रक्त हवे, रक्त द्यायचे तर easyblood.info

0

आमच्यापैकी बहुतांश लोक नाना प्रकारच्या आजारांचा सामना करताहेत. अचानक घडलेली दुर्घटना वा शस्त्रक्रियांच्या प्रसंगांतून रक्ताची किती आवश्यकता भासते, हे देखील आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहे. देशातील रक्ताच्या उपलब्धतेसंबंधीचे काही आकडे असे आहेत…

आमच्या देशात दरवर्षी जवळपास ११० लाख युनिट रक्ताची गरज भासते, पण इतक्या मोहिमा, अभियाने राबवूनही रक्तदात्यांकडून ४८ लाख युनिट कसेबसे जमा होतात. आकडे स्पष्टच करतात, की आपल्यादेशात दरवर्षी ६२ लाख युनिट रक्ताची कमतरता भासते. मागणी आणि पुरवठा यातील कमालीच्या असंतुलनामुळे ताशी ७ लोक वेळेवर रक्त उपलब्ध न होऊ शकल्याने मृत्यूला बळी पडतात. दर दोन सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज पडते. याशिवाय भारतातील रक्तदानासंदर्भातले वास्तवही दाहक असेच आहे. भारतात उपलब्ध होणाऱ्या रक्तापैकी ३० टक्के रक्त हे अशुद्ध वा भेसळयुक्त असते. अमेरिकन लोकसंख्येपैकी ८ टक्के लोक वर्षातून किमान एकदातरी रक्तदान करतात. आपल्याकडे भारतात फक्त ३ टक्के लोक रक्तदान करतात.

रक्ताच्या उपलब्धतेशी संबंधित समस्येचे समाधान शोधण्याच्या दिशेने शौविक साहा आणि भास्कर चौधरी यांनी मिळून easyblood.info ची स्थापना केली. साहा आणि चौधरी यांनी तयार केलेल्या या वेबसाइटच्या माध्यमातून भारतातल्या २५०० शहरांतून कुठल्याही रक्तगटाचा ऐच्छिक रक्तदाता शोधणे सोपे झालेले आहे. रक्तदानाशी निगडित माहितीचे अशाप्रकारे हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे व्यासपीठ आहे. ‘रक्तपीठ’ म्हणा हवं तर… easyblood.info ही वेबसाइट खरे म्हणजे ‘पीपल फॉर चेंज’ या मूळ संघटनेचाच उपक्रम आहे. ‘पीपल फॉर चेंज’ कडून चालवले जाणारे हे ऑनलाइन पोर्टल देशभरातील रक्तदात्यांच्या बाबतीत एकाच ठिकाणी माउसवरील एका क्लिकवर सगळी माहिती उपलब्ध करून देते.

शौविक सांगतात, ‘‘इझीब्लड ची स्थापना रक्तदाता आणि आकस्मिक परिस्थिती ओढवलेल्या गरजवंतांना एकमेकांशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून स्थापन करण्यात आलेले एक व्यासपीठ होते.’’ अपघात वगैरे दुर्घटनेच्या आणीबाणीच्या स्थितीत रक्तदात्यांचा शोध घेणे सोपे ठरावे, हा हेतू अर्थातच त्यामागे होता. याअंतर्गत प्रक्रियेनुसार वेबसाइटवर रक्तगट मॅच करत देशभरातील रक्तदान करू इच्छिणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एक सरळ लिंकही उपलब्ध होते.

शौविक आणि भास्कर यांनी चोलामंडलम आणि एचडीएफसी बँकेची मोठ्या पगाराची नोकरी सोडून २००९ मध्ये ‘पिपल फॉर चेंज’ नावाची एक संघटना स्थापन केली. ही अशासकीय सेवासंस्था जमशेदपूरबाहेरून संचलित होते आहे. शौविक सांगतात, ‘‘खरं पाहिलं तर देशभरात कुठेही ‘इझीब्लड’चे कार्यालय म्हणून असे नाही. तरीही आम्ही खडगपूर, हजारीबाद, मुग्मा आणि पतरातूमध्ये आमच्या शाखा सुरू केलेल्या आहेत.’’

उपक्रमाच्या सुरवातीसंदर्भात शौविक सांगतात, ‘‘पिपल फॉर चेंज’च्या निमित्ताने देशभर फिरण्याचा योग आला. यादरम्यान आम्ही रक्तदानासंदर्भातल्या धक्कादायक वास्तवाला सामोरे गेलो. आम्ही स्वत:ही याबाबतीत काही संशोधनकार्य केले. गोष्टींचा मागोवा घेतला. देशात ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण वाढल्यास रक्तदानासंदर्भातल्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात, ही बाब मुख्यत्वे आमच्या लक्षात आली. इथूनच ‘इझीब्लड’ची स्थापना खरंतर झाली.

