आम आदमी पक्ष हा एक प्रकारचा स्टार्टअप - आशुतोष

0

एकदा मी दिग्गज पत्रकार शेखर गुप्ता यांचा एनडीटीव्हीवरील 'वॉक द टॉक' कार्यक्रम पाहत होतो. मी या कार्यक्रमाचा नियमित प्रेक्षक नाही. मात्र दोन महाविद्यालयीन तरुण त्यांच्याशी बोलत असल्याचे पाहून मी तो कार्यक्रम पाहू लागलो. त्या मुलांची ओळख पटवण्यासाठी मला काही फार वेळ लागला नाही. ते दोघेजण देशातील ऑनलाईन बाजारपेठेतील एका प्रसिद्ध अशा स्नॅपडील कंपनीचे सह-संस्थापक कुणाल बहल आणि रोहित बन्सल हे होते. दोन लाख ७५ हजार विक्रेते आणि ३० दशलक्ष उत्पादने असलेली स्नॅपडील ही कंपनी भारतातील जवळपास सहा हजार शहरांमध्ये पोहोचलेली असून, त्यांचा इतिहास हा अवघ्या सहा वर्षांचा आहे. या दोन्ही तरुणांनी तिशीच्या पूर्वार्धातच स्टार्टअपमध्ये एवढे यश संपादित केले आहे.

शेखरशी बोलत असताना त्या दोघांनीही त्यांना आपल्या आजवरच्या अनुभवाबद्दल सांगितले. स्वतःची कंपनी सुरू करायचे निश्चित केल्यानंतर त्या दोघांनाही अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. २००७ साली त्या दोघांकडे फक्त ५० हजार रुपये होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांना कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पाच लाख रुपयांची आवश्यकता होती. त्या क्षणाला ते त्यांची कंपनी बंद करू शकत होते आणि एका चांगल्या ठिकाणी नोकरी करुन कदाचित यशस्वीदेखील झाले असते. मात्र कुणाल आणि रोहित यांनी हार न मानता आपल्या काही मित्रांकडून उसने पैसे घेऊन कर्मचाऱ्यांचा पगार दिला आणि कंपनी तशीच पुढे सुरू ठेवली. त्यानंतर २०१३ साली त्यांच्याकडे एक लाख डॉलर्स एवढी रक्कम जमा होती आणि त्यांना पाच लाख डॉलर्स एवढी रक्कम चुकती करायची होती. ही त्यांच्याकरिता निराशाजनक परिस्थिती होती. मात्र तरीही ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि पहा आज ते कुठे आहेत! या कठीण प्रसंगात कोणती उर्जा त्यांना सतत प्रेरणा देत होती, असे विचारले असता त्या दोघांनीही प्रांजळपणाने सांगितले की, 'त्यांचा स्वतःवर आणि त्यांच्या व्यवसायावर असलेला विश्वास'.

तो क्षण मला फार ओढ लावणारा वाटला. मला माझ्या स्वतःच्या अनुभवाची आठवण झाली. स्टार्टअपच्या आजच्या या युगात  आम आदमी पार्टी (आप) हादेखील एक वेगळ्या धाटणीचा राजकीय स्टार्टअप आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात सुरू केलेली चळवळ, ही खरी या स्टार्टअपचे मूळ आहे. राष्ट्रीय कल्पनेने प्रेरीत असलेली ही चळवळ काही आठवड्यांनी ती राष्ट्रीय व्याख्यानात बदलली. मात्र त्यातही अशी वेळ आली जेव्हा अण्णांनी वेगळे व्हायचे ठरवले तसेच अरविंद आणि त्याचे सहकारी ज्यांना राजकीय पक्ष स्थापन करायचा होता, त्यांना त्यांचे नाव न वापरण्यास सांगितले. त्यानंतर अण्णा यांचे अनुयायीदेखील मोठ्या प्रमाणात होते आणि त्यांची तुलना गांधी तसेच जेपी यांच्यासोबत करण्यात येत होती. प्रत्येक संभाषण हे त्यांच्या नावापासूनच सुरू होत होते आणि त्यांच्यावरच संपत होते. चळवळ पुढे नेताना त्यांच्याशिवाय कोणतीही रणनिती आखणे, याचा विचार करणेदेखील अशक्य होते. मात्र ते ठाम होते. कोणाचेही ऐकून घेण्यास ते नकार देत होते. हा जीवनमरणाचा प्रश्न होता. चळवळीने तिची समर्पकता जवळपास गमावली होती आणि यंत्रणा साफ करण्यासाठी राजकारण हा एकमेव मार्ग होता, असे अरविंद आणि त्याच्या सहकाऱ्यांचे मत होते. अण्णांशिवाय हे शक्य होईल का? हा प्रश्न होता. अण्णांशिवाय राजकीय पक्षाला कोणतेही भविष्य नाही, याच्याशी सहकाऱ्यांमधील एक गट सहमत झाला होता. हे वस्तूतः मेल्यासारखे होते. तो एक निर्दिष्ट करणारा क्षण होता. अखेरीस अरविंद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अण्णांशिवाय पुढे जाण्याचे ठरवले.

