पडद्यावरच्या कलेला पडद्यामागून काम करून ओळख मिळवून देणारी ‘इनफोकस’! दोघा सामान्य तरुणांच्या जिद्द आणि मेहनतीची असामान्य कहाणी!

पडद्यावरच्या कलेला पडद्यामागून काम करून ओळख मिळवून देणारी ‘इनफोकस’!
दोघा सामान्य तरुणांच्या जिद्द आणि मेहनतीची असामान्य कहाणी!

Monday January 18, 2016,

4 min Read

दूरचित्रवाणीवरून दररोज अक्षरश: शेकडो प्रकारच्या मालिका, कार्यक्रमांचा रतिब घातला जात असतो. या सा-या मालिका कार्यंक्रमांची निर्मिती करण्यासाठी लाखो ज्ञात-अज्ञात कलाकारांचे हात राबत असतात. कलेच्या माध्यमातून यशाची शिखरे गाठणा-या निर्मात्या-दिग्दर्शकांच्या समोर त्यातील लेखक,अभिनेते किंवा पतपुरवठा करणारे जितके महत्वाचे असतात तितकेच महत्वाचे असतात कलेची आणि तंत्रज्ञानाची नेमकी सांगड घालू शकणारे ‘व्हिडिओ एडिटर्स’ लेखक, दिग्दर्शकांच्या संकल्पनेतील कथा तंत्राच्या मदतीने नेमकी कोणत्या पध्दतीने दर्शकांसमोर गेली तर ती त्यांना भावेल याची जाण असणारा, त्यातील सुक्ष्म बारकावे देखील समजावून घेऊन कलेच्या मदतीने ते मांडणारा ‘व्हिडिओ एडीटर’ म्हणूनच या कार्यक्रमा़च्या पाठीमागचा महत्वाचा सूत्रधार, दुवा असतो.


image


‘इनफोकस’ या नावाने व्हिडिओ एडिटिंगच्या व्यवसायात गेल्या पंधरा वर्षांपासून काम करणा-या दिनेश पुजारी आणि संदेश पाटील या सर्वसामान्य घरातल्या तरूणांनी स्वबळावर या चंदेरी दुनियेच्या पडद्यामागच्या भूमिका संघर्षाना समोरे जात पेलल्या आहेत, आणि उद्याच्या परिपूर्ण स्वत:च्या’ प्रॉडक्शन हाऊस’च्या स्वप्नांसाठी तसेच व्हिडिओ एडिटींगच्या शिक्षण देणा-या संस्था उभारण्याच्या स्वप्नांसाठी हे तरूण आजही धडपडताना दिसतात.


image


स्वकर्तृत्वावर ज्यांनी स्वत:चा उद्यम सुरू केला अशा या उद्यमी तरूणांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी ‘युअर स्टोरी’ने ‘इनफोकस’चे दिनेश पुजारी यांची भेट घेतली. आपली चंदेरी दुनियेच्या पडद्यामागची कहाणी सांगताना ते म्हणाले की, “सन२००३ मध्ये मी आणि संदेश एका स्थानिक केबल ऍडएजन्सीमध्ये जाहिरातींसाठी काम करण्याच्या निमित्ताने भेटलो. मी व्हिडिओ एडिटिंग करत असे आणि तो मार्केटिंगची जबाबदारी सांभाळत असे. काम करताना दोघांची घट्ट मैत्री झाली, पुढे २००५मध्ये संदेशचे मालकासोबत मतभेद झाले आणि त्याने नोकरी सोडली, त्यावेळी त्याच्या आणि माझ्या चर्चेत असे दुस-यांसाठी काम करण्यापेक्षा भागिदारीत स्वत:च व्यवसाय सुरू करावा असे ठरले. आधी मी नोकरी सांभाळून त्याला मदत करण्यास तयार झालो मात्र नंतर लक्षात आले की, नोकरी करून ते शक्य होणार नसल्याने मी देखील दोनच महिन्यात नोकरी सोडून त्याच्यासोबत काम सुरू केले.”


