‘व्हिडिओ जॉब प्रोफाईल’च्या माध्यमातून नियोक्ता आणि उमेदवारांचा वेळ वाचविणारे ‘पिनहोप्स’

0

‘पिनहोप्स’ नियोक्ता आणि उमेदवार दोघांसाठी निवड प्रक्रिया सोपी करणारे एक व्हिडिओ जॉब ऍप्लिकेशन पोर्टल आहे. यावर नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार काही क्षणात आपला व्हिडिओ रेकॉर्ड करुन नोकरीसाठी अर्ज करु शकतात. ‘पिनहोप्स’ हे स्मार्टप्लॅनेट सर्विसेस इन्डिया प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केलेले उत्पादन जानेवारी २०१४ मध्ये म्हैसूर शहरात सुरु करण्यात आले. विनोद जयरामन (सीटीओ) आणि सतिश नरहरी मूर्ती (सीईओ) यांनी नियोक्ता आणि उमेदवारांच्या एका सर्वेक्षणाअंती नियोक्त्यांसमोरच्या समस्या समजून घेतल्यानंतर या समस्येकडे लक्ष देण्याचे ठरविले आणि ‘पिनहोप्स’ची सुरुवात केली.

आयटी, बीपीओ, हेल्थकेअर, शिक्षण, हॉस्पिटॅलिटी, मीडिया आणि रिटेल अशा सेल्स किंवा ग्राहकांना सामोरे जावे लागणारी कामे असणाऱ्या, संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व आणि सादरीकरण कौशल्यावर जास्त भर दिल्या जाणाऱ्या क्षेत्रात ही संकल्पना प्रभावीपणे काम करताना दिसते.

या पोर्टलवर नियोक्ता त्यांच्याकडील भरावयाच्या रिक्त जागांची माहिती टाकू शकतात आणि इच्छुक उमेदवारांकडून व्हिडिओ प्रोफाईलची मागणी करु शकतात. नोंदणीकृत उमेदवार लगेचच स्वतःची माहिती देणाऱ्या तीन ते पाच मिनिटांच्या व्हिडिओसह आपला व्हिडिओ प्रोफाईल रेकॉर्ड करु शकतात आणि नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

‘पिनहोप्स’ हे एक बिल्ट-इन सर्च इंजिन आहे, जे काही मापदंडांच्या आधारावर नियोक्त्यांना टॉप बेस्ट अर्ज सुचवितात. यामुळे नियोक्त्यांना सर्व अर्जांमधून टॉप २० उमेदवारांवर लक्ष केंद्रित करणे शक्य होते. ज्यामुळे त्यांचा वेळ वाचतो.

‘पिनहोप्स’च्या सहाय्याने समकालिक मुलाखतींच्या व्यवस्थापनाद्वारे नियोक्ता आणि उमेदवार दोघांनाही मुलाखतीच्या प्राथमिक फेऱ्यांदरम्यान होणारा उशीर टाळणे शक्य होते. नियोक्ता त्यांच्याकडील नोकरीसाठी उपलब्ध जागांची माहिती ‘पिनहोप्स’वर टाकतात आणि प्राथमिक फेरीमध्ये अर्जदारांच्या सुरुवातीच्या चाचण्या घेतल्यानंतर त्यातील काही उमेदवारांची निवड पुढच्या फेरीसाठी करतात. या पातळीवर नियोक्त्यांना पारंपरिक मुलाखत प्रक्रियेनुसार उमेदवारांबरोबर प्रत्यक्ष मुलाखतीची वेळ ठरविण्याची गरज पडत नाही. ते हे काम त्यांच्या सोयीनुसार समकालिक मुलाखतीच्या माध्यमातून करु शकतात. नियोक्ता निवडक अर्जदारांसाठी ‘पिनहोप्स’वर त्यांचे प्रश्न पोस्ट करतात. अर्जदार या प्रश्नांना व्हिडिओ प्रोफाईलिंगचा पर्याय वापरुन प्रतिसाद देऊ शकतात.

“नियोक्त्यांना व्हिडिओ प्रोफाईल मिळत असल्याने ते मुलाखत प्रक्रियेच्या सुरुवातीलाच उमेदवार विशिष्ट पदासाठी पात्र आहे की नाही हे ठरवू शकतात. व्यक्तिमत्व आणि सीव्ही यांच्यातील तफावतीसारख्या समस्या टाळता येऊ शकतात आणि टेलिफोनिक इन्टर्व्ह्यूच्या फेऱ्याही बाद करता येऊ शकतात,” असे ‘पिनहोप्स’च्या सेल्स ऍण्ड मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ संचालक विक्रम मुर्देश्वर सांगतात. ‘पिनहोप्स’वर नियोक्ता प्रत्यक्ष मुलाखतीची वेळ ठरविण्यापूर्वी उमेदवाराकडून त्याच्या प्रावीण्य क्षेत्राविषयी अधिक माहितीही मिळवू शकतात. ज्यामुळे त्यांचा वेळ वाचतो. या मुलाखती विशेषतः पाच ते दहा मिनिटांच्या असतात. मात्र नियोक्त्यांच्या मागणीनुसार त्या कस्टमाइजही केल्या जाऊ शकतात.

सर्वोत्कृष्ट उमेदवार मिळविण्याकरिता ‘पिनहोप्स’ नियोक्त्यांना त्यांचा ब्रॅण्ड दाखविण्याची परवानगी देते. कंपन्या त्यांचे कॉर्पोरेट व्हिडिओ, ब्रोशर, स्लाइड शो प्रेझेंटेशन्स आणि सोशल मीडियावरील त्यांच्या लिंक्स शेअर करु शकतात. “अनेकजण कॅमेऱ्यासमोर यायला लाजतात आणि त्यामुळे नोकरीसाठी व्हिडिओसह अर्ज करण्यास नाखूष असतात. लोकांनी ही पद्धत अवलंबणे हे आमच्यासमोरचे एक आव्हान होते आणि म्हणूनच आम्ही नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना व्हिडिओ प्रोफाईलचे फायदे आणि त्याचा कन्टेन्ट काय असावा याबाबत मार्गदर्शन करण्यावर भर द्यायचे ठरविले. नियोक्तासुद्धा व्हिडिओ प्रोफाईलला प्राधान्य देत आहेत ही एक जमेची बाब आहे आणि आम्ही त्यांना त्यांच्या जॉब कार्ड्सवर हे स्पष्टपणे ठळक अक्षरात नमूद करण्याचा पर्यायही दिला आहे.”

‘पिनहोप्स’ला चांगला प्रतिसाद लाभत आहे. केवळ पाच महिन्यांच्या कालावधीत त्यांच्याकडील नोंदणीकृत अर्जदारांची संख्या २० हजारावर गेली आहे आणि एक हजाराहून जास्त जॉब लिस्टींगसह फ्लिपकार्ट, हॅप्पीएस्ट माइन्ड्स, सीसीडी आणि फर्स्ट सोअर्ससारख्या कंपन्या त्यांच्या ग्राहक ठरल्या आहेत.

लेखक : सत्यनारायण जी.

अनुवाद : अनुज्ञा निकम