बनारसमध्ये भीक मागणाऱ्या स्त्रियांना आत्मनिर्भर बनवले परदेशातील भगिनींनी 

0

मोक्ष नगरी काशीमध्ये दरवर्षी लाखो संख्येने यात्रेकरू येतात. सातासमुद्रापलीकडून आलेल्या यात्रेकरूनां येथील घाट आवडतात, तर कुणी येथील संस्कृतीमध्ये रमून जातात तर कुणी इथलेच होऊन जातात. पण अर्जेन्टिनाहून आलेल्या दोन बहिणींनी काशीमध्ये आपली  एक वेगळी ओळख व अस्तित्व निर्माण केले.  त्यांनी इथल्या अनेक स्त्रियांमध्ये जगण्याची एक नवी उमेद जागृत केली. जेसुमेल व साईकल नामक या दोघी बहिणींनी इथल्या स्त्रियांच्या आयुष्यात नवे रंग भरले आहे. मंदिराबाहेर, चौकात, स्टेशनवर भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला जगण्याचा मार्ग दाखवला. आपल्या मेहनतीने व अंगी असलेल्या गुणांमुळे आज त्यांच्या दोन वेळेसच्या जेवणाची सोय झाली आहे व हे कोणत्याही सरकारी योजनेद्वारे नाही तर या दोन बहिणींमुळे शक्य झाले आहे. आज या स्त्रिया टोपी, चप्पल, बांगड्या तयार करून घाटावर विकतात व त्या पैशातून आपला घरखर्च चालवतात तसेच आज त्यांची मुलं पण शाळेत जाऊन  शिक्षण घेत आहेत.

सुमारे पाच वर्षापूर्वी जेसुमेल काशीमध्ये आल्या होत्या. काशीच्या या घाटांबद्दल त्यांना एक ओढ निर्माण झाली त्या रोज घाटावर तासंतास बसून गंगेच्या पाण्यावर पडणाऱ्या सूर्यकिरणांना न्याहाळत बसायच्या. इथल्या चाली-रिती, संस्कृती, अदब समजण्याचा प्रयत्न करायच्या, पण एक गोष्ट नेहमी त्यांना खटकायची, ती म्हणजे इथले भीक मागणारे मुलं व स्त्रिया, हे चित्र त्यांना नेहमीच विचलित करत आले. जेसूमेल यांना ही गोष्ट इतकी खटकली की त्यांनी भीक मागून खाणा-या स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी प्रेरित केले..........

युवर स्टोरीशी बोलतांना जेसुमेल सांगतात की, "माझ्यासाठी बनारसच्या घाटांवरील हे दृश्य खरच त्रासदायक होते. भूक व गरिबीशी लढणाऱ्या या स्त्रियांना बघून माझी झोपच उडाली व एक दिवस यांची परिस्थिती बदलण्याचा मी जणू विडाच उचलला. तेव्हापासून आजपर्यंत मी या उद्देशासाठी झटत राहिले".

जेसूमेल यांच्यासाठी हे ध्येय सोपे नव्हते, यासाठी सगळ्यात मोठी अडचण ही भाषेची होती कारण एकमेकांना त्यांची भाषा कळत नव्हती. परंतु जेसूमेल यांनी हार मानली नाही. तेथील स्त्रियांना व मुलांना त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण होऊन त्यांच्या भावनांना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी त्यांनी हिंदी भाषा शिकायला सुरवात केली. जेसूमेल आता शुद्ध हिंदी बोलायला शिकल्या. या स्त्रियांना त्या योग्यप्रकारे समजावू शकतात तसेच या स्त्रियापण आढेवेढे न घेता आपले गाऱ्हाणे त्यांच्या समोर मांडतात. .......

जेसूमेल यांनी काशी येथील अस्सी, दशाश्वमेध व शीतला घाटावर भीक मागणाऱ्या समुद्री, चंद्री, सपना व लीला सारख्या अनेक स्त्रियांना संघटीत करून स्वखर्चाने कामासाठी त्यांना प्रशिक्षित केले. आज या स्त्रिया पर्स, खेळणी, माळा व अगरबत्ती बनवतात. आज यांच्या बनवलेल्या उत्पादनाची बाजारात धूम आहे. जेसुमेल या सामानाला आपल्या बरोबर आर्जेन्टिनाला नेऊन त्यांची विक्री करतात. काही स्त्रियांनी घाटावरच स्वतःचे दुकान उघडलेले आहे. प्रथम जेसू सहा महिने इथे रहात असे पण या वर्षी त्या वर्षभर इथे राहणार आहे. भीक मागणारे हात आज कष्ट करायला शिकले. चांद सांगतात की, "जेसु यांचे उपकारच आहे की आज आम्ही स्वत: च्या पायावर उभे आहोत, आमचे मुलं पण भीक मागण्याऐवजी शिकायला शाळेत जातात. आमच्यासाठी हे एका स्वप्नापेक्षा कमी नाही, आम्ही आमच्या आयुष्यात अशा दिवसाची कधीच कल्पना केली नव्हती.” जेसू यांच्या कार्याला आज बनारस पण सलाम करतो. या गरीब स्त्रियांच्या कामाबद्दलच्या आत्मियतेने शहरातील काही संस्था आज जेसू बरोबर कार्यरत करत आहे.

या स्त्रियांसाठी जेसू आज एखाद्या देवदूत प्रमाणे आहे. निश्चितच स्वत:वर विश्वास व ती करण्याची हिंमत असेल तर कोणतेही काम अवघड नाही. ज्यांनी परिस्थिती पुढे हार पत्करली अशा स्त्रियांसाठी जेसूमेल हे उत्तम उदाहरण आहे.

लेखक : आशुतोष सिंग

अनुवाद : किरण ठाकरे