कैद्यांना ‘आशा’ देणार्‍या ‘निशा’!

कैद्यांना ‘आशा’ देणार्‍या ‘निशा’!

Friday November 20, 2015,

3 min Read

सकाळची पहिली किरणे त्यांच्या चेहर्‍यावर पडताच ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहातील कैदी नळातील बारीक धारेचे पाणी तोंडावर शिंपडून ते एका नव्या दिवसाची सुरुवात करतात. पहाटे पहाटे आंघोळ करून पुरूष कैदी शुभ्र कपडे आणि गांधी टोपी घालतात तर महिला कैदी शुभ्र रंगाच्या साड्या परिधान करतात. त्यानंतर तुरुंगातील आपआपल्या ब्लॉकमध्ये बसून, रिकाम्या भिंतींकडे एकटक बघत कटू भूतकाळ आठवत संपूर्ण दिवस व्यतीत करणाऱ्या कारागृहातील कैद्यांच्या जीवनात अशा पल्लवित केल्या निशा पवार यांनी. कारागृहातील भिंतींच्या आत सर्वसामान्यांप्रमाणेच वावरणारे हे कैदी या भिंतींबाहेर मात्र बेड्या घातलेले, पोलिसांच्या आणि समाजाच्या कठोर नजरांसमोर असतात. तरीही आत येणार्‍या स्वच्छ सूर्यप्रकाशाप्रमाणेच भविष्यकाळाबद्दल त्यांच्या आशा पल्लवित होत आहेत.

image


ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची दिनचर्या वरीलप्रमाणे एका सर्वसाधारण माणसांसारखीच होती. पण त्यांची मनस्थिती प्रक्षुब्ध होती. मग ती सूड बुद्धीची, खिन्नतेची असो वा दु:खाची असो. काही वर्षभरापूर्वी ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहाची हीच परिस्थिती होती. पण गेल्या काही वर्षात निशा रमेश पवार यांनी आपल्या मेहनतीने तसेच आपल्या जवळील कला आणि कौशल्याच्या जोरावर ही परिस्थिती झपाट्याने बदलली. कर्तुत्ववान महिलांच्या यादीत त्यांची नावे कधीच येत नाहीत. मात्र त्यांचे कार्य हे नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहेत.

कारागृहातील सर्व कैदी खुनासारख्या विविध गंभीर गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत होते. पण असे म्हणतात की फक्त परीवर्तनशीलता ही एकमेव कायमस्वरूपी गोष्ट आहे. या नियमाने त्यांच्यामध्येही परीवर्तन झाले. त्याचे कारण म्हणजे निशा पवार या कारागृहातील कैद्यांना देत असलेले बेकरी उत्पादन प्रशिक्षण होय. कारागृहामध्ये विविध गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत असलेल्या अशा लोकांच्या जवळ जातानाही सामान्य माणसे एक प्रकारचा धसका घेतात. परंतू आपल्या जिद्दीने आणि मोठ्या धाडसाने निशा पवार यांनी कैद्यांना बेकरी उत्पादन प्रशिक्षण देण्याचे ठरवून कैद्यांना स्वावलंबी आणि सामाजिक दृष्ट्या जबाबदार बनविण्याचे ठरविले आणि त्यात ते यशस्वीही झाले.

पुणे येथे राहणार्‍या निशा यांनी २००७ मध्ये बेकरी आणि मिठाई बनविण्याचा कोर्स केला होता. त्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीसाठी अर्ज दाखल केला आणि त्यात त्यांना यशही मिळाले. आपण अवगत केलेले कौशल्य जर कारागृहातील कैद्यांना दिले तर त्यांना रोजगारही उपलब्ध होईल आणि जगण्यासाठी एक कारणही मिळेल, हा विचार करून त्यांनी मध्यवर्ती कारागृहातील कैदी महिला व पुरूषांना बेकरी उत्पादन कौशल्य शिकविण्यास सुरवात केली. गेल्या आठ वर्षापासून निशा पवार या कैद्यांना विविध बेकरी प्रोडक्ट आणि फरसाण बनविण्याचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी आपल्या करीअरची सुरवात कोल्हापूर शहरापासून केली. त्यानंतर पुण्यातील येरवडा जेलमध्ये त्यांनी ६ वर्ष प्रशिक्षण दिले आणि २०१४ मध्ये ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात बेकरी प्रशिक्षक (इन्स्ट्रक्टर) या पदावर त्यांची नियुक्ती झाली. या पदावर महाराष्ट्रातील केवळ दोनच महिला कार्यरत आहेत.

दररोज १५ ते २० कैद्यांना प्रशिक्षण देण्याचे त्यांनी ठरविले. कैद्यांची मानसिकता पाहून त्यांच्या सोबत त्यांना व्यवहार करावे लागतात. निशा पवार सांगतात, ‘‘ सुरवातीला मला थोडी भीती वाटायची की कैदी माझे म्हणणे ऐकतील की नाही? मात्र काळानुरूप सर्व काही सहज सोपे होत गेले. कारागृहातील कैद्यांना चिवडा, नानकटाई, केक, टोस्ट बनविण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली.’’ सकाळी ७.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत आठवड्याचे ६ दिवस हे काम चालत असल्याचे त्या सांगतात. तसेच कारागृहातील कैद्यांना प्रशिक्षण देताना आपल्यालाही बर्‍याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. तर बरेच कैदी आपले म्हणणे ऐकून घेतात. तसेच मी सांगितलेल्या गोष्टी ते गांभीर्याने देखील घेतात, असे निशा पवार सांगतात. याप्रकारच्या प्रशिक्षणाने ते थोडा काळ का होईना तणावापासून दूर राहत असल्याचे सांगून निशा पवार या आपल्या कार्याबाबत समाधान व्यक्त करतात.

कैद्यांमार्फत बनविलेले खाद्यपदार्थ, बेकरीचे पदार्थ हे जवळपास असलेल्या अनेक मॉल आणि जनरल स्टोअरमध्ये विकले जात आहेत. हे उत्पादन जेलच्या कँटीनमध्ये देखील उपलब्ध होतात. तसेच ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर असणार्‍या दुकानात हे खाद्यपदार्थ योग्य दरात मिळतात. तर सणासुदीच्या वेळेस या पदार्थांची खरेदी करण्यास ठाणेकर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यामुळे कैद्यांचे आयुष्य सावरू लागलेआहे. तसेच बंदिवासात असलेल्या कैद्यांना त्यांच्या मुक्ततेनंतर पुर्नवसनही करण्यात येत आहे. तुरुंगातील असंख्य कैद्यांच्या जीवनात एक यशाचे बीज पेरण्याचे कार्य माझ्या हातून घडले व प्रशिक्षण देताना त्यांच्यात होणारे बदल पाहून मला खूप आनंद आणि समाधान वाटते, असे निशा पवार यांचे म्हणणे आहे.

निशा पवार या कैद्यांसाठी जणू बाहेरच्या जगाची खिडकी आहे. त्या त्यांची संदेशवाहक, मार्गदर्शक आणि मैत्रीणही आहे, ज्यांच्या समोर ते आपलं मन मोकळं करतात. अशा या निशा पवार यांना मानाचा मुजरा!