किरण मुझुमदार शॉ, भारतीय उद्योगजगतातील एक प्रेरणादायी नाव

किरण मुझुमदार शॉ, भारतीय उद्योगजगतातील एक प्रेरणादायी नाव

Thursday December 24, 2015,

12 min Read

मला आठवते आहे, लहानपणी मला माझी आई सांगायची की मोठी होऊन किरण मुझुमदार शॉ प्रमाणे प्रभावी, स्वावलंबी आणि यशस्वी हो. माझी आई, मी आणि देशभरातील करोडो लोकांसाठी किरण खऱ्या अर्थाने एक आदर्श आहेत. पुरुषप्रधान क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःची एक जागा निर्माण केली आहे. त्यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती, हिंमत आणि काही तरी वेगळे करण्याचे स्वप्न होते. त्यांनी ते स्वप्न साकार केले आहे.

मला नुकतीच त्यांच्या ऑफीसमध्ये जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. आमच्यामध्ये खूप मनमोकळी चर्चा झाली. त्यांनी मला प्रभावित केले. त्या आनंदी, मजेशीर आणि उद्देशपूर्ण असं व्यक्तिमत्व आहेत.

आमची चर्चा एका तासापेक्षा जास्त वेळ चालली आणि मला त्या वेळात त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. हा त्या चर्चेचा पहिला भाग.

किरण मुझुमदार शॉ त्यांच्या आईसमवेत

किरण मुझुमदार शॉ त्यांच्या आईसमवेत


युवरस्टोरी : तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःच्या बळावर बरंच काही मिळविलेलं आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर सर्व काही मिळालं असं वाटतं की अजूनही बरंच काही करायचं आहे असं वाटतं ? या क्षणाला त्याबद्दल काय भावना आहेत तुमच्या ?

किरण : कुठल्याच उद्योजकाला असं वाटत नाही की त्याचा प्रवास संपला आहे. मला वाटतं उद्याेजकाचं आयुष्य म्हणजे एक निरंतर चालणारा प्रवास असतो. हा प्रवास शेवटचे ठिकाण गाठण्यापेक्षा मैलाचे दगड पार करण्यासाठी असतो आणि मला वाटतं उद्योजक म्हणून आम्हाला ते माहिती असतं. आम्ही जेव्हा हा प्रवास सुरु करतो तेव्हा हा मार्ग आम्हाला कुठे घेऊन जाणार आहे हे आम्हाला ठाऊकही नसतं आणि त्यामुळे आमच्यासाठी हा एक शोध प्रवास असतो. हा शोध प्रवास खूप रोमांचकारी आहे. कारण तो आम्हाला एका अज्ञात गंतव्य स्थानी घेऊन जातो आणि आमच्यासाठी नवनवे मार्ग तयार करतो. सर्व उद्योजकांचा प्रवास हा असाच असतो.

मला वाटतं मीही याला अपवाद नाही. माझा उद्योजक म्हणून प्रवास दैवयोगाने सुरु झाला. १९७८ मध्ये माझ्या लक्षात आलं की पेय तज्ज्ञ होऊन ब्रेवरी व्यवस्थापन करण्याचं माझं स्वप्न मी पूर्ण करु शकत नाही. तेव्हा मी विचार केला की ठीक आहे, मग मी दुसरं काय करु शकते आणि मग अपघातानेच हा व्यवसाय सुरु केला. वाटलं ‘ठीक आहे. हे जैवविज्ञान आहे आणि जैवविज्ञान निश्चितपणे ब्रेवरीशी संबंधित आहे. हे एक रोमांचक क्षेत्र आहे. मी कधी कुठला व्यवसाय केला नसल्यामुळे मला व्यवसाय कसा सुरु करायचा याबाबत काहीही माहिती नाही. पण हा एक शोध प्रवास आहे. तेव्हा चला हा व्यवसायाचा प्रवास नेमका काय असतो याचा शोध घेऊया.’