दिल्ली हे पहिले लक्ष्य ठरविण्यात आले. एका वर्षाच्या आत तेथे निवडणूका होणार होत्या. पक्ष उभा करणे, सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणणे आणि आम आदमी पक्ष हा कॉंग्रेस/भाजपला एक चांगला पर्याय ठरू शकतो, हे दिल्लीकरांना पटवून देणे, हे एक मोठे कार्य होते. शून्यापासून सुरुवात करायची होती. भ्रष्टाचारविरोधातील चळवळीत दिल्ली हे महत्वाचे केंद्र होते, हे सत्य नाकारता येऊ शकत नव्हते. त्या चळवळीतील नेत्यांच्या विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मोठ्या प्रमाणात जागरुकता होती. मात्र सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे प्रत्येक केंद्रामध्ये संघटना असणे, आप पक्ष हा भारतीय राजकारणातील दोन बड्या आणि प्रस्थापित पक्षांचा ज्यांचा राजकारणातील अनुभव हा अनेक दशकांचा असून, प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांच्या पक्षाचे अस्तित्व आहे म्हणजेच भाजप आणि कॉंग्रेसचा पराभव करू शकतो, हे मत लोकांना पटवून देणे. आम्ही हे करू शकतो का, हा प्रश्न निर्माण झाला होता.

संघटनेला विश्वास होता की, हे होऊ शकते. जेव्हा निकाल जाहीर करण्यात आला, तेव्हा अनेक राजकीय पंडित स्तब्ध झाले होते. पारंपारिक विचारसरणी उच्चस्तराला आली होती. विश्लेषक आणि मतदानपूर्व अंदाज बांधणारे, जे 'आप'ला चार जागांशिवाय निवडून देत नव्हते, त्यांनी याचे वर्णन क्रांती असे केले होते. अशक्य गोष्ट घडली होती आणि तीदेखील अण्णा हजारेंशिवाय. हे सर्व घडले कसे? स्वतःवरील विश्वास आणि आमच्या ध्येयावरील श्रद्धा. माझे बोलणे आता कुणाल बहल आणि रोहित बन्सलप्रमाणे वाटले का?

दिल्लीत सत्ता मिळवल्यानंतर, आप सरकारने ४९ दिवसांत सत्ता सोडण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकजण चकित झाला होता. राजकीय पंडित, विश्लेषकांनी पुन्हा एकदा त्यांच्या निर्णयाबद्दल बोलणे सुरू केले होते. आप पुन्हा वर येऊ शकत नाही. सगळीकडे मोदींची लाट होती. सर्वसामान्य जनतेचे ते प्रिय होते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे विद्वान त्यांच्या प्रेमात पडले होते. भारतीय लोक त्यांच्यात भविष्यातील नेता पाहत होते. लोकसभा निवडणुकीत 'आप'चे नुकसानच झाले. दिल्ली जेथे आपची मजबूत पकड होती, तेथेदेखील सर्व जागा गमावल्या होत्या. आप आणि त्यांच्या नेत्यांचा सर्वसामान्य लोकांकडूनदेखील उपहास करण्यात येत होता. मोदींची लोकप्रियता सर्वोच्च स्तराला होती. चार राज्यांमधील विधानसभा निवडणूका त्यांनी एकहाती जिंकल्या होत्या. दिल्ली ही पाचवी होती. आमच्यासाठी ती करो वा मरोची परिस्थिती होती. आम्ही थोडे खाली आलो होतो मात्र बाहेर पडलो नव्हतो. कार्यकर्त्यांचे मनोधैर्यदेखील काही खास नव्हते. अरविंदच्या सत्ता सोडण्याच्या निर्णयामुळे लोकांच्या मनात राग होता. आम्हाला स्वतःच एकत्र यायचे होते आणि आम्ही पुन्हा जिंकू शकतो, यावर विश्वास ठेवायचा होता.