आकड्यांसंदर्भात बोलताना शौविक सांगतात, ‘‘भारतात जवळपास १४ कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात. पैकी इंटरनेट वापरणारे १२ कोटी लोक १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आहेत. सज्ञान आहेत. रक्तदानासाठी वयाचा जो निकष आहे, त्यात बसणारे आहेत. एवढ्या सगळ्या लोकांना जरी ऐच्छिक रक्तदानासाठी प्रोत्साहित केले तरी भारतातील रक्ताची समस्या दूर होऊ शकते. शेकडो लोकांना वाचवले जाऊ शकते. ‘इझीब्लड’च्या माध्यमातून आम्ही इंटरनेटचा वापर करणाऱ्या याच गटाला टारगेट केलेले आहे. आम्ही उद्दिष्टपूर्तीत यशस्वी ठरलो तर रक्तटंचाई दूर झालीच म्हणून समजा.’’

वेबसाइटच्या कार्यप्रणालीबाबत भास्कर सांगतात, ‘‘तुम्हाला रक्तदान करायचे तर केवळ आपल्या नावाची नोंदणी करावी लागते. आणि जेव्हा एखादा गरजवंत तुमच्याशी संपर्क साधतो तेव्हाच रक्तदानही करायचे असते. नोंदणीची प्रक्रिया निशुल्क आहे. सदस्यत्वासाठीही कुठली फी आकारली जात नाही. ज्याला आपले रक्त दिले जात आहे, अशा व्यक्तीबाबत रक्त देणारा आवश्यक ती माहिती जाणून घेऊ शकतो, ज्याला आपण रक्त देत आहोत, त्याला पाहूही शकतो. दोघांदरम्यान बोलणे होऊ शकते, अशा प्रकारे नवे रक्तसंबंध प्रस्थापित होतात. नाती निर्माण होतात.’’

१७ डिसेंबर २०११ रोजी ही वेबसाइट सुरू झाली. वेबसाइटला मिळणारा प्रतिसादही प्रोत्साहन वाढवणारा असाच आहे. ‘‘आजअखेर ५०० हून अधिक लोक ऐच्छिक रक्तदाते म्हणून या वेबसाइटचे सदस्य बनलेले आहेत. रक्ताची गरज असलेल्या अनेकांना आमच्या वेबसाइटच्या माध्यमातून रक्तदाते प्राप्त झाल्याची उदाहरणे मोठ्या संख्येने आमच्यासमोर आहेत. वेबसाइटमुळे अनेकांना हवे तेव्हा म्हणजे वेळेबरहुकूम रक्त मिळालेले आहे, अशी उदाहरणेही ढीगभर आहेत.’’

‘पिपल फॉर चेंज’च्या आगामी योजनाही उत्साहवर्धक आहेत. स्थानिक शाखांच्या माध्यमातून देशभरातील २५०० शहरांमध्ये आपली प्रत्यक्ष उपस्थिती नोंदवण्याचा हेतू आहे. शौविक सांगतात, ‘‘सरकारी रुग्णालये, आरोग्य केंद्रे आणि रक्तपेढींसमवेत नाते जोडत जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली सेवा पोहोचवणे, हा आमच्या मुख्य उद्दिष्टांमधला एक महत्त्वाचा भाग आहेच.’’

खरंच हा एक अत्यंत सुंदर आणि उपयुक्त असा एक प्रयत्न आहे. भास्कर आणि शौविक यांना आपण सर्वच शुभेच्छा देऊयात… हा उपक्रम सुरू करताना त्यांच्या मनात भविष्याबद्दलच्या ज्या ज्या कल्पना असतील, त्या सर्व कल्पनांना मूर्त रूप प्राप्त होवो. यश प्राप्त होवो. ‘युवरस्टोरी’च्या वाचकांनीही या अभिनव उपक्रमात सहभागी व्हावे व इतरांना जीवनदान देण्याच्या प्रयत्नांत वैयक्तिक पातळीवर एक वाटेकरी व्हावे. कारण तुम्हाला या क्षणी थोडेच कळणार आहे, की केव्हा कुणाला तुमची गरज पडेल आणि तुम्ही त्याच्या आयुष्याची दोरी घट्ट कराल… अन् नवे नाते जुळेल… अक्षरश: रक्ताचे!

तर मग तुम्हीही या उपक्रमाबाबत आणखी जाणून घ्या अन् या उपक्रमाचे सभासद व्हा-

https://www.facebook.com/pages/EasyBLOOD/272932586095663?sk=info&ref=page_internal

Related Stories