'मेक इन इंडिया' देशाच्या औद्योगिक विकासाची संधी ‘अभि नही तो कभी नही’ : मेक इन इंडियाच्या भव्य शुभारंभात पंतप्रधानांचे आवाहन

'मेक इन इंडिया'  देशाच्या औद्योगिक विकासाची संधी ‘अभि नही तो कभी नही’ : मेक इन इंडियाच्या भव्य शुभारंभात पंतप्रधानांचे आवाहन

Saturday February 13, 2016,

3 min Read

भारतात गुंतवणूक कऱण्याची आजच्या इतकी उत्तम संधी कधीही नव्हती अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील उद्योजकांना मेक इन इंडिया कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की गेल्या वर्षभरात आम्ही गुंतवणूकी मधील सारे प्रशासकीय अडथळे व अडचणी दूर केलेल्या आहेत. आता कोणालाही निर्धोकपणाने भारतात येऊन उद्योग करता येईल. इथली न्यायव्यवस्था ही स्वतंत्र असून काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली आहे. आम्ही कधीही पूर्वलक्षी प्रभावाने कर लावणार नाही असे मी पुन्हा एकदा जाहीर करतो. आमची कर प्रणाली ही पारदर्शक, निश्चित आणि स्थिर राहील असेही आश्वासन पंतप्रधानांनी दिले. येथील सरदार वल्लभभाई स्टेडिअमवर मेक इन इंडिया सप्ताहाचे अधिकृतरीत्या समारंभपूर्व उद्घाटन करताना ते बोलत होते. 

यावेळी ६५ देशातील उच्चाधिकारी व्यवसाय उद्योग शिष्टमंडळे , भारतातील सर्व प्रमुख उद्योजक तसेच मेक इन इंडियात सहभागी झालेल्या १७ राज्याचे अनेक प्रतिनिधी, मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी अत्यंत शानदार आणि आधुनिक तंत्राचे लेझर, फिल्म तंत्राचा पुरेपूर वापर करणारा डोळे दिवपून टाकणारा सोहळा अनुभवता आला. विविध राज्यांतील संगीत व नृत्याचा वापर या सादरीकरणात करण्यात आला होता. नाचणाऱ्या कलावंतांबरोबरच पडद्यावर सरकणारी अद्भुत दृष्ये भारताची व्यावसायिक भौतिक प्रगती जगासमोर मांडत होती.


image


पंतप्रधान म्हणाले की गेल्या सप्टेंबर २०१४ मध्ये आम्ही मेक इन इंडिया अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर येथे उद्योग येण्यातील सर्व अडथळे दूर केले आणखीही त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत भारत सरकारने आपला दृष्टीकोन बदलल्याबरोबर राज्य सरकारांनीही तशीच कृती करीत व्यवसायासाठी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केले. आता २०१५ मध्ये भारताने जागतिक अर्थकारणातही मोठी प्रगती केलेली आहे. देशाचा जागतिक उत्पादन क्षेत्रातील वाटा आम्ही सत्तेत आलो तेंव्हा फक्त १.७ ट्केक होता. गतवर्षी तो १.२ टक्के झाला आहे.२०२० पर्यंत आपाल्या देशाच्या सकल उत्पन्नात निर्मिती क्षेत्राचा वाटा २५ ट्क्क्या पर्यंत वाढवायचा आहे. जगातील सर्व प्रमुख आर्थिक पाहणी संस्थांनी गेल्या वर्षातील भारताच्या प्रगतीच्या झेपेची नोंद घेतली आहे. जगभर थेट परकीय गुंतवणूक कमी होत होती मात्र भारतात ४८ टक्के गुंतवणुकीत वाढ झालेली आहे. गतवर्षी आजवरची सर्वाधिक वीज उत्पादन भारताने साध्य केले आहे तर कोळशाचे उत्पादनही आजवरचे सर्वाधिक झालेले आहे असेही पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले. रस्ते, रेल्वे व बंदर विभागात भारत फार मोठी गुंतवणूक करीत असून करमुक्त रोखे त्यासाठी काढले जात आहेत. भारतात खूप मोठ्या संधी असून त्याचा लाभ घ्या असेही आवाहन त्यांनी उदयोग जगताला केले. संरक्षण, उत्पादन, शेती आयटी, टेकस्टाईल असा क्षेत्रांचाही त्यांनी उत्तम गुंतवणूक संधी असा उल्लेख केला.

image


पंतप्रधानांचे कौतुक फिनलंड तसेच हॉलंडच्या पंतप्रधानांनी या कार्यक्रमात बोलताना केले. भारतात गुतंवणूक करण्यासाठी भारताच्या विकासात सहभागी होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र देशाच्या औद्योगिकतेचा कणा- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस म्हणाले की मेक इन महाराष्ट्र हाही कार्यक्रम मेक इन इंडिया समवेतच सुरु आहे. महाराष्ट्र हा भारतीय उत्पादन क्षेत्राचा कणा ठरू शकतो. आजच ओरॅकल, कोकाकोला व रेमंड उद्योगांसमवेत कृषी व आयटी क्षेत्रांशी निगडीत दहा बिलियन अमेरिकन डॉलर गुंतवणुकीचे समझोता करारा झाल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की मेक इन इंडिया सप्ताहात असे आणखी मोठ्या गुंतवणुकीचे करार होणार आहेत. आता महाराष्ट्रात गुतंवणूक व नवीन उद्योग सुरु करण्याचे काम फक्त एका अर्जावर होणार आहे. सारे परवाने आता इलेक्ट्निक प्लॅटफॉर्मवर आणले आहेत असे संगून मुख्यमंत्री म्हणाले की ज्या परवानग्यांसाठी पूर्वी ३६५ दिवस लागत होते तेच परवाने आम्ही तीन दिवसात देणे सुरु केलेले आहे.