“तुम्ही भेट देत असलेल्या स्थानाला, काहीतरी परत करणेही गरजेचे असते, यावर माझा विश्वास आहे” – रुतावी मेहता

“तुम्ही भेट देत असलेल्या स्थानाला, काहीतरी परत करणेही गरजेचे असते, यावर माझा विश्वास आहे” – रुतावी मेहता

Wednesday March 16, 2016,

5 min Read

“ वयाच्या सोळाव्या वर्षी मला पहिल्यांदाच एकटीने प्रवासाला जाण्याची संधी मिळाली. सर्वसाधारण एसटी बसमधूनच मी कोल्हापूरला निघाले होते. वेगवेगळ्या बसेस बदलण्याचा अनुभव आजही माझ्या लक्षात आहे. मी एकटीच चालली आहे, वगैरे, असा कोणताही विचार मी त्यावेळी केला नव्हता. या सगळ्या नवीन संज्ञा आहेत. या प्रवासादरम्यान बाईक चालविणाऱ्या एका बाईंशी झालेली भेट, आजही मला चांगलीच आठवते. त्यांनी पारंपारीक नऊवारी साडी नेसली होती आणि त्या चक्क राजदूत चालवित होत्या. महत्वाचे म्हणजे त्या सत्तरीच्या घरात होत्या! आमच्या गप्पांना सुरुवात झाली आणि आपल्या यजमानांबरोबर बाईकवरुन केलेल्या रोड ट्रीपविषयी त्या मला सांगू लागल्या आणि ही कल्पना माझ्या मनात भरली,” रुतावी मेहता सांगतात. रुतावी आज एक आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल ब्लॉगर, सोलो ऍडवेंचरअर आणि सोशल मिडीया इव्हँजलिस्ट आहेत.

image


हॉटेलियर ते बाईकर आणि सोलो ट्रॅव्हेलर

एवढ्या वर्षांमध्ये रुतावी यांनी हॉटेलियर, सेल्स आणि मार्केटींग एक्झिक्युटीव्ह, सोशल मिडीया स्ट्रॅटेजिस्ट आणि इंटरनेट मार्केटर अशा नाना प्रकारच्या भूमिका केल्या. पण या सगळ्या काळात एक गोष्ट मात्र कायम होती, ती म्हणजे ‘प्रवास’ या गोष्टीवरील त्यांचे प्रेम आणि त्यासाठीचे प्रचंड वेड.... “ मी सर्वप्रथम शिकलेले आणि प्राविण्य मिळविलेले कौशल्य म्हणजे छायाचित्रण... मी लवकरच रॉयल एनफील्डच्या प्रकल्पात सहभागी झाले. हाच तो काळ होता, जेंव्हा मी बाईक चालवायला शिकले. मी त्यावेळी अगदी नवीन होते आणि मला ‘राईडर विथ ए कॅमेरा’ ही संकल्पना कळू शकत नव्हती. पण राईडर आणि बाईकरमधील संकल्पनात्मक फरक समजल्यानंतर, मला समजले की मला बाईक चालवायची होती पण ती एका छायाचित्रकाराच्या दृष्टीकोनातून,” रुतावी सांगतात.

लवकरच त्या उर्वशी पाटोले यांना भेटल्या आणि ‘द बाईकरनी’ चा एक भाग झाल्या. “ इंटरनेट मार्केटींगच्या माध्यमातून मी बाईकरनी विषयी ऐकले होते आणि ती शैली शिकण्यास सुरुवात केली,” रुतावी सांगतात. हे सगळे तेंव्हा घडत होते, जेंव्हा रुतावी या हॉटेल उद्योगातच होत्या. याच काळात त्यांनी स्वतःचे काहीतरी सुरु करण्याचा निर्णय घेतला. “ मी सगळे सोडले आणि बहिणीला भेटण्यासाठी कतारला गेले. हा एक खूपच चांगला निर्णय होता, कारण, इथेच, मला प्रवास आणि पर्यटनाबाबत खूप जास्त समजले. मी कतार टुरीझमबरोबर माझ्या पहिल्या कामाला सुरुवात केली. त्यांच्याबरोबरच्या प्रवास प्रकल्पासाठी मी मार्केटींग आणि सोशल मिडीयाला एकत्र केले. काम सुरु झाले ‘आय लव कतार’. ती माझी पहिली वैयक्तिक कामगिरी होती,” रुतावी सांगतात.

यानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. रुतावी यांनी अनेक पर्यंटन महामंडळांबरोबर काम केले, त्यांच्यासाठी विविध संकल्पना आणि कल्पना विकसित केल्या. “ मी प्रवास आणि सोशल मिडीया क्षेत्रात प्रचंड काम केले. असाच एक प्रकल्प म्हणजे, ‘केरला ब्लॉग एक्सप्रेस’. जगभरातील पंचवीस ब्लॉगर्सना केरळची सफर घडविण्यात आली आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणच्या त्यांच्या अनुभवावर लेखन केले,” रुतावी सांगतात.

image


प्रवासः जबाबदारीच्या मार्गावरुन

एकटीने प्रवास करणाऱ्या स्त्रियांबाबत बोलताना, रुतावी सांगतात, “ तो एक अतिशय सुंदर अनुभव असतो. मला प्रवास करण्यातून नेहमीच आनंद मिळाला आहे. मग तो एकटीने केलेला असो किंवा गटाबरोबर केलेला, प्रवास हा नेहमीच आत्मशोधाविषयीचा असतो.” याशिवाय जबाबदार प्रवासावर रुतावी यांचा प्रचंड विश्वास आहे. “ दर वर्षी मी लडाखमधील शाळांमध्ये एक महिना शिकविण्याचे काम करते. हा स्वतःमध्येच एक अनुभव आहे. या शाळांपर्यंत पोहचण्यासाठी मला कितीतरी किलोमीटर चालावे लागते. त्या ठिकाणी मी विविध गोष्टी शिकवते, जसे की पुस्तक कसे वाचावे आणि त्यातील पात्रं कशी लक्षात ठेवावीत आणि बऱ्याच इतर गोष्टी... मी २००१ पासून लडाखला जाण्यास सुरुवात केली. माझा एका गोष्टीवर विश्वास आहे, जेंव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता, तेंव्हा त्या जागेला काहीतरी परत करणेही गरजेचे असते. तुम्ही प्रत्येक ठिकाणापासून एवढे काही घेत असता, मग काहीतरी परत का करु नये?” त्या म्हणतात.

रुतावी यांनी लक्षद्विपमध्येही आणखी एका प्रकल्प हाती घेतला होता. “ या बेटावरील रहिवासी लॉजिस्टीक्सचे व्यवस्थापन कसे करत असतील, याविषयी माझ्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. केवळ जलमार्गांनीच येथपर्यंत पोहचता येत असल्याने, येथे अनेक मर्यादा होत्या. तेथे छोट्या जमाती होत्या आणि त्यापैकी बहुतेक त्यांचे आयुष्य सामान्यपणे जगत होत्या. पण हे बेट केवळ पाच किलोमीटरचे आहे. सर्वात मोठ्या आकाराचे कालपेनी बेट हे बारा किलोमीटरचे आहे. मला या बेटाचा शोध घ्यायचा होता. महामंडळांद्वारा लक्षद्विपचा विकास कसा करता येईल, यावर एक लहानसा माहितीपट बनविण्याची माझी इच्छा होती, पण दुर्दैवाने, हा प्रकल्प सोडून द्यावा लागला,” रुतावी सांगतात.