बायोकॉनमध्ये काम करताना किरण

बायोकॉनमध्ये काम करताना किरण


अशा प्रकारे मी व्यवसायात उडी घेतली. मी सुरुवातीला इण्डस्ट्रीअल एन्झाइम्स आणि खास ब्रेविंगसाठी डिझाईन करण्यात आलेले अनेक एन्झाइम्स तयार करायला सुरुवात केली. मला तो विषय परिचयाचा होता. या माध्यमातून माझी आवड आणि व्यवसाय एकत्र आले आणि त्यामुळे मी अजूनही ब्रेविंगशी जोडलेली आहे असं मला वाटू लागलं. मला खूप परिचयाच्या असलेल्या या क्षेत्राशी माझा व्यवसायही जोडला गेला. मला वाटतं अनेक उद्योजक त्यांना परिचयाचा असलेला, त्याबद्दल काहीतरी माहिती असलेला व्यवसायच सुरु करतात. कारण मला नाही वाटत की कुठलाही उद्योजक आपण काय करतो आहोत याबाबत काहीच माहिती नसताना उद्योग सुरु करत असेल. मला वाटतं उद्योजकाला तो जे काही करतो आहे त्याची मनापासून आवड असली पाहिजे आणि तो काय उभं करतो आहे याची त्याला चांगली समज पाहिजे. काहीतरी वेगळं करण्याची माझी मनापासून इच्छा होती. मी या उद्योगक्षेत्राची पहिल्यांदा सुरुवात केली. मी पायोनिअर आहे कारण मला मार्ग दाखवणारा, हा व्यवसाय कसा करावा हे सांगणारं कोणीही नव्हतं.

युवरस्टोरी : आज तुम्ही अनेकांच्या मार्गदर्शक आहात. मला आठवतं आहे, आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्हाला तुमच्याबद्दल सांगितलं जायचं. आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण करा असं सांगताना तुमचं उदाहरण दिलं जायचं.

किरण : मागे वळून पाहिलं की मला वाटतं की हो ते खूप धैर्याचं काम होतं. कारण मी कुठे चालली होते याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. मला वाटतं उद्योजक ते असतात ज्यांच्यामध्ये हिंमत असते, जे धोका पत्करतात. तुला स्ट्रगल करण्याची इच्छा आहे, आव्हान घ्यायची इच्छा आहे पण एका विशिष्ट उद्देशासाठी; त्यावेळी स्वतःला व्यवस्थापक म्हणून सिद्ध करणे हा माझा उद्देश होता. लोकांनी मला सांगितलं होतं की तू एक स्त्री आहेस म्हणून आम्ही तुला ब्रेवरची नोकरी देऊ शकत नाही. तेव्हा स्त्री व्यवसाय सांभाळू शकते, मग तो कुठलाही व्यवसाय असो हे दाखवून देण्याचा मी निश्चय केला होता.

image


ते मी घेतलेलं आव्हान होतं आणि एन्झाइम्स विकसित करणे आणि जैवतंत्रज्ञानाच्या कक्षेबाहेर जाऊन व्यवसाय उभा करणे हे माझं उद्दिष्ट होतं. एक उदयोजक म्हणून तुमच्यामध्ये आव्हानं झेलण्याचा उत्साह असला पाहिजे. तुम्हाला पुढे नेणारी कुठलीतरी गोष्ट असलीच पाहिजे. मग फ्लीपकार्ट असो, बायोकॉन असो वा इन्फोसिस, प्रत्येकाला पुढे नेणारं काही तरी असावं लागतं, जे तुम्हाला एक उद्देश आणि आव्हान देईल.

