गणित कोडींग आणि स्पर्धा: सिमरन डोकानिया जिंकण्यासाठी स्पर्धेत उतरते

गणित कोडींग आणि स्पर्धा: सिमरन डोकानिया जिंकण्यासाठी स्पर्धेत उतरते

Sunday November 29, 2015,

4 min Read

संगणकाच्या प्रोग्रामिंग मधील अडचणी गणिताच्या माध्यमातून सोडवणं हे मला फार आवडायचं, सिमरन डोकानिया सांगत होती, सिमरन कोडर म्हणून काम करते. (कोडर म्हणजे संगणकाचे प्रोग्रॅम तयार करणारी व्यक्ती.)


image


ती सध्या बेंगळूरूच्या इंटरनेशनल इन्स्टीट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नोलॉजी मध्ये इन्फोर्मेशन टेक्नोलॉजीचं शिक्षण घेत आहे.

पण कोडींगच का मी तिला विचारलेल्या या प्रश्नावर तिने दिलेलं हे उत्तर.

" आमचं तिसरं सत्र सुरु होतं तेव्हा विवेक यादव या माझ्या सिनिअर ने आमच्या वर्गाला कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंग या विषयाची ओळख करून दिली. गणिताची आकडेमोड मला नेहमीच आकर्षित करायची, आणि लहानपणा पासूनच गणित हा माझा आवडता विषय होता. आणि कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंग हा विषय पण गणिताच्या जवळचा वाटला, म्हणजे गणित सोडवल्याप्रमाणे एक एक प्रॉब्लेम सोडवल्याप्रमाणे. गणिताप्रमाणे प्रोग्रामिंग मधील अडचणी सोडवणं यामुळे मी त्याकडे आकर्षित झाले आणि ते मला आवडायला लागलं."

सिमरन विवेकचे मनापासून आभार मानते, त्याच्यामुळे तिला कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंगची आवड तिच्या लक्षात आली आणि ती त्याकडे वळली. सिमरनने सप्टेंबर २०१४ पासून कोडींगच्या कामाला सुरवात केली, आणि हे काम फार कठीण नाही. फक्त उन्हाळी सुट्ट्यामधेच ती त्या कामात अडकते आणि थोडी गंभीर होते.

सिमरनने भाग घेतलेली पहिली स्पर्धा म्हणजे मोरगन स्टेनली कॉडेथोन. ही स्पर्धा डिसेंबर २०१४ मध्ये पार पडली." मी त्यावेळी पुरेसा अभ्यास केला नव्हता त्यामुळे मला थोडी भीती वाटत होती, पण भीती वाटत असतानाही त्या स्पर्धेचा अनुभव मनोरंजक होता.पहिल्या ५० विद्यार्थ्यांमध्ये मी स्थान पटकावलं." तिने हसत हसत सांगितलं.


image


सिमरनचा जन्म मुंबईचाच. ती इथेच लहानाची मोठी झाली, तिला तीचं शहर आवडतं. " मी माझ्या आयुष्यातील बराचसा काळ मुंबईत राहिले, आणि भारतातील एक वेगवान शहर असलेल्या या मुंबईत मी अनेक गोष्टी शिकले. आज मी जे काही आहे ते या शहरामुळेच," असं सिमरन सांगते.

सध्या ती बेंगळूरूमध्ये आहे आणि ती सांगते तिच्या अभ्यासक्रमाची एकच तुकडी आहे. तिचा वर्गात २२ मुली आणि ३५ मुलं आहेत. तिच्या मते, संगणक विज्ञान हा मुलांचा विषय आहे, या जुन्या विचारसरणीमुळे अनेक मुली या विषयाकडे वळत नाहीत.

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, त्या बाळंतपणानंतर काम करणं सोडून देतात. घर आणि काम यामध्ये महिला या घराला प्राधान्य देतात, या विषयावर सिमरन म्हणते," हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, जर त्यांना पारंपरिक पद्धतीने मुलांना लहानाचं मोठं करायचं असेल तर त्यांनी काम सोडावं अन्यथा त्या काम सुरु ठेवू शकतात. काही वेळा काही कंपन्या महिलांना कामासाठी सोयीची वेळ देत नाहीत त्यामुळेही महिला नोकरी सोडतात. माझं वैयक्तिक मत असं आहे की, ज्या महिला आई होणार आहेत, त्यांची विशेष काळजी कंपन्यांनी घेतली पाहिजे. कारण या महिलांना घरची आणि कामाच्या ठिकाणची अशी दोन्हीकडची जबाबदारी सांभाळायची असते.

नुकत्याच झालेल्या हॅकररँक विमनस कप स्पर्धेत सिमरनने तिसरा क्रमांक पटकावला. ती तिच्या मैत्रिणी बरोबर यात सहभागी झाली होती. सिमरन तिचा हा अनुभव सांगत होती," आम्हाला हे अजिबात अपेक्षित नव्हतं. आम्ही पहिल्या १०० क्रमांकात स्थान मिळवण्याचं आमचं लक्ष होतं आणि आम्ही ते नक्की करू हे पण माहित होतं. पण आमच्या या यशामुळे आम्हीच आश्चर्यचकित झालो."

सिमरनचा एमबीए करण्याचा विचार आहे. संगणक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तिला तज्ञ होण्याची तिची इच्छा आहे. " तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकं ज्या काही नवीन गोष्टी शोधत आहेत, त्यामुळे मी याकडे आकर्षित झाले, आणि या क्षेत्रात काहीतरी नवीन घडवण्याचा माझा मानस आहे."

शेर्ली सेन्ड्बर्ग आणि अनिता बॉर्ग या दोघी सिमरनच्या आदर्श आहेत. तिच्या नुसार या दोघींनी या क्षेत्रात जे काही कर्तृत्व घडवलं आहे, ते प्रेरणा देणारं असून, महिलांनी उच्च पदावर काम करण्याची स्फूर्ती या दोघींकडून मिळते. " त्यांच्या मते तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिला अधिक प्रभावशाली असतात आणि त्याचे फायदेही आहेत. अधिक महिला जर उच्च पदावर काम करू लागल्या तर ते सगळ्यांसाठीच योग्य ठरेल.

सिमरन धेय्यपूर्ती साठी जी काही धडपड करत आहे ती प्रशंसनीय आहे. ती महाविद्यालयात आहे तरीपण ती आपल्या ध्येयप्राप्तीसाठी गंभीरपणे प्रयत्न करत आहे." दिलेल्या वेळेत काम करायला मला आवडतं. कामाचं वेळा पत्रक आखून त्यानुसार काम करायला आणि ते वेळेत संपवायला मला आवडतं. यामुळे मला पूर्णतेच समाधान मिळतं आणि मी काही तरी मिळवलं आहे याचा आनंदही होतो. यामुळे काम शांतपणे आणि वेळेत पूर्ण होतं, आणि यामुळे सुधारणेला वावही मिळतो आणि काम उत्तम होण्याची प्रेरणाही."

सिमरन सारख्या अनेक मुली जर तंत्रज्ञान क्षेत्रात आल्या आणि त्या काम करत राहिल्या तर पुढील १० वर्षात तंत्रज्ञान क्षेत्र हे महिलांचं असेल.


लेखिका : तन्वी दुबे

अनुवाद : श्रद्धा वार्डे