आम्हाला स्वतःवर काही शंका नव्हती. आम्हाला माहित होते की, लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यांचा विश्वास होता की, आम्ही सरळ आहोत मात्र अप्रामाणिक नाही. शासन हा मुद्दा होता. आम्ही बाहेर पडून लोकांना भेटण्याचे ठरवले. आम्ही आमच्या राजीनाम्याबद्दल माफी मागितली. तसेच दिल्लीकरिता आमची काय धोरणे आहेत तसेच आम्हाला माहित आहे, शासन कसे करायचे, हे लोकांना सांगितले. मात्र आम्हाला माहित होते की, आम्ही मोदींविरोधात लढत आहोत, जे गेल्या ३० वर्षातील प्रभावी आणि शक्तिशाली पंतप्रधान होते. ही लढत डेविड आणि गोलिएथमधली होती. त्यांच्याकडे सर्व स्त्रोत आणि पैसे होते आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे एक 'कल्पितकथा' होती ती म्हणजे, त्यांचा कधी पराभव होऊ शकत नाही. आमच्याकडे काय होते? स्त्रोत आणि पैसे यांच्याबाबतीत आम्ही त्यांना कुठेच तुल्यबळ नव्हतो. आमच्याकडे कल्पना होती, जी क्रांतीकारी होती आणि त्या कल्पनेवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी होती.

ही युक्ती काय होती? ती अशी की, परंपरागत राजकारण आणि राजकारणी या देशाला लुटत आहेत आणि हे बदलायला हवे. भारत हा असा देश आहे ज्याला एक शासनकर्ता हवा. ही कल्पना अशी होती की, आम आदमीला अशाप्रकारे अधिकारसंपन्न करायचे की, सत्तेचा प्रवाह हा सर्वसामान्य माणसाकडून यायला हवा. प्रामाणिक, स्वच्छ आणि परवडणाऱ्या राजकारणाबद्दलची ती कल्पना होती. आप हे वाहन होते. आम्हाला त्या कल्पनेची शक्ती माहित होती. आम्हाला निराश व्हायचे नव्हते, फक्त संयम ठेवायचा होता. आम्ही तसेच केले आणि पहा आज आम्ही कुठे आहोत. आम्ही ७०मधील ६७ जागा जिंकल्या आहेत. ऐतिहासिक आणि अभूतपूर्व यश. गुरुत्वाकर्षणाला विरोध करणारी कृती.

आता दिल्लीतील सरकार एक नवी चर्चा देशाच्या राजकर्त्यांसमोर ठेवणार आहे. ज्या कल्पनेने आम्ही दिल्लीत विजयी झालो तीच लाट आता पंजाबमध्येदेखील आहे. जर सर्वकाही व्यवस्थित पार पडले तर २०१७ साली आम्हाला पंजाब आणि इतर अनेक राज्यांमध्ये तसाच विजय मिळेल. जर कुणाल आणि रोहितने हार मानली असती तर आज शेखर गुप्ताने या व्यवसाय प्रतिनिधींची मुलाखत घेतली नसती. तसेच अरविंद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जर त्यांच्या युक्तीवर विश्वास ठेवला नसता तर आज जे काही मी लिहितो आहे, ते मी लिहिलं नसतं. स्टार्टअप्स हे सर्वकाही कल्पना, स्वतःवरील विश्वास, सातत्य आणि संयम यांच्यावर आधारीत असतात. हे जे कोणी पार पाडतात ते जिंकतात. रोहित आणि कुणाल हे विजेते आहेत.

( या लेखाचे मूळ लेखक पत्रकार आशुतोष हे आम आदमी पक्षाचे नेते आणि राजकीय विचारवंत आहेत त्यांनी मांडलेल्या विचारांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.)

अनुवाद – रंजिता परब