image


आणि मग दोन मित्रांनी इतर मित्रांच्या मदतीने भाड्याने एक जुना संगणक मिळवला, तो घरातच टिपॉयवर ठेऊन केबल जाहिरातींचे एडिटिंग, होर्डिंगच्या जाहिरातींसाठी काम सुरू झाले. संदेश मार्केटिंगची बाजू बघत होते, तर दिनेश कामे पूर्ण करून देत होते. २००७पर्यंत या दोन मित्रांनी आपल्या कामातून परिचय वाढवले आणि त्यातून कामे वाढत गेली. मग घरातून बाहेर जाऊन भाड्याने कार्यालय घेण्याचा विचार आला कारण आता घरच्यांना या उद्योगातून फार काळ त्रास देता येणार नव्हता, दिनेश सांगतात. तेंव्हापासून मग भाड्याच्या खोलीत त्यांचा ‘स्टुडिओ’ तयार झाला आणि आज २०१६पर्यंत ठाणे शहर-मुंबईत त्यांनी व्हिडिओ एडीटींगच्या क्षेत्रात जाहिराती, लघुपट, माहीतीपटांसह काही डेली सोप मालिकां आणि सिनेमांचे एडिटिंग करून स्वत:च्या कौशल्यासोबतच व्यवसाय आणि इतरांना रोजगार तसेच नांवलौकीक मिळवून दिला आहे. आधी साध्या ‘विंडोज’पासून सुरुवात करत आज ‘मँक’च्या सातयंत्रापर्यंत विस्तार स्वत:च्या जिद्द आणि मेहनतीने करण्याच्या या गेल्या पंधरा वर्षांत कसोटीचे अनेक प्रसंग आल्याचे दिनेश सांगतात. सुरूवातीपासून दोघांनाही घरच्यांकडून कोणताही आर्थिक, मानसिक पाठिंबा नव्हता त्यामुळे जे काही करायचे ते स्वत:च्या बळावर हे त्यांनी मनात पक्के केले होते. जस जसे काम वाढले तसे त्यांचे इरादे मग पक्के होत गेले आणि एक दिशा मिळाली, असे दिनेश सांगतात.


image


“हळुहळू लघुपटांच्या स्पर्धामध्ये आमच्या कलाकृती जाऊ लागल्या आणि एडिटिंगच्या क्षेत्रात आमचे नांव गाजू लागले, त्यानंतर कँमेरा भाड्याने देणे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या व्हिडिओ शुटिंगची, इव्हेंट्स तसेच अल्बम तयार करून देण्याची कामे सुरु झाली.” दिनेश म्हणाले. इव्हेंट करता करता मग त्यांनी माहितीपट, आणि दैनिक मालिकांचे व्हिडिओ एडिटींग सुरू केले.२०१२मध्ये मराठीत गाजलेला सिनेमा ‘रेगे’करिता प्रथमच सिनेमाचे एडिटींग केले आणि चांगल्या कामाला दाद मिळतेच असे म्हणतात तसेच झाले, ‘रेगे’ने या क्षेत्रात ‘इनफोकस’ला आणि त्याच्या या शिलेदारांना ‘फोकस’ मिळवून दिला. २०१३मध्ये या सिनेमाच्या उत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार त्यांना मिळाला. त्याआधीच ईटिव्ही, झी साठी देखील दैनंदिन मालिकांचे काम सुरु झाले होते. मग 'झी सन्मान पुरस्कार' मिळाला आणि आपण जी कामे करतो त्यातील योगदान आणि मेहनतीचे चीज होत असल्याचे समाधान मिळत गेले त्यामुळे आत्मविश्वास वाढला. प्रभात पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार अशा पुरस्कारांची रांग लागली आणि मग त्यातून प्रतिमा विकण्याच्या व्यवसायात स्वत:ची देखील ‘प्रतिमा’ निर्माण करण्यात हे दोन बहाद्दर यशस्वी झाले आहेत.


image


हे सारे करताना अनेकदा संघर्षांचे क्षण आले, एकदा तर दोघांचे इतके भांडण झाले की काम बंद करण्याचा विचार आला होता. पण ते गैरसमज होते आम्ही दोघे एकमेकांना सावरून पुढे घेऊन जाऊ शकतो यांची दोघांना जाणिव झाली आणि मग कामांची विभागणी करून आम्ही निर्विवाद आमचे लक्ष्य गाठण्यास सिध्द झालो दिनेश सांगतात. हे काम करताना काही अनुभव आले त्याबद्दल सांगताना ते म्हणतात की, हा असा व्यवसाय आहे की त्यात करु तेवढे काम थोडे आहे, आणि स्पर्धा देखील खूप आहे. पण परिपूर्ण ज्ञान मात्र फारच थोड्या जणांना असल्याचे जाणवते. चांगले व्हिडिओ शुटिंग करणारे, एडिटिंग करणारे तंत्रज्ञ आज हवे आहेत मात्र ज्याला जसे जमेल तसे तो काम करत आहे, त्यामुळे हे परिपूर्ण संपादनाचे ज्ञान देणारी संस्था स्थापन करावी. जेथे प्रॉडक्शन हाऊससोबत ज्ञानही देता येईल आणि उद्याच्या काळासाठी नवे व्हिडिओ एडिटर्स तयार करता येतील असे वाटत असल्याचे दिनेश सांगतात. दिनेश यांच्या पडद्यामागच्या कलाकारांच्या दुनियेतील सत्य जाणून घेताना एक गोष्ट मात्र माहिती झाली की, पडद्यावर सत्य दाखवण्याच्या अविर्भावात या उद्योगात वावरणा-या अनेकांना या पडद्यामागच्या तंत्रज्ञांचीसुध्दा एक दुनिया असते याचे भान असतेच असे नाही. आणि ते नसेल्यानेच पडद्यावर कितीही मोठे कथानक आले तरी काहीच उपयोगाचे नसते हे जाणून घ्यावेच लागते. गोविंदाग्रजांच्या शब्दात ‘आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे’!