तोपर्यंत कोणीही जैवतंत्रज्ञानावर आधारित उद्योग उभारला नव्हता. त्यामुळे माझ्यासाठी ते आव्हानात्मक होतं. मला ते शक्य करुन दाखवायचं होतं. एक स्त्री व्यवसाय करु शकते आणि सांभाळूही शकते हे दाखवून द्यायचं होतं आणि पर्यावरण अनुकुल व्यवसाय करणे हे माझं उद्दिष्ट होतं. रासायनिक तंत्रज्ञानाऐवजी एन्झाइम तंत्रज्ञानाचा वापर करुन जगाला हिरवेगार बनविणारी ती खूप नवीन संकल्पना होती आणि तोच माझा उद्देश होता.

जसे की जेव्हा इन्फोसिस सुरु झाली तेव्हा एक साॅफ्टवेअर सर्विस कंपनी सुरु करणे हे त्यांचं उद्देश्य होतं आणि त्यांच्यासमोर Y2Kचं आव्हान होतं. मात्र त्यांनी ते आव्हान स्विकारुन तंत्रज्ञानाच्या युगातील आम्ही पहिल्या फळीचे उद्योजक कक्षेबाहेर जाऊन प्रत्यक्षात नव्याने एक उद्योग उभा करु शकतो हे दाखवून दिलं. प्रत्येकाकडे एक उद्देश्य असते, एक आव्हान असते आणि जसं तू उद्योग उभारायला सुरुवात करते, निश्चितपणे तो एक शोध प्रवास असतो. मुळात तू समस्यांचा सामना कसा करायचा हे शिकतेस, समस्या सोडवायच्या कशा हे शिकते, बिझनेस इश्यू, रेग्युलेटरी इश्यू कसे हाताळायचे हे शिकतेस. जेव्हा तू व्यवसाय उभारायला सुरुवात करतेस तेव्हा या सर्व गोष्टी तुम्हाला प्रतिकूल असतात. मग तुमच्या लक्षात येते की याची एक औपचारिक पद्धत असते. तेवढ्यापुरती काहीतरी मार्ग काढून ते पूर्ण करायचं असं नसतं. तुम्हाला जे करायचं आहे त्यासाठी तर्कांवर आधारित काही गोष्टी असतात. काही डावपेच असतात आणि मग हळूहळू तुम्ही तुमचं काम कसं करायचं हे शिकू लागता.

बायोकॉनचा पायाभरणी सोहळा

बायोकॉनचा पायाभरणी सोहळा


युवरस्टोरी : तुम्हाला काहीतरी मोठं करायचं आहे याबाबत तुम्ही आधीपासूनच विचार केला होता का?

किरण : सुरुवातीच्या काळात तू या गोष्टींचा विचारही करत नाहीस, काही लोक करतात पण मी नव्हता केला. मला फक्त मी जे करत होते त्यामध्ये यशस्वी व्हायचं होतं. मला व्यवसायाची पार्श्वभूमी नव्हती. अनेकांना व्यावसायिक पार्श्वभूमी असते, त्यामुळे त्यांची व्यवसाय सुरु करण्याची, सांभाळण्याची, चालविण्याची समज माझ्यासारख्या नवशिक्या व्यक्तीपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. मला व्यवसायाची पार्श्वभूमी नव्हती, अनुभव नव्हता आणि मी कधी अशा कुठल्या कंपनीसाठी कामही केलं नव्हतं जिथे मी बिझनेस प्रोसेस शिकले असेन किंवा बिझनेस प्रोसेस काय असते हे समजून घेतलं असेन. त्यामुळे मी अक्षरशः सगळ्या गोष्टी शोधून काढल्या, स्वतः सर्व शिकून घेतलं. मला कामाविषयी बोलण्यासाठी त्याबाबत माहिती करुन घेणं गरजेचं होतं.

युवरस्टोरी : तुम्हाला कधी एकटेपणा जाणवला का?

