‘पिपल ट्री’ची सावली बेरोजगारांची माऊली!

0

भारत एक विकसनशील देश आहे. देशात गेल्या १५-२० वर्षांत विकासकार्यांचा वेग कमालीचा वाढलेला आहे. शहरी भागांतून गृहनिर्माण प्रकल्प, मॉल्स आणि कार्यालयांसाठी जिथे आधुनिक इमारती उभ्या राहात आहेत, तिथे ग्रामीण भागांपर्यंतही पक्के रस्ते वेगाने तयार केले जात आहेत. पायाभूत रचना आणि बांधकाम क्षेत्रात त्यामुळेच कुशल कामगारांना मोठी मागणी आहे. एका अंदाजानुसार येत्या दहा वर्षांत जवळपास ५० लाख कामगारांची गरज पडणार आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपल्याकडे श्रमिक नाहीत. वास्तविक पाहाता सुशिक्षित बेरोजगारांची संख्या आपल्याकडे भरपूर आहे, पण शिकलेले-सवरलेले बेरोजगार श्रमाला प्रतिष्ठा देत नाहीत. मोजकेच या क्षेत्राकडे वळतात. या क्षेत्राची प्रकृतीच अशी काही आहे, की ती या शिकल्या बेरोजगारांना मानवत नाही. संतोष परुळेकरांनी ही बाब हेरूनच ग्रामीण युवकांना एक उत्तम भविष्य उपलब्ध करून देण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे.

संतोष यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात एक यशस्वी आयटी व्यावसायिक म्हणून केली. पुढे ही नोकरी सोडून त्यांना गरीब कुटुंबांतील अल्पशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून प्रयत्न सुरू केले. ‘पिपल ट्री’चा पाया रचला. बांधकाम क्षेत्रातील प्रशिक्षणात आज पिपल ट्री एक नावाजलेले नाव आहे.

संतोष परुळेकर यांचा जन्म मुंबईचा. मुंबईतीलच ‘व्हीजीआयटी’मधून त्यांनी इंजिनिअरिंग केले आणि टाटा कंपनीत नोकरी सुरू केली. नोकरीत असतानाच त्यांनी ‘कॉम्प्युटर सायन्स’मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. नंतर त्यांनी ‘सिटी कॉर्प’मध्ये काम केले. सिटी कॉर्पने त्यांना विदेशातही संधी दिली. सहा वर्षांनंतर संतोष यांनी ‘थिंक सिस्टिम’ नावाची कंपनी जॉइन केली. मोजक्या कालावधीत त्यांनी कंपनीला दोनशेहून अधिक ग्राहक मिळवून दिले. संतोष यांचे हे यश मोठेच होते. आपल्या गुणवत्तेच्या बळावर नोकरीदरम्यानच संतोष कंपनीच्या व्यवस्थापनातला एक महत्त्वाचा घटक बनले. इथे नोकरी करत असतानाच त्यांनी ‘एमबीए’ केले. लगेचच ‘एसकेएस’ नावाच्या ‘मायक्रोफायनांस इन्स्टिट्यूट’मध्ये नवी जबाबदारी स्वीकारली. इथे त्यांना मायक्रोफायनांसचा कारभार वाढवायचा होता. कारभार वाढवायचा तर कामकाज नेमके समजून घ्यायला हवे म्हणून त्यांनी आंध्रप्रदेशचा दौरा केला. गावपातळीवर लोकांशी संपर्क वाढवला. काही काळ इथं घालवला.

संतोष यांना देशातील तरुणांना सोबत घेऊन काही करून दाखवायचे होते. जेणेकरून तरुणांना दोन पैसे मिळावेत. नेमका मायक्रोफायनांसच्या विस्ताराचा तो काळ होता. ‘रिलायंस’ आणि ‘भारती’सारख्या मोठ्या कंपन्याही या क्षेत्रात उतरलेल्या होत्या. ‘एमएफआय’च्या (मायक्रोफायनांस इन्स्टिट्यूट) कार्यप्रणालीबद्दल संतोष तसे नाराजच होते. ‘एमएफआय’ बेरोजगार तरुणांसाठी कुठलीही आश्वासक पावले उचलत नसल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. कर्ज देताना तरुणांनाच विश्वासपात्र मानले जात नाही. संतोष यांनी मग ठरवले, की असे काही करावे जेणेकरून बेरोजगार तरुणांना दोन पैसे कमावण्याची संधी मिळू शकेल. शैलेंद्र आणि विक्रम या दोन मित्रांना सोबत घेऊन संतोष यांनी ‘पिपल ट्री’चे रोपटे रोवले.

