छोट्या शेतकऱ्यांसाठी वरदान ‘कमल किसान’

छोट्या शेतकऱ्यांसाठी वरदान ‘कमल किसान’

Friday November 06, 2015,

3 min Read

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताची बहुसंख्य लोकसंख्या शेतीवरच अवलंबून आहे. पण गेल्य़ा काही वर्षांपासून कृषी क्षेत्राची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी आता शेती सोडून अन्य पर्यायांचा विचार करू लागले आहेत. अनेक कारणांमुळे हल्ली शेती करणं अत्यंत अवघड बनलं आहे. अशा वेळेस जर एखादी सुशिक्षित तरुण व्यक्ती आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करत असेल, तर ते नक्कीच कौतुकास्पद आहे. देवी मूर्ती ही अशीच एक तरुणी आहे. देवीनं ‘कमल किसान’ नावाची कंपनी सुरु केली आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत करणारी अनेक छोटी यंत्रं ही कंपनी तयार करते.

देवी मूर्तीनं इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यांनी उत्पादन व्यवस्थापक म्हणून धातूच्या पत्र्यांची निर्मिती सुरु केली. त्यानंतर बंगळुरुच्या आयआयएम मधून मास्टर्स इन एंटरप्रेनरची पदवी मिळवली.

देवी मूर्ती

देवी मूर्ती


उत्पादन व्यवस्थापक म्हणून मिळालेला अनुभव वाया जाऊ नये असं देवी यांना वाटत होतं. आपण स्वत:चं काही सुरु करावं अशी त्यांची इच्छा होती.त्याचदरम्यान त्यांच्या एका मित्रानं त्यांना शेतीची उपकरणं बनविण्याचा सल्ला दिला. हा सल्ला देवी यांना पटला असला तरी त्यांनी त्यावर दोन वर्षं संशोधन केलं. त्या शेतकऱ्यांना भेटल्या, अनेक ठिकाणी त्यांनी पाहणी केली. त्यातून त्यांना एक गोष्ट समजली ती म्हणजे शेतकऱ्यांना खरंच नवीन उपकरणांची नितांत गरज आहे.

शेती करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यानं शेतीचं उत्पादनही घटत चाललं आहे. शेतकऱ्यांकडे उपकरणं घेण्यासाठी पैसे नसल्यानं ते स्वत:च ती कामं करायचे. त्यामुळेच या शेतकऱ्यांचं आयुष्य थोडंसं तरी सुखावह व्हावं यासाठी या उपकरणांच्या माध्यमातून देवीनं शेतकऱ्यांना मदत करायचं ठरवलं. यामुळे उत्पादनातही वाढ होऊ शकते, जो शेतकरी आणि देशाच्या विकास वाढीसाठी एक चांगला संकेत आहे.


image


देवीनं २०१२ मध्ये कमल किसानची सुरुवात केली. कमल किसान छोट्या शेतकऱ्यांना शेतीत मदत करणारी उपकरणं तयार करते. ही उपकरण वापरायला अगदी साधी सोपी आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होतात आणि वेळही वाचतो. त्याचबरोबर उत्पादन खर्चही कमी होऊ शकतो.

बाजारात असलेली मोठमोठी यंत्रं छोट्या शेतकऱ्यांसाठी काहीच उपयोगाची नाहीत. कारण ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या जमिनी नाहीत , त्या शेतकऱ्यांसाठी ही यंत्रं अत्यंत खर्चिक आहेत. छोट्य़ा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या छोट्या छोट्या कामात उपयोगी पडणारी, सहज वापरता येणारी आणि कमी खर्चिक अशा उपकरणांची गरज होती. देवी यांनी कमल किसानमार्फत अशीच यंत्रं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली.कमल किसान हे छोट्या विक्री केंद्रांवर आधारित मॉडेल आहे. शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना सेवा पुरविण्यासाठी कमल किसाननं विविध ठिकाणी केंद्रं बनविली, त्यांची कार्यक्षेत्रं वाढविली, वेगवेगळे गट तयार केले. कमल किसानला मद्रास आयआयटीच्या ग्रामीण तंत्रज्ञान आणि व्यावसायिक केंद्रानं बियाणांसाठी पाच लाख रुपये दिले आहेत. कमल किसान ही चार लोकांची टीम आहे. त्य़ांनी त्यांचं सगळ्यांत पहिलं उत्पादन म्हणून राईस ट्रान्सप्लान्टरची निर्मिती केली. अन्य बऱ्याच यंत्रांवर काम सुरु आहे, तर काही बाजारात आली आहेत.

शेतकऱ्यांचा यंत्रांवर विश्वास नसतो. त्यामुळे यंत्रं, उपकरणं वापरण्यासाठी समजावणं हे खूप कठीण काम असल्याचं देवी सांगतात. पण देवी आणि त्यांची टीम सतत प्रयत्न करतात आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या शंकांचं समाधान करतात. उत्पादन वाढीसाठी या उपकरणांचा वापर कसा फायदेशीर आहे हे शेतकऱ्यांना समजावतात. देवी या त्यांच्या कार्यालयात कमी आणि शेतकऱ्यांबरोबर शेतात जास्त वेळ घालवतात. ५० हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं हे त्यांचं लक्ष्य आहे.