किरण : नाही, मला कधी एकटेपणा जाणवला नाही. कारण जेव्हा तुमच्याकडे आव्हान पेलण्याची जिद्द असते तेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवत नाही. तुम्ही तरुण असता, तुम्हाला माहिती असतं की तुमच्यामध्ये खूप जिद्द आहे, तुम्हाला त्या गोष्टी करायच्याच आहेत आणि त्यासाठी स्वतःला तयार करण्याची तुमची इच्छा असते. माझी काहीही करायची तयारी होती, मला कशाचीही भिती नव्हती. जेव्हा मी व्यवसाय सुरु केला तेव्हा माझ्याकडे तितकेसे पैसे नव्हते. त्यामुळे मी देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जायचं असलं तरी ट्रेन किंवा बसने प्रवास करायचे. मला विमानाचं तिकीट परवडणारं नव्हतं. मी सर्व ठिकाणी जाण्यासाठी प्रवासाचा स्वस्तात स्वस्त पर्याय निवडायचे. मला आठवतंय माझ्या पालकांना खूप काळजी वाटायची. एकटी मुलगी, देशभरात सगळीकडे एकटी फिरतेस, कारखान्यांमध्ये एकटी जातेस असं म्हणून ते काळजी करायचे. अकाली दल इत्यादीमुळे पंजाबमध्ये तो खूप कठीण काळ होता आणि तरीही मी एकटीच कुठे कुठे जायचे. उत्तर भारतात व्यवसायाच्या संधी खूप असल्यामुळे तेव्हा माझा जास्त तो प्रवास त्या बाजूलाच व्हायचा. मी कशाचीही पर्वा करायचे नाही. माझ्यासमोर एक उद्देश्य होता आणि त्यामुळे मला कशाचीच भिती वाटायची नाही. अनेकदा बसमध्ये असणाऱ्या प्रवाश्यांमध्ये मी एकटीच स्त्री प्रवासी असायचे. सगळे पुरुष प्रवासी माझ्याकडे टक लावून पहात असायचे पण कंडक्टर मात्र मला काळजीने विचारायचा ‘आप कहाँ जा रही है मॅडम?’ आणि मी म्हणायचे ‘मुझे वह जगतजीत इण्डस्ट्री पहुँचनेका है’ आणि तो बिचारा गेटसमोर बस थांबवायचा आणि म्हणायचा तुम्ही इथे उतरा. माझ्याकडे पैसे नसायचे आणि दूरवर चालत जायलाही मजा यायची.

किरण आणि त्यांचा परिवार

किरण आणि त्यांचा परिवार


युवरस्टोरी : तुमच्या बिनधास्त व्यक्तिमत्त्वावर तुमच्या पालकांचा किती प्रभाव आहे?

किरण : माझ्या आई-वडिलांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. माझे वडिल खूप पुढारलेले होते. ते मला म्हणायचे की केवळ तू माझी मुलगी आहेस म्हणून तू करिअर करु नये असं मूळीच नाही. किंबहुना तू करिअर करावं अशी माझी इच्छा आहे.

ते सुद्धा ब्रेव मास्टर होते आणि त्यांना वाटायचं की त्यांच्या एकातरी मुलाने ब्रेवर व्हावं. म्हणून ते म्हणायचे की तू ते कर आणि माझी प्रतिक्रिया असायची ‘पण मी मुलगी आहे.’ मग ते म्हणायचे ‘तू का करु शकत नाही? हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. तू खूप चांगली ब्रेव मास्टर बनू शकतेस.’ त्यांना एवढा विश्वास होता माझ्यावर. माझ्या वडिलांनी मला खूप चांगली मूल्यं शिकवली. ते म्हणत असत, “प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगलं असतं आणि जर तू एक चांगली व्यवस्थापक असशील तर तू माणसांमधील चांगले गुण प्रकाशात आण. चांगला मॅनेजर तो असतो जो प्रत्येकातील चांगले गुण हेरुन त्या गुणांना प्रोत्साहन देतो.” माझ्यासाठी तो एक सूचक उपदेश होता असं मला नेहमी वाटतं.