नविन आव्हाने

देशाच्या विविध भागांत प्रवास करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रुतावी नेहमीच याबाबतच्या योजना आखत असतात. सध्या मुंबई ट्रॅव्हल मॅसिव्हच्या प्रमुख असलेल्या रुतावी यांची शहरामध्ये विविध ट्रॅव्हल मीट अप्स आयोजित करण्याची योजना आहे. त्याचबरोबर त्या एनडीटीव्ही गुडटाईम्सवरुन दाखविण्यात आलेल्या एव्हरेस्ट चॅलेंजमध्येही सहभागी झाल्या होत्या. “ मी कधीच एक ऍथेलेटीक व्यक्ती नव्हते. त्यामुळे खरं तर मी या कार्यक्रमाचा भाग होणे हे आश्चर्यकारक होते. एव्हरेस्ट बेस कॅंप म्हणजे नेमके काय, याची माहिती नसतानाही मी यासाठी अर्ज केला. मी अशा प्रकारचा उपक्रम कधीच पाहिला नव्हता. मी अंतिम फेरीतील स्पर्धकांपैकी एक होते आणि हा माझ्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्काच होता. खरं तर मी राजस्थानच्या माझ्या प्रवासाची योजनाही आखली होती आणि यासाठी माझी निवड झाल्याचा मेल मला मिळाला. थोडक्यात सांगायचे, तर मी त्या कार्यक्रमाचा भाग होते आणि ते खूपच कठीण होते. परतीच्या मार्गावर असताना मी पडले आणि माझा पाय एवढा दुखावला की शेवटी शेर्पाला मला उचलून आणावे लागले. माझ्या पायाची परिस्थिती अतिशय वाईट असल्याने, सर्वांनाच एक दिवस मागे थांबावे लागले. त्या सगळ्यांनीच मला प्रचंड सहकार्य केले. या ठिकाणी मी वाटून घेण्यास शिकले आणि मुख्य म्हणजे माणसाचे मन किती ताकदवान असते, तेदेखील समजले. आत्म्याची ताकद मला समजली. जसं ते म्हणतात, वर चढणे हे ऐच्छिक असते पण खाली उतरणे मात्र अनिवार्य असते,” त्यावेळच्या आठवणींना उजाळा देताना रुतावी सांगतात.

image


रिक्षेत स्वार

गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये रुतावी या ‘रिक्षा रन’ मध्ये सहभागी झाल्या होत्या. “ २०१० मध्ये मी रिक्षा रनबद्दल ऐकले. या कार्यक्रमाबाबत वाचत असताना, जेंव्हा मला समजले की भारतातच होत असलेल्या या कार्यक्रमात भारतीयांचा सहभाग मात्र नाही, तेंव्हा मला आश्चर्यच वाटले. मला हे खूपच विचित्रही वाटले. ते माझ्या हॉटेलवरुन जाणार होते आणि तेथेच रहात होते. त्यामुळे मी त्यांना या कार्यक्रमाबाबत विचारले आणि केवळ परदेशीच का, असा प्रश्नही उपस्थित केला. त्यांनी मला सांगितले की कार्यक्रम आयोजित करणाऱ्या एडवेंचरीस्ट या कंपनीचे लक्ष्य भारतीय नागरीक नाहीत. त्यामुळेच २००७ पासून एकही भारतीय यामध्ये सहभागी झालेला नाही. या रिक्षा रनमध्ये सहभागी झालेल्या ट्रॅव्हल ब्लॉगर्सना मी ओळखत होते. ते केवळ दोनच जण होते, डेरीक आणि ब्रायन, आणि त्यांनी मला त्या वर्षी सहभागी होण्याविषयी विचारले,” रुतावी सांगतात.

याचा मार्ग वर शिलॉंगपर्यंत जातो आणि बारा दिवसांत हा रस्ता पूर्ण करणे गरजेचे आहे. या प्रवासाचे सर्व व्यवस्थापन त्यांच्याकडूनच केले जाते. या रनमध्ये सहभागी होणाऱ्या रुतावी या पहिल्याच भारतीय महिला ट्रॅव्हल ब्लॉगर्स ठरल्या. भारतीय स्पर्श लाभलेल्या त्यांच्या टीमचे नाव होते ‘टीम रोमांचक’..

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित :

बिनधास्त,बेधडक ‘बायकरणी’ आव्हान देती पुरुषांच्या मक्तेदारीला. . .


image


लेखक – सिंधू कश्यप

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन  

    Share on
    close