‘पिपल ट्री’च्या माध्यमातून तरुणांना नोकरीसाठी प्रशिक्षित करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. पण प्रशिक्षण कुठल्या क्षेत्राचे द्यावे म्हणून मग त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांचे बारकाईने निरीक्षण सुरू केले. अखेर असे ठरले, की तरुणांना बांधकाम क्षेत्राचे प्रशिक्षण द्यावे. बांधकाम क्षेत्रात व्यापक संधी आहेत. ग्रामीण तरुण या क्षेत्रात सहज कार्यक्षम ठरू शकतात. संतोष आणि त्यांच्या दोन्ही भागीदारांनी प्रत्येकी ५० लाख रुपयांची गुंतवणूक केले. दोन ‘स्ट्रॅटेजिक’ गुंतवणूकदार आणि एका ‘व्हेंचर’ भांडवलदाराने बाकी पैसा ओतला. अशा पद्धतीने नोव्हेंबर २००७ मध्ये ८ कोटी रुपयांच्या निधीसह ‘पीपल ट्री’ नोंदणीकृत झाली. हैदराबादेत २५ एकर जमिनीवर त्याची उभारणी झाली. तरुणांना प्रशिक्षण सुरू झाले. एकावेळी जवळपास २०० तरुण लाभ घेऊ लागले. पीपल ट्रीने ऑस्ट्रेलियातील एक कंपनी ‘टीएफई’समवेत करारही केला. कंपनीचे लोक पीपल ट्रीमध्ये येऊन युवकांना प्रशिक्षण देतात. बांधकाम क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करण्यासाठी तरुणांना आठवडाभराचे निवासी प्रशिक्षण दिले जाते. नंतर या तरुणांना ‘पीटीव्हीपीएल’ चमूसह ६ महिन्यांच्या कालावधीसाठी बांधकामांच्या ठिकाणी तैनात केले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी नोकरी या तरुणांना दिली जाते. दोन वर्षांच्या अनुभवानंतर तरुणांचे समूह बनवले जातात. फायद्यातील भागीदारीच्या आधारावर या समूहांना सरकारी कंत्राटे मिळवून दिली जातात.

पिपल ट्रीने आतापावेतो २० हजारांहून अधिक तरुणांना प्रशिक्षण दिलेले आहे. देशभरात आज पिपल ट्रीची २७ प्रशिक्षण केंद्रे सुरू झालेली आहेत. पाठ्यवेतन म्हणून या तरुणांना ७ हजार ६०० ते १० हजार रुपये दरमहा दिले जातात. प्रशिक्षणादरम्यानच तरुणांच्या कमाईला सुरवात झालेली असते. प्रशिक्षणाअंती अपवाद वगळता जवळपास सर्वच तरुणांना नोकरी मिळालेली असते.

संतोष यांचे हे ‘सोशल एंटरप्रायजेस’ आज अल्पशिक्षित ग्रामीण तरुणांसाठी एक वरदान ठरलेले आहे. पीपल ट्रीमध्ये प्रशिक्षण घेऊन ते एक यशस्वी बांधकाम कामगार म्हणून समोर येत आहेत. आपल्या देशातील विषमता पाहाता आर्थिक स्तरावरील किमान समतेसाठी का होईना… अविरत मेहनत करणाऱ्या संतोष परुळेकर यांना सलाम ठोकलाच पाहिजे. दूरदृष्टी ठेवून वाटचाल सुरू केली आणि हजारो तरुणांना रोजगार मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. संतोष यांच्यासारखी उदाहरणे खरोखर विरळीच.