आईवडिलांसमवेत किरण

आईवडिलांसमवेत किरण


त्यांनी माझ्यामध्ये चांगली नैतिक मूल्ये रुजवली. ते म्हणायचे, “शॉर्टकट मारण्यात काही अर्थ नाही. व्यवसाय करण्याचा एक चांगला मार्ग असतो आणि एक तितकासा चांगला नसलेला मार्गही असतो आणि मला माझ्या मुलीने प्रामाणिकपणे व्यवसाय केलेला पाहिजे आहे. माझ्या मुलांनी समाजात वावरताना खूप प्रामाणिकपणे वागावं अशी माझी इच्छा आहे.”

आईवडिलांसमवेत बालपणीच्या किरण

आईवडिलांसमवेत बालपणीच्या किरण


माझ्या आईची मला नेहमीच साथ लाभली. माझे वडिल जी नैतिक मूल्ये मानायचे त्यावर तिचाही विश्वास होता. तिच्या लेखी स्वावलंबनाला खूप महत्त्व आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्या आईने स्वतःला सकारात्मक दृष्ट्या गुंतवून ठेवण्यासाठी स्वतःचा एक उद्योग सुरु केला (त्यांनी यापूर्वी कधीही नोकरीधंदा केला नव्हता. त्या एक गृहिणी होत्या). ती वयाच्या ८२ व्या वर्षी तिचा स्वतःचा व्यवसाय चालवत आहे. एकेदिवशी ती मला म्हणाली, “तुला माहिती आहे? मी वाचलं आहे की जे लोक स्वतःला व्यस्त ठेवत नाहीत त्यांना अल्झायमर आणि डिमेन्शिआ होतो आणि मला स्वतःला खरोखरच व्यस्त ठेवायचं आहे. मी जर एखादा व्यवसाय सुरु केला तर मी त्यामध्ये पूर्णपणे गुंतलेली राहीन.”

(आम्ही लवकरच तुमच्यासाठी किरण यांच्या आईची कहाणी घेऊन येऊ. त्यांचा ऑटोमॅटीक लॉण्ड्रीचा व्यवसाय आहे.)

युवरस्टोरी : उद्योगजगतातील एक स्त्री, यशस्वी उद्योजक आणि एक आदर्श म्हणून स्त्रीच्या दृष्टीकोनातून काय सांगाल? उदयोन्मुख उद्योजिकांना काय सांगाल?

किरण : जेव्हा मी ब्रेव्हिंगचा कोर्स करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते तेव्हा मी एकटीच होते. माझ्या क्लासमधील विद्यार्थ्यांमध्ये मी एकटीच मुलगी होते. ती माझ्यामध्ये खूप बदल घडवणारी वेळ होती. कारण त्यावेळी अचानक मला हे जाणवू लागलं की मी स्वतःच्या हिंमतीवर काही तरी करु शकते. मी पुरुषांच्या आणि माझ्या पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने त्यांच्या तोडीचे काम करु शकते. इतर विद्यार्थी ब्रेवरीमध्ये खूप अनुभवी असूनही मी क्लासमध्ये सर्वाधिक गुण मिळवले होते. स्त्री असणे म्हणजे अपंग असणे किंवा तोट्याचे असणे बिल्कूल नाही हे मी यामधून शिकले. खरं तर माझ्या स्त्री असण्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढायला मदत झाली.

मी स्त्रीयांना नेहमी सांगते की हे सर्व तुमच्या डोक्यात आहे. तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही स्त्री आहात म्हणून एखादी गोष्ट तुम्ही करु शकत नाही? तुम्ही काय करु शकत नाही? कृपया मला सांगा.

