतर जगाला कळेल, की कोणताही दहशतवाद मानवतेला संपवू शकत नाही. या पध्दतीचे मॉडेल प्रत्येक देशात असणे गरजेचे आहे. असे झाले तर संपूर्ण जगातूनच दहशतवाद नष्ट होईल.” डॉ. अविनाश धर्माधिकारी म्हणाले, “या विषयाची चर्चा झाली पाहिजे. प्रत्येक मंदिर हे शिक्षणाचे केंद्र बनले पाहिजे. जेव्हा हे विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन बनेल, तेव्हा तेथे एक विश्‍वविद्यालय होईल. ”

सय्यद मौलाना कल्बे रिझवी म्हणाले, “देवाने सांगितले की, मानवा, या जगातील सर्व गोष्टी म्हणजे जमीन, पाणी वगैरे तुझ्यासाठी आहे आणि तू माझ्यासाठी आहेस. जगात मानवता निर्माण व्हावयाची असेल तर तू प्रथम खरा माणूस हो. मानव बनण्याची ही प्रक्रिया या विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवनाच्या माध्यमातून निश्‍चितपणे पूर्ण होईल.”

वेदप्रताप वेदिक म्हणाले, “शक्तीच्या जोरावर नव्हे तर प्रेमाच्या जोरावरच हे स्वप्न साकार होईल. अनेकांनी मंदिर, मस्जिद तसेच अनेक धार्मिक स्थळे उध्वस्त केली. पण डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्या उदात्त विचारधारेतून एकतेचे मंदिर असणारे हे विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन निर्माण होणार आहे.”

डॉ. अनीस चिस्ती, फिरोज बख्त अहमद, नबाब शाह मोहम्मद शोएब खान, महंत रामदासजी, श्रीमती शमिना खान, श्रीमती मेहेर मास्टर मूस, पंडित वसंतराव गाडगीळ, मौलाना मोहम्मद वहिदुल्ला खान - अन्सारी चतुर्वेदी, अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल बहारी मल्होत्रा, सिराज कुरेशी, राधिकानंद सरस्वती, श्रीमती आफताब, प्रा.रतनलाल सोनग्रा यांनीही अयोध्या येथे विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन उभारल्यामुळे सर्व जातीधर्मांमध्ये सलोखा, बंधुभाव आणि शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल असा सूर आंतरधर्मीय समन्वय या राष्ट्रीय गोलमेज परिषदेत व्यक्त केला.