मला काय वाटतं, स्त्रीयांनी त्यांना वेगळेपणाची जाणीव करुन देणाऱ्या, तुमच्या स्त्रीत्वामुळे तुम्हाला खूप समस्यांचा सामना करावा लागेल असे वाटायला लावणाऱ्या टीकांकडे दुर्लक्ष करणं शिकलं पाहिजे. मी खूप लवकरच हे शिकले. तांत्रिकदृष्ट्या माझे ज्ञान खूप चांगले होते त्यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला. जेव्हा मी ब्रेवरीजमध्ये जायचे, ब्रेवर्स आणि तंत्रज्ञांबरोबर व्यावसायिक चर्चा करायचे तेव्हा मी त्यांची भाषा बोलू शकायचे. मी समोरच्याला गुंतवून ठेवू शकेल या तोडीची खूप चांगली चर्चा करु शकायचे. मला माहिती होते की अनेकदा मी त्यांच्यामध्ये वरचढ ठरायचे कारण त्यांचे तांत्रिक ज्ञान माझ्याएवढे चांगले नव्हते. मी माझ्या स्ट्रेन्थ पॉईंटवर काम केलं. तुमच्या स्ट्रेन्थवर काम करा आणि त्याचा फायदा उठवा.

मी नेहमी म्हणते की तुम्ही एक स्त्री आहात म्हणून जर ते तुमच्यावर दया दाखवून तुमची मदत करु इच्छित असतील तर घ्या मदत (हसतात). तुम्हाला कदाचित मदतीची गरज नसेल, तरीही घ्या मदत. मला आठवतंय मी सरकारी कार्यालयांमध्ये स्त्री असलेल्याचा पूर्ण फायदा करुन घ्यायचे. मी परवाना मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये जायचे. मला आठवतं आहे मी सरकारी अधिकाऱ्यांकडे जाऊन सांगायचे, “मला खूप भिती वाटते.” ते विचारायचे “का?” मी उत्तर द्यायचे, “जेव्हा मी व्हरांड्यात मला आत बोलवायची वाट पहात बसले होते तेव्हा इथले काही सौदेबाज माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला सांगितलं तुम्हाला ही परवानगी मिळविण्यासाठी लाच द्यावी लागेल. बाप रे, मी थोडी घाबरलेच, जर मला लाच द्यावी लागली तर माहिती नाही मी पुढे व्यवसाय करु शकेन की नाही” अधिकारी म्हणाला, “नाही, नाही, नाही... कुणाहीवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला लाच द्यावी लागणार नाही.” मी म्हटलं, “ओह.. बरं झालं. मग मी खूश आहे.” ते म्हणाले, “आता व्हरांड्यात बसू नका. आतापासून तुम्ही माझ्या खोलीत बसा. लोकांना तुम्हाला त्रास द्यायला देऊ नका. तुम्हाला जराही लाच द्यावी लागणार नाही.”

सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सरकारी अधिकारी आणि तिथली माणसं खूप चांगली असतात. आपण आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज असते. तुम्हाला वाटतं की सर्वजण वाईट असतात. पण तसं नसतं. मी म्हणेन अधिकतर सरकारी माणसं ही खूप मदत करणारी असतात, खूप चांगली असतात. मला अजून आठवतंय, जेव्हा मला मान्यता मिळाली, त्या बिचाऱ्याने ‘अभिनंदन, आम्ही तुमच्या कंपनीचा परवाना मान्य केला’ अशा आशयाचा एक टेलिग्राम मला पाठवला होता.

बायोकॉनच्या कन्स्ट्रक्शन साईटवर किरण

बायोकॉनच्या कन्स्ट्रक्शन साईटवर किरण


त्याचप्रमाणे बंगळुरुमध्ये जेव्हा मी कारखान्यांमध्ये, सेक्रेटरीच्या कार्यालयात जायचे तेव्हा तिथे असणाऱ्या अनेक लोकांमधून माझी सर्वात आधी दखल घेतली जायची कारण तिथे आलेल्या लोकांमध्ये मी एकटीच स्त्री असायचे. स्त्री असणे हे खूप फायद्याचे आहे. आपण फक्त त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे.

मला कधीही लाच द्यावी लागली नाही. माझी सगळी कामं मला व्यवस्थित पूर्ण करुन मिळायची. माझे पुरुष सहकारी म्हणायचे, आम्हाला तुझा खूप मत्सर वाटतो आणि हे बरोबर नाही, तुला कधीच लाच द्यावी लागत नाही आणि आम्हाला मात्र द्यावीच लागते. एकदा त्यांनी मला सांगितले, ‘हा माणूस खूप भ्रष्ट आहे. मी तुला आव्हान देतो, मला पहायचंय या माणसाला लाच न देता तू कशी काय तुझं काम करुन घेऊ शकते. तो सबसिडीवर कमीत कमी 10 टक्के कट मागतो. नाहीतर तो तुला चेक देतच नाही.’ मी आत गेले आणि काहीही न करता माझा चेक घेऊन आले. ते मला म्हणू लागले, ‘हे बरोबर नाही. त्यांनी तुला काहीही न घेता चेक दिला आणि आम्हाला देत नाही.’ मी उत्तर दिलं, ‘हो, कारण मी स्त्री आहे. माझ्याकडे लाच मागण्याची त्याची हिम्मत नाही.’ ‘पण मी तुम्हाला खरं कारण सांगते,’मी म्हणाले. ‘मी स्वतः जाऊन सगळी कामं करते, तुम्ही तुमच्या शिपायाला, क्लर्कला नाहीतर तुमच्या कनिष्ठांना पाठवता. त्यामुळे तुम्हाला तशी वागणूक मिळते.’ जेव्हा तुम्ही तुमच्या कनिष्ठांना आत पाठवता ते लाच मागतात. जेव्हा तुम्हीच आत जाता तेव्हा तुमच्याकडे कोण लाच मागणार? हा खूप महत्त्वाचा धडा मी शिकले. तुम्हाला तुमची कामं पूर्ण झालेली पाहिजे असतील तर ती तुम्ही स्वतः करा.

माझ्या वडिलांनी मला आणखी एक गोष्ट शिकवली. त्यांनी सांगितलं, जेव्हा तू सरकारकडे एखाद्या गोष्टीची मागणी करतेस तेव्हा ती केवळ स्वतःचा विचार करुन करु नकोस, संपूर्ण क्षेत्राच्या भल्यासाठी मागणी कर. मी ते करायला शिकले आणि आज मी जेव्हा केव्हा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारशी बोलते, मी कधीही असं म्हणत नाही की बायोकॉनला गरज आहे. कदाचित काही प्रमाणात बायोकॉनला खरंच त्याची गरज नसतेही. मात्र मी इण्डस्ट्रीसाठी बोलते. कारण मला ही इण्डस्ट्री मोठी करायची आहे. 

सर्वांच्या विकासाच्या या विचाराला जवळ करा आणि पहा विकास तुमच्याशी कसा जोडला जातो ते.

image


मी एक प्रकारे, भांडवलशहा नियंत्रित अर्थव्यवस्थेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणाच्या बाजूने आहे. सरकार आणि उद्योजकांमधील जवळच्या संबंधांबाबत मला नेहमीच संशय वाटत आला. स्वतःच्या छोट्याश्या फायद्यासाठी सरकारबरोबर भ्रष्टाचार करणारे अनेक उद्योग मी पाहिले आहेत. मला वाटतं ते चुकीचं आहे. मला वाटतं तुम्ही जे काही करता ते संपूर्ण इण्डस्ट्रीसाठी करायला पाहिजे. तुम्ही सरकारकडे ज्या कशाची मागणी करता आहात त्याचा फायदा सर्वांना होऊ द्या, फक्त तुम्हाला नाही. जरी अनेक लोक कदाचित म्हणत असतील की किरण मूर्ख आहे, तिला बिझनेस कसा करायचा हे कळत नाही. पण ही ती नैतिक मूल्य आहेत जी मी लहानपणापासून जपली आहेत. फक्त स्वतःसाठी नाही, सर्वांसाठी मागा आणि तुम्ही सर्वांना कसे प्रभावित करु शकता ते पहा.

लेखिका : श्रद्धा शर्मा

अनुवाद : अनुज